Login

रेखा ओ रेखा

Lifeline
©®विवेक चंद्रकांत...

"हॅलो, विनू? कुठे आहे तू? मी बसलीय तुझी वाट पाहत इथे."

आपल्या होणाऱ्या बायकोचा फोन आणि तिने पहिल्याच भेटीत आपल्याला विनू म्हणणे विनयला आवडले नाही.पण ते टाळून तो म्हणाला.
" अगं ऐन वेळेस साहेबांनी काम सांगितल्याने फक्त पाचच मिनिट late झाला रेखा. आलोच मी. "

"ए माझे नाव सुवर्णंरेखा आहे. त्याचं नावाने हाक मारायची."

मला विनू म्हटलेले चालते.. स्वतःला काय भानुरेखा गणेशन समजते का? विनयला संताप आला पण तो चूप बसला. पहिल्याच भेटीत वाद नको.

मागच्याच आठवड्यात रेखाला दाखवायला आणले होते. तिच्या सौंदर्याने सारेच प्रभावित झाले होते.तिचे सफाईदार इंग्रजी, mnc मधील नौकरी. तिच्या आई वडिलांचे अदबशीर वागणे. लग्न तिथेच पक्के होणार होते. हुंडाबिंडा नव्हताच.लग्न थाटातच होणार होते. सगळेजण हुरळून गेले. पण विनयच्या आईने सांगितले

"आधी एकमेकांना भेटू द्या. मते जुळू द्या. मग तारीख काढू."
आज विनय घरून निघाला तशी आई म्हणाली

"पोरगी थोडी आगाऊ वाटते. तू समंजस आहे. जरा व्यवस्थित बघ. संसार तुला करायचा आहे."
आईच्या मतांबद्दल त्याला आदर होता.. पण ती कदाचित generation गॅप असेल असे त्याला वाटले.

तो पोहचला तेव्हा रेखा शांतपणे सूप पीत होती. त्याने घड्याळात पाहिले.. मोजून आठ मिनिटे late झाला होता. तितकेही आपल्यासाठी थांबू नये?

"ये. सूप मागवू?" veg? नॉन veg? " रेखा म्हणाली

", अर्थातच व्हेज. मी नॉनव्हेज खात नाही."

"मी खाते हा. अगोदरच सांगते. नंतर कटकट नको."

"घरी कोणीच खात नाही... पाहिजे तर तुला बाहेर घेऊन जात..." विनय चाचरत म्हणाला.

रेखाने तोंड वाकडे केले. "ठीक आहे. करेन काही दिवस ऍडजस्ट आणि ड्रिंक्स?"

"क्वचित घेतो. ऑफिसमध्ये पार्टी असेल तर किंवा कोणी क्लायंटने गळ घातली तर." विनय संकोचत म्हणाला.

"मीही घेते. एवढा घाबरतोय कशाला? आजकाल कॉमन आहे.आधी माहिती असते तर ड्रिंकच मागवले असते कशाला सुपबीप."

विनयने घाम पुसला. तेवढ्यात वेटर आला.

"काय ऑर्डर?" वेटरने अदबीने विचारले.

"मला एक सीझलर. एक पिझ्झा आणि शेवटी चॉकलेट ब्राउनी. तुला विनय?"

ऑर्डर देतांना काय मागवायचे हे दोघे मिळून ठरवू असा विचार विनयने येतांना केला होता. पण कसचे काय...

"मला फक्त, मसाला पापड आणि हराभरा कबाब."

"बस्स्स? बरे मी काय सांगते ऐक? मला जॉब चांगला आहे आणि परदेशीं जाण्याची संधी पण आहे तर त्यात तुझी आणि तूझ्या घरच्या लोकांची आडकाठी नको."

विनय काही बोलला नाही. हे घरी व्यवस्थित डिसकस करता आले नसते का?

" आणि मला कंपनीत प्रोस्पेक्ट चांगले असल्याने प्रेग्नन्सी नको. किमान तीन वर्षे. "

"तीन वर्षे जास्त नाही होत? ऑलरेडी आपण दोघे तिशीच्या आसपास आहे.," विनय म्हणाला.खरेतर एकदम प्रेग्नन्सी वगैरे विषयावर बोलायची त्याची इच्छा नव्हती.. पण नाईलाज होता.

"खरंच नको. परदेशीं जातांना ते झेंगट गळ्यात नको."

विनय काहीच बोलला नाही. मुकाट्यानं पापड खात राहिला.

"आणखीन एक. तुझा माझा पगार मिळून भरपूर पैसे होतात. आपण एक फ्लॅट बुक करायचा? "

"कशाला ग? आमचा फ्लॅट खूप मोठा आहे ना 3bhk. पुरणार नाही?"

"अरे पण तो तूझ्या वडिलांचा आहे ना? आपला नको का? इनकम tax ही वाचेल. इन्व्हेस्टमेंट ही होईल."

"अग पण मी एकुलता एक आहे."

" अरे पण उद्या नाहीच पटले तर.? आपला फ्लॅट नको? "

विनय काहीच बोलला नाही. मौनम सर्वार्थ साधनम.

तिचे खाऊन झाले. अर्धा पिझ्झा आणि अर्धे सीझलर उरले होते. पण ते तू खातो का हे विचारण्याची तसदीही तिने घेतली नाही. एवढे अन्न वाया घालवलेले बघून विनयला उगाच चूकचूकल्यासारखे झाले. तिने हात पुसले.

"चल निघते मी. Bill देऊन टाक. आता काय माझे पैसे हे माझे आणि तुझे पैसेही माझेच. समजलं?"
विनयला आता मान डोलवण्या शिवाय काही काम नव्हते.त्याने पाण्याची बॉटल तोंडाला लावली.

"आणखी एक विनू. बहुदा पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढतील. तर मी contraceptive pills चालू करू की तू कंडोम वापरशील?"

विनयला एकदम ठसका लागला.

"मी फोन करून सांगतो." तो कसेबसे म्हणाला.. त्याच्या गालावर हलकेच kiss करत बाय हनी म्हणून ती निघाली.
गोरामोरा झालेला विनय मात्र तिथेच बसून राहिला.

त्याचे चंद्र तारे, मंद वारे आणि रोमँटिक कविता..
मनातच राहिले सारे....

(काय मंडळी. काय वाटते? विनयने रेखाशी लग्न करावे की नाही?)
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.


तुमचे 'हुरहूर' (पाहिला भाग )वाचले आणि हे सुचले. आजच्या मुली खूप प्रॅक्टिकल असतात.. दुसरी बाजुही.