Login

आयुष्याचा जोडीदार भाग ५

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग ५


             मि. परदेशी सर आणि शलाका मॅमला राधाबद्दल प्रचंड जिव्हाळा होता आणि ऑफिसच्या कामात पण ती खूप पक्की होती. त्यामुळे ती कंपनीसाठी खूप महत्वाची होती हे त्यांना पक्के ठाऊक होते.

मनूला झोपवून राधा पुस्तक वाचत बसली होती, तोच तिचा फोन वाजला, बघते तर किरण सरांचा कॉल आला होता.

“इतक्या उशिरा का कॉल केला असेल? काही काम असेल का?" मनात विचार केला.

आई बाबा सुद्धा झोपलेले असल्याने. त्यांना त्रास नको म्हणून ती फोन घेऊन बाल्कनीत गेली.

        “हॅलो किरण सर काय झाले? इतक्या उशिरा कॉल केलात?” राधा चिंतेने म्हणाली.

           “राधा मी किरण बोलतोय, मॉमची तब्येत खूप बिघडली आहे, डॅड नेमके घरी नाही आहेत. त्यांचा फोन लागत नाही. मॉमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुझा नंबर मिळाला म्हणून तुला फोन केला." किरण खूप टेन्शनमध्ये बोलत होता.

       “काsssय? ठीक आहे मी येते लगेच,” इतके बोलून राधाने फोन कट केला, आईला जेमतेम परिस्थिती सांगून ती होत्या त्याच कपड्यांवर घरातून निघाली, जाता जाता डॉक्टर सोनींना कॉल केला तर ते आऊट ऑफ इंडिया असल्याचे समजले. किरण घरी तिची वाटच बघत होता.

             राधा घरी आलेली पाहून किरण तिला म्हणाला “हे काय? डॉक्टर कुठे आहेत, अगं मला इकडे मॉमला एकटीला सोडून जाता येत नव्हते. आज नेमके सगळे नोकर पण सुट्टीवर आहेत, मला वाटले तू डॉक्टर ना घेऊन येशील.”

            “किरण सर, थोड थांबा मला बोलू तर द्या. डॉक्टर. सोनी आऊट ऑफ इंडिया गेले आहेत, पण मी डॉक्टर. पंडित सरांना कॉल केला आहे. ते येतील इतक्यात, तोपर्यंत मला मॅमना बघू दे!” राधा काळजीने म्हणाली.

                “तू काय डॉक्टर आहेस का?” वैतागून त्याने विचारले, त्याचा स्वभाव तसाच होता, झटकन बोलायचा, मनात काही असेल असे नाही पण बोलून जायचा पटकन.

             “ते नंतर बघू. आधी मला मॅमला बघूदे." राधा रागाने म्हणाली. राधाने सुद्धा क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले.

तसा तो काही न बोलता तिच्यासोबत मॉमच्या रूममध्ये गेला. शलाका मॅमला श्वास घेताना खूप त्रास होत होता. राधाने किरणच्या मदतीने शलाका मॅमला उठवून बसवले आणि पाठीला आधार म्हणून उशी देऊन त्यांना त्यावर टेकवले आणि त्यांचा एका पायाचा तळवा भराभर घासायला सुरुवात केली.

               किरणने तारतम्य दाखवून दुसरा तळवा घासायला सुरुवात केली. तोवर त्यांची धाप जरा कमी झाली होती. त्यांना थोडे पाणी प्यायला देऊन राधाने पुन्हा डॉक्टरांना फोन केला. राधा होती म्हणून नाहीतर किरणला इतके सगळे सुचलेच नसते. डॉक्टर आले तसे किरणला मॉमजवळ थांबायला सांगून राधा धावतच खाली गेली.

                  सगळी कल्पना देऊन राधा त्यांना वर घेऊन आली. शलाका मॅमची आत्तापर्यंतची सगळी मेडिकल हिस्ट्री राधाला पाठ होती. त्या सगळ्यांचा डॉक्टरांना अंदाज दिला. किरणला याचे भयंकर अप्रूप वाटत होते. डॅड राधाचं इतके कौतुक का करतात याची त्याला कल्पना आली. तिच्या स्वतःच्या फॅमिली सारखे ती त्याच्या मॉम-डॅडना जपत होती.

                 इंजेक्शनमुळे शलाका मॅमला शांत झोप लागली होती. मॉमशेजारी बेडला टेकूनच किरण सुद्धा दमून झोपला होता. राधा शांतपणे त्याच्याकडे बघत होती, तो झोपल्यावर तसाच निरागस दिसत होता जसा राम दिसायचा. झटका लागावा तशी ती भानावर आली. आपण कसला विचार करतोय, असे वाटून तिला स्वतःची लाज वाटली.

                 अतिश्रमाने तिला सुद्धा खूप थकवा आला होता आणि त्यात सकाळपासून चाललेल्या या राम आणि किरणच्या विचारांनी ती मानसिक थकली होती, स्वतःचा राग येत होता तिला. एव्हाना पहाट होत आली होती. तशीच ती खाली उतरली आणि तिने गाडी स्टार्ट करणार तोच, “राधा” किरणचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला.

                ती स्तब्ध झाली, हळूच मागे वळली, किरण तिच्याच दिशेने येत होता. तिला त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नव्हता, पण त्याने धावत येऊन तिला मिठीच मारली. ती शहारली. काय करावे तिला समजेना. ती तशीच उभी राहिली.

“थँक्यू यू सो मच! तुझे जितके आभार मानेन तितके कमी आहेत, मी एकटा होतो ग, मला समजत नव्हते काय करावे, नशीब तू आलीस आणि सगळे नीट केलेस, कमाल आहेस तू खरेच! जादूगार आहेस का? कसे इतके सगळे मॅनेज करता येते तुला?”

                पुन्हा तेच रामचे शब्द त्याचीच वाक्य राधा भयंकर अस्वस्थ झाली आणि तिने किरणला अक्षरशः धक्का देऊन स्वतः पासून लांब केले. बेसावध असलेला किरण खाली पडता पडता वाचतो.

“कोण आहेस तू आणि का आला आहेस माझ्या आयुष्यात? काय संबंध आहे तुझा आणि रामचा, का सतत मला त्रास देतो आहेस? मी सुखी आहे ना माझ्या मनूबरोबर, मग का सारखा येऊन मला त्याची आठवण करून देतो आहेस?" रागाच्या भरात राधा किरणवर ओरडून म्हणाली आणि गाडीत बसून निघूनही गेली. किरण मात्र गोंधळून तिच्या गाडीकडे बघत राहिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all