मीरा आणि विराज दार उघडून घरात आले. काही क्षण हॉल मध्ये घुटमळून मीरा त्याला तिच्या जुन्या खोलीत घेऊन गेली. तिच्या मनात होतं ते त्याला कसं सांगायचं याचाचं विचार ती करत होती.
"मीरा अगं पटकन सांगून टाक ना काय आहे ते, मला आता काळजी वाटायला लागली आहे हं", विराजला आता उत्सुकता सहन होत नव्हती.
मीराने तिच्या टेबलाचा खालचा खण उघडला, त्यात पत्रांचा खच पडला होता, "हे बघ". विराजला काहीच कळत नव्हतं. त्याने त्यातलं एक पत्र उचललं, पत्रावर दोन-तीन महिन्यांपूर्वीची तारीख होती. काकूंनी अविला लिहिलेलं पत्र होतं ते.
"मीरा हे.. हे पत्र तुझ्याकडे कसं? अवि इकडे आला होता?", विराजने विचारलं.
"नाही, हे पत्र इकडे आहे कारण ते मलाच पाठवलं होतं", मीरा खिडकीबाहेर बघत म्हणाली.
"पण ह्यावर तर अविचं नाव लिहिलं आहे मग ..", विराज बोलत असताना मीराने वळून त्याच्याकडे बघितलं.
"काकूंना पत्र पाठवणारा अवि मीच आहे. त्यांच्या सगळया पत्रांची उत्तरं मीच पाठवली आहेत", मीरा म्हणाली आणि विराजच्या पायाखालची जमीन सरकली. मीराने त्याला काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग सांगायला सुरवात केली, "मागच्या वेळी काकू हॉस्पिटल मध्ये असताना आपलं बोलणं झालं तेव्हा मी तुझ्या सांगण्याप्रमाणे अविला फोन केला. तेव्हा आमच्यामध्ये झालेला संवाद मी कोणालाच सांगितला नाहीये, आजपर्यंत.."
(भूतकाळात)
"हॅलो?", पलीकडून फोनवर अविचा आवाज ऐकून मीराच्या पोटात गोळा आला.
"हॅलो अवि? मी मीरा बोलतेय", मीरा कशीबशी बोलली.
"मीरा? असा अचानक फोन केलास? काही काम होतं का?", अविने विचारलं. इतक्या वर्षांनंतर बोलताना त्याचा पहिला प्रश्न हा होता?
"हो तुझ्याशी जरा बोलायचं होतं, तुला वेळ असेल आत्ता तर", मीरा म्हणाली
"हो बोल ना, ऑफिसमध्ये आहे पण थोडावेळ बोलू शकतो", अवि पलीकडून म्हणाला.
"अवि काकूंना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, त्याचं बी.पी खूप वाढलं होतं. डॉक्टरांचं म्हणणं पडलं त्यांना कसला तरी मानसिक तणाव आहे. आजकाल त्यांच्या बोलण्यात तुझं नाव खूप येतं त्यामुळे मला वाटतंय त्या तुझी खूप आठवण काढतात. तुझं लग्न होऊन, काकांना जाऊन आता इतकी वर्ष झाली, मग आपण आधी झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून जायला काय हरकत आहे. त्यांना खरंच तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे", मीरा बोलत होती पण अवि शांतच होता.
"मला माहितीये आपल्या भूतकाळामुळे तुझ्या बायकोला आपलं बोलणं, भेटणं आवडणार नाही. पण तू काकूंसाठी एकदा इकडे येऊच शकतोस की. तेव्हा मी हवं तर कुठेतरी निघून जाईन थोडे दिवसांसाठी. पण.. तू येशील का?", मीरानेच पुढे विचारलं.
"मला काय बोलावं कळत नाहीये मीरा, इतके वर्षांनंतर हे काय मध्येच? मला खरंच तिकडे यायला नाही जमणार, इकडचं काम, माझी फॅमिली सोडून कसं येणार तिकडे असं? आणि एकदा आलं की आईचं रडगाणं चालू होईल, 'थोडे दिवस थांब, परत ये, मला तिकडे घेऊन जा', आणि यातलं काहीच मला शक्य नाहीये", अवि म्हणाला. त्याच्या बोलण्यातल्या कोरडेपणाचं मीराला आश्चर्य वाटलं आणि चीडही आली.
"अवि, अरे काकू पण तुझी फॅमिलीच आहेत ना? तू त्यांच्याकडे पाठ फिरवलीस म्हणून ते सत्य बदलत नाही. त्यांची काय चूक होती रे सगळ्यात की तू त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकलेस? काका गेले तेव्हाही आला नाहीस. एकदाही असं वाटलं नाही का तुला की आपली आई कशी जगत असेल? भेटायला येणं दूर पण कधी फोनही करावासा वाटला नाही तुला? तू अमेरिकेला गेलास तेव्हाची गोष्ट वेगळी होती, दुसऱ्या देशांतून फोन/मेसेज करणं कठीण होतं, पण आता तर तसं नाहीये ना? मग कधीतरी त्यांना फोन करायला काय हरकत आहे? त्यांच्या तब्येतीचा तरी विचार कर", मीरा तिच्या रागावर नियंत्रण ठेवत बोलायचा प्रयत्न करत होती.
"फोनकरून काय होणार आहे? मला उगाच तिच्या अपेक्षा वाढवायच्या नाही आहेत. सुरवातीला फोनवर भागेल पण नंतर तिला इकडे यावंसं वाटेल, मी तिकडे यावं, असं वाटेल. आणि डेझीला काही ते पटेल असं वाटत नाही मला. मला ह्या सगळ्यामुळे माझ्या संसारात काही प्रॉब्लेम्स नको आहेत. आणि तब्येतीचं म्हणशील तर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे ने ना तिला. औषधांनी बरं होत नाही असं काही नसतं जगात. एक मिनिट, तुला पैसे हवे आहेत का तिच्या ट्रीटमेंट साठी? हवं तर एकदा पाठवेन मी, पण मला सारखं सारखं पाठवायला नाही जमणार", अवि बोलला. त्याच्या या बोलण्याने मात्र मीराचा स्वतःच्या रागावरचा उरला-सुरला ताबा सुटला.
"माझा विश्वास बसत नाहीये अवि की मी तुझ्यासारख्या मुलाकडून कसलीही अपेक्षा केली. तुला काय वाटतं, हा फोन मी तुझ्याकडून पैसे मागायला केलाय? ईश्वरकृपेने एवढी वाईट वेळ माझ्यावर आली नाहीये की माझ्या आईच्या उपचारांसाठी मला कोणासमोर हात पसरावे लागतील. त्यांचा तुझ्यासाठी जीव तुटताना बघून माझा जीव तुटतो आणि दुर्दैव असं की मला त्यासाठी काही करताही येत नाहीये. एक शेवटची अपेक्षा होती तुझ्याकडून की आता स्वतः बाप झाल्यावर आपल्या आई वडिलांची किती ओढाताण झाली असेल हे तुला कळेल पण तीही अपेक्षा सपशेल फेल ठरवलीस तू. राहिला प्रश्न तुझा आणि तुझ्या अमेरिकन कुटुंबाचा, ते तुला लखलाभ असो. काकूंची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. फक्त एक लक्षात ठेव अवि, जे आईचं प्रेम तू ह्या माजाने नाकारतोयस ना, ते सगळ्यांच्या नशिबात नसतं. आणि हे तुला कधी ना कधी कळेलच. आय होप तेव्हा खूप उशीर झाला नसेल", म्हणून मीराने फोन ठेऊन दिला. संतापाने तिच्या डोळयातून पाणी येत होतं.
(वर्तमानकाळ)
मीराने तिचं अविबरोबर झालेलं बोलणं जसंच्या तसं विराजला सांगितलं. ते ऐकून विराजचा पण संताप होत होता. अशी लोकं असतात जगात? इतकी निर्विकार आणि स्वार्थी?
"अविने त्या फोनवर हे स्पष्ट केलं होतं की त्याच्या आयुष्यात काकूंची काहीच जागा नव्हती पण हे सगळं मी त्या आईला कसं सांगणार होते जी डोळ्यात तेल घालून त्याची वाट बघत होती? म्हणून मीच त्यांना ते पत्र लिहिलं. तेव्हा माझा हेतू फक्त त्यांना पुन्हा एकदा अविशी बोलण्याचा आनंद देणं एवढाच होता. पण त्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यात आलेला बदल, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला तो त्यांच्यापासून हिरावून घ्यावासा नाही वाटला. त्यानंतर त्याही अविला म्हणजे मला पत्र पाठवायला लागल्या. मी अविने त्याच्या सोशल मीडिया वर टाकलेले काही फोटोज पत्राबरोबर काकूंना पाठवले, ते बघून त्यांनी सगळं विसरून त्यांना भरभरून आशिर्वाद दिला रे. असं असतं आईचं मन आणि ते मोडताना अविला काहीच कसं नाही वाटलं. मी बरोबर केलं ना विराज?", मीरा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. विराजला मीरासाठी वाईट वाटलं आणि तिचा अभिमानही वाटला.
त्याने तिला जवळ घेतलं, "बरोबर, चूक ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात मीरा. माणूस त्याच्या जवळच्या माणसांसाठी काहीही करायला तयार होतो. त्यांचा आनंद किती लाखमोलाचा असतो हे आपल्या दोघांपेक्षा जास्त चांगलं कोणाला कळणार. आणि तुझ्या वागण्याने कोणाला त्रास तर नाहीच झाला ना. तू जे केलंस त्यासाठी खूप हिम्मत आणि कोणावर तरी जीवापाड प्रेम करावं लागतं. तू जे केलंस ते एकदम बरोबर केलंस", तिच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत तो म्हणाला.
"पण मीरा, मला एक गोष्ट कळली नाही. जर काकूंना अविची पत्र तू पाठवत होतीस तर तुला ते पत्र कोणी पाठवलं होतं?", विराजने विचारलं,
"काकूंनी", मीरा हसून म्हणाली.
"मी माझ्या कोणत्याही पत्रात माझा उल्लेख टाळायचे, म्हणजे मुद्दामून नाही पण स्वतः पत्र लिहिताना स्वतःबद्दल कसं लिहिणार ना. त्यामुळे अविचा आणि माझा काहीच संपर्क नाहीये असं काकूंना वाटायला लागलं. त्यातच तू माझ्या आयुष्यात आलास. काकूंना मनापासून आपलं लग्न व्हावं असं वाटत होतं पण मी अजूनही भूतकाळातच अडकले आहे हे त्यांना दिसत होतं. म्हणून त्यांनीच ते पत्र मला लिहिलं. खरंतर अविशी झालेल्या फोननंतर माझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या सगळ्या भावना संपल्या होत्या, पण कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की आमचं नातं पण अविसाठी असं वरवरचं होतं का? काकूंचं ते पत्र वाचताना माझं मलाच जाणवलं भूतकाळ कसाही असला तरी तो आता भूतकाळ आहे आणि जसा मला काकूंचा त्रास बघवत नव्हता तसंच मला होणारा त्रास बघून त्यांचंही मन तुटत असणारंच. माझीच आयडिया त्यांनी त्यांच्या नकळत माझ्यावर वापरली. पण त्यांचं अक्षर मी लगेच ओळखलं आणि त्यांचा हेतूही. त्यांच्या त्या पत्रामुळेच मला माझ्या मनातल्या भावना, प्रेम व्यक्त करायला मदत झाली", विराजच्या गालावर प्रेमानं थापटी मारत मीरा म्हणाली.
"म्हणजे गेली काही वर्ष तुम्ही एका घरात राहून एकमेकींना पत्र पाठवत होतात? कमाल आहात हां तुम्ही दोघी माय लेकी", विराज म्हणाला आणि काही क्षणांसाठी दोघं सगळी दुःख विसरून खळखळून हसले!
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा