आयुष्याचा जोडीदार भाग ७
कालची राधा आणि आजची राधा यात खूप फरक होता. अशी हळूवार राधा किरणने पहिल्यांदा बघितली होती आणि त्याला ती आवडायला लागली होती. गाडी चालवताना तो तिच्या हालचाली न्याहाळत होता. ती समोर शून्यात नजर लावून बसली होती आणि अचानक तिने गाडी बाजूला घ्यायला सांगितली. किरणने जागा बघून गाडी बाजूला घेतली.
“मला तुमच्याशी थोड बोलायच आहे." राधा समोर बघतच किरणला म्हणाली
“ठीक आहे, पण एका अटीवर!” किरण म्हणाला.
राधा निर्विकारपणे "ह्म्म्म!" म्हणाली
“तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारायची.” किरण तिच्याकडे निरखून बघून म्हणाला, तशी राधा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली.
"ठीक आहे." मनाशी काही विचार करत राधा म्हणाली
"ग्रेट! तुम्ही माझे ऐकले हे काय कमी आहे, सांगा आता तुम्हाला काय सांगायचे ते" किरण म्हणाला, तसे तो पूर्णपणे तिचे ऐकण्यासाठी वळून तिच्याकडे बघू लागला. तिच्या गालावर रुळणारी केसांची बट हळूच तिने कानामागे सारली. तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती.
साध्या कपड्यात पण ती छान दिसत होती, रात्रभर धावपळ झाल्याचा थकव्यातही चेहरा निरागस भाव दाखवत होता. तो आपल्याकडे बघतोय, हे लक्षात आल्यावर ती सावरून बसली, डोळ्यांची नजर न हलवता ती म्हणाली,
“आज पहाटे जे झाले ते व्हायला नको होते. मी जे वागले त्याबद्दल मी तुझी माफी मागते. माझ्या भूतकाळातील काही चांगल्या वाईट आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून मी अशी वागले, त्याचा त्रास तुला व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती." राधाचा आवाज नरमला होता.
"तुझा तर माझ्या ह्या आठवणींशी आणि माझ्या आयुष्याशी काही संबंध सुद्धा नाही, म्हणून जे झाले ते अयोग्य होते. तू प्लिज हे सगळे विसरून जा. ही माझी तुला रिक्वेस्ट आहे. मी जर आज हे बोलले नाही तर ऑफिसमध्ये तुझ्या नजरेला नजर मिळवून काम करू शकणार नाही. प्लिज मला माफ कर!" राधाने दिलगिरी व्यक्त केली.
किरण शांतपणे तिचे म्हणणे ऐकत होता, तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवत होता. तिने घडलेला प्रकार मनाला खूप लावून घेतला होता. तिचे घाव समजायला त्याला वेळ लागला असता, पण निदान माणुसकी म्हणून तिला आधार देणे ह्यात त्याला काही वावगे वाटत नव्हते.
“मुळात तुम्ही असे काही एक वागल्या नाहीत की ज्यामुळे तुम्ही माझी माफी मागावी. खरतर, तुम्हाला मी अपरात्री बोलावले नसते तर हे सगळे झालेच नसते ना, म्हणून माफी मी मागायला हवी. पण आता तुम्ही म्हणणार मी माफी मागते आणि मी म्हणणार मी मागतो त्यापेक्षा आपण एक सोप्पा उपाय केला तर?" किरणने भुवई उंचावत विचारलं, तसे तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले. दोघांची नजरानजर झाली, तिचे डोळे निव्वळ सुरेख होते, प्रचंड भावनांचा समुद्रच जणू तिच्या डोळ्यांत वाहत होता. किरणला ती आता जास्तच आवडायला लागली होती. किरणची तिच्यावर रोखलेली नजर बघून क्षणार्धात तिची नजर झुकली, हलक्या आवाजात ती म्हणाली, "कोणता उपाय?"
“मैत्री! आपण एकमेकांचे मित्र होऊया म्हणजे तुला, सॉरी तुम्हाला काहीच टेन्शन नाही ना? एका मित्राशी बोललात असे समजा आणि विसरून जा. ऑफिसमध्ये काम करतानाही आपल्याला या मैत्रीचा खूप फायदा होईल, कसा वाटतोय हा मार्ग?" या त्याच्या उपायावर राधा समाधानकारक हसली.
किरण असे काही सुचवेल असे तिला वाटलेच नव्हते. राम गेल्यानंतर तिला फक्त वेगळ्या अर्थी मैत्री करणारे लोक भेटले होते, पण किरण तसा नव्हता इतके तर तिला नक्की समजत होते. किरणच्या उपायाने ती बरीच सावरली होती. किमान स्वतःचा तिरस्कार तरी करत नव्हती.
थोडी रिलॅक्स होऊन ती बसली आणि तिने सरळ हस्तांदोलन साठी किरण समोर हात पुढे केला.
“देन इट्स अ डील नाऊ वुई आर फ्रेंड्स राईट" किरणने त्याचा हात तिच्या हातात दिला आणि म्हणाला.
"येस! पण तू सुद्धा मला आता एकेरी हाक मारायची तरच." गोड हसत तिने त्याच्या हातावरची पकड हलकीशी घट्ट केली आणि म्हणाली
"येस! पण तू सुद्धा मला आता एकेरी हाक मारायची तरच." गोड हसत तिने त्याच्या हातावरची पकड हलकीशी घट्ट केली आणि म्हणाली
"नक्कीच! नाहीतर मला काम नाही करता येणार बाई तुझ्याबरोबर." असे म्हणून किरण जोरात हसला. तीही त्याच्या हसण्यात सामील झाली.
ती शांत झालेली पाहून त्याला बरे वाटत होते. या सगळ्या गप्पांमध्ये तिचा नाजूक पण कणखर हात त्याच्या हातातच होता हे तिच्या लक्षात आले नव्हते, किरणने अगदी सहज तिचा हात त्याच्या हातातून मोकळा केला पण तिच्या हाताचा स्पर्श मात्र त्याच्या हातातून मोकळा झाला नव्हता. तिच्याबद्दल त्याला आपुलकीपेक्षा जास्त काहीतरी वाटत होते.
या घटनेला जवळपास सहा महिने होऊन गेले होते. किरण आणि राधा एकमेकांचे छान मित्र झाले. राधाच्या आयुष्यात किरणमुळे बरेच सकारात्मक बदल झाले होते. ती आनंदी राहायला लागली होती. राधाच्या मदतीने किरणही खूप नवीन गोष्टी शिकत होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा