आयुष्याचा जोडीदार भाग १
राधा सर्वसामान्य घरातील एक मुलगी होती. घरातील सगळी जबाबदारी तिच्यावर होती. आई वडील जास्त थकले असल्याने ते तिला इच्छा असून देखील मदत करू शकत नव्हते, त्यामुळे ऑफिस आणि घर सांभाळताना तिची खूप तारेवरची कसरत होत होती. कष्ट केल्याशिवाय तिला पर्याय नव्हता, कारण तिच्या छोट्या पिल्लासाठी तिला काम करावेच लागणार होते. आपले दुःख विसरून तिला पुन्हा एकदा नव्याने उभे राहावे लागणार होते.
मनूच्या भविष्यासाठी तिला मेहनत ही घ्यावी लागणार होती. त्याचबरोबर आई बाबांनाही थोडी फार मदत करुन घरातील आर्थिक जबाबदारी पार पाडायची होती. अशातच तिला तिच्या जुन्या ऑफिस मधून बोलावणे आले. मि.शंशाक सरांनी तिला ऑफिस जॉईन करायला सांगितले कारण काही झाले तरी ती त्यांची बेस्ट एम्प्लॉइ होती.
मनूला शाळेत सोडून राधा लगबगीने स्कुटीजवळ आली. आधीच एक तर खूप उशीर झाला होता त्यात ट्रॅफिक लागणार म्हणजे ऑफिसला पोहोचायला अजून उशीर होणार म्हणून ती जरा टेन्शनमध्येच होती.
खरं तर आज तिला हाफ डे ची सुट्टी मिळाली हेच भाग्य होते. ऑफिसचे हेड सर मि. शशांक परदेशी सरांचा परदेशातून शिकून आलेला मुलगा, किरण परदेशी आज ऑफिस जॉईन करणार होता. मि.शशांक परदेशी सर आणि त्यांच्या पत्नी मिसेस शलाका दोघेही आपल्या मुलाला या फॅमिली डायमंड बिझनेसमध्ये सामिल करून घ्यायला खूप उत्सुक होते. कारण त्यांचा एकुलता एक मुलगा किरण एम. बी. ए. आपले शिक्षण नुकतेच पूर्ण करून तो भारतात परत आला होता, आणि आपल्या वाढत्या डायमंड बिजनेसचा डोलारा त्याने सांभाळावा अशी त्यांची खूप इच्छा होती.
ऑफिसमध्ये तसं त्याला फारसं कुणी ओळखत नव्हतं,परंतु त्याच्या हुशारीचे किस्से मात्र ऑफिसमध्ये पसरलेले होते. वेळप्रसंगी असलेले प्रसंगावधान आणि मोजके बोलून प्रश्न सोडवण्याची हातोटी खूप छान होती.
ऑफिसमधील स्टाफला त्याला भेटण्याची खूप उत्सुकता होती. त्यात तो आधी इंटर्नशिप म्हणून जॉईन करणार होता, त्यामुळे अजूनच राधाचा ताप वाढणार होता. सरांनी त्याची सगळी जबाबदारी राधावर सोपवून टाकली होती. आज परदेशी सर बाहेर असल्याने राधाला वेळेत जाऊन किरणला रिसिव्ह करायचे होते. राधाला हे सगळे अति वाटत होते, पण पर्याय कुठे होता?
परदेशी सरांचे तर ठरले होते, त्यांना किरणची पर्सनल सेक्रेटरी अनुभवी अगदी राधा सारखीच हवी होती. राधा गेली ८-१० वर्षे या कंपनीत परदेशी सरांची सेक्रेटरी म्हणून काम बघत होती. शिवाय ती ऍडमिनिस्ट्रेशनची डिपार्टमेंटची हेड होती. बरेचदा महत्वाचे निर्णय घेताना राधाचा सल्ला विचारात घेतला जात असे.
राधा तिच्या कामात अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होती. सर नसतील तरी ऑफिस कसे सांभाळावे हे तिला पक्के माहित होते. पण तिला किरणची सेक्रेटरी होणे मान्य नव्हते. मुळात किरण राधा वयाने सारखेच होते. त्यामुळे त्याला बॉस म्हणून स्वीकारणे राधाला जरा कठीण जाणार होते. शिवाय मि.शशांक परदेशी सरांची गोष्ट वेगळी होती. ते तिच्या वडिलांच्या वयाचे होते.
रामच्या म्हणजेच राधाच्या पतीच्या निधनानंतर सर आणि मॅडम यांनी तिला खूप मानसिक आणि वेळ पडल्यास आर्थिक आधारही दिला होता. त्या दोघांसाठी मनापासून काम करणे हे राधासाठी त्यांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवण्यासारखे होते.
विचारांच्या तंद्रीतच राधा ऑफिसजवळ कधी येऊन पोहोचली तिला कळले देखील नाही. जोरात वाजलेल्या हॉर्नच्या आवाजाने ती दचकली आणि तिने मागे बघितले. मागे बुलेट वर एक माणूस बसला होता आणि तिने पुढे जावे यासाठी तो जोरजोरात हॉर्न वाजवत होता. त्याला पार्किंगमध्ये जायचे होते आणि तो रस्ता राधाने अडवून ठेवला होता. आधीच डिस्टर्ब असलेली राधा अजूनच वैतागली,
“ओ हॅलो मिस्टर, प्रॉब्लेम काय आहे तुमचा?” राधा त्या माणसावर खेकसली.
त्याने हेल्मेट काढलं आणि तिच्याकडे वैतागून बघत म्हणाला, “प्रॉब्लेम? कोणाला? मला कि तुम्हाला?”
राधा बोलली “ओ मिस्टर, हॉर्न कोणी वाजवला? तुम्हीच ना, मग तेच विचारतेय! पार्किंगमध्ये कशाला हॉर्न वाजवताय? पुढे जाणारच आहे ना मी, इथे थांबून राहणार आहे का ?”
त्याला तिच्या वाक्यावर एकदम हसू आले, ते आवरतच तो म्हणाला, “ओ मॅडम, हॉर्न वाजवला नसता तर तुम्ही संध्याकाळपर्यंत इथेच थांबला असतात आणि तुमच्यामागे मी सुद्धा, कळले का?”
“दहा मिनिटांपासून हाक मारतोय तुम्हाला. मॅडम गाडी पुढे घ्या प्लिज, मला माझी गाडी पार्क करायची आहे. तुम्ही एक नाही कि दोन नाही. विचारा हवे तर ह्या काकांना.” असे म्हणून त्याने पार्किंगमधल्या सिक्युरिटी गार्डकडे मिश्किलपणे बघितलं. उत्तरादाखल गार्डने फक्त केविलवाण्या चेहऱ्याने मान हलवली.
राधाला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्या माणसाला सॉरी म्हणून तिने गाडी पुढे घेतली आणि तिची गाडी पार्क करून ती सरळ लिफ्टच्या दिशेने गेली. तसा तो माणूस सुद्धा तिच्या मागोमाग लिफ्टमध्ये शिरला. राधाच्या बाजूला उभे राहून त्याने त्याला जायचे होते त्या फ्लोअरचे बटन दाबले आणि तो वाट बघत थांबला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा