"काय रे विराज, मला काही कळू पण दिलं नाहीस तू. अंगठी वगैरे बनवून आणलीस, एकदम रोमँटिक आहेस हां", मीरा आणि विराज पर्वती वर गप्पा मारत बसलेले.
"हो मग, आहेच मी. खरं सांगू का? त्या दिवशी मी प्रपोज करायचं असं अगदी ठरवून नव्हतो आलो, पण तिकडे तुझ्याबरोबर स्टेजवर उभं असताना, तुला तसं भावुक झालेलं बघून मला राहावलंच नाही", विराज मीराकडे बघत म्हणाला.
"थँक्स", मीरा हसून म्हणाली.
"थँक्स? प्रपोज केल्यावर थँक्स म्हणणारी तू पहिलीच आहेस", विराज हसत म्हणाला.
"हो का? असं किती जणींना प्रपोज केलंयस तू? आणि थँक्स नाही मग काय म्हणू?", मीरा नाक फुगवून म्हणाली.
"म्हणायला बरंच काही म्हणू शकतेस. जे तू आत्तापर्यंत म्हणाली नाहीयेस ते म्हण ना", विराज मीराच्या खांद्यावर हात ठेऊन तिला जवळ ओढत म्हणाला.
"काय चाललंय तुझं? त्या काकू बघत गेल्या आपल्याकडे, उगाच नको तिकडे कशाला प्रेमाचं प्रदर्शन", मीरा म्हणाली पण प्रत्यक्षात तिलाही त्याचं असं तिच्यावर हक्क दाखवणं आवडत होतं.
"बघू दे की, लग्न ठरलंय आपलं आता. पण तू विषय नको बदलूस. ए मीरा, म्हण ना एकदा आय लव्ह यू ", विराजच्या तोंडून ते शब्द ऐकून मीराचा चेहरा लाल होत होता. म्हणजे तशी ती लाजरी बुजरी नव्हती पण विराज होताच एवढा चार्मिंग की तिच्यासारखी बिनधास्त, दिलखुलास मुलगीही लाजली.
"म्हणायला कशाला पाहिजे? तुला माहिती आहे की", मीरा विषय टाळत म्हणाली.
"असं कसं? मी एवढ्या लोकांसमोर गुढघ्यावर बसून तुला अंगठी घातली आणि तू मला एवढं नाही म्हणू शकत?", विराज म्हणाला.
"आत्ता नको, नंतर म्हणते", म्हणून मीराने लाजून दुसरीकडे तोंड फिरवलं. खरं तर तिने तिच्या मनात खूपवेळा विराजला आय लव्ह यु म्हंटलं होतं, पण असं तो समोर असताना, त्याची खट्याळ नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली असताना मीराच्या तोंडातून शब्दही फुटायचे नाहीत, त्यामुळे आय लव्ह यु म्हणणं तर दूरचीच गोष्ट होती.
अंधार व्हायला लागला तसा दोघं घरी यायला निघाले. विराजने मीराला घरी सोडलं. "चला निघतो आम्ही आता, जे ऐकायचं होतं ते मिळालंच नाहीये. वाटलं होतं एका बिनधास्त वकिलीणबाईंशी लग्न करतोय, पण तू तर एकदम भित्रीभागूबाई निघालीस. तीन शब्द बोलायला किती आढेवेढे", विराज बाईकवरून उतरून समोर उभ्या राहिलेल्या मीराला म्हणाला. मीरा नुसतीच त्याच्याकडे बघत उभी होती.
"मज्जा करत होतो हां मी. उगाच चिडायचीस नाहीतर. गुड नाईट", विराजच शेवटी म्हणाला. तो बाईक चालू करत असताना, मीराने त्याच्या कानाजवळ जाऊन आय लव्ह यु म्हंटलं आणि त्याच्या गालावर ओठ टेकवले. तिच्या स्पर्शाने भान हरपलेला विराज चालू बाईकला किक देत होता.
"पटलं का आता तरी मी भित्री नाहीये ते? आणि मि.मोहिते बाईक चालू झालीये ऑलरेडी, किक मारणं थांबवा आता. गुड नाईट", म्हणून मीरा हसत आत निघून गेली आणि विराज तिच्याकडे पहातच राहिला.
"काय मीरा बाई, एवढ्या हसत कुठे चाललात?", नुकत्याच आलेल्या मीराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून काकूंनी विचारलं. तसं आपण विनाकारण हसतोय हे मीराच्या लक्षात आलं, लगेच चेहऱ्यावर गंभीर भाव आणत मीरा म्हणाली, "हसत? नाही तर. उगाच कशाला हसू मी".
"लग्नाळू मुलीसारखी वागतेयस अगदी. पण चेहरा खुललाय बरं का. तुला सांगते मीरे, माझ्या डोक्यावरचं एक ओझं गेल्यासारखं वाटतंय मला. तुझं लग्न व्हावं, तुला समजून घेणारा, प्रोत्साहन देणारा आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा तुझ्या नशिबात यावा म्हणून किती प्रार्थना केल्यात सांगू. पण आता एकदा तुझं लग्न झालं की काही इच्छा नाहीत बघ माझ्या. हां नातवंडांना एकदा भेटावं असं वाटत होतं पण ते काही होईल असं वाटत नाही", काकू म्हणाल्या.
"असं का म्हणताय काकू, असं किती वय झालंय तुमचं. आणि नातवंड पण भेटतील तुम्हाला. तुम्ही फक्त हसत खेळत रहा हो", मीरा त्यांचे गाल ओढत म्हणाली.
"वा, आज मूड एकदमच चांगला आहे वाटतं, काही खास बोलला का विराज?", काकू तिला चिडवत म्हणाल्या तशी मीरा मगाशी झालेला प्रसंग आठवून लाजली.
"बरं ते सगळं जाऊ दे, हे बघ मी माझे दागिने काढून ठेवले आहेत इकडे, ते मोडून आपण तुझ्या आवडीचा एखादा गळ्यातलं कानातल्याचा सेट करून घेऊया का? माझा आशिर्वाद म्हणून देईन तुला लग्नात. म्हणजे हे सगळे दागिने तुझेच आहेत, पण जरा जुन्या घडणावळणीचे आहेत ना. आजकालच्या मुली घालत नाहीत असं काही म्हणून म्हंटलं", काकू मीरासमोर त्याचे दागिने मांडत म्हणाल्या.
"एवढं सगळं कुठे करताय काकू, आणि हे तुमचे दागिने आहेत ना, मी काय कधी वाटलं तर घेईन तुमच्याकडून मागून. शेवटी तुमच्याकडे राहिले काय किंवा माझ्याकडे काय", मीरा काकूंचा लक्ष्मी हार गळ्याला लावून आरशात निरखत म्हणाली. तेव्हा काकूंचा उतरलेला चेहरा तिला दिसला.
"काय झालं काकू? मी काही चुकीचं बोलले का? तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी घेईन हे दागिने. पण मोडून दुसरे नको करूया, तुमचा आशिर्वाद आहे ना, मग हेच घालीन मी", मीरा त्यांच्याजवळ बसत म्हणाली.
"तसं नाही गं बाळा, आत्ता अचानक मला जाणवलं आता तू सासरी जाणार. इतके दिवस तुझं लग्न करायचं म्हणून मी एवढी उतावळी झालेले की तू आता या घरात राहणार नाहीस हे माझ्या लक्षातच नाही आलं. माझं आपलं आईचं मन, मुलांनी कायम डोळ्यासमोर राहावं असच वाटतं. पण समाजाची रीत असते, लग्न झालं की पोरीला जावंच लागतं. इतकी सवय झालीये तुझी. पण होईल हळू हळू तुझ्या नसण्याची सवय सुद्धा", काकू डोळे पुसत म्हणाल्या. ते बघून मीराच्या काळजात चर्र झालं. काकूंपासून दूर, त्यांना असं एकट्यांना सोडून ती कशी जाणार होती?
रात्री मीरा झोपायला तिच्या खोलीत आली तेव्हा तिचा तोच विचार चालू होता. तेवढयात विराजचा फोन आला.
"हॅलो? अजून झोपला नाहीस तू?", मीराने विचारलं.
"कसलं काय, झोप उडालीये माझी मगाशी झालेल्या प्रकाराने", विराज म्हणाला आणि मीरा काही वेळासाठी डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेऊन हसली.
"बघ, म्हणून मी काही बोलत नव्हते. आता उडाली ना झोप", मीरा त्याला चिडवत म्हणाली.
"तू जर असं रोज करणार असशील ना तर मी रोज जागा राहायला तयार आहे. हां आणि जागणारच असू तर अजूनही बरंच काही करू शकतो", विराज तिला चिडवत म्हणाला.
"हे बरं सुचतं तुला पटापट. बरं ऐक ना, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं", मीरा म्हणाली.
काही दिवसांनी संध्याकाळी ऑफिसवरून विराज काकूंना भेटायला आला. "अरे वाह, आज माझी आठवण आली वाटतं. एरवी मीराला सोडून बाहेरच्या बाहेर निघून जातोस", काकू लटक्या रागाने विराजचे कान पकडत म्हणाल्या.
"तुमची मुलगी बोलवतच नाही मला घरात तर काय करणार, पण आज आलोय ना, मस्त तुमच्या हातचा गरम गरम आमटी भात खाऊनच जाईन आता. पण त्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय", विराज म्हणाला.
" काय रे, सगळं बरं आहे ना?", काकूंनी काळजीने विचारलं.
"तुम्ही पण ना, आनंदाची बातमी सांगतोय मी, एवढं काय टेन्शन घेताय. हे बघा", हातातल्या किल्ल्या त्यांच्या समोर धरत तो म्हणाला. अजूनही काकूंना काय चाललंय याचा उलगडा होत नव्हता.
"या आपल्या नवीन घराच्या किल्ल्या आहेत, इकडून पाच मिनिटावर आहे. रविवारी आपण तिघं घर बघायला पण जाऊ शकतो", विराज खुश होत म्हणाला.
"बापरे नवीन घर? म्हणजे तुम्ही दोघं लग्नानंतर इकडेच राहणार?", काकूंनी खुश होत विचारलं.
"काकू, मीरा तुम्हाला किती क्लोज आहे ते मला माहितीच आहे. तुम्ही समोर नसताना तिला कायम तुमची काळजी असते. अशात लग्नानंतर आम्ही शहराच्या दुसऱ्या बाजूला राहणार म्हणजे इकडे जास्त येणं पण होणार नाही. म्हणून म्हंटलं तुमच्या आसपासच राहावं. नशिबाने आपल्या ह्या बंगल्यासारखाच प्रशस्त आणि हवेशीर बंगला माझ्या एजन्टने दाखवला. मीरालाही खूप आवडला म्हणून आम्ही लगेच फायनल करून टाकला", विराज पुढे म्हणाला. त्याच्या बोलण्याने काकूंच्या जीवात जीव आला होता. त्यांच्या मनातल्या भावना ओळखून विराज त्यांच्यासमोर गुढघ्यावर बसला आणि त्यांचे सुरकुतलेले हात त्याने हातात घेतले,
"काकू, मीरासारखेच माझेही आई वडील मी लहान असतानाच गेले. त्यामुळे त्यांचं प्रेम कधी मिळालंच नाही. मीराबरोबर तुम्हीही माझ्या आयुष्यात आलात. तुम्ही जेव्हा मला फोन करून विचारता 'कुठे आहेस? वेळेवर घरी जा.. गाडी नीट चालव.. जेवणात लक्ष दे' तेव्हा खूप छान वाटतं. गेल्या काही वर्षात तुम्ही माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग कधी बनलात मला कळलंच नाही. म्हणूनच आता तुम्हाला असं एकटं सोडून तुमच्या मुलीला तुमच्यापासून दूर घेऊन जाणं मला पटत नाहीये", विराज बोलत होता.
"आणि तुमची मुलगी सारखी रडत असते, लग्नानंतर रडली की इकडे आणून सोडणार आहे मी तिला. बघा आत्ता पण रडतेय", दारात उभं राहुन त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेल्या मीराच्या डोळ्यात पाणी बघून विराज म्हणाला.
काकूंनी मीराला आपल्या जवळ बसवलं आणि विराजला दुसऱ्या बाजूला बसवलं. "आज मला माझं कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झाल्यासारखं वाटलं", त्या दोघांना जवळ घेऊन काकू म्हणाल्या.
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा