प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-६८

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-६८


लगीनघाई जोरात सुरू होती. उद्यावर लग्न आलं तरी आपल्या करवले मंडळींचे नखरे काही संपत नव्हते. सार्थक आणि गौरवी तर पार वैतागलेले... त्यांचंच लग्न मग सगळ्यांच्या सॉफ्ट टार्गेट वर तर ते दोघे असणारच होते. आलिशा, सौम्या आणि शशांक त्यांना चिडवायची एकही संधी सोडत नव्हते. तर गौरवीचे सैनिक दिग्विजय, कृणाल, मितलही संधी बघून त्यांना हिमनग दाखवत होते. गौरवी हे सगळं एंन्जॉय करत होती. पण सार्थकची मात्र गोची झालेली... बाकी ज्येष्ठ मंडळी मात्र यांच्या लूटूपुटूच्या खेचाखेचीचा मनसोक्त आनंद लूटत होते.

काल मेहंदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज रात्री साखरपुडा आणि हळदी लागोपाठ असणार होते. त्यामुळे सगळ्यांचीच तयारी आणि धावपळ सुरू होती. यासोबतच गौरवी दिग्विजयचे काही बाह्य हितचिंतकही या समारंभात बाधा आणण्याचा कुटील डाव शिजवत होते. दादासाहेबांनी सर्व राजकीय नेते व इतर ओळखीच्या नामांकित मंडळींना रिसेप्शनचे आमंत्रण दिले असले तरी लग्नात मात्र काही ठराविक मंडळी उपस्थित असणारच होती. या गोष्टीकडे जरी दादासाहेबांचं किंचित दुर्लक्ष होत असलं तरी दिग्विजय आणि कृणाल याबाबतीत अधिक सजग होते. दिग्विजयला मात्र एका वेगळ्याच संकटाची राहून राहून चिंता सतावत होती. त्यासाठी तो सकाळीच नाष्टा झाल्यानंतर गौरवीला गप्पा मारत मारत त्यांच्या बेसमेंटमधील मिनी ऑफिसमध्ये घेऊन आला.

" Digvijay, any queries...?" गौरवीने न समजून विचारलं.

" Something missing... एका व्यक्तीवर माझा संशय बळावतोय. का ते नाही माहित. पण बदल्याच्या आगीत जळणारी ती व्यक्ती हा चान्स सोडेल असं नाही वाटत मला..." दिग्विजय विचाराअंती म्हणाला. तिला कळत होतं त्याला काय सुचवायचं आहे ते...

" पण मला नाही वाटत दिल्लीश्वर इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी कुणाला ग्रीन सिग्नल दाखवतील. त्यांचे सगळे हुकमी एक्के जायबंद असताना ते ही रिस्क घेणार नाही. आणि राहिला प्रश्न तिचा तर ती इथे येऊन स्वताच्या पायावर दगड नाही मारून घेणार. तरी अलर्ट रहायला हवंय." गौरवी गंभीरपणे नाही पण तितक्याच सहजपणे म्हणाली. तिच्या नजरेतला दूरदृष्टीपणा त्याला जाणवला.

" अगदीच.. अलर्ट तर रहायलाच हवंय आपण, कारण आपण एकटे नाहीयोत सध्या. आपल्यासाठी बाकीच्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही आपण... मी सकाळीच सिक्यूरिटीला अल्टिमेटम दिलाय. आता पून्हा अलर्ट करतो. आणि तू म्हणालीस तसं ती इथे येऊन तिच्या जखमेवरची खपली काढून नाही घेणार. किमान तितकी अक्कल तर तिला आता आलीच असावी. " दिग्विजय तिला दुजोरा देत म्हणाला. पण शेवटचं वाक्य तो मिश्कीलपणे म्हणाला. तसं गौरवीही हसली. आणि ते दोघेही तिथून बाहेर पडले.

संध्याकाळी सातच्या सुमारास विधीवत सार्थक आणि गौरवीचा साखरपुडा पार पडला. त्यातही सगळ्यांनी डीजेच्या तालावर नाचत धमाल आणलेली... सार्थक आणि गौरवी मात्र त्या सगळ्यांकडे बघत त्यांना दाद देत होते.

इंजिन की सीटी पे मारो
बम के डोले
थोडा और भगा ले ड्रायव्हर
चल मत हौले हौले...

सौम्या आलिशा मितल या गाण्यावर थिरकत होत्या. शशांक आणि कृणालचीही लूडबूड होतीच. दिग्विजय मात्र त्यांची मजा घेत टाळ्या वाजवत त्यांना चीअर अप करत होता. सार्थकला पण खूप वाटत होतं जावं आणि बेधूंद नाचावं... पण ते जणू त्यांचं लग्न असूनही अडगळीत पडल्यासारखे झालेले. त्याच्या मनात प्रकटलेले हे भाव गौरवीने अचूक हेरले. आणि तिने उठून सार्थकचा हात धरून त्याला स्टेजकडे घेऊन जाऊ लागली. चालता चालता तिने दिग्विजयला इशारा केला. तसं दिग्विजयने ते दोघे स्टेजच्या मधोमध येताच बॅकग्राऊण्ड ला रