प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण भाग-१
" अगं, तुला एवढा माहीत आहे, तरी तू कशाला तुझ्या सुनेला एवढं बोलत असते ?" रोहिणी काकू म्हणाली.
" आपला काही अधिकारच नाही, असंच आजकालच्या सुनांना वाटत असतं." जेवल्यानंतर सर्व वृद्ध महिलांचा रात्री चालण्यासाठी जमलेल्या गटामधल्या माने काकू म्हणाल्या.
"आपण सर्व करतच होतो ना, त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी नीट करायला यायला हव्यात. आपण या वयामध्ये एवढं करत असतो, पुन्हा आपली मुलं जेव्हा आपल्याला काहीही बोलतात, तेव्हा कधी कधी ही आपलीच मुले आहेत का, असा मला प्रश्न पडतो." त्यातीलच एक वैशाली काकू म्हणाल्या.
इथेच बाजूला साने काकू शांतपणे बसून सर्वांचे ऐकत होत्या.
' घरातल्या गोष्टी बाहेर कशाला सांगत बसतात. दुसऱ्यांना नुसत्या चौकश्या करायच्या असतात. आता आपलं वय काय? खायचं, प्यायचं आणि शांत राहायचं. कशाला उगाच सुनांच्या कामांमध्ये चुका काढत बसायच्या.' त्या मनातल्या मनात म्हणाल्या.
"आपणच आपल्या सुनांना समजून घ्यायला हवे." रोहिणी काकू सर्वांना सांगत होत्या.
" काय तुम्ही? कधी तुमच्या सुनेबद्दल काही बोलतच नाही, तसे ती खूप चांगली आहे; असं मी ऐकले आहे." त्यातील एक काकू रोहिणी काकूंना म्हणाल्या.
" हा म्हणजे बरीच म्हणायचे आता. आपणच सांभाळून घेतल्यावर त्या कशाला काय बोलणार आहेत." हसत रोहिणी काकू म्हणाल्या.
"बरं, यावेळेस कोणाच्या घरी आपण नाश्त्यासाठी जाणार आहोत ?" माने काकू उत्साहित होत विचारत होत्या.
सगळ्यांच्या घरी जाण्याची पाळी झालेली होती. आता फक्त रोहिणी काकूंच्याच घरी जायचे राहिले होते. प्रत्येकजणी स्वतःहून या आठवड्यामध्ये माझ्या घरी या, बोलत होत्या; परंतु रोहिणी काकू कधी स्वतःहून काही बोलायच्या नाहीत. यावेळेस सुद्धा त्या गप्पच होत्या.
"रोहिणी ताई, तुमच्याच घरी यायचे राहिले आहे." त्यातीलच एक बाई म्हणाली.
" हो का, माझ्या लक्षातच नव्हतं. बरं मी एकदा घरात कोणी पाहुणे वगैरे येणार नाहीत ना, ते बघून आपल्या ग्रुप वर सांगते." त्या म्हणाल्या.
पुन्हा एकदा नातवंड, मुले, जावई आणि सून या त्यांच्या विषयावर मनसोक्त गप्पा मारुन झाल्यावर त्यांनी झोपण्यासाठी आपल्या घराकडे पाय वळवले.
आता सगळ्याजणी आपल्या घरी येणार आणि पुन्हा प्रत्येक गोष्ट बारकाईने बघणार म्हणून रोहिणी काकूंना जरा टेन्शनच आले होते.
ज्यांच्या घरी त्या आधी गेलेल्या होत्या, तिथे बाकीचे कसे वागतात, हे सुद्धा त्यांनी बघितलेले होते. काहींनी तर एकत्र भेटायचे, म्हणून आधीच सुनांना सांगून ठेवले होते. काहींच्या सुनांना एवढ्या दहा बायकांचा नाश्ता करायचा म्हणजे जीवावर यायचं, म्हणून त्यांनी आधीच नकार दिलेला होता. काहींच्या सुना नोकरी करणाऱ्या होत्या, त्यामुळे त्यांना जर त्यांच्या सासूने आधी त्रास दिला असेल, तर त्यांच्याशी निगडित असणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीबद्दल काही करण्याबाबत त्या नेहमीच निरुत्साही असायच्या, ह्या त्यांच्या वागण्या बोलण्यावरून दिसायचे.
" आई, आज तर तुला खूपच उशीर झाला." रोहिणी काकूंच्या मुलाने विचारले.
" हो रे, या आठवड्यामध्ये आपल्या बिल्डिंग मधल्या काही बायका ज्या माझ्या मैत्रिणी आहेत; त्या नाश्त्यासाठी घरी येणार आहेत. म्हणून त्याबद्दलच बोलणं चालू होतं." त्या म्हणाल्या.
" भारी आहे. तुमच्या सगळ्यांची मज्जा असते. एकमेकांच्या घरी जाऊन गप्पा गोष्टी आणि खाणं-पिणं छानपैकी तुमचं चालू असतं." त्यांचा मुलगा म्हणाला.
" हो, आता या वयात करायचं काय आहे? आयुष्यभर घरात मुलांचं केलं. त्यानंतर नातवंडांचं करावं लागतं, मग तेवढाच काय तो आम्हाला विरंगुळा असतो. आम्ही तरी आमच्या गोष्टी कुठे व्यक्त करणार?" त्या मात्र खूपच निर्विकारपणे म्हणत होत्या.
आपल्या आईची सवय रोहिणी काकूंच्या मुलाला माहीत असल्यामुळे त्याने त्यावर जास्त काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
हे सर्व रोहिणी काकूंची सून, दिशा ऐकत होती.
दुसऱ्या दिवशी सर्व घराची साफसफाई काढायला रोहिणी काकूंनी सांगितली होती. आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी सणानिमित्त केलेली असून सुद्धा, आपल्या सासूने पुन्हा साफसफाई काढायला सांगितली; म्हणून थोडीशी दिशा वैतागली होती.
दिशाला आत्ताच कुठे गरोदरपणातील तिसरा महिना लागलेला होता. त्यात तिने एका आठवड्याची आरामासाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती.
सासुबाई फक्त एका जागी बसून सर्व गोष्टी सांगायच्या. बाकी सर्व तिला कराव लागायचं. नवऱ्याला सुद्धा महत्त्वाचा प्रोजेक्ट असल्यामुळे, तो तिला जास्त मदत करू शकत नव्हता. त्याने सुद्धा एवढं सर्व करायची गरज नाही, असं सांगितलेलं होतं, परंतु माझ्या मैत्रिणी येणार आहेत, असे म्हणून सर्वच गोष्टीने नीट हव्यात; असा जणू आदेशच रोहिणी काकूंनी त्यांना दिला होता.
" दिशा, एकदा आईच्या मैत्रिणी घरी येऊन गेल्यानंतर तू थोडे दिवस माहेरीच राहायला जा. तेवढाच तुला आराम करायला वेळ मिळेल. इथे आई काही ऐकत नाही. तुझी बाजू घेतली की, तिला राग येतो. त्यामुळे काहीतरी कारण देऊन, एका आठवड्यासाठी तुझ्या माहेरी राहण्यासाठी जा. " दिशाच्या नवऱ्याने सांगितले.
क्रमशः
रोहिणी काकू काय करतील पुढे?
©विद्या कुंभार.
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा