प्रेम! एका अनामिक वळणावरचं. पर्व-२ भाग-६

एक चतुर राजकारणी आणि एका ध्येय वेड्या मुलीची ही अनोखी प्रेमकहाणी.
भाग -६

पूर्णाच्या घरी सकाळी,

नऊ वाजलेले तोच पूर्णाच्या आईने तिला झोपेतून उठवलं. तिने डोळे चोळत वरच्या भिंतीवरच्या घड्याळात बघितलं पण डोळे पूर्ण उघडतच नव्हते. मग तिने उशाला असलेला मोबाईल घेतला आणि त्यातली वेळ बघून तिची झोप कुठल्या कुठे पळून गेली. इतका वेळ आईने मागे लागून उठवायचा प्रयत्न केलेला पण खरी जाग मोबाईलमुळेच आली, असा विचार चमकून गेला तिच्या मनात... आणि ती हसली.

" पूर्णा अगं ए पूर्णा उठ...." आई परत किचनमधून हाक मारत आली.

" उठलीस का, बघ जरा घड्याळात किती वाजलेत ते. सकाळी सात वाजता उठवायला सांगितलेलं ना तू मला, तेव्हापासून उठवतेय आणि आता उठलीय तू. बघ घड्याळात सातच वाजलेत की नाही ते " आई तिला रागवत म्हणाली. तेव्हा तिला आठवलं की आपणच सकाळी अभ्यास करायला उठव म्हणून सांगितलेलं ते

" मग तू मला सातलाच उठवायचं ना आणि नाही उठले तर सोडून द्यायचं होतं. झोप तर मोडलीसच पण त्यासोबत माझं किती छान स्वप्न तोडलंस तू . मी महाभारतात जाऊन पोहोचलेले आणि तुला माहितीय त्यात माझी कर्णासोबत भेट झालेली. स्वयंवरात त्याने मला जिंकलेलं मी त्याच्या गळ्यात वरमाला घालणार तितक्यात तू किंचाळलीस आणि सगळं अदृश्य झालं " पूर्णा स्वप्नाळू स्वरात म्हणाली. तसं आईने पाठीत धपाटा घातला.

" म्हशे ते महाभारत आणि कर्ण ची स्टोरी वाचायचं बंद कर. चार दिवसांनी इंटरव्ह्यू आणि परीक्षेत तुला महाभारतातले प्रश्न विचारणार नाहीयेत. इतिहासाचा अभ्यास कर नाहीतर जा ताईच्या ऑफिसमध्ये जाऊन जॉब कर" आई कडक शब्दांत म्हणाली आणि तिथून निघून गेली.

ह्यां!!! याला काय अर्थय. इतिहास तर योद्धा आणि रणांगणाशिवाय अपूर्ण आहे. आणि कर्ण सारखा महावीर योद्धा एवढ्या युगात कधी झालाच नाही. जिथे जिथे अन्याय हा शब्द येईल तिथे कर्णाची छबी असेल. माझ्यासाठी कायम तोच महान असेल. तिने स्वत:ला ग्वाही दिली. तिने कर्ण संबंधित अनेक पुस्तकं वाचलेली. नुसती वाचलीच नाही तर तोंडदेखत पाठ करून ठेवलेली. असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा तिने राधेयाची आठवण काढली नसेल. त्याच्यावर झालेले अपमानाचे, अन्यायाचे वार आणि तरी तो ज्या निष्ठेने लढला ते पून्हा पून्हा वाचून, पाहून तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहायचं नाही. काय आहे हे सगळं तिलाही उमजायचं नाही कधी कधी... पण तिची निष्ठा तिचं प्रेम फिरून फिरून कर्ण या पात्राभोवतीच घुटमळायचं. आईची परत एकदा हाक आली तसं ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली.
चला बा आता आवरते आणि बाकीच्या इतिहासाचा अभ्यास करते. नाहीतर परवा इंटरव्ह्यू ला गेल्यावर कर्णावर भाषण देत बसले तर हाकलून लावतील मला. आणि मग नाईलाजाने ताईसोबत ऑफिसमध्ये काम करावं लागेल. अहं ती कल्पनाही नको. मी झाले तर शिक्षकच होणार. तिने मनाशी निश्चय केला आणि आवरायला गेली.

दुपारचे बारा वाजू गेलेले. साधारण दिड तास सगळे नोट्स चाळून ती हॉलमध्ये येऊन बसली. तर टीव्हीवर आजी दिग्विजय जगतापची मुलाखत मन लावून बघत बसलेली. तसं तिने काही होऊ शकत नाही अशा आविर्भावात मान हलवली. तिच्या येण्याची चाहूल लागली तसं आजीनेही वळून तिच्याकडे बघितलं आणि तिला खुन्नस दिली. ते बघून पूर्णाने डोळे फिरवले. आणि नाही म्हणलं तरी टीव्ही कडे लक्ष जाऊन दिग्विजय जगताप काय नि कसा बोलतो हे बघण्यासाठी तिचे कान टवकारले.

" आताच्या चालू असलेल्या वर्तमान राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? " मराठी न्यूज चॅनल वरच्या आघाडीच्या संपादकाने प्रश्न केला. त्यासोबतच त्यांच्या युनिटमधील इतर पत्रकारही होते. जे संधी मिळेल तसं त्याला प्रश्न विचारून कोंडीत पकडायचा प्रयत्न करायचे. पण त्याची उत्तरं प्रश्नकर्त्यालाच पेचात पाडणारी होती.

दिग्विजय - आताच्या राजकारणात समाजकारण मानणारी विचारसरणी खूप कमी प्रमाणात उरलीय. राजकारण हे सत्ताकारण होत चाललंय ही शोकांतिका आहे. पण हेही तितकंच खरंय की राजकारणात नीती, न्याय या गोष्टींना फारसा वाव नसतो. राजनीती, सत्तेचा वापर हा स्वतासाठी किंवा पक्षासाठी नाही तर मतदारसंघासाठी करणार्यांनाच जनता निवडून देते.

रिपोर्टर- म्हणजे यावरून तुम्हाला असं तर म्हणायचं नाहिये ना की राजस्थानमध्ये तुम्ही आणि तुमच्या पक्षाने जे केलं ते याचाच भाग होता ते?

दिग्विजय - माणूस जे करतो तेच तो बोलतो. पण राजकारणात असं नसतं. जे कधी केलं नाही तेही इथे धावत्या मनावर आसुड उंचावत बोलावंच लागतं. हे मी एक राजकारणी म्हणून नाही तर माणूस म्हणून बोलतोय. त्याने अशी काही गुगली टाकली की ती भल्याभल्यांना बाऊन्सर गेली.

तेवढ्यात दुसरा पत्रकाराने उठून प्रश्न केला.
रिपोर्टर- राजकारण, पक्ष, जनहित आणि स्वहित यात तुमचं सगळ्यात जास्त महत्त्व कशाला?
यावर दिग्विजय काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं...

दिग्विजय - यात सर्वात अग्रस्थानी जनहित आणि त्यानंतर अनुक्रमे पक्ष आणि राजकारण... कारण जनतेमुळेच पक्ष आणि राजकारण प्राप्त झालंय. पक्ष, राजकारणासाठी जनता नाही. त्याने निर्विकारपणे उत्तर दिलं.

रिपोर्टर - आणि स्वहित ??

दिग्विजय - it's none of my business. Next question please... तो तितक्याच निर्विकारपणे म्हणाला.

रिपोर्टर - राजकारणाला घराणेशाहीने पोखरलंय असे आरोप नेहमी होतात. कदाचित तुम्हीही कुठेतरी याच प्रवर्गात मोडता तर यावर आपलं काय म्हणणं आहे?
दुसऱ्या पत्रकाराने उठून विचारलं.

दिग्विजय - हे खरं असलं तरी त्याची निवड जनमतातूनच केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्या ज्येष्ठ नेत्यांची मुले घराणेशाहीतून पुढे येऊनही उत्तरार्धात अयशस्वी ठरले. अंतिम निर्णय जनतेचाच असतो.

रिपोर्टर - तुम्हाला राजकारणात रूची असल्याने तुम्ही राजकारणात आलात की जगताप साहेबांच्या इच्छेखातर? कारण असंही बोललं जातं की तुम्हाला लहानपणापासून दादासाहेबांनी राजकीय धडे दिलेत.

दिग्विजय - मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं. कारण घरात नेहमी राजकीय नेत्यांची ऊठबस असल्याने मी घरापासून लांब रहायचो. पण दादासाहेबांनी आम्हाला राजकीय धडे दिले हे अर्धसत्य आहे. त्यांच्या सहवासात राहूनच आम्हाला राजकारण कळलं म्हणूनच राजकारणात यायचं नाही हे निश्चित ठरवलेलं. कारण मी पेशाने वकिल आहे अनेक सोशल फाउंडेशन शी संलग्न आहे. पण एकदा दादासाहेबांच्या अनुपस्थितीत काही कार्यकर्ते मदत मागायला आले आणि तिथून पुढे अनेक राजकीय पेचप्रसंगात कार्यकर्ते हक्काने बोलू विचारू लागले तेव्हाच राजकारण प्रवेश झाला नसतानाही राजकारणी अशी ओळख मिळाली. त्यानंतर साखर कारखाने, शिक्षण संस्था, क्रिकेट असोसिएशन अशा जबाबदार्या मिळत गेल्या आणि त्यामाध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. युवकांची पसंती मिळत असल्याने अनेक राजकीय पक्षांनी आमंत्रण दिलं. तेव्हा मी ही गोष्ट दादासाहेबांना सांगितली असता ते म्हणाले, मी तुला राजकारणात ये म्हणणार नाही किंवा येऊ नको हेही सांगणार नाही. या क्षेत्रात यायचं की नाही ते तू ठरव पण तुला स्वीकारायचं की नाही हे जनताच ठरवेल. " कारण लहानपणापासून त्यांनी स्वताचे निर्णय स्वताच घेण्याची मूल्यं आम्हाला दिलेली...

एवढं झालं आणि चॅनलने थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला. जाहिरात लागली तसं पूर्णा आजीला बोलली,

" हे सगळं भाषणबाजी ऐकून बघून तुला बोअर होत नाही का ? पाचच मिनिटं बघितले मी तर आता मला झोप यायला लागली. " पूर्णा जांभई देत म्हणाली. तसं आजीने तिच्याकडे तिरकस नजरेने बघितलं

" काय झालं आता खरं तेच सांगितलं मी. बाप्पा आता बोलायची पण चोरी झाली घरात " पूर्णा नाटकीपणे म्हणाली.

" प्रत्येक गोष्टीत कुचकेपणा शोधावाच लागतो का ? काहीतरी चांगलं पण घेण्यासारखं असतं त्यातून... तेवढीच अकलेत वाढ तर होईल. " तिची आजी तिला लूक देत म्हणाली. तसं पूर्णा मोठमोठ्याने हसायला लागली.

" मला राजकारणात थोडी ना जायचंय आजी. मग काय डोंबल्याचं घ्यायचं त्याच्यातून. पण ते जाऊदे तुला का तो भामटा इतका आवडायला लागला. काय नातजावई करून घ्यायचा विचार आहे की काय ?" इति पूर्णा.

" गप बैस भैताड. त्याला बघून तरूणपणीचे जयवंतराव जगताप आठवतात. फक्त काळ बदलला पण बोलणं, विचार सगळं कसं हुबेहूब वाटतं. पण लोक म्हणतात तो त्यांचा मुलगा किंवा दत्तक घेतलेला असेल. मग एवढं कसं साम्य... " आजी विचारात हरवत बोलत होती.

" अगं आजी राजकारणी लोक नेहमी एकमेकांना कॉपी करत असतात. मग तोही करत असेल म्हणून सारखं वाटतं आणि तुझ्यासारखे भावनिक निष्ठावान लोकं लगेच याला भुलतात. आणि आणि एक मिनिट हं अच्छा म्हणजे तुला लग्नाआधी जयवंतराव आवडायचे होय ? आता कळलं मला सिक्रेट " ती फुशारक्या मारत म्हणाली. आधी आजीला कळलं नाही ती काय बोलली पण जेव्हा कळलं तेव्हा आजीने हातातली उशी फेकून मारली तिला...  पण तेवढ्यात मुलाखत पून्हा सुरू झाली तसं त्या दोघी परत तिकडे वळल्या.

रिपोर्टर - तुमच्या आवडीनिवडी आणि चांगल्या वाईट सवयींबद्दल सांगा...

दिग्विजय - आवडीनिवडी ओळखायला, जपायला कधी वेळ मिळाला नाही. पण इतर कुणी त्यांचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यात समाधान वाटतं. आणि माझी चांगली म्हणा अथवा वाईट एकच गोष्ट मला माहिती आहे ती म्हणजे अलिप्त राहणं.

दिग्विजय उत्तरला पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.

काय माणूस आहे की कोण आहे हा, असं कुठं असतं होय ? स्वताची नियत याला ओळखता आली नाही की ती सांगण्यासारखी नाही म्हणून हे कारण पुढे करतोय. पूर्णा डोळे फिरवत म्हणाली.

" पूर्णा.... तोंड सांभाळून बोलत जा जरा. तुला काय करायचंय कुणाची नियत कशी हे घेऊन. आणि तुला काहीच अधिकार नाही एखाद्याच्या चारित्र्यावर बोलण्याचा.. मग समोरचा कुणीही असो.  " तिची आई हॉलमध्ये येताच तिच्यावर खेकसली. त्यानंतर तिला पुढे काही बोलण्याचं धारिष्ट्य झालं नाही. आणि ते पून्हा शांतपणे टीव्ही कडे बघायला लागले.

रिपोर्टर - तुमचे राजकीय मार्गदर्शक दादासाहेब आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त तुमचे हितसंबंध असणारा नेता कोण??

दिग्विजय - ज्येष्ठ नेते रामानंद महामुनीजी... तो म्हणाला आणि तिथे प्रेक्षकात बसलेले शशांक आणि नील यांना हसू आवरलं नाही. कारण इतर सगळे आश्र्चर्यचकित होऊन पाहत होते. पण त्यांना दिग्विजयचं हे बोलणं सत्य आहे की उपहास याचे तर्क लावता येत नव्हते.

रिपोर्टर - पण सध्या त्यांच्यावर जो कारवाईचा बडगा ओढवलाय यामागे तुमचा हात आहे असे आरोप त्यांच्या समर्थकांकडून होतात. यात किती तथ्य आहे? शिवाय त्यांच्या विरुद्ध कोर्टात धुरा अॅड गौरवी सपकाळ सांभाळत आहेत. आणि या तुमच्या घनिष्ठ आहेत. म्हणून नकळत हे तुमचंच चक्रव्यूह आहे असंही बोललं जातं..

दिग्विजय - ती केस सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मला जास्त काही बोलता येणार नाही. पण महामुनी साहेब पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आमचा त्यांच्याप्रति निश्र्चितच स्नेह आहे. गौरवी सरकारी यंत्रणेचा भाग असल्याने सरकारी नियमांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागते. पण आशा आहे महामुनी साहेब याला पूर्ण सहकार्य करतील.
यावर तिथल्या पत्रकारांचं समाधान झालं असलं तरी दिग्विजयने पक्षांतर्गत कलह थोपविण्यासाठी हा मास्टरस्ट्रोक खेळलेला...

रिपोर्टर - तुमचं वैयक्तिक आयुष्य कधीच फारसं उजेडात आलं नाही. त्यामुळे याबद्दल काय सांगाल?

दिग्विजय - माझं वैयक्तिक आयुष्य इतकं वैयक्तिक आहे की त्यात काय चालूय हे मलाही आजवर कळलं नाही. आणि ते जाणून घेण्याचा मानसही नाही. कारण त्या विवंचना मला समाजकार्यापासून परावृत्त करतील. तो निर्विकारपणे म्हणाला. तरी रिपोर्टर ला यावर अजून खोदून विचारण्याचा मोह टाळता आला नाही.

रिपोर्टर - आजपर्यंत तुमचं नाव बहुतेकींशी जोडलं गेलंय. तर यातून तुमच्या जोडीदार निवडताना कुणाला निवडाल?
पत्रकाराने अतिशय पांचट प्रश्न विचारलेला याचा राग शशांकला जास्त आलेला. पण त्याने दिग्विजय समोर नमतं घेतलं.

दिग्विजय - लोक म्हणजेच मीडियावाले आपापल्या सोयीनुसार काही गोष्टींचे तर्क लावतात आणि ते टीआरपी मिळवण्यासाठी खपवतात. असो मी जोडीदाराविषयी आजपर्यंत कधी विचार केला नाही. It's none of my business. आणि ज्या तिघींसोबत माझं नाव जोडलं गेलंय त्यांच्याशी माझं आप्तेष्ठाप्रमाणे निखळ नातं आहे. त्यामुळे व्यर्थ तर्क लावल्याने जे सत्य आमच्या ठायी आहे ते पुसलं जाणार नाही.
दिग्विजय ठामपणे म्हणाला पण त्याचे शब्द एखाद्या तीक्ष्ण बाणाप्रमाणे अनेकांना बोचत होते.

रिपोर्टर - याबद्दल दिलगिरी. यावर दिग्विजय ने किंचित हसून प्रतिसाद दिला.

रिपोर्टर - आजच्या युवावर्गाला तुम्ही काय संदेश द्याल?

दिग्विजय - भारत हा युवांचा देश आहे. त्यामुळे युवकांचं स्थान देशाच्या प्रगतीत नगण्य आहे. तरूणाईने संपूर्ण जीवनातील फक्त पाच टक्के वाटा जरी विदेशातील आकर्षणाऐवजी इथे खर्च केला तर भारत जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून उदयास येईल. म्हणूनच युवकांनो फक्त कमवण्याच्या हेतूने ज्ञानार्जन करू नका. तर तुमच्या कौशल्याचा एकसंधपणे वापर करून देशाच्या उन्नतीत तुमचं योगदान व्यतीत करा.
एवढं बोलून दिग्विजयने विनयशीलतेने सर्वांना हात जोडून अभिवादन केलं आणि तो तिथून निघाला. मागे उमटलेला टाळ्यांचा कडकडाट, त्याच्या नावाचा जयघोष ऐकायला तो तिथे थांबला नाही.

सन्मान स्वीकारल्याने संघर्ष टळत नाही. आणि संघर्षाविना मिळालेला सन्मान तग धरत नाही. जगणं म्हणजे दिवास्वप्न नव्हे, हा तर एक प्रण आहे. ज्यात दिग्विजय हा कुणीच कोणत्याच बाबतीत असू शकत नाही. हीच जीवनाची रीत आहे. त्याच्या मनात यासारखे अनेक विचार घोंघावत होते. कदाचित हेच तर त्याच्या जीवनाचं फलित होतं जे तो नाकारत आलेला... कारण ते पचवण्याची त्याची सहनशीलता नियतीने जन्माआधीच हिरावून घेतलेली...

क्रमशः

🎭 Series Post

View all