प्रेम! एका अनामिक वळणावरचं. पर्व-२. भाग-४

एक चतुर राजकारणी आणि एका ध्येयवेड्या मुलीची ही अनोखी प्रेमकहाणी.
भाग -४

गौरवीशी फोनवर बोलणं झाल्यावर तो तसाच डोळे मिटून टेबलावर पाय ठेवून रेलिंगला टेकत मागे झुकला. समोरच्याला अगदी शांत दिसत असला तरी मनात अनेक गोष्टी भराभर रचल्या जात होत्या. तेवढ्यात त्याच्या रूममध्ये कुणीतरी आल्याची चाहूल लागली. त्याला माहित होतं कोण आलं असेल ते..

" आत ये नील... " तो डोळे मिटलेल्या स्थितीतच म्हणाला. तसं नील लगबगीने येऊन त्याच्या समोर बसला.  तर नील भिडे हा तरूण दिग्विजयचा स्वीय सहायक होता. त्याच्या कोणत्याही दौऱ्यात, राजकीय कामात तो नेहमी त्याच्यासोबत सावलीसारखा असायचा. फक्त कामानिमित्त च नाही तर इतर अनेक बाबींत तो दिग्विजयसोबत जोडला गेलेला. आणि दिग्विजयने त्याच्यासह सर्व कार्यकर्त्यांना हक्काने त्याला दादा अशीच हाक मारायला सांगितलेलं. साहेब, सर वगैरे म्हणलेलं त्याला आवडायचं नाही.

" दिग्विजय दादा.... इथल्या राजकारणात बाह्य यंत्रणांचा, केंद्रीय सत्तेचा हस्तक्षेप होतोय. आजच वेटरच्या आणि इतर स्टाफच्या रूपात विरोधी पक्षाने आमदारांशी सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या गार्डनी हा डाव हाणून पाडला. आता आपलं इथे राहणं फायद्याचं ठरणार नाही असं वाटतंय. " तो गंभीरपणे वास्तव दर्शवत म्हणाला. तसा दिग्विजय गुढ हसला.

दिग्विजयला मघाशीचा गौरवीने दिलेला अलर्ट आठवला. ती म्हणालेली की महामुनीच्या नांग्या आपणच ठेचल्यात हे त्याला आणि त्याच्या दिल्लीतल्या म्होरक्याला कळलं असेल. म्हणूनच स्वपक्षात असूनही विजयाचं योगदान दिग्विजयला मिळू नये आणि तो वरिष्ठांच्या नजरेतून बाजूला व्हावा यासाठी त्यांनी विरोधी पक्षाला आपलेच आमदार फोडण्यासाठी मदत करण्याचा कुटील डाव रचला असेल. त्यामुळे तिथून निघून सुरक्षित ठिकाणी जावं आणि गनिमी काव्यामार्फत विरोधक आणि त्यांच्या समर्थनात असलेल्या अपक्षांना आपल्या चमूत आणावं याची मोर्चेबांधणी त्यांनी केलेली...

" नील सगळ्या आमदारांना एकेक करत मागच्या गेटकडे घेऊन जा. आपण आता बेंगलोरमधल्या रिसॉर्टमध्ये निघतोय पुढचे काही दिवस... Let's go." असं म्हणत दिग्विजय उठला. नीलनेही पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच निघाला.

मीडिया आणि तिथल्या इतर सरकारी यंत्रणांना सुगावा न लागू देता दिग्विजय पहाटे ३ च्या दरम्यान त्या सर्व आमदारांसह बेंगलोर स्थित रिसॉर्टमध्ये पोहोचला. इतक्या रात्रीही तिथले पक्षाचे काही नेते पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी तिथे आलेले. राजस्थान, गुजरात नंतर बेंगलोरमध्येही ठिकठिकाणी " एकच वादा, दिग्विजय दादा" असे स्वर निनादले. त्याने काहीही न बोलता फक्त हात जोडून अभिवादन केलं आणि त्या सर्वांना आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. आणि तो आतमध्ये गेला.  तिथे आल्यावर आमदारांची परेड व रिसॉर्ट मॅनेजरशी सुरक्षिततेची खातरजमा करून  तो नीलसह त्याच्या खोलीत आला.

" दादा, आता पाचच मिनिटांत विरोधी पक्षाचे तीन आणि अपक्ष दोन आमदारांची video conference आहे. " नील म्हणाला.

" हम्म... उद्या त्यांची इथे येण्याची सोय झालीय ना?" दिग्विजय ने विचारलं तसं त्याने होकार दिला.

