मीराच्या वाढदिवसाला आठवडा होऊन गेला होता. ह्या आठवड्यात मीरा आणि विराजचं भेटणं झालं नव्हतं. झाल्या प्रकारानंतर विराजने बरेचदा तिला फोन करायचा प्रयत्न केला होता पण तिने उचलला नाही. जे झालं त्यात त्याची फारशी चूक नसली तरी मीरावर चिडल्याचं त्यालाच जास्त वाईट वाटत होतं. मीराही त्याचे फोन घेत नसली तरी तिचीही चलबिचल होतंच होती. तिच्या वागण्या बोलण्यात एरवी असलेला उत्साह काकूंना गेल्यासारखा वाटत होता आणि त्याचं कारणही त्यांना माहीत होतं, मीरा आणि विराजचं भांडण त्यांनी ऐकलं होतं. सुरवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण ह्यांचं भांडण संपायची काही चिन्ह दिसेना तेव्हा त्यांनी विराजला फोन केला.
"विराज, अरे कुठे गायब आहेस? मीराशी भांडलास म्हणून मला पण विसरलास की काय", काकू म्हणाल्या.
"अहो काकू, कसं शक्य आहे ते. जरा बिझी होतो म्हणून जमलं नाही यायला. आणि मला बघून मीराचं परत डोकं फिरलं असतं म्हणून म्हंटलं नकोच", पलीकडून विराज म्हणाला.
"काय रे तुम्ही मुलं, भांडणं झाली कि सोडून द्यायची लगेच. जसे जसे दिवस जातात ना नात्यात दुरावा येतो. आम्ही इतकी वर्ष सुखी संसार केला कारण आम्ही भांडणं एवढी ताणायचो नाही", काकू म्हणाल्या.
"मला कुठे ताणायला आवडतंय काकू. मला मान्य आहे मी चिडायला नको होतं पण इतके दिवस होऊन गेले आता, मीरा तिच्या मनात काय चालू आहे ते कबूल करायला तयारच नाहीये. मला काहीच घाई नाहीये, पण तिच्याबाजूने पण थोडे प्रयत्न दिसले पाहिजेत ना? मला असं वाटतं ती अजूनही तिच्या भूतकाळातच अडकली आहे. त्यामुळे तिच्या समोर असणाऱ्या माणसांच्या भावना तिच्यापर्यंत पोहचतंच नाहीयेत", विराज हतबल होऊन बोलत होता. मीराचं प्रेम जिंकण्याचे त्याचे प्रयत्न सपशेल फसत चालले आहेत असं त्याला वाटायला लागलं होतं.
"मला कळतंय रे बाळा तुझी या सगळ्यात फार ओढाताण होतेय, आणि खरं सांगू का मीराची ही. माझ्या मुलीला ओळखते ना मी. तुझ्यापासून लांब असल्याचं दुःख तिलाही आहे, वाईट तिला पण वाटतंय, प्रेम तिच्याही मनात आहे.. फक्त ती मान्य करायला घाबरतेय. पुन्हा आपलं मन दुखावलं जाणार नाही ना हे पुन्हा पुन्हा तपासून पाहतेय. तिला जेव्हा मनातून वाटेल तेव्हाच ती हे मान्य करेल. आपण तिला उगाच जबरदस्ती करून काहीतरी उलटंच व्हायचं", काकू विराजची समजून घालत म्हणाल्या.
"खरंय, शेवटी आपण घोड्याला फक्त पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी त्यालाच प्यावं लागतं", विराज म्हणाला.
"माझ्या मीराला घोडा बोललास तू?", काकू चिडल्याचं नाटक करत म्हणाल्या. तसा विराज एकदम बावरला आणि काकू हसायला लागल्या.
"मज्जा केली रे. तू थोडा अजून पेशन्स ठेव. तिचं तिलाच जाणवेल बघ लवकरच", म्हणून काकूंनी फोन ठेवला.
संध्याकाळी मीरा ऑफिसवरून आल्यावर काकूंनी तिला चहा आणून दिला. ती सकाळचा पेपर वाचत चहा पीत होती. "काय गं, विराज बरोबर माझ्याशी पण बोलणं सोडलंयस का?", काकू तिच्या समोर बसत म्हणाल्या. विराजचं नाव ऐकून मीराने चमकून काकूंकडे बघितलं.
'काकूंना कसं कळलं? विराज आला होता का? आला असेल तर मला न भेटता गेला?', मीरा स्वतःशीच विचार करत होती.
"काहीपण काय काकू, आणि विराजशी तरी कुठे बोलणं सोडलंय. बिझी होते जरा म्हणून वेळ नाही मिळाला एवढंच", मीरा दुसरीकडे बघत म्हणाली.
"मीरा, मी काही तुला इकडे बसून आयुष्यावर प्रवचन देणार नाहीये, आत्तापर्यंत तू तुझे सगळे निर्णय स्वतःच घेतले आहेस आणि पुढेही तू तेच करावस असंच मला वाटतं. म्हणूनच विराज आणि तुझं नातं मैत्रीपुरतं मर्यादित ठेवायचं का त्यापुढे न्यायचं हे ही तूच ठरवलं पाहिजेस. फक्त तो निर्णय तू तुझ्या आधीच्या अनुभवांवरून घेऊ नयेस एवढंच मला वाटतं", काकू चहाचा घोट घेत म्हणाल्या.
"असं का बोलताय तुम्ही, भूतकाळाचा याच्याशी काही संबंध नाहीये. मला स्वतःलाच असं वाटतंय की आमच्यात फक्त मैत्री असावी. कारण मला त्यापेक्षा जास्त अजून काही वाटत नाही", मीरा पुन्हा काकूंची नजर चुकवत म्हणाली.
"एक तर तू दुसरीकडे बघून बोलल्यामुळे मला तुझ्या मनात काय चाललंय ते कळणार नाही असं वाटत असेल तुला तर ते चुकीचं आहे. माझं काय, तू म्हणशील ते मी खरं मानेन पण तुझं काय? गेले काही दिवस तुझं कशातच लक्ष नाहीये, फार काही बोलत नाहीस. विराजशी भांडण झाल्यापासून किती अस्वस्थ असतेस. हे काय सगळं फक्त एका मित्रासाठी आहे का? तुझ्या मनात काय चालू आहे तू माझ्याशी बोलू शकतेस", काकू म्हणाल्या.
"मलाच कळत नाहीये काकू कसं वागायचं. विराज खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, मला त्याच्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी वाटतं. पण भिती वाटतेय जे आधी एकदा झालंय ते परत झालं तर? आणि हे नातं पुढे गेल्यावर मला कळलं की मी अजून विराजला माझ्या आयुष्यातली अविची जागा द्यायला तयार नाहीये तर? त्याच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल ना. आणि जर विराजने अवि सारखं काहीतरी केलं तर? पुन्हा एकदा हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्यात नाहीये", मीरा म्हणाली.
"पुढे काहीतरी चुकीचं होईल म्हणून आज तुला वाटत असणाऱ्या भावना आत ठेऊन जगायचं हे मला तरी चुकीचं वाटतंय. मी तुला कुठलीच जबरदस्ती करणार नाही. पण आयुष्य असं एकट्यानं नाही जगता येत बाळा. मी किती दिवस पुरणार आहे तुला? आश्रमातली मुलं म्हणशील तर तीही पुढे मोठी होऊन त्यांच्या आयुष्यात बिझी होतील. तू एकटी पडशील मीरा आणि ते मला सहन नाही होणार", काकू पदराने डोळे पुसत म्हणाल्या तशी मीरा उठून त्यांच्या बाजूला जाऊन बसली.
"एवढी काळजी नका करू माझी, मी तुम्ही बोललात त्याचा विचार करेन, मग तर झालं?", काकूंच्या गळ्यात पडून ती म्हणाली.
काही दिवसांनी मीरा सकाळी ऑफिसला जायची तयारी करत असताना काकू तिच्या खोलीत आल्या. "घाईत आहेस का गं?", त्यांनी विचारलं.
"नाही घाईत असं नाही, बोला ना. तुम्हाला काही हवंय का?", मीराने थांबून काकूंकडे बघितलं.
