प्रेम! एका अनामिक वळणावरचं. पर्व-२. भाग-३

एक चतुर राजकारणी आणि एका ध्येयवेड्या मुलीची ही अजब प्रेमकहाणी.
भाग-३

दुसरा दिवस उजाडला. पूर्णा अजून झोपलेली होती. काल रात्री झोपायला उशीर झाला आणि प्रवासात थकली असेल म्हणून तिला उठवायची तसदी कुणी घेतलेली नव्हती. ती जवळजवळ अकरा वाजण्याच्या सुमारास आळस देत उठली. आणि तयार होऊन हॉलमध्ये आली. तेव्हा तिचे बाबा आणि आजी टीव्हीवर न्यूज पाहत होते.

" आई..... भूक लागली मला. " पूर्णा सोफ्यावर बसून आईला हाक मारत ओरडली. तसं तिची आजी आणि बाबा त्यांची तंद्री भंग झाल्यामुळे रागाने तिच्याकडे बघत होते.

" लहान आहेस का तू. स्वता जाऊन घे ना काय खायचं ते खा. काडीची शिस्त नाहीये या पोट्टीला.." असं म्हणत आजी पून्हा लक्ष देऊन टीव्ही बघायला लागली. पूर्णा परत काही बोलणार तितक्यात तिच्या बाबांनी तिला गप्प अशी खूण केली.

काय देवा एवढं महत्वाचं आहे का ते. इथे घरात काय चाललंय ते बघावं ना आधी. तर चालले जगाच्या खबरी बघायला... मनातच बोलत तिने खुन्नस देऊन त्यांच्याकडे आणि परत टीव्हीकडे बघितलं. तसं अचानक तिला काहीतरी आठवलं. आणि तिने टीव्हीवरची न्यूज लक्ष देऊन बघायला लागली. तिथे तर ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली कधीपासून ते राजस्थानचंच राजकीय भूकंप दाखवत होते. आमदार रिसॉर्ट मध्ये गेले. त्यामागचा शिल्पकार, मास्टरमाईंड आणि ब्ला ब्ला ब्ला हेच कौतुकपुराण चालू होतं. म्हणून तिने खाली येणार्या इतर बातम्याही वाचून काढल्या. पण त्या माणसाचं काहीच कळत नव्हतं. सतत तेच ते न्यूज दाखवत होते. आता तिला ते बोअर व्हायला लागलेलं. पण रिमोट मागितला तर घरात भूकंप येईल म्हणून ती गप्प बसून होती. तेवढ्यात तिच्या आईने तिला चहा आणून दिला. आणि चहा पिऊन झाल्यावर किचनमध्ये मदतीला ये म्हणून सांगून गेली.

पण काम कसं तरी करून टाळायचं हे पक्कं माहित होतं तिला... तिने चहासोबत न्यूजपेपर घेतला वाचायला. तसंही तिला तो कोण हे शोधून काढायचंच होतं. आणि चहा आणि काम म्हणजे निमित्ताला कारण. तिचं टंगळमंगळ करत चहा पिऊन होईस्तोवर आईचं काम कामवाल्या मावशी किंवा ताईच्या मदतीने होऊन जाईल याची पुरेपूर काळजी घेतलेली तिने..

एक सिप एक बातमी असं करत सगळा पेपर आणि चहा संपवला. पण तो माणूस कोण असेल हे काही तिला कळत नव्हतं. पेपरमध्ये पण सगळा राजस्थान मधील राजकीय उलथापालथीचाच लेखाजोखा होता. ते वाचत बसण्यात तिला काहीच इंटरेस्ट नव्हता. तिला वाटत होतं तो कुणी IAS, IPS अधिकारी किंवा कुणीतरी मोठा बिझनेसमन असावा. पण छे त्याबद्दल काही खास नव्हतंच पेपरमध्ये. मग त्या बाई असं का म्हणाल्या असतील की डेली न्यूजपेपर आणि न्यूज पाहत जा मग कळेल तो कोण आहे ते... मी तर त्यांचं तोंड पण बघितलं नाही नीट. डोळ्यांवर तर काळा गॉगल होता त्याच्या... आणि शरीराने धिप्पाड उंच होता मग नक्कीच तो कोणता तरी यंग बिझनेसमन असेल. या निष्कर्षापर्यंत येऊन ती पोहोचलेली. ती त्याला शोधण्याचा का एवढा आटापिटा करतेय हे तिलाही माहित नव्हतं. पण का कुणास ठाऊक एक curiosity लागून राहिलेली तिच्या मनाला की कोण असेल तो महान माणूस. भलेही तिने त्याला माणूसकीवरून चार बोल ऐकवलेले पण तो काहीच बोलला नाही. इतकं कसं बरं कुणी शांत असू शकतं. जाऊदे ब्वा मी का एवढा विचार करतेय. असं म्हणत तिने तिचं लक्ष पून्हा टीव्हीकडे वळवलं.