थोड्या वेळाने त्यांची video conference यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांनी इतर गोष्टींवर चर्चा केली. तेवढ्यात नीलकडे असलेला त्याचा फोन वाजला.

" दादा, विरोधी पक्षनेते चौधरींचा फोन आहे. " नीलने सांगितले. तसं दिग्विजय ने तो फोन घेतला आणि स्पीकरवर टाकत टेबलवर ठेवला.

" ए दिग्विजय जगताप, ये तुने अच्छा नहीं किया..  अपने आप को क्या समझते हो, क्या तुम्हे अपनी पार्टी के MLA पर भरोसा नहीं है? हिम्मत है तो सामने आकर लढो. भागम भाग बहुत हो चुकी " फोन उचलताच पलीकडून विरोधी नेता बरसत होता. कारण त्यांचा डाव हाणून उलटपक्षी त्यांचेच आमदार गळाला जे लावले होते दिग्विजयने...

" ईट का जवाब पत्थर से... राजनीती में भरोसा किसी के काबिल नहीं होता बस शुरू आपने किया और अंत हमने.. now it's my turn. रोखना है तो रोख लो. " दिग्विजय कुत्सितपणे हसत म्हणाला. तसा तो अजूनच चवताळला. पण याशिवाय ते दुसरं काही करूही शकणार नव्हते. आणि फोन कट झाला.

" दादा आपला इथला मुक्काम जास्त दिवस नसणारे हो ना कारण बुकिंग फक्त पाच दिवसांची आहे. त्यानंतर आपला सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होईल ना " नील म्हणाला.

" हम्म. " त्याने हुंकार भरला. आणि त्याला जाऊन झोपायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी,

दिग्विजय टीव्हीसमोर बसून मराठी न्यूज चॅनल पाहत बसलेला... बराच वेळ कोर्टात त्या हायप्रोफाइल केसची सुनावणी चालू होती. अखेर राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या 'नागपूर तिहेरी हत्याकांड' प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आणि सबळ पुरावे, भक्कम युक्तिवादाला ग्राह्य धरून मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली. तेवढ्यात तिथे गौरवी तिचा सहायक वकिल कृणालसोबत बाहेर आली आणि माध्यमांनी तिला एकच गराडा घालून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तिने जराही न डगमगता त्यांच्या निरर्थक प्रश्नातली हवाच काढून घेतली. ते सगळं टीव्हीवर बघून दिग्विजय विजयोत्काराने हसला. उत्तराच्या अपेक्षेत असलेल्या पत्रकारांना गौरवीने प्रतिप्रश्न करून खडे बोल सुनावलेले त्याने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरलं. आणि टीव्ही बंद झाला.


" Lady lawyer is a type of power.... Who can help you to gain justice... And can push you in the fire of hell too. HATS OFF U GAURAVI" तो अभिमानाने स्वत: शीच उद्गारला.


दोन दिवसांनी दिग्विजयने पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आता काहीच अडचण नाही याची खात्री दिली. आणि राज्यपालांचा प्रस्ताव येताच आमदारांसह जयपूरला रवाना झाला. त्यांच्या पक्षाने सत्ता स्थापन केली. आता त्याची तिथली जबाबदारी पूर्ण झालेली. म्हणून तो मुंबईत यायला निघाला. इकडे मुंबईत एअरपोर्टवर पहाटे शशांक स्वता त्याला घ्यायला आलेला. इन्स्पेक्टर शशांक मनोहर म्हणजेच त्याचा सगळ्यात विश्वासू मित्र... महामुनीसारख्या भ्रष्टाचारी माणसाला वेसन घालण्यात गौरवीसोबत शशांकनेही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावलेली. अतिशय जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या शशांकशी सुर जुळायला त्यांची समविचारी विचारसरणी कारणीभूत होती. त्याच्या एकनिष्ठ असण्यामुळेच तो गौरवी आणि दिग्विजय सोबत कमी कालावधीत सर्वार्थाने जोडला गेलेला.

सकाळी ६ च्या दरम्यान दिग्विजय एअरपोर्टवर उतरला तसं त्याने खाली वाकून आधी मायभूमीचं दर्शन घेतलं. हारतुरे, पुष्पगुच्छ वगैरे तो कधीच स्वीकारायचा नाही त्यामुळे खाली हाताने स्वागत करण्याऐवजी काही कार्यर्कत्यांनी झाडांची रोपे आणलेली ज्याला दिग्विजय नाही म्हणूच शकला नाही. त्यानंतर मीडियाला फारसा काही प्रतिसाद न देता तो सरळ शशांककडे गेला आणि कडकडून त्याला मिठी मारली. आणि ते दोघेही तिथून आधी दादासाहेबांकडे गेले. त्यानंतर तो पक्ष कार्यालयात अनेकांच्या भेटीगाठी घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साही हसू आणि तेज तितकंच प्रखर होतं. या २५ दिवसात तो शांतपणे कधी झोपला असेल की नाही हे त्यालाही ज्ञात नसावं. पण चेहऱ्यावर जी टवटवी होती ती फक्त त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याप्रतीच्या निष्ठेचं रूप होतं. जे कधीच ओसरणार नव्हतं. शशांक आणि दिग्विजय एअरपोर्टवरून जाताना का कुणास ठाऊक पण त्या जागेवर तो करडी नजर टाकून गेलेला...

दुसरीकडे पूर्णाला मात्र पहाटेच अचानक जाग आली. आणि ती उठून बसली. झोपायचा प्रयत्न करूनही झोप काही येतच नव्हती. खूप वेळ ती नुसती कुस बदलत होती. शेवटी उठून मांडी घालून बसली आणि झोपेला चार शिव्या घातल्या. पण आता काय करायचं म्हणून तिने मोबाईल, हेडफोन्स घेतले. आणि यूट्यूबवर गाणे ऐकत बसली. गाणे ऐकण्यासाठी इतर अॅप्स असताना ही दीडशहाणी यूट्यूबवरच गाणे ऐकायची असं नेहमी सगळे म्हणायचे. पण पूर्णा म्हणजे पूर्णाच..‌

स्क्रोल करता करता एक बातमी दिसली तिला... दिग्विजय जगताप यांचं पहाटे एअरपोर्टवर आगमन याचं लाईव्ह सुरू होतं. एकामागोमाग एक अशा सगळ्या बातम्या बघितल्या तिने त्याच्याबद्दलच्या.. तरी समाधान होईना म्हणून यूट्यूबवर अजून सर्च केलं. आणि त्याची बायोग्राफी ढूंढाळत बसलेली. भाऊ बहिण कुणीच नाही त्याला.. पण अफेयर्स आहेत. तो एकाच वेळी दोघींसोबत लिव्ह इन मध्ये राहतो. शिवाय दिल्लीत त्याची अजून एक गर्लफ्रेंड आहे. दिग्विजय जगताप के काले कारनामे, कुछ अनजाने सच जो जगताप फॅमिली ने दुनिया से छिपाए है... या असल्या वेड घेऊन पेडगावला जाणार्या यूट्यूबर्सच्या बातम्या ती बघत होती. आजीला तर मोठं कौतुक त्या जगताप आणि त्यांच्या मुलाचं.. पण या मोठ्या लोकांचा काय भरोसा ते तर काहीही करू शकतात. जाऊदे ब्वा मी का विचार करतेय त्यांचा एवढा. मला काय घंटा फरक पडणारे हूह... असं स्वताशीच म्हणत तिने मोबाईल बंद केला.

पण त्याचवेळी त्या एअरपोर्टवरच्या माणसाची आठवण झाली तिला... तो पण माणूस असाच कुणीतरी मोठा असावा. त्याचंही असेल का असं अफेयर वगैरे..हे सगळी मोठी माणसं सारखीच. नाव मोठं आणि लक्षण खोटं. पण ते जाऊदे कोण असेल बरं तो, त्याला राग आला असेल का माझा, त्याला माझी आठवण येत असेल का ? तो माणूस परत मला कधी भेटेल का ? ती स्वताशीच बडबडत होती. मी शोधून काढलं तर त्याला काय होईल ? शोधमोहीम पूर्ण होईल का माझी पण, आणि त्यानंतर मला सीआयडी, सीबीआय सारख्या गुप्त तपास यंत्रणेत घेतील का? स्वताच मारलेल्या या पांचट जोकवर तिला हसायचा प्रयत्न केला तरी हसूच येत नव्हतं. श्या लैच टुकार होता वाटतं जोक. जाऊदे खपूदे मला काय मी लोळते आली तर आली झोप नाहीतर लोळण्यात काय नुकसान नाही उलट फायदा आहे. असं म्हणत ती धपकन बेडवर कलंडली.


क्रमशः

दिग्विजय ही कथामालिका स्वतंत्र असली तरी अनेक पात्रं गौरवी कथेतलीच आहेत आणि काही घटनाही... त्यामुळे पात्रं तीच पण त्यामागचं नॅरेटिव्ह आणि रहस्य वेगवेगळ्या कोनातून असेल. आणि कथा आवडल्यास शेअर पण करा.