"हो म्हणजे, आज अविच पत्र आलंय. आणि..", काकू बोलताना थांबल्या. मीरा प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत होती.
"आणि हे तुझ्यासाठी आलंय", काकू मीराच्या हातात पत्र देत म्हणाल्या. मीराने पत्राकडे बघितलं आणि तिच्या पायाखालची जमिनच सरकली. अविने तिच्यासाठी पत्र पाठवलं होतं? त्या पत्राकडे बघत असताना काकू तिकडून कधी निघून गेल्या तेही तिला कळलं नाही. तिने पत्र उघडून वाचायला सुरवात केली,
'मीरा,
प्रिय लिहिलं नाही कारण त्यासाठी आपल्यात आता साधं मैत्रीचं नातंही राहिलं नाहीये. त्याला कारणही मीच आहे म्हणा. मी हे पत्र लिहायला इतका उशीर का केला हे खरं तर मलाही माहित नाही. माझं लग्न झालं तेव्हा तुझ्याशी बोलायची हिम्मत नव्हती माझ्यात, काय सांगणार होतो मी तुला? त्यानंतर डेझीला आवडत नाही म्हणून माझा आई बाबांशी पण संबंध तुटला. त्यामुळे मी माझ्या चुकांची जबाबदारी कधी घेऊच शकलो नाही. पण आता मला हे अजून पुढे नाही ढकलायचं आहे. मीरा, आय एम रिअली सॉरी.
मला माहिती आहे माझ्या एका सॉरी म्हणण्याने तुझ्या आयुष्यातले गेलेले क्षण परत येणार नाहीयेत, तुला झालेला त्रास कमी होणार नाहीये. पण माझ्या मनातली अपराधीपणाची भावना घालवण्याचा हा एकमेव मार्ग मला दिसतोय. प्रेमाच्याही आधी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. एकमेकांशी सगळं शेअर करणारे, एकमेकांच्या सगळ्या निर्णयात साथ देणारे आणि दोघांपैकी कोणी चुकलं तर बोलून दाखवणारे. म्हणूनच आज मी तुला सांगतोय, मी केलेल्या चुकांच्या ओझ्याखाली तू तुझं आयुष्य नको जगूस. जेवढे क्षण आपण एकत्र घालवले, कदाचित तेवढेच आपल्या नशिबात होते. आणि मी तो प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय केला. आता आपण एकत्र नसलो तरी मी त्या आठवणी विसरून जायचा प्रयत्न कधीच केला नाही. कधीतरी एकटं जुनी गाणी ऐकत असताना आठवतात ते क्षण आणि त्यात चुकीचं काहीच नाही. भूतकाळ सगळ्यांचा असतोच की. पण तो भूतकाळ आहे हे लक्षात ठेऊन त्याला आपल्या वर्तमानात न येऊ देणं हे महत्वाचं!
पाहिलं प्रेम खास नक्कीच असतं पण शेवटचं प्रेम आयुष्यभरासाठीचं असतं आणि तेवढंच सुंदर असतं. मी केलेल्या चुकांमुळे तू स्वतःला त्यापासून वंचित ठेऊ नयेस एवढंच मला वाटतं. अवि आणि मीराचं प्रेम आपण आपल्या आयुष्यातली एक सुंदर गोष्ट म्हणून लक्षात ठेऊ की, पण त्याला तुझं अख्ख आयुष्य नको बनवूस!
आणि हो, बिलेटेड हैप्पी बर्थडे!
अवि '
मीराने पत्र टेबलवर तिच्या आणि अविच्या फोटोसमोर ठेवलं. डोळ्यातलं पाणी पुसून तिने त्या पत्राकडे आणि फोटोकडे एकवार बघितलं. तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. हे सगळं तिला मनात कुठेतरी आधीच माहिती होतं पण कोणीतरी बोलून दाखवायची गरज होती. तो फोटो आणि पत्र तिने तिच्या टेबलाच्या सगळ्यात खालच्या खणात जपून ठेऊन दिलं. अवि आणि मीराच्या प्रेमाची गोष्ट आज खऱ्या अर्थाने संपली होती. मीराच्या मनातही.. आणि आयुष्यातली नवीन नाती स्वीकारायला ती आता तयार होती..
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा