Login

आयुष्याचा जोडीदार भाग ४

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग ४

राधाचे डोळे त्याक्षणी फार तीक्ष्ण आणि बोलके दिसत होते. तिला केसांची चेहऱ्यावर येणारी बट सतत कानामागे खोचायची सवय होती.

राधाची आणि किरणची नजरानजर झाली. किरणच्या त्या एकटक बघण्याने राधा जरा अस्वस्थ झाली. किरणला देखील ते लक्षात आले, तसा तो फाईल्स चाळू लागला. एक विचित्र शांतता त्या केबिन मध्ये पसरली.

थोड्या वेळाने राधा कडक आवाजात बोलली,“किरण सर तुम्हाला काही मदत हवी आहे का? तसेही मी तुमची ओळख, सगळ्या स्टाफबरोबर करून दिली आहे पण मी तुम्हाला असे म्हणेन की तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांच्याकडे न जाता त्यांना बोलावून घेतलेत तर बरे होईल. जरी तुम्ही इंटर्नशिप म्हणून काम करायचा निर्णय घेतला असला तरीही तुम्ही मालक आहात आणि तसेच वागणे अपेक्षित आहे, म्हणून सांगितले. "

राधाने थोडक्यात किरणला पटेल अशा शब्दात आपले म्हणणे मांडले.
आता नाही म्हणायची त्याला सोयच राहिली नव्हती. किरणच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. राधाला आपण जरा जास्तच बोलून गेल्याची जाणीव झाली.

पण हे सगळे तिच्यासाठी नको झाले होते. आल्यापासून किरणने तिची पाठच सोडली नव्हती आणि ती त्याला बॉस असल्याने काही बोलूही शकत नव्हती.

किरण बोलला “सॉरी, तुम्हाला अवघडल्या सारखे वाटत असेल तर मग मी डॅडच्या केबिनमध्ये बसतो थोडा वेळ", इतके बोलून तो उठला आणि केबिन मध्ये निघून गेला.

त्याला वाईट वाटले होते, बघायला गेले तर राधा स्वतःच्या बॉसशीच उर्मटपणे वागली होती. पण तिचा नाईलाज होता.

त्याच्यातले आणि राममधील छोटेसे साम्य सुद्धा तिला खूप बेचैन करत होते. तिला किरणची भीती वाटत होती. खरेतर ती स्वतःच्या मनाला भीत होती.

ऑफिसमधून निघताना तिने नेहमीप्रमाणे परदेशी सरांच्या केबिनचे लाईट्स बंद करण्यासाठी केबिनचे दार उघडले तर तिला पेपर्स वाचत बसलेला किरण दिसला.

मनातल्या मनात “कपाळ माझे” असे म्हणत तिने त्याला आवाज दिला.
“किरण सर, तुम्ही अजून निघाला नाहीत का? ऑफिसचा टाईम संपला आहे, आणि ह्या सगळ्या फाईल एकाच दिवसांत वाचणार का? उद्या पण ठेवा काही वाचायला."असे बोलून ती थोडे उर्मटपणे मिश्किल हसली.

किरणच्या ते लक्षात आले तसे तिच्याकडे थोडे रागाने बघत तो म्हणाला “तुम्ही पण अजून इथंच आहात की?” त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली आणि तो दरवाज्यापाशी येण्यासाठी निघाला, तशी ती गडबडली.

“मी का.. मी रोजच उशिरा जाते, सगळे ऑफिस बंद करून!" इतके म्हणून ती निघाली.

“राधा” किरणने मारलेल्या एकेरी आवाजाने ती बावरली. तशीच पाठमोरी उभी राहिली. "एक विनंती आहे तुम्हाला, आपण एकमेकांना एकेरी हाक मारली तर चालेल का? मला अगदी शाळेत आल्यासारखे वाटेल नाहीतर!" त्याने अगदी सहज विचारले.

“पण तुम्ही माझे बॉस असल्याने ते योग्य दिसणार नाही किरण सर” राधा ठामपणे म्हणाली.

“बरे ठीक आहे, मान्य!” पण इंटर्नशिप म्हणून तर एकेरी हाक मारू शकता ना? असे म्हणून किरण हसला.
राधा पण उत्तरादाखल फक्त हसली आणि म्हणाली “बघू”.

इतके बोलून राधा निघाली, किरण देखील तिच्याबरोबर ऑफिसमधून निघाला.
दोघे एकत्रच लिफ्ट मधून पार्किंगला आले आणि सकाळचा किस्सा आठवून किरण राधाला म्हणाला,

“आता मी आधी गाडी काढणार आहे बरं का!" राधा पुन्हा फक्त हसली आणि “बरे” म्हणाली.

तिचे वागणे त्याला जरा तुटक वाटले. किरण निघेपर्यंत राधाने फोन वर बोलत असल्याचे नाटक केले.

मुळात तिला फार सलगी केलेली आवडत नसे. किरण तसे वागत नसला तरी राम गेल्यापासून तर ती अजूनच सावध झाली होती. एकटी बाई म्हणून कोण कसे वागेल याचा नेम नाही म्हणून ती स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायची. पण किरणच्या बाबतीत तिला काही गत्यंतर नाही, असे झाले होते.

ते दोघे एकाच वयाचे होते तरी पण त्यांच्यात एक अवघडलेपणा होता. त्यामुळे किरणचे तिच्याशी वागणे त्याच्यापरीने योग्य होते हे तिला समजत होते पण तिच्या वागण्याला मर्यादा होत्या. तिने त्या खूप आधीपासूनच घालून घेतल्या होत्या.

किरण घरी जाता जाता राधाचा विचार करत होता. ती अतिशय कामसू आणि प्रामाणिक दिसत होती. फक्त असे कडक शिस्तीत तिच्याबरोबर काम करणे म्हणजे किरणला कठीण जाणार होते.

वातावरण हलके फुलके करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याने दिवसभरात खूपदा केला होता आणि म्हणून तो थोडा काळजीत होता.

राधा अशी वागते ह्याचे कारण त्याला माहित नव्हते. पण त्यामागे काहीतरी कारण आहे हे त्याला जाणवत होते. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणे त्याला सोप्पे करून घेण्यासाठी तो प्रयत्न करत होता.


क्रमशः

🎭 Series Post

View all