Login

आयुष्याचा जोडीदार भाग १०

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग १०

              राधाने हळूच आपले डोळे उघडले. पुढे बघते, तर किरण अगदी तिच्यासमोर दोन्ही कान पकडून उभा होता. त्याच्या नजरेत प्रचंड अपराधीपणाची भावना दिसत होती. तिला कधीच त्याला असे बघायला आवडत नसे. त्याची समंज्यसता त्याच्या निरागसपणातच होती.

             तो काही मुद्दाम तिच्याशी असे वागला नव्हता हे तिलाही माहित होते. त्याला तसे बघून तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. तिने त्याला माफ केले, हे लक्षात आल्याने त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने झटकन तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले. दोघांनाही तो स्पर्श सुखावून गेला. राधा तिच्या नकळत त्याला बिलगली. किरण अजूनच शहरला.

            तिला त्याच्याबद्दल असे काही वाटत असेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.

"मला आत्ता जे जाणवले ते खर आहे का? मला का नाही आधीच सांगितले कि, मी तुला आवडतो.” प्रचंड आनंदाने तिला दोन्ही हातानी घट्ट धरून त्याने तिच्या डोळ्यात खोलवर बघत विचारलं.
              
"शूsss ...!! (त्याच्यापासून लांब होत राधाने त्याच्या तोंडावर हात ठेवला) तुला माहिती आहे का किरण. काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या असतात. काही नात्यांचे आयुष्य न उलगडल्यानेच वाढते. आपले नातेसुद्धा असेच आहे. तुझ्यापुढे तुझे पूर्ण आयुष्य पडले आहे. त्यामुळे माझ्यासारखीचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर"

                "तू खुश आहेस ना यात माझा खरा आनंद आहे. मी माझे सगळे आयुष्य रामसोबत जगले आहे रे. रामनंतर तू माझ्या आयुष्यात येणे, हा मला माझ्या आयुष्याने दिलेला बोनस आहे. तो मला जगू दे. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, पण म्हणून मी स्वार्थी नाही होऊ शकत. शेवटी जरी कोणी बोलून नाही दाखवले तरी मी एक विधवा आहे, एका मुलीची आई आहे, काही झालेच नाही असे दाखवून तुला आणि स्वतःला फसवू नाही शकत मी." तिने त्याला वास्तवाची जाणीव करून दिली.

               तिच्या या बोलण्याचा किरणला आदर वाटत होता, पण म्हणून मन मारून जगणे हे त्याला मान्य नव्हते. तो स्वतः तसे करणार नव्हता आणि तिलाही ते करू देणार नव्हता. त्याने सरळ तिचा हात धरून तिला मंदिरात नेले आणि त्याने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला.

“खा माझी शपथ या देवासमोर! ज्याच्यावर तुझा प्रचंड विश्वास आहे आणि सांग मला माझ्याशिवाय तू राहू शकशील का? मला पूर्णपणे विसरून जाशील आणि आयुष्य जगशील. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय पण आजपर्यंत तुला काय वाटेल ह्या विचाराने गप्प होतो, माझे प्रेम कधी व्यक्त केले नाही. पण आज तुझे ही माझ्यावर प्रेम आहे हे कळल्यावर मी शांत नाही राहू शकत. माझ्या भावनांना आवर नाही घालू शकत. तू समाजाला घाबरून मागे हटत असशील किंवा मनूच्या विचाराने हा निर्णय घेत असशील तर तुझ्या कोणत्याही निर्णयात मी तुला पूर्णपणे साथ देईन पण एकच अट आहे, मला विसरून नवे आयुष्य जगायचे. पुन्हा नव्याने सुरुवात करायची." किरण तिच्या डोळ्यांत आरपार बघत म्हणाला.

            हे सगळे ऐकून राधाचे डोके जड व्हायला लागले होते. पुन्हा तिने तिचे आखून घेतलेले आयुष्य बिघडत होते. तिच्या जिवलग व्यक्तींची आणि तिची ताटातूट तिच्या नशिबातच लिहिलेली होती. तिला रडू कोसळले.

किरण तिच्या उत्तराची वाट बघत होता. राधा हतबल होऊन त्याच्याकडे बघत होती.

“ठीक आहे मला तुझे उत्तर मिळाले. आता इथून पुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही. असे समज की, मी सुद्धा तुझ्या आयुष्यात राम सारखाच आलो होतो. थोड्या वेळा करिता आणि तसाच निघून गेलो." तो कोरड्या आवाजात तिला म्हणाला आणि तिथून बाहेर पडला.

तो गाडीजवळ पोहचला असेल नसेल इतक्यात राधा धावत त्याच्यामागून आली आणि तिने किरणच्या खाड्कन एक तोंडात मारली. तो फक्त निर्विकारपणे तिच्याकडे बघत राहिला. ती मोकळी होत होती आणि त्याला तेच हवे होते. तिच्या मनातील भावनांचा बांध फुटला होता.

 “काय म्हणालास तू? राम सारखाच निघून जाशील!” पुन्हा बोल! काय समजतोस काय तू स्वतःला, अस बोलून खुप काही मिळवले आहेस तू असे वाटते का तुला? तुला काय हक्क आहे मला आणि मनूला असे एकटे सोडून निघून जाण्याचा? राम गेल्यावर खूप लढले रे मी एकटी जगाशी, पण तू भेटलास आणि मनाला आधार मिळाला. लढण्याची एक नवी उमेद मिळाली. स्वतःला तुझ्यावर सोपवून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला लागले. तुझ्या आधाराची भीती वाटण्या इतपत तुझ्यात गुंतत गेले." तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तरी ती जिवाच्या आकांताने त्याच्यावर ओरडून म्हणाली आणि त्याच्या छातीवर डोक ठेवून रडू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all