आयुष्याचा जोडीदार भाग ६
मला या सगळ्याचा त्रास होतो रे राम, मी जगले नसते तू गेल्यानंतर पण मनूमुळे पुन्हा उभी राहिले, सगळे दुःख,सगळा त्रास, समाजाची बोलणी, लोकांच्या घाणेरड्या नजरा, सगळे सगळे झेलून उभी राहिले लढायला, आपल्या मनूसाठी तुला मनातल्या एका कोपऱ्यात बंद करायचा जितका प्रयत्न करते तितका तू समोर येतो आहेस.
आज मनू लहान आहे म्हणून तिला समजत नाही पण मोठी होऊन तिला माझे दुःख समजण्याआधी मला कोडगे व्हायचे आहे तिच्यासाठी, तिच्या भल्यासाठी राधाचा स्वतः वरचा ताबा सुटला होता, ती काय बडबडते आहे तिचं तिलाही कळत नव्हते.
अश्रू डोळ्यातून बांध फुटल्यासारखे वाहत होते. आपण राम नाहीतर किरणशी बोलत आहोत ह्याचेही तिला भान राहिले नव्हते. इतके दिवस दडवून ठेवलेल्या भावनांचा तोल ढासळला होता. राम गेल्यापासून पहिल्यांदा ती तिचे दुःख व्यक्त करत होती. मनू आई बाबा या सगळ्यांचा विचार करता करता तिने स्वतःचा विचार करणे जणू सोडूनच दिले होते.
सगळ्यांसमोर खंबीर असल्याचे नाटक करताना स्वतःच्या हळुवार मनाला सावरायचे ती विसरली होती. अचानक बोलता बोलता तिला घेरी आली. किरणने लगेच तिला आधार दिला. त्याच्या आधाराच्या मदतीने ती जवळच्या गॉर्डन मधील असलेल्या बेंचवर बसली. कितीतरी वेळ ती तशीच त्याला बिलगून होती.
तो तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. त्याच्यासाठी हे सगळे नवीन होते. आज सकाळी बघितलेल्या खंबीर राधापेक्षा हि राधा खूप नाजूक होती, तिला आताबजपायला हवं इतकंच त्याला या परिस्थितीत कळत होते. ती थोडी शांत झाल्यावर तो तिथून उठला आणि तिच्यासाठी पाणी आणायला गेला.
एव्हाना राधा बऱ्यापैकी सावरली होती. तिला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. आपण हे काय करून बसलो असे याचा तिला पश्चाताप होऊ लागला. किरण या आपल्या वागण्याचा काय विचार करून ती अजूनच डिस्टर्ब झाली.
तो येण्याआधी तिथून जाण्यासाठी उठली असता पुन्हा तिला चक्कर आली. यावेळी मात्र ती धाडदिशी खाली कोसळली, तिच्या अंगात त्राण उरले नव्हते. किरण धावत तिच्याजवळ आला. त्याला तिची हि झालेली अवस्था बघवत नव्हती. त्याने तिला दोन्ही हातावंर उचलून घरात आणले.
तिला शांतपणे बेडवर झोपवून तो शेजारच्या खुर्चीवर बसला. तिच्या खंबीरपणाचे त्याला प्रचंड कौतुक वाटत होते. तो तिच्याकडे कौतुकाने बघत होता.तिच्या तोंडून सर्व ऐकून त्याला आता तिच्या दुःखाची त्याला कल्पना येत होती.
तिचे दुःख हलके कसे करता येईल याचा तो विचार करत होता. मगापर्यंत त्याची कोणी नसणारी ती त्याच्यासाठी अचानक महत्वाची झाली होती. त्याला तिची काळजी वाटत होती. एक वेगळेच नाते तिच्याविषयी त्याच्या मनात निर्माण व्हायला लागले होते.
राधा शुद्धीवर आली तोवर चांगलेच उजाडले होते. झाल्या गोष्टीचा विचार करून तिचे डोके सुन्न झाले होते. अचानक तिला मनूची आठवण आली तसं ती आईला फोन करण्यासाठी उठून बाल्कनीत गेली, फोनवर तिने सगळे काही ठीक असल्याचे आणि दुपारपर्यंत घरी येईल असेही सांगितले. आईचा तिची खूप काळजी वाटत होती. मागे वळून बघते तर शलाका मॅम दारात उभ्या होत्या. मॅमनी तिला कडकडून मिठी मारली आणि तिचे खूप कौतुक केले.
कालपेक्षा आज त्या ठीक होत्या. रात्रीच्या मदतीबद्दल तिचे आभार मानले. तिला थोडा वेळ अजून आराम करायला सांगून त्या निघून गेल्या. इकडे राधाच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. तिने स्वतःचा अवतार ठीक ठाक केला आणि घरी जायच्या हिशोबात तिथून निघाली. तर समोरच किरण हातात चहाचा ट्रे घेऊन गोड हसत उभा होता.
“चला मॅडम चहा बिस्कीट खावून घ्या, रात्रीपासून खूप धावपळ सुरू आहे तुमची, काही खाल्ले सुद्धा नाही.” असे म्हणून चहाचा कप त्याने तिच्या हातात दिला. त्याच्याशी नजर मिळवायची तिची हिंमत होत नव्हती, तिने शांतपणे चहाचा कप त्याच्या हातून घेतला.
किरण मात्र काही झालेच नाही असा वागत होता. पण तरीही तो तिच्या मनःस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होता. ती काहीच बोलत नाही पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली.
“तुम्ही दोन दिवस सुट्टी घ्या, आराम करा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल, ऑफिसची काळजी करू नका, मी सगळे व्यवस्थित हॅण्डल करतो. डॅड चार दिवसांनी येतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही.”
किरण हे सगळे मनापासून बोलत होता. त्याला राधाची काळजी वाटत होती. राधाने त्याच्या बोलण्यावर फक्त शांतपणे मान डोलावली आणि ती खाली जाण्यासाठी उठली. तो देखील तिच्याबरोबर खाली आला.
तिची स्कुटी त्याने सकाळीच घरी पाठवून दिली होती. त्याने गाडी काढली आणि तिला म्हणाला “बसा मी सोडतो तुम्हाला घरी.”काही एक शब्द न बोलता ती शांतपणे गाडीत बसली, वरून शांत दिसत असली तरी तिच्या आत काहूर माजले होते, किरणला ते समजत होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा