Login

आयुष्याचा जोडीदार भाग ३

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग ३

"राधा मॅम, तुम्हाला काही सांगायचे आहे का अजून?" राधाचा चेहरा न्याहाळत किरणने विचारले.

“हो! मला तुम्हाला सॉरी म्हणायचे आहे, मला खरचं कल्पना नाही आली तरी पुन्हा एकदा झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागते. किरण सर!” राधाने दिलगिरी व्यक्त केली.

“मी अगदी मनापासून एक गोष्ट सांगू का? मी तुमच्यावर मुळीच रागावलो नाहीय. इथे असं अचानक येण्याची कल्पना माझी होती आणि त्यामुळे जे झालं ते मला मान्य आहे आणि हो, तुम्ही मला अहो जावो नका करू. मला खूप ऑकवर्ड फील होत. मला तुमच्याबरोबरच काम करायचे असल्याने आपण शक्य असल्यास जितके एकमेकांशी मोकळे वागू तितके चांगल आहे." किरण स्मित हास्य करत म्हणाला

"मॉम डॅडकडून तुमच्याबद्दल खूप काही ऐकले आहे मी तुमच्या कामाबद्दल. आय होप! मला तुमच्याकडून बरच काही शिकता येईल." किरण असं म्हणताच राधाला काय बोलावे ते सुचेना. किरण अगदीच काही बिघडलेला मुलगा वाटत नव्हता. कामाप्रती खूपच कर्तव्यनिष्ठ वाटत होता.

किरणला लोकांबद्दल आदर होता आणि मुळात तो मालक म्हणून नाही तर खरोखर एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी इथे आला होता. त्यासाठी कसलेही आणि कोणतीही परिश्रम घ्यायला तो तयार असल्याचे असं तिच्या लक्षात आले. म्हणून प्रोफेशनल एटीकेट्स लक्षात घेता आपल्या कौतुकाबद्दल तिने किरणला “थँक्स” म्हंटले आणि ती आपल्या कामाला निघून गेली.

ऑफिसमधल्या कामाच्या तयारीत राधाचा वेळ कुठे निघून गेला, ते तिला देखील समजले नाही. सगळे आटोपून ती केबिनमध्ये आली आणि तिने घरी आईला फोन केला. मनू नुकतीच घरी आली होती. तिने धावत येऊन आजीकडून फोन खेचून घेतला अन् बोलू लागली

“आई, तू कधी येणार आहेस? मी वाट बघतेय तुझी!” आज ना खूप गंमत झाली शाळेत, सगळं काही सांगायचंय तुला, प्लिज लवकर ये ना.." आपल्या पिल्लाची आर्त हाक ऐकून राधाला गलबलून आलं.

“हो गं बाळा! थोड काम आहे ते संपवते आणि लगेच येते” राधा स्वत:ला सावरत म्हणाली त्यावर मनूने गुणी बाळासारखे "ओके" म्हणून फोन ठेऊन दिला.

हातातला मोबाईल बाजूला ठेऊन राधा तशीच खुर्चीत डोक टेकून थोडा वेळ डोळे मिटून शांत बसून राहिली. डोक्यात विचार येतं होते. रामचा तिला खूप राग येत होता.

“का गेलास तू आम्हाला सोडून? मी आणि मनू कसे राहायचे तुझ्याशिवाय? त्या बिचारीला तर तुझा चेहरा सुद्धा आठवत नाही धड! का केलस तू असं?” ती रामवर चिडत मनातच बोलत होती.

या गोष्टींचा विचार करून राम परत येणार नव्हता हे जरी खरं असलं तरीही त्याच्या आठवणींशिवाय तिचा एकही दिवस जाणे शक्य तरी होते का? मनातल्या मनात रामशी बोलणे हा तिचा नित्यनेम होता. त्याने तिला समाधान मिळत असे. राम खरच तिच्यासोबत आहे असे तिला वाटे.

मनूची आई आणि बाबा दोन्ही बनून राहण्याची उमेद येत असे. दारावरच्या नॉकने तिची तंद्री मोडली. डोळ्यांच्या कडांजवळचे पाणी हाताने टिपत असतानाच किरण आत आला आणि त्याने ते बघितले. त्याच्या हातातल्या फाईल्स बघून ती धडपडत खुर्चीतून उठली.

“किरण सर, तुम्ही कशाला आणल्या फाईल्स? मला सांगितल असत तर मीच आले असते केबिनमध्ये. द्या, त्या फाईल्स इकडे." अस म्हणून तिने त्याच्या जवळच्या सगळ्या फाईल्स घेतल्या.

“अहो, मी इथे इंटर्नशिप म्हणून काम करायचे ठरवतोय. त्यामुळे मला सगळी सवय असायला हवी ना म्हणून मीच आलो फाईल घेऊन. कसे आहे ना, ग्राउंड लेव्हल पासून सुरुवात केली कि पाया मजबूत होतो कोणत्याही गोष्टीचा, अस म्हणतात" अस म्हणून किरण गोड हसला.

राधा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत बसली आणि अस्फुटपणे म्हणाली “राम” किरणच्या सगळ्या सवयी रामसारख्याच होत्या. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ग्राउंड लेव्हल पासून होते असे राम नेहमी म्हणायचा, आणि राधाला नेहमी त्या वाक्याचा राग यायचा.

एखादी गोष्ट करायला घेताना राम त्याचा अगदी इत्यंभूत अभ्यास करायचा आणि राधा हैराण होऊन जायची. हे आज असे दुसऱ्यांदा झाले होते तिच्याबरोबर, "किरण आणि राम एकच आहेत का? दोघांमध्ये काहीच साम्य का नाही वाटत?" हा विचार मनात आल्यासरशी ती भानावर आली.

किरण तिच्याकडेच बघत होता. तिचे काहीतरी बिनसले असल्याचे त्याच्या लक्षात आले. तशी त्याला ती सकाळपासूनच अपसेट माईंडेड वाटत होती, पण असतो एखाद्याचा स्वभाव म्हणून त्याने फार लक्ष दिले नाही. आता मात्र तो तिला निरखून बघत होता. राधा दिसायला खरच सुंदर होती. कोणीही लगेच तिच्या प्रेमात पडाव अस तिच व्यक्तिमत्व होत.

तिच्या गोऱ्या वर्णावर गडद निळ्या रंगाची कॉटनची साडी आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी उठून दिसत होती. चेहऱ्यावर हलकासा मेकअप पण त्याहीपेक्षा दिवसभराचा आलेला थकवा जास्त छान दिसत होता.