Login

मर्यादा नात्यातील 3

मराठी कथा
राकेशला आईबद्दल खूप प्रेम होतं, त्याला वाटायचं की आईला आपल्या संसाराची काळजी आहे, कधी न कधी ती वैष्णवीला परत आणायला सांगेल, पण आईने तो विषयही कधी निघू दिला नाही..आता मात्र त्याला वैष्णवीची चांगलीच उणीव भासू लागलेली..

एके दिवशी राकेशच्या घरी त्याचे आजी आजोबा आले. म्हणजे त्याच्या वडिलांचे आई वडील. दोघे बरेच म्हातारे झाले होते, गावी मोठ्या काकांकडे राहायचे. आज खूप वर्षांनी त्यांना नातवाला भेटायची ईच्छा झाली आणि ते आले. ते येणार म्हणून आईची आधीच चिडचिड सुरू झाली होती, राकेशला ते काही आवडलं नाही.

"कशाला एवढा प्रवास करून इकडे यायची हौस बरं? आपण भेटून येतो ना त्यांना.."

"अगं पप्पांचे आई वडील आहेत ते, मुलाला भेटावसं वाटणारच ना.."

"मुलं मोठी झाली की आई वडीलांनी मुलाच्या संसारात जीव अडकवू नये, इथे तर इतके मोठे झाले हे तरी यांचे फोनवर फोन चालूच.. आता तर स्वतः येताय राहायला.."

हे ऐकून राकेशला धस्स झालं..हेच वाक्य आईने स्वतः अवलंबले असते तर?

आजी आजोबा आले, राकेशला पाहून त्यांनी त्याला कवटाळलं..राकेशनेही त्यांना काही कमी पडू दिलं नाही. आजीचं वय झालं असलं तरी कडक होती ती.

दुसऱ्या दिवशी राकेशचे वडील आजीला म्हणाले,

"अक्का, तुझ्या हातचं भरीत..त्याची चव कुणालाच नाही, आज बनव की माझ्यासाठी.."

"कशाला?? मी चांगलं बनवत नाही का? ते काही नाही..मी आज मेथी करणार आहे.."

आजीने हे ऐकलं आणि तिचा हिरमोड झाला..आजीने माघार घेतली..

राकेश चिडला..

"आई तू आजीला असं कसं बोलू शकतेस? एक दिवस करू दे की तिला.."

झालं..आईचं परत रडगाणं सुरू..

"मी बायको आहे त्यांची..माझा काही हक्क आहे की नाही? काय तर म्हणे आईसारखं भरीत जमत नाही मला..मग इतके दिवस माझ्या हातचं का खाल्लं म्हणावं, आईचा एवढा पुळका होता तर कशाला आणलं मला या घरात??"

राकेश मटकन खाली बसला..

आजीच्या एका दिवसाच्या राहण्याने आईने इतका आकांडतांडव केला..

वैष्णवीने तर कितीतरी दिवस आईचा हा दुतोंडीपणा सहन केला होता, एवढं करूनही ती शांत असायची..आहे ते मान्य करायची..आणि आई? आपल्या नवऱ्यावर त्याच्या आईनेही हक्क दाखवायचा नाही हा आईचा हट्ट...आणि सुनेने तसा थोडा प्रयत्न केला तर तिला घरातून निघून जायला भाग पाडलं??

वातावरण चिघळू नये म्हणून राकेशने आईशी नंतर बोलायचं ठरवलं, आणि हेही पक्क केलं की आता स्वतःच्या बायकोला कुणाचीही वाट न बघता परत आणायचं..
क्रमशः

🎭 Series Post

View all