विराज त्याच्या ऑफिसमध्ये कामात बुडाला होता. म्हणजे त्याने स्वतःला बुडवून घेतलं होतं. मीराशी झालेल्या भांडणानंतर त्याचं कशातच लक्ष नव्हतं. रिकामं बसून सारखं तिच्या फोनची वाट बघण्यापेक्षा आणि तिला खूप मिस करण्यापेक्षा कामात बिझी असलेलं बरं म्हणून त्याचा सगळा वेळ ऑफिसातच जात होता. आज त्याच्या दिवसातल्या मीटिंग्सची तयारी करत असतानाच त्याला रिसेप्शन वरून फोन आला.
"आता सकाळी सकाळी कोण आलंय यार भेटायला", जरा वैतागातूनच विराज बाहेर आला आणि तो दारातच उभा राहिला. समोर मीरा.. हो मीराच उभी होती. डार्क निळ्या रंगाचा कुर्ता, केशरी लेगिंग्स, मोकळे केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, हातात एक नाजुकशी सोन्याची बांगडी आणि त्याला साजेसे कानातले.. विराजने दिलेले. किती सुंदर दिसत होती ती. नेहमीच्या तिच्या ड्रेसिंगपेक्षा एकदम वेगळी. विराज तिच्याकडे बघतच राहिला.
"मि. मोहिते, या तुम्हाला भेटायला आल्या आहेत", रिसेप्शनिस्ट बोलली आणि विराज भानावर आला.
"आर यु शुअर? ह्या मला भेटायला आल्या आहेत?", अजूनही त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
"विराज, काय रे तू पण. इथे अजून कोणाला भेटायला येणार मी? सॉरी तू कामात होतास का? मी अशी अचानक इकडे आलेय न सांगता", मीरा त्याच्याकडे बघत म्हणाली. विराजला उगाच ती थोडी लाजल्याचा भास झाला.
"कामात? छे छे,, गेले काही आठवडे मी वर्षभराचं काम केलं आहे. आणि तू अशी रोज येणार असशील तर मी उद्यापासून रिसेप्शनवरच बसत जाईन", विराज हसत म्हणाला. त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ते बघून मीराला बरं वाटलं. पण ती काही बोलणार इतक्यात कोणीतरी विराजला बोलावलं, "विराज, मीटिंग सुरु झाली आहे, सगळे वाट बघतायत"
"आय एम सो सॉरी मीरा, मला ह्या मीटिंग ला जावंच लागेल. मी तुला फ्री झालो कि फोन करतो लगेच, चालेल? मला खरं तर कुठेही जायची इच्छा नाहीये पण आता काय पोटापाण्याचा प्रश्न आहे, जावं लागेल", म्हणून विराज नाईलाजाने आत गेला. पुढचा दिवस त्याचा एवढा बिझी गेला की त्याला मीराला भेटायला काय तिला फोन करायला पण वेळ नाही मिळाला. जेव्हा त्याने घड्याळ बघितलं तेव्हा रात्रीचे ९ वाजत आलेले. त्याने मीराला फोन केला पण तिने उचलला नाही.
"काय फालतुगिरी आहे राव! नेमकं आजच ह्यांना उशिरापर्यंत मिटींग्स ठेवायच्या होत्या. म्हणा मीच गेले काही आठवडे चुकीची सवय लावली आहे ह्यांना. मी काय ऑफिसमध्येच पडलेला असतो असं वाटतं ह्यांना! आता उद्यापर्यंत वाट बघावी लागणार मला मीराला भेटायला", स्वतःशीच बोलत विराज ऑफिसमधून निघाला. तो ऑफिसच्या पार्किंगमध्ये आला तेव्हा नुकताच पाऊस पडून गेलेला, छान गार वारा सुटला होता. विराज बाईकला टेकून त्याचा फोन चेक करत होता, मीराचा काही मेसेज कसा नाही आलाय? मेसेज चेक करून झाल्यावर त्याने फोटोजची गॅलरी उघडली. त्यात मीराच्या बर्थडे पार्टीमध्ये काढलेले फोटो होते. तो प्रत्येक फोटोत मीराच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव बघत होता. ते बघताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत होतं.
"एकटाच काय हसतोयस अरे? लोकं वेडं समजतील बरं का. आणि फोटोमध्ये कशाला प्रत्यक्षात बघ की", मागून आलेल्या आवाजाने विराजने चमकून बघितलं. तिकडे मीराला बघून तो पटकन फोन बंद करून सरळ उभा राहिला.
"तू? एवढ्या रात्री इकडे? आणि तू सकाळपासून इकडेच थांबली आहेस का?", विराजने तिला गोंधळून विचारलं. त्यावर मीराने मानेनेच होकार दिला.
"अगं मी नंतर एवढा बिझी झालो कि वेळच नाही मिळाला. पण तू एवढा वेळ कशाला थांबलीस? मेसेज टाकायचास ना, मी आलो असतो तुला भेटायला. असं सुंदर मुलीला एकटीला ताटकळत ठेवणं बरं नाही वाटत ना", विराज त्याच्या मानेवरून हात फिरवत म्हणाला.
"आता मी एका हँडसम मुलाला इतका वेळ ताटकळत ठेवलं, त्याने माझी वाट बघितलीच की. मग मी फक्त दिवसभर थांबले तर काय झालं", विराजच्या डोळ्यात बघत ती म्हणाली. तिच्या बोलण्याचा अर्थ कळला तेव्हा विराजच्या डोळ्यात क्षणभरासाठी पाणी तरळलं.
"म्हणजे मीरा तू..", विराज काही पुढे बोलायच्या आधीच मीराने पुढे येऊन त्याचा हात हातात घेतला.
"विराज, आजपर्यंत मी माझ्या मनातल्या भावना आपल्या मैत्रीच्या नात्यामागे लपवत होते. पण तू माझ्यासाठी एका मित्रापेक्षा खूप जास्त आहेस. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम बघून मला किती आनंद व्हायचा मी सांगू नाही शकत, पण मी त्या प्रेमाच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन याची खात्री नव्हती. तरीही तू कायम माझा मित्र बनून राहिलास, माझ्या प्रतिसादाची वाट बघत. म्हणूनच आज मला आपल्यातलं हे अंतर संपवायचं आहे", मीरा बोलत होती आणि विराज भान विसरून तिच्याकडे पहात होता.
"तू काही बोलत का नाहीयेस? तुझा विचार बदललाय का? नाही म्हणजे मी समजूच शकते. मी इतके दिवस तुला अव्हॉइड करत होते. तुला दुसरी कोणी मुलगी आवडलीये का? मीच पुन्हा उशीर केला का?", मीराचा जीव आता वरखाली होत होता. तिची ती घालमेल बघून विराज मनोमन सुखावला.
"हो म्हणजे, माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी..", विराज बोलायला लागला आणि मीराने त्याच्याकडे पाठ फिरवली. तिच्या डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून अन तेव्हाच विराजने तिला स्वतःकडे ओढून आपल्या मिठीत घेतलं.
"मीरा, मी आज किती खुश आहे सांगू नाही शकत. ह्या दिवसाची मी किती आतुरतेने वाट बघत होतो तुला माहित नाही. आणि असं असताना मला काही आठवड्यात दुसरी कोणी मुलगी कशी आवडेल? आता काही बोलू नकोस, मला असंच तुझ्या मिठीत उभं राहायचंय", विराज बोलत होता अन मीरा त्याचं बोलणं मनात साठवून घेत होती. थोड्यावेळाने दोघं भानावर आले आणि मीरा विराजच्या मिठीतून सुटायची धडपड करत होती.
"मीरा अगं सोड मला, ऑफिसमधल्या कोणी बघितलं तर काय म्हणेल", विराज नाटक करत म्हणाला आणि मीरा लाजली.
"बरं आता या सुंदर मुलीला काही खाऊ घालणार आहेस का? सकाळपासून उन्हापावसात तुझी वाट बघून झिजले आहे मी", मीरा म्हणाली अन दोघं हातात हात घालून जवळच्याच हॉटेलात जेवायला निघाले.
मीरा आणि विराजचं प्रेम हळूहळू उमलत होतं. त्यांनी काकूंना लगेचच सांगितलं होतं पण लग्नाची इतक्यात घाई नको अशी मीराची सख्त ताकीद होती. एकमेकांना ओळखून वर्ष होऊन गेलं असलं तरी त्यांचं नातं तसं नवीन होतं. एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचा निर्णय घ्यायच्या आधी एकमेकांना ओळखणं खूप महत्वाचं होतं. आयुष्यातला प्रेमाचा हा नवीन टप्पा त्यांना एन्जॉय करायचा होता.
एका संध्याकाळी विराज असाच काकूंना भेटायला घरी आला होता. दोघं मिळून मीराला चिडवत होते. त्यांची ही नवीन टीम मीराला अजिबात आवडत नव्हती. पण मनात कुठेतरी तिला तिचं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. जेऊन झाल्यावर काकू झोपायला गेल्या आणि विराज पण घरी जायला निघाला. तेवढ्यात मीरा त्याचा हात धरून त्याला गच्चीत घेऊन गेली.
"काय गं, इकडे कुठे घेऊन आलीस. उशीर झालाय, निघालं पाहिजे मला आता", मीराच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट तिच्या कानांमागे करत विराज म्हणाला. "आणि मागच्या वेळेसारखी परत पळून जाऊ नकोस आज!"
"मागच्या वेळेला मी जरा विचित्रच वागले होते ना. आता प्रत्येक वेळेला गच्चीत आलं की मला तेच आठवतं म्हणून म्हंटलं ती आठवण पुसण्यासाठी नवीन आठवण बनवूया, चालेल?", हातातले हेडफोन्स पुढे करत मीरा म्हणाली. तिच्या त्या निरागसपणाने आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याच्या स्वभावाने विराज रोज नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. किती बदलली होती ती! आधी कायम बुजलेली, मोजून मापून वागणारी मीरा आता प्रत्येक क्षण एवढी बिनधास्त आणि मोकळेपणाने जगतेय, आणि त्या प्रत्येक क्षणावर आता त्याचा हक्क आहे या विचाराने विराज सुखावला.
"आय लव्ह यु मीरा", विराजच्याही नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या शब्दांनी मीरा लाजली. तिने पटकन दोघांच्या कानात हेडफोन्स घातले. विराजने मीराचा हात हातात घेतला. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि तिचं आवडतं गाणं लावलं..
'तेरे बिना जिया जाए ना, तेरे बिना जिया जाए ना,
बिन तेरे, तेरे बिन, साजना, सांस मै सांस आए ना ..'
लताजींच्या मधुर आवाजातलं गाणं ऐकत ते दोघं तो क्षण मनात भरून घेत होते..
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा