Login

आजकाल लग्न - भाग 1

Lgna
स्पर्धा - जलद कथा मालिका लेखन स्पर्धा
शीर्षक - आजकाल लग्न.... भाग 1


कथा मालिका, पात्र काल्पनिक आहे.


सुरेखा (सकाळी सोफ्यावर चहा घेत ) - "अहो आज रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सारखं आपल या अंगावरून त्या अंगावर कूस बदलणं, आधी तहान मग पाणी प्यायचं मग बाथरूम ला जायचं परत तहान हेच रात्रभर.. "


दिलीप (शेजारी एका खुर्ची वर चहा घेत ) - "अग झोप आली की पटकन झोपायचं."

सुरेखा -"माझ्या मेलीला झोप कुठे येते. तुम्ही मस्त घोरत असतात. "

दिलीप ( हसतात ) - " वा.. पेपर आला. पेपर वाचायला घेतात. "

सुरेखा - "हसू येत बरं तुम्हाला ... एवढा तरणा ताठा, एकुलता एक मुलगा, पस्तीशी आताच पार केली. एवढा शिक्षक, सरकारी पगार. त्याच लग्न जमेना. मला विचाराने झोप येईना. यांना हसू येत, याचं चहा, पेपर सगळं व्यवस्थित."

दिलीप - "तू एवढा विचार करून होतं आहे का लग्न त्याच?"

सुरेखा - "अहो तुम्ही काही खटपट करा झाले ना रिटायर आता. मागे एक स्थळ असेच गेले. त्यांना शेती हवी होती."

दिलीप -" मी सरकारी रिटायर माणूस. आता काय शेती करू म्हणतेस.. आणि त्यांना शेती हवी तर ती मुलगी काय शेती असती तर शेतीत राबली असती का? तिला नोकरी होतीच. "

सुरेखा -"शेतीच जाऊ द्या, कुठे वधू वर सूचक मध्ये नावं नोंदवा."

दिलीप "असं काय करतेस दोन -तीन वधू वर सूचक मध्ये नावं नोंदवलं. एकेकाला पाच -पाच हजार दिले वर्षभर 8-10 स्थळ सुचवले. प्रत्येक स्थळ. व्हाट्सअप वरच फोटो, बायोडाटा पाठवा. व्हाट्सअप वरच योग नाही. क्षमस्व. कुठे गोत्रच एक , कुठे नाडच एक. साधा पाहण्याचा कार्यक्रम नाही आजकाल. कांदे पोहे कार्यक्रम संपले आता."

सुरेखा - "इतके नकार पचवणे, परत लग्नाचं वय उलटून जुळेल अशी आशा, अपेक्षा ठेवून नॉर्मल आयुष्य जगणं सोपं आहे? मग घ्या डिप्रेशन.."

दिलीप - "आजकाल लग्न म्हणजे अवघड विघ्न.."


सुरेखा - "अहो सरकारी नोकरी आधी तुटून पडायचे. मुलीचा बाप जोडे झीजवायचा. आता शिक्षक नको, सरकारी पगारदार नको. बिझनेस वाला नको. पोरोहित्य नको. मिलटरी मध्ये नको. शेतकरी नको. मग आता पाहिजे तरी काय नक्की? कोणास ठाऊक "



क्रमशः