आयुष्य आनंदाने पुर्णपणे जगावे ! लेखक सुनिल पुणेTM 9359850065
वयाच्या 62 व्या वर्षी ती रिटायर्ड प्राध्यापिका एकटीच आपल्या शांत फ्लॅटमध्ये राहत होती. आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवताना तिने स्वतःच्या इच्छा कधी बाजूला ठेवल्या हे तिलाही कळलं नव्हतं. नवरा काही वर्षांपूर्वी गेला होता, मुलं परदेशात स्थायिक झाली होती. रोज सकाळी ती देवापुढे दिवा लावायची, पण घरात दिव्याच्या ज्योतीशिवाय कुठलाच उजेड उरला नव्हता. फोनवर मुलांचा आवाज ऐकताना ती हसायची, पण कॉल संपला की डोळ्यांत पाणी यायचं. हळूहळू तिच्या मनात एक विचित्र रिकामेपणा वाढू लागला आणि त्याचं नाव तिलाही माहीत नव्हतं "नैराश्य".
एक दिवस डॉक्टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवलं. समोर बसलेला डॉक्टर शांत होता. त्याने हळूच विचारलं, “तुमची मुलं काय करतात?” ती थोडी हसून म्हणाली, “सगळे चांगल्या कंपनीत आहेत, आपापल्या आयुष्यात सुखी आहेत.” डॉक्टर पुन्हा विचारतो, “ते जवळ राहतात का?” ती मान खाली घालून म्हणाली, “नाही, फार लांब आहेत. वेळ मिळाला तर येतात, नाहीतर फोनवरच बोलतात.” डॉक्टर काही क्षण थांबला आणि म्हणाला, “तुमचं आयुष्य तुम्हाला कसं वाटतं?” ती थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, “रिकामं… खूप रिकामं. आयुष्यभर इतरांसाठी जगले, आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही असं वाटतं.”
डॉक्टरांनी पुन्हा विचारलं, “तुमची अजून काही इच्छा आहे का जी पूर्ण झाली नाही?” ती हलकेच हसली. “हो… आयुष्यात एकदातरी निवांत, राजासारखं जगायचं होतं. पण कधी वेळ मिळालाच नाही.” डॉक्टर म्हणाला, “तुमच्याकडे काय मालमत्ता आहे?” ती म्हणाली, “हा फ्लॅट आहे आणि गावाकडे एक प्लॉट आहे. आजच्या दराने किमान सहा सात कोटींचा असेल.” डॉक्टर तिच्याकडे पाहत म्हणाला, “मग तुम्ही अजूनही श्रीमंत आहात, फक्त भावनिकदृष्ट्या एकट्या आहात. तो प्लॉट विकून टाका. अर्ध्या पैशांत दुसरी मालमत्ता घ्या आणि उरलेले पैसे स्वतःवर खर्च करा. पंचतारांकित हॉटेल, प्रवास, आराम, नवीन लोक, नवीन आयुष्य… तुम्ही पुन्हा जगायला शिकाल.”
ती त्या दिवशी घरी गेली, पण मनात पहिल्यांदाच एक वेगळा विचार जागा झाला, ‘मीही जगू शकते.’ काही महिन्यांत तिने प्लॉट विकला. थोड्या पैशांत दुसरी सुरक्षित गुंतवणूक केली आणि उरलेले पैसे स्वतःसाठी ठेवले. पहिल्यांदाच ती एका सुंदर हॉटेलमध्ये राहायला गेली. सकाळी योगा, स्विमिंग पूल, मोकळ्या गप्पा, नवीन ओळखी… तिला वाटू लागलं, जणू आयुष्य पुन्हा सुरू झालं आहे. ती दर तीन महिन्यांनी शहर बदलू लागली. कधी समुद्रकिनारा, कधी डोंगर, कधी ऐतिहासिक शहरं. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज आलं, डोळ्यांत चमक परतली.
कधी संध्याकाळी ती स्वतःशीच हसत म्हणायची, “मी इतकी वर्षं कशाला थांबले होते?” तिचं मन हलकं झालं, तिच्या हृदयात नव्या आठवणी साठू लागल्या. वयाच्या उत्तरार्धात तिने खरं आयुष्य अनुभवलं. काही वर्षांनी ती शांतपणे जगातून गेली, पण ती रिकामी नव्हती. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत दुःख नव्हतं, पश्चात्ताप नव्हता, फक्त समाधान होतं.
कारण तिने समजून घेतलं होतं की आयुष्य हे केवळ जगण्यासाठी नाही, तर मनापासून जगण्यासाठी आहे. आज चालता येतं, उद्या काठी लागेल. आज डोळ्यांत प्रकाश आहे, उद्या चष्मा लागेल. आज मित्रांसोबत हसा, उद्या डॉक्टरांसोबत बसाल. म्हणूनच आजचा क्षण जगा. आयुष्य हे औषधांवर नाही, तर आठवणींवर जगायचं असतं.
लेखक सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा