Login

लोकं काय म्हणतील....?

लोकं काय म्हणतील?
' केलंस ना शेवटी तुझ्या मनासारखं? मग आता कशाला आम्हाला तोंड दाखवायला आला आहेस? आलात तसे निघून जा इथून दोघे जण.

२ दिवसांपूर्वी रजिस्टर लग्न केलेल्या समीर आणि त्याच्या बायकोला म्हणजेच केतकीला दाराशी आलेलं पाहून विनायकराव म्हणजेच समीरचे वडील जोरात ओरडले.

बाबा प्लीज असं नका करू . तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण ?
केतकी आता आपल्या घरची आहे . प्लीज आम्हाला अंतर देऊ नका .
आई ....तू तरी समजाव ना बाबांना.

विनायक राव आपल्या बायकोकडे रागात पाहत म्हणाले, ती काय समजावणार मला?
तुझ्यासाठी मी श्रीधररावांच्या मुलीला नैनाला मागणी घातली होती.
एकुलती एक , पदवीधर , दिसायला सुंदर , शिवाय आपल्याच गावातील आपल्याच जातीतील मुलगी .
तिला नकार देऊन तू चक्क या दुसऱ्या जातीधर्मातील मुलगी पसंद केलीस?
आणि हिलापण लाज नाही का खुशाल आई - वडिलांना सोडून लग्न करते दुसऱ्याशी?

इतका वेळ बाप - लेकांचं भांडण पाहून भेदरलेली केतकी पुढे आली आणि विनायकरावांना म्हणाली,

बाबा, मी अनाथ आहे. माझ्या आज्जी आजोबांनी माझा सांभाळ केला. पण ते आता हयात नाहीत. आणि मी दुसऱ्या जातीतली असले तरी माझ्यावर चांगले संस्कार आहेत..मी तुमच्या सुनेकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करेल. पण आम्हाला बाहेर नका काढू.

या गावात मला आणि माझ्या शब्दाला लोकं फार मान देतात.आता तुमच्या या हरकतीमुळे मला गावात आणि आपल्या समाजात तोंड दाखवायला जागा नाही राहिली.
लोकं हसतील आता मला....म्हणतील दुसऱ्यांना बोलायचा, उपदेश द्यायचा ,आणि स्वतःच्या घरी मात्र मोकळा कारभार.
आता कोणाकोणाला काय उत्तरं द्यायची मी? - विनायकराव

समीर हात जोडत म्हणाला, हे माझं आयुष्य आहे . मी माझ्या मनाप्रमाणे जगेल . त्यासाठी तुम्हाला किंवा मला दुसऱ्या लोकांना उत्तरं द्यायची गरज नाही. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा विचार कशाला करायचा?

जास्त शिकलास म्हणून स्वतःला शहाणा समजू नकोस. मला माझ्या समाजात, गावात राहायचे आहे त्यामुळे तू निघ इथून.
मी माणसं कमावलेली आहेत त्यामुळे मला तुझी गरज नाही. - विनायकराव दाराच्या दिशेने हात दाखवत म्हणाले.

नवऱ्यापुढे एकही शब्द न बोलू शकणाऱ्या जानकीबाईंनी रडतच आपल्या मुलाचा आणि सुनेचा निरोप घेतला.

समीरच्या लग्नाचा हा विषय काही दिवस गावात चर्चेचा झाला . श्रीधर रावही विनायकरावांशी भांडून गेले होते. त्यामुळे सुरुवातीचे काही वर्षे लोकांमध्ये या घटनेची कुजबुज सुरूच होती.
विनायक रावांना मात्र मुलाला - सुनेला घराबाहेर काढल्याचे दुःख नव्हते.
ग्रामपंचायतीच्या नोकरीतून त्यांचं चांगलं भागत होतं.
त्यांच्यामते त्यांनी समाजातल्या लोकांसमोर दुसऱ्या जातीधर्मात लग्न केलेल्या मुलाला घराबाहेर काढून चांगला आदर्श निर्माण केला होता.

याउलट जानकीबाई विनायकराव नसले की घरच्या landline वरून मुलाला फोन करायच्या. सुनेची चौकशी करायच्या. त्यांच्याशी प्रेमाने बोलायच्या.
काही वर्षांनी समीर - केतकीला मुलगी झाली. ही आनंदाची बातमी त्यांनी विनायकरावांना दिली पण आम्हाला काही देणंघेणं नाही असं बोलून विनायक रावांनी फोन आपटला.

त्यानंतर जानकीबाई गावातला कोणी कोणी शहरात जात असेल तर त्याच्याकडे नातीसाठी वस्तू वैगेरे पाठवू लागल्या. समीरनेही आईसाठी एक स्मार्टफोन पाठवला . जानकीबाईंनी व्हिडिओ कॉल शिकून घेतला आणि आता त्या विनायक रावांना न जुमानता नातीशी बोलू लागल्या.
कधी कधी विनायक रावांना पण इच्छा व्हायची मग वाटायचं की आपण बरोबर केलं आहे.

१५ वर्षानंतर..........................

विनायकराव आहात का घरी? अहो पुढच्या आठवड्यात नातीच लग्न काढलंय पोराने म्हणून पत्रिका द्यायला आलोय.
तात्या विनायकरावांच्या घरात शिरत म्हणाले.

अहो अस एकदम पुढच्या आठवड्यात? तयारी कधी होणार मग? बघू बरं पत्रिका .......
अरे हे काय....? तात्या.....अहो हे काय लिहलंय ...आपल्या सपनाचं लग्न ना? होणारा जावई पंजाबी???
पंजाब्याच्या घराशी सोयरिक जुळवली????

तात्या शक्य तितक्या लहान आवाजात म्हणाले, आता आपलं कोण ऐकतंय?
पोरीला चांगलं शिकवलं आणि नंतर ऑनलाईन का काय म्हणतात ते ओळख काढली आणि लग्न ह्याच्याशीच करणार म्हणून आडून बसली .
तिच्या बापाने आधी समजावलं तिला. पण नंतर आम्हाला कळलं मुलगा चांगला आहे . घरचे लोकही सुशिक्षित आहेत. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे मग अजून काय पाहिजे ?

तात्या तुम्ही गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहात. तुम्हीच अस केलं तर लोकं काय म्हणतील ? काय उत्तर द्याल तेव्हा? - विनायक राव म्हणाले.

कशाला कोण काय बोलेल ? जरी बोलले तर बोलू दे ना. माझ्या नातीचं चांगलं होत आहे याच्याशी मला देणंघेणं.
आता बोलतील मग विसरतील.
तात्या निघून गेले आणि विनायक राव विचारात पडले.

लग्नाच्या दिवशी पण गावातले लोकं पोरीने चांगली सोयरिक जुळविली म्हणत नवरदेवकडच्या लोकांची तारीफ करत होते.

२ वर्षांनी विनायकरावांच्या भावकीतल्या एका नातलगाने असेच जातीबाहेर लग्न ठरवले. ही बातमी ऐकून विनायकराव तावातावाने त्यांच्या घरी गेले.

काय रे किशोर..? तुला आपल्या जातीतल्या मुली नाही मिळाल्या का प्रेमविवाह करायला?
आणि किशोरच्या आई ....तुम्ही तरी कशी परवानगी देता ? तुम्हाला चालेल का हा असला प्रकार ? आपला समाज आणि लोकं काय म्हणतील याचा तरी विचार करा.

किशोर संतापून म्हणाला ...
विनायकराव तुम्ही वडीलधारे आहात पण म्हणून आम्ही काय करायचं हे ठरवायचं अधिकार तुम्हाला नाही . ..

आम्हा दोघांना सोयरिक पसंद आहे मग मला लोकं काय म्हणतील याचा विचार करायची गरज नाही.
तसंही १५-२० वर्षांपूर्वी तुम्ही समीरदादाला लोकांचा विचार करून याच कारणाने घराबाहेर काढलं होत ना आता मला सांगा किती लोकं येतात तुम्हाला विचारायला ????
आहे का कोणाच्या लक्षात तो प्रसंग आता ? असला तरी किती लोकं कौतुक करतात तुमच्या वागण्याचं ?

विनायक राव शांतपणे म्हणाले, माझ्या वागण्यामुळे लोकांसमोर माझा मान राहिला. किंमत राहिली.

कसली किंमत? कसला मान ? उद्या तुम्हाला काय झालं तर कोण येणार आहे तुमचं करायला ?
लोकांचा विचार करून त्यांना घराबाहेर काढलं ना तुम्ही, बघू उद्या किती लोकं तुमचं करायला येतील?

तुमच्या मुलाशिवाय तुम्हाला कोणी विचारणार पण नाही एवढं लक्षात असूद्या.

विनायकराव निरुत्तर होऊन घरी निघून आले
तेव्हा जानकीबाई सुनेशी व्हिडिओकॉल वर बोलत होत्या. केतकी त्यांना प्रेमाने रागवत औषधं घेण्याविषयी सूचना देत होती तर त्यांची नात जानकी आजी कशी स्ट्राँग आहे हे सांगत चिडवत होती.

इथे विनायकराव आपण इतक्या वर्षात लोकांचा विचार करून प्रेमाची माणसं गमावल्याचं दुःख करत बसले होते.
0