टीव्हीवर अजूनही तेच दाखवलं जात होतं. पण तिचे आजी आणि बाबा दिग्विजय जगताप किंवा जयवंतराव लाईव्ह येण्याची वाट पहात होते. पण जयवंतरावांनी पत्रकार परिषद घेण्यास नकार दिलेला, आणि "फक्त थांबा आणि वाट पहा" असं सुचक वक्तव्य केलेलं. दिग्विजय जगताप मात्र अजूनही मीडियासमोर आला नव्हता.शिवाय मीडियासाठी तो नॉट रिचेबल होता. त्यामुळे प्रत्येक चॅनलवर जणू दिग्विजय जगताप कोण आहे, त्याचा इथपर्यतचा प्रवास हे सगळं दाखवत होते.

माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र, वय वर्षे ३०, शिक्षण एलएलबी आणि अर्थशास्त्राचा पदवीधर, विद्यार्थी परिषदेपासून प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात. पण त्याआधीपासूनच जयवंतरावांच्या सानिध्यात राहून लहानपणापासूनच राजकीय सारीपाटाचे धडे गिरवलेले, सध्या पक्षाचे युवा नेतृत्व आणि राजस्थानचे प्रभारी. इत्यादी इत्यादी त्याच्या फोटोसह दाखवलं जात होतं.

" अरे किशोर, हा जयवंतरावांचा मुलगा आहे का ? पण हे कसं शक्य आहे हा किती तरुण आहे. त्यांच्या नातवाच्या वयाएवढा असेल. " पूर्णाची आजी काहीतरी आठवत विचारत होती.

" हो सगळीकडे हेच सांगितलं जातंय की हा त्यांचा मुलगा आहे ते... मग मुलगाच असेल एवढं काय त्यात. " किशोरराव म्हणाले.

" नाही नाही. मला पक्कं आठवतंय ज्यादिवशी माझं लग्न झालं त्यादिवशीच जयवंतराव जगतापांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली. तेव्हा त्यांना सात वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा मोठा होईपर्यंत इथेच होता. पण अचानक विदेशात निघून गेला तो परत आलाच नाही. मग हा दिग्विजय कोण?" त्या गंभीरपणे म्हणाल्या.

" काही जणांकडून असंही बोललं जातं की हा त्यांचा मानसपुत्र आहे. पण जयवंतराव हेच सांगतात की तो त्यांचाच मुलगा आहे. मग मला तर असं वाटतं की हा त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा असावा. " किशोररावांनी त्यांच्या मनातला अंदाज व्यक्त केला.

" हम्म. असू शकतं असंही... पण या मुलाची एकूणएक कृती जयवंतरावांची तारूण्यातली आठवण करून देते. राहून राहून असंच वाटतं की हे त्यांचंच रक्त आहे. " पूर्णाची आजी आणि बाबा बोलताना पूर्णा ते सगळं लक्ष देऊन ऐकत होती.

" पण तुम्ही का इतका विचार करताय त्यांचा. राजकारणी लोकांचं कधी काही खरं असतं का ? आणि यावाचून आपलं काही अडलंय का. मग का उगाच आपल्या डोक्याला ताण द्यायचा. " पूर्णा अखेर बोलली. तसं तिच्या आजीने कपाळावर हात मारून घेतला.

" तुला माहित नाही, माझं माहेर हिंगोली. म्हणजेच मराठवाड्यासारखा दुष्काळी भाग. तिथे जयवंतरावांनी आमचा पाणीप्रश्न सोडवला. शिवाय जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही स्वीकारलं. त्यानंतर सलग दोनदा त्यांनी तिथून निवडणूक लढवली आणि जिंकलेही... उगाच कुणी कुणासाठी इतकं बोलत नाही. हे फक्त मीच नाही तर सगळा मराठवाडा बोलतो. कारण त्यांचे ऋण, जनतेच्या हिताबद्दलची जी हातोटी आहे ना ती विलक्षण आहे. " सुधाताई म्हणजेच पूर्णाची आजी सांगत होत्या.

" मग आजी तू मराठवाड्यातली आणि आजोबा विदर्भातले. तुमच्यात कधी यावरून भांडणं झाली नाहीत का ?" पूर्णाने विचारलं तसं सगळेच हसले.

" यावरून नाही झाली भांडणं कधी. फक्त भाषेवरून सुरूवातीला जरा अडचण यायची. पण परत होत गेलं सगळं... आणि आमच्या भांडणाचं एकच कारण असायचं नेहमी ते म्हणजे तुझी आत्या. तुझ्यासारखीच शेळपट. आजोबा मात्र तिला नेहमी पाठीशी घालायचे. मला मात्र ते पटायचं नाही. " सुधाताई आठवणींचा मनोरा फुलवून सांगत होत्या.

" म्हणजे आज आजोबा असते तर त्यांनी माझेही आत्यासारखे लाड केले असते ना. नाहीतर तू खूप छळते मला. बघितलंत का आजोबा तुम्ही नाही म्हणून मला किती सोसावं लागतं ते..." पूर्णा नाटकीपणे छताकडे बघत बोलत होती. ते बघून परत सगळे गालातल्या गालात हसायला लागले.

" पूर्णा बस कर आता बालिशपणा. लहान नाहीयेस तू, किती वेळा सांगायचं तुला. आणि ताईने तुझ्यासाठी तिच्या सरांना विचारलंय बघ तिथे जाऊन interview दे. काहीतरी कामाचं बघ. स्वताच्या पायावर उभी रहा. " पूर्णाची आई तिला रागवत म्हणाली.

" आई तुला कितीदा सांगितलं मी की मला कोणत्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम नाही करायचंय. मला प्राध्यापक व्हायचंय. मी सेटची परीक्षा पण दिलीय तरी तुम्ही नेहमी तेच ते ऑफिसचं सांगत असता मला..." पूर्णा काहीशी वैतागून म्हणाली.

" अगं मग परीक्षा पास होईपर्यंत हे करू शकतेस तू घरात बसण्यापेक्षा. तेवढाच अनुभव येईल तुला. तुझ्यासाठी म्हणूनच आपण इथे मुंबईत आलोय. " आजी म्हणाली.

" नाही परवा आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हा एक मैत्रीण म्हणाली मला की सेटची परीक्षा पास होईपर्यंत इथल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून जायचा विचार आहे. त्या संस्थेने जागा भरायला काढल्यात. पुढच्या महिन्यात तिथेच इंटरव्ह्यू द्यायला जाणारोत आम्ही. एकदा का सेट पास झाले की मग त्याच संस्थेत सहायक प्राध्यापकपदासाठी बढती होऊ शकते. " पूर्णा स्वप्नाळूपणे म्हणाली. तिची स्वप्नं जगावेगळीच होती. परिस्थिती प्रमाणे बदलणं तिला मान्य नव्हतं. कुणी कितीही सांगितलं तरी तिला जे हवं तेच ती करायची. स्वताचा स्वार्थ आणि फायदा बघण्यापेक्षा ज्यातून आपल्याला खरा आनंद मिळतो त्या गोष्टी साठी ती धडपडायची.

" देवा परमेश्वरा अवघड आहे या पोरीचं. तुझ्या लग्नाचा विचार करताना तरी आमचं ऐक . " तिची आजी उपहासाने म्हणाली.

" तिला जसा हवा मुलगा या पृथ्वीतलावर असेल की नाही हे धर्मसंकट असणारे आपल्यासमोर... " पूर्णाचे बाबा मिश्कीलीत म्हणाले.

" त्या गोष्टीला अजून खूप उशीर आहे. उगाच शितावरून भाताची परीक्षा घेऊ नका. आणि कुणी कसा का असेना फक्त मला समजून घेणारा असावा एवढंच वाटतं मला. " पूर्णा म्हणाली.

" हो बाई तू म्हणशील तसं... पण एक लक्षात ठेव जे करशील ते योग्यच कर. नाव गाजवायचं होत नसेल तर किमान नाव घालवण्यासारखं तरी काही करू नको. " तिची आजी तिला उद्देशून म्हणाली. पण पूर्णाला जरासं वाईट वाटलं आजीच्या बोलण्याचं... म्हणजे माझ्यावर यांचा भरोसा नाही काय? मी खरंच इतकी बावळट आहे का हे आणि यासारखे अनेक प्रश्न क्षणात विंचवासारखे तिच्या मनाला डसत होते.

" जाऊदे. चला सगळे जण जेवायला..." पूर्णाच्या बाबांनी कशीबशी विषयाला कलाटणी दिली. कदाचित तिच्या मनाची घालमेल त्यांना कळली असावी.

                 *-*-*-*-*-*-*-*-*-

दिग्विजयला आता आमदारांसह रिसॉर्ट मध्ये थांबून पंधरा दिवस उलटले होते. महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातील एका भ्रष्टाचारी नेत्याच्या मुलावरील केस चर्चेत होती. आणि उद्या त्या प्रकरणाचा अंतिम निकाल होता.

जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे गौरवी सौम्याला सोडायला तिच्या बेडरूममध्ये गेली.

" दि उद्या खूप महत्वाची केस आहे ना. होप सो नेहमीप्रमाणे सत्याची बाजू जिंकेल. तुला आणि कृणालला ऑल द बेस्ट " सौम्या गौरवीला हग करत म्हणाली. तसं गौरवीने हसून प्रतिसाद दिला आणि तिच्या गालावर हलकेच थोपटलं.

" दा पण असायला हवा होता ना. कधी येणारे तो किती दिवस झाले तिकडेच आहे. फोन कर ना त्याला, मला बोलायचंय.." सौम्या हट्ट करत म्हणाली. तसं गौरवीने दिग्विजयला कॉल केला. आणि फोन स्पीकरवर टाकला.

" हॅलो दादू " फोन रिसिव्ह केल्या केल्या सौम्या काहीशा नाराजीने म्हणाली.

" What's wrong angel. झोपली नाहीस का अजून" तो प्रेमाने शीळ घालत म्हणाला. तसा हिचा फुगलेला चेहरा क्षणार्धात गळून पडला.

" Daduuu we are missing you alot... कधी येणार तू इकडे. जावा ना पटकन राज्यपालांकडे आणि सत्ता मिळवा. किती दिवस अजून असं लपून डाव खेळणार... " सौम्या इमोशनली रागात म्हणाली. तिचा राग पण खूप क्यूट असायचा. त्याला हसू आलं तिच्या बोलण्याने...

" हो आता शेवटच्या टप्प्यात आलोय आम्ही.. बंडखोर आणि नाराजांची दुखती नस पकडलीय. आता येत्या आठवडाभरात सगळं सॉर्ट होईल ओके. " दिग्विजयने तिला समजावलं. तसं ती वरमली. पण तेवढ्यात गौरवी बाहेर जायच्या पेहरावात तयार होऊन आली.

" दि तू आता यावेळी कुठे निघतेयस..." गौरवीला तयार होऊन आलेलं बघून सौम्या म्हणाली.

" सौम्या माझं महत्वाचं काम आहे मी तासाभरात जाऊन येते. कांता मावशी आहेतच आज इथे. पण तू शांतपणे झोप. दिग्विजय ती झोपेपर्यंत तू तिच्याशी गप्पा मार. " गौरवी म्हणाली.

" गौरवी तू जा आणि काम फत्ते करून ये. मी बोलतोय सौम्याशी.. घरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज ऑन कर जाता जाता..." दिग्विजय म्हणाला तसं तिने होकार दिला आणि निघाली.

दिग्विजय सौम्याशी बरंच काही बोलत होता. अहं बोलत कमी ऐकत जास्त होता. तिची नेहमीसारखी चटरपटर चालू होती. तो गेल्यापासून इथली छोट्यातली छोटी गोष्टही ती त्याला रंगवून सांगत होती. तो बाल्कनीत लॅपटॉप घेऊन बसलेला घरातले फुटेज बघण्यासाठी. आणि कानात ब्लूटूथ होते. थोड्या वेळाने सौम्याला बोलता बोलता झोप लागली. आणि ती झोपली. तो तिला फुटेजमधून बघत होता. किती शांतपणे झोपलेली ती... झोपल्यावरही तिच्या चेहऱ्यावरची मोठी स्माईल तशीच होती. किती आनंद झालेला तिला. आणि तिला आनंदी बघून त्याला जगातला सर्वात मोठा आधार वाटत होता. तो प्रेमाने तिच्याकडे बघत होता. त्या दोघांच्या आयुष्यातला सौम्या हाच एक सुखावणारा हिस्सा होता. त्याने वर त्या काळोख्या आकाशात बघितलं तर तिथेही सौम्याचा हसरा चेहरा मोठ्या आकारात भासत होता. त्याच्या ओठांच्या कडा हलकेच रूंदावल्या. खूप वेळ असंच तो एकटक बघत होता. साधारण दीड ते दोन तासांनी गौरवी घरी आल्याचं फुटेजमधून दिसताच त्याने लक्ष तिकडे वळवलं. आल्या आल्या ती सौम्याच्या बेडरूममध्ये गेली आणि तिच्या अंगावरचं ब्लॅन्केट सारखं करत तिथून निघून तिच्या बेडरूममध्ये गेली. आणि दिग्विजयला फोन केला. दोघांनी बरीच काही सल्लामसलत केली. गौरवीने आज accidentally घडलेल्या त्या घटनेबद्दल त्याला कल्पना दिली. आणि इतर काही बोलून फोन ठेवला.


क्रमशः

काय वाटतं तुम्हाला... पूर्णा आणि दिग्विजयचे सूर एकमेकांशी जुळतील का. की परिस्थितीनुसार त्यांना आपल्या प्रेमाचं समर्पण द्यावं लागेल??

🎭 Series Post

View all