Login

लोकमान्य टिळक भाषण (Lokmanya Tilak Speech In Marathi)

Lokmanya Tilak Speech In Marathi
भाषण क्रमांक 1

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र -मैत्रिणींनो आज आपण इथे जमलो आहोत ते एका महान नेत्याची पुण्यतिथी साजरी करायला. ते महान नेते आणि स्वतंत्र सेनानी म्हणजेच लोकमान्य टिळक!

आपला देश जेंव्हा पारतंत्र्याच्या बेड्या घालून एखाद्या अजगरासारखा सुस्त होऊन पडला होता. जेंव्हा पारतंत्र्य हेच आपले प्राक्तन आणि गुलामगिरी हेच आपले नशीब असं मानून आपला समाज ब्रिटिशांच्या अन्यायाचे आसूड निपचित होऊन झेलत होता तेंव्हा पूर्ण देशात एक आवाज आणि एक घोषणा दुमदुमली आणि आपल्या झोपलेल्या समाजाला जागे केले.

‛ स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’

असं इंग्रजांना ठणकावून सांगून झोपलेल्या समाजाला जागं करून लढण्याची प्रेरणा त्या शब्दांनी आणि त्या आवाजाने आपल्या लोकांना दिली. तो आवाज होता लोकमान्य टिळकांचा. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.लोकमान्य टिळक मुळातच कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यात आले. तिथे त्यांनी डेक्कन कॉलेजमधून पदवी संपादन केली. टिळकांचे आवडते विषय म्हणजे गणित आणि संस्कृत!1880 मध्ये टिळकांनी विष्णुशास्त्री चुपळूनकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कुल या संस्थेची स्थापना केली. आणि टिळकांचे सामाजिक जीवन सुरू झाले. पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि या कॉलेजमध्ये ते विनापगार शिकवले.

टिळक कायमच पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती आणि प्रेम निर्माण केले. त्यांनी जनजागृती करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे काढली. त्यातून ते कायम ब्रिटिश सरकार विरुद्ध लिखाण करत.1896 मध्ये महाराष्ट्र मोठा दुष्काळ पडला तेंव्हा त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित होण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या केसरी वृत्तपत्रातून सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

1897 मध्ये पुण्यात भयंकर प्लेगची साथ आली होती. त्या काळात ब्रिटिश सरकारने पुण्यातील जनतेवर अतोनात अन्याय केले. तेंव्हा टिळकांनी बंड पुकारले. त्यांनी वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकारला

‛ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’

असा खडा सवाल विचारला होता. आणि त्यांना त्यासाठी तुरंगात ही जावे लागले होते. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगली आणि तिथेच त्यांनी ‛ गीता रहस्य ’ हा ग्रंथ लिहला.

त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती सारखे उत्सव सुरू केले. त्यांना ‛भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून ओळखले जाते.त्यांचे इंग्रजांशी लढा देत असताना 1 ऑगस्ट 1920 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची आज पुण्यतिथी! त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो.
★★★
भाषण क्रमांक 2

माननीय मुख्याध्यापक आणि आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्र - मैत्रिणींनो! आज आपण इथे जमलो आहोत ते म्हणजे आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी.

लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वती बाई होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे नाव केशव ठेवण्यात आले होते पण त्यांना घरात सगळे बाळ म्हणायचे आणि तेच नाव पुढे ठेवले गेले. टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि बंडखोरवृत्तीचे होते. गणित विषयात त्यांना विशेष गती आणि रुची होती.

एकदा वर्गात त्यांच्या शेजारील बेंचवरील मुलांनी शेंगा खाऊन टरफले तिथेच टाकली. वर्गात शिक्षक आल्यावर त्यांनी टिळकांना ती टरफले उचलायला सांगितली तेंव्हा

‛ मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही.’

असे बाणेदार उत्तर छोट्या टिळकांनी धिटाईने दिले होते. तेव्हांपासूनच त्यांच्या बंडखोरवृत्तीची चुणूक त्यांनी दाखवून दिली होती.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये पाठवण्यात आले तिथे त्यांनी गणित विषयात बॅचलरची पदवी संपादन केली. त्यांचे गणित आणि संस्कृत हे आवडते विषय होते.त्यांनी यावरच न थांबता एल.एल.बी देखील केले. त्यांचे लग्न सोळाव्या वर्षी सत्यभामाबाई उर्फ तापीबाईंशी झाले होते.

त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे मित्र गो.ग. आगरकर आणि चिपळूणकर यांच्या साहाय्याने 1880 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली आणि तिथूनच त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.पुढे 1885मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. तिथे ते विनापगर शिकवत होते. पारतंत्र्य आणि अन्याया विरुद्ध त्यांच्या मनात भयंकर चीड होती.

त्यांनी गो.ग.आगरकरांबरोबर केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. त्यातून ते इंग्रज सरकारवर सातत्याने टीका करत असत. टिळक हे जहाल मतवादी नेते होते. त्यांना स्वातंत्र्यची ओढ होती. त्यांनी विविध प्रकारे जनजागृती केली आणि लोकांना आपल्या हक्काविषयी जागृत करण्याचे काम केले.

‛ स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच.’ अशी सिंह गर्जना त्यांनी केली.


त्यांनी लोकांना संघटित करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. 1897 मध्ये पुण्यात भयंकर प्लेगची साथ पसरली होती. या काळात इंग्रज सरकारने पुण्यातील जनतेवर अतोनात अन्याय केले. ते पाहून

‛ सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?’ या शीर्षकाखाली त्यांनी केसरीमधून अग्रलेख लिहला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यांना मंडालेतील तुरुंगात सहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आणि तिथेच त्यांनी
‛गीता रहस्य’ हा ग्रंथ लिहला. त्यांना इतिहासात भारतीय असंतोषाचे जनक म्हणले जाते. इंग्रजांशी लढत असताना 1 ऑगस्ट 1920 मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले

अशा या महान नेत्याची आणि स्वातंत्र्य सेनानीची आज पुण्यतिथी! त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
©स्वामिनी चौगुले