Login

आयुष्याचा जोडीदार भाग ९

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग ९


    ती कंपनीच्या मालकाशीच बोलतेय ह्याचं तिला भान नव्हत. एक मित्र म्हणून ती त्याला त्रास होऊ नये आणि त्याचवेळी कंपनीचे नुकसान होऊ नये या दोन्ही गोष्टींचा ती विचार करत होती. आता मात्र किरण चिडला, त्याला तिच्याकडून अशी वागणूक अपेक्षित नव्हती, तिने त्याचे काही ऐकून न घेताच त्याच्यावर बालिशपणाचा टॅग लावून टाकला होता, जे त्याला अजिबात आवडले नाही. शब्दाने शब्द वाढू लागला.

“मग काय आता मी तुझे अँप्रुव्हल घ्यायला हवे होते का? माझे स्वतःचे डोक काही वापरूच नको का?” काय तर म्हणे, आपले सगळे ठरले होते. तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे राधा. सगळे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. तू म्हणालीस उठ की, किरण उठणार आणि बस म्हणालीस की किरण बसणार. का तर मी लहान, मला स्वतःची अक्कल नाही. असे काय चुकीचे वागलो गं मी आणि झाले ना नुकसान कंपनीला, तर मी बघून घेईन तुला कशाला हवी इतकी काळजी!" किरण भयंकर चिडून म्हणाला 


        "मुळात मी इथे तुला स्पष्टीकरण द्यायला आलो हेच चुकले. असेही मला अक्कल आहे कुठे! सगळे काय ते मॅडम तुम्हालाच समजते आणि हो “फॉर युवर काईंड इन्फॉर्मेशन! मी तुला कॉल करत होतो, हे सगळे करायच्या आधी पण तुझा फोन लागत नव्हता. मनूबरोबर असशील, ह्या विचाराने मी परत कॉल केला नाही, डॅडशी बोलणे करूनच हे सगळे केले मी. तुला असे वाटते का गं की, सगळे तुलाच समजते. समोरच्याला काही कळतच नाही. हे असे वागतोस ना, म्हणून लोक लांब जातात तुझ्यापासून, कायमचे!" इतका वेळ राधा त्याच अपराध्यासारख ऐकत होती, ती उगीच त्याच्यावर वैतागली, हे तिला लक्षात आले होते. पण त्याच्या शेवटच्या वाक्याने तिच्या काळजाचा घाव घालून नकळतपणे तिला दुखावले होते. ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. तिच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने, ज्याच्याबद्दल तिच्या मनात अव्यक्त प्रेम होते, आदर होता, ज्याला ती मनाने सर्वस्व मानत होती, त्याने तिला असे म्हंटले होते. हा घाव मोठा होता तिच्यासाठी!

               आपण काय बोलून गेलो याची त्याला जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेली होती.

राधाने फक्त कसेबसे "सॉरी" म्हंटले आणि भरल्या डोळ्यांनी ती निघाली. किरणला क्षणभर काय करावे तेच समजले नाही.

        त्याने मुद्दाम तिला दुखावले नव्हते, पण यावेळी त्याची काही चूक नव्हती आणि राधाने त्याचे काही ऐकून न घेताच त्याला सुनावले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून तो भडकला. भानावर येत धावत तो राधाच्या मागे गेला. तिचा हात घट्ट पकडून त्याने तिला थांबवले. तिने त्याच्या हाताला जोरदार झटका देऊन स्वतःचा हात सोडवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड खूप घट्ट होती.

“माझा हात सोड प्लिज! मला काहीही बोलायचे नाही." राधा रडत हुंदका आवरत म्हणाली

“राधा, प्लिज माझे ऐकून घे. आय अम रिअली सॉरी!आय डीड नॉट मिन टू हर्ट यू. मी रागाच्या भरात काय बोलून गेलो, हे मला समजले नाही." किरण म्हणाला. 

“तू सॉरी नको म्हणू. चूक माझी आहे. आजही आणि प्रत्येकवेळी! तू काहीच चुकीचे म्हणाला नाहीस. खरेतर, तू माझे डोळे उघडले आहेस आज. मी माझ्या मर्यादेत राहून वागायला हवे होते. आय एम रियली सॉरी." राधा मात्र प्रचंड दुखऱ्या स्वरात म्हणाली

तिने पुन्हा त्याच्या हातातून हात सोडवायचा प्रयत्न केला. त्याची तिच्या हातावरची पकड अजूनच घट्ट झाली. तिचा हात तसाच पकडून किरण तिच्यासमोर आला. तिच्या मिटल्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहत होते. किरणविषयी राधाच्या मनात प्रचंड प्रेम होते. त्याने तिच्या जगण्याला एक आशा दिली होती.

सुख दुःख ज्याच्याबरोबर बोलता येत असे, असा तिचा तो जिवाभावाचा मित्र होता. खरेतर मित्राहून त्याची जागा जास्त होती तिच्या मनात. पण तिने त्याला कधी हे सांगितले नाही. कारण अखेरीस ती एक विधवा होती. तिला समाजभान ठेवणे गरजेचे होते.

तिच्या किरणबद्दलच्या या भावनेला समाज आणि किरण स्वतः तरी स्वीकारेल का? याची तिला भीती होती. रामबरोबर प्रतारणा केल्याची सल मनात घेऊन ती जगू शकली नसती. मनूला ती काय सांगणार होती. या सगळ्याचे तिच्या मनावर भयंकर दडपण होते म्हणून ती त्याच्याबरोबर असणाऱ्या मैत्रीतही खुश होती. आज मात्र ती दुखावली होती.

काही क्षणात तिच्या हातावरची पकड सैल झाली आणि त्याचा गरम श्वास तिच्या कानाला जाणवला. त्याच्या आवाजाने तिच्या कानाला गुदगुल्या झाल्या. “माझ्याकडे बघणार सुद्धा नाही आहेस का आता?” प्लिज, माफ कर ना मला. मी खरेच चुकलो गं. तुला हर्ट करायचा विचार मी स्वप्नातही नाही करू शकत. तू अशी रडायला लागलीस ना कि, मला सुचत नाही काय कराव. प्लिज.. प्लिज.. एकदा माझ्याशी बोल." किरण विनवणीच्या सुरात म्हणाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all