विराज हॉस्पिटलला पोहोचला तेव्हा मीरा आय.सी.यु च्या बाहेर अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालत होती. विराजला बघून तिचा जीव भांड्यात पडला.
"मीरा अगं झालंय काय नक्की? तू फोनवर पण काही नीट सांगितलं नाहीस?", विराज तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"सॉरी विराज तुला एवढ्या रात्री इकडे बोलावून घेतलं, पण मला काही सुचतच नव्हतं. मी घरी गेले तेव्हा काकू अंगणात पायरीवर बसून होत्या, त्यांना दरदरून घाम फुटलेला. तोंडातून शब्द फुटत नव्हते. मी पाणी वगैरे दिलं त्यांना आणि आत घेऊन जात असताना त्या बेशुद्ध पडल्या. आणि मी.. आणि मी", झालेला प्रसंग आठवून मीराच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती आपल्या हातांत तोंड लपवून रडायला लागली. विराजने तिला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि ती शांत होईपर्यंत तो फक्त तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेऊन बसून राहिला. काही वेळाने डॉक्टर आले तेव्हा त्यांच्याशी बोलायला दोघं उठून उभे राहिले.
"मीरा, वेळेत आणलंस हां तू त्यांना इकडे. त्यांचं बी.पी. खूपच वाढलं होतं. गोळ्या घेत नाहीयेत का त्या वेळेवर?", डॉक्टरांनी मीराला विचारलं.
"नाही डॉक्टर. तसं काहीच नाहीये. मीच रोज माझ्या हाताने त्यांना गोळ्या देते. आणि मागच्या वेळेला तुम्ही सांगितल्या प्रमाणे त्या नियमित फिरायला वगैरे पण जातात. सगळी पथ्य पाळतात", मीरा स्वतःशीच विचार करत बोलत होती.
"हं.. मग त्यांना काही मानसिक तणाव आहे का? औषधं-गोळ्या, व्यायाम ह्या सगळ्यांनी तुमचं शरीर तंदुरुस्त राहू शकतं पण शेवटी माणसाच्या मानसिक अवस्थेवर पण खूप काही अवलंबून असतं", डॉक्टरांच्या या प्रश्नावर मीराकडे काही उत्तर नव्हतं. काही गोळ्या लिहून देऊन डॉक्टर निघून गेले. काकूंना भेटून आल्यावर मीरा आणि विराज बाहेर आले.
"मीरा तू काही खाल्लयंस का? मला तर खूप भूक लागलीये. चल इकडे जवळंच काहीतरी खाऊन येऊ", विराज मीराला बाहेर येताना म्हणाला. तिला तसं बिथरलेलं, रडवेलं झालेलं बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. सगळी बंधनं विसरून तिला आपल्या मिठीत घ्यावं आणि जगातल्या सगळ्या दुःखांपासून तिचं रक्षण करावं असं त्याला वाटत होतं. पण त्यांच्या सकाळच्या बोलण्यानंतर त्याला त्यांच्यातल्या मैत्रीच्या नात्याची सीमा ओलांडायची नव्हती. म्हणून तो तिला अवघडल्यासारखं होणार नाही याची काळजी घेत योग्य अंतर ठेऊन वागत होता.
थोड्यावेळाने मीरा आणि विराज जवळच्या उडपी हॉटेलात जेवत होते. पण मीराचं लक्ष खाण्यात नव्हतं. "मीरा, काकू बऱ्या आहेत आता. तू नको टेन्शन घेऊस. लवकरच ठणठणीत बऱ्या होतील त्या", विराज तिला समजवायला म्हणाला.
"तू ऐकलं नाहीस का विराज डॉक्टर काय म्हणाले? औषधांनी त्यांचं शरीर ठणठणीत राहील, पण मनाचं काय?", मीरा विराजकडे बघत म्हणाली. "आता तुझ्यापासून काय लपवायचं. काकूंनी तुला सगळं सांगितलंच आहे. अविबद्दलही तुला माहितीच आहे. त्यांचा जीव तुटतो रे अविशी बोलायला. इतकी वर्ष होऊन गेली झाल्या प्रकाराला, काका गेले, काकूंचंही आता वय होत चाललं आहे. उतारवयात त्यांना वाटणारंच ना मुलाशी, नातवंडांशी बोलावं. त्यांना भेटायची आशा तर त्यांनी कधीच सोडून दिली आहे. पण अविकडून काहीतरी खबरबात यायला नको का? वाईट या गोष्टीचं वाटतं की मी ह्यात काहीच करू शकत नाही", मीरा डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली.
"असं कसं काही करू शकत नाहीस? तू आधीच खूप करतेयस त्यांच्यासाठी मीरा. आणि त्याही तुला मुलीसारखंच मानतात. तुझ्या इथे असण्यानेच त्यांना खूप आधार मिळतो. मागे त्या बोलल्या होत्या मला", विराज तिला समजावत होता.
"मलाही असंच वाटत होतं रे इतके दिवस. पण कदाचित मुलापासून लांब राहायचं दुःख काय असतं ते मला आई झाल्याशिवाय नाही कळणार. त्यांचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे याबद्दल मला तसूभरही शंका नाही. पण अवि त्यांचा सख्खा मुलगा आहे ना रे. त्याच्या आठवणीने व्याकुळ होणं स्वाभाविक आहे. मला राहून राहून प्रश्न पडतो, अविला कधी त्यांची आठवण येत नसेल का? कोणी स्वतःच्या आईपासून एवढं कसं दुरावू शकतं. आणि या सगळ्यात काय चूक होती काकूंची? काकांच्या नशिबात तर अविला शेवटचं बघणं ही नव्हतं. तसं काकूंच्या बाबतीत व्हायला नकोय मला", मीरा पुढे म्हणाली. गरम कॉफी पोटात गेल्यावर तिला थोडं बरं वाटत होतं. थोडावेळ मीरा आणि विराज दोघं गप्पं बसले होते.
"मी एक सुचवू का मीरा? नाही म्हणजे मला मान्य आहे हा तुमच्या घरातला प्रश्न आहे आणि मला कदाचित यावर काही बोलायचा अधिकार नाहीये. पण बरेचदा प्रश्नाचं उत्तर खूप सोप्प असतं आणि म्हणूनच ते आपल्याला सुचत नाही. तू अविला फोन करून त्याच्याशी एकदा बोलत का नाहीस?", विराजने मीराच्या डोळ्यात बघत विचारलं. तिला ते सुचवताना त्याला किती त्रास होत होता ते त्यालाच माहित होतं.
अविला फोन करायच्या नुसत्या कल्पनेनेही मीराच्या अंगावर शहारा आला. "असं कसं मी त्याला अचानक फोन करू? त्याचं लग्न झाल्यापासून आम्ही एकमेकांशी बोललो नाही आहोत. त्या घटनेला पण आता खूप वर्ष होऊन गेली आहेत. आणि त्याच्या बायकोला त्याचं त्याच्या आई वडिलांशी बोललेलं आवडत नाही मग मी त्याला फोन केलेला कसं आवडेल. उगाच माझ्यामुळे त्यांच्यात प्रॉब्लेम नको", मीरा म्हणाली. खरं तर अविला फोन करायची हिम्मत तिच्यात नव्हती.
"मीरा, आत्ता तूच म्हणालीस ना, झाल्या प्रकाराला वर्ष होऊन गेली आहेत. तो तिकडे त्याच्या संसारात रमला आहे. तो ही हे सगळं विसरला असेल. तू फक्त त्याला फोन करून काकूंच्या तब्येतीबद्दल सांग. त्यानंतर त्याच्या बायकोला आवडत नसेल तर तू त्याच्याशी बोलू नकोस, पण जर तुझ्या फोन करण्याने काकू आणि अवि मधलं अंतर दूर होणार असेल तर ते चांगलंच आहे ना?", विराज पुढ्यातला डोसा संपवत म्हणाला. मीराला त्याचं बोलणं पटत होतं. एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. काकूंसाठी ती एवढं तर करूच शकत होती.
"आता तू तुझा डोसा संपव बरं का, नाहीतर मला इतकी भूक लागलीये की मी तो पण खाऊन टाकेन", विराज मीराचा विचारमग्न चेहरा बघत म्हणाला. तशी मीरा हसली. आल्यापासून त्याने पहिल्यांदाच तिला हसताना बघितलं होतं.
जेवून झाल्यावर विराजने मीराला हॉस्पिटलला आणून सोडलं. तिला तिकडे एकटं सोडून त्याच पाय निघत नव्हता. तो हेल्मेट घालून निघणार तेवढ्यात मीरा म्हणाली, "विराज, मला बोलायला जरा अवघडल्यासारखं होतंय, पण मैत्रीच्या हक्काने काहीतरी बोलू का? तुला जमणार असेल तर तू आज इकडेच माझ्याबरोबर थांबशील का? मला खूप एकटं वाटतंय!" तिच्या त्या वाक्याने विराज विरघळला. क्षणाचाही विलंब न करता तो बाईक पार्क करून तिच्याबरोअबर आत आला.
दोन-तीन दिवसांनी काकू घरी आल्या. त्या हॉस्पिटल मध्ये असताना विराजची मीराला खूप मदत झाली होती अन आधारही वाटला होता. आत्ताही काकू घरी आल्यावर तो जाऊन त्यांची औषधं, फळं काय काय घेऊन आला होता आणि आता त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसला होता. त्याचं बोलणं ऐकून खूप दिवसांनी काकू खळखळून हसत होत्या. ते बघून मीराला बरं वाटलं. विराज गेल्यावर काकू औषधं घेऊन झोपायला निघून गेल्या.
मीरा गच्चीत उभं राहून विराजच्या बोलण्यावर विचार करत होती. अविला फोन करण्यासाठी मनाची तयारी ती गेले दोन दिवस करत होती, आता शेवटी ते करायची वेळ आली होती. तिने अमेरिकेतली वेळ बघितली. तिकडे सकाळचे ११ वाजले होते. मीराने थरथरत्या हाताने फोनवर अविचा नंबर टाकला. आज इतके वर्षांनीही तिला तो तोंडपाठ होता. पलीकडून कोणीतरी फोन उचलला, "हॅलो?"
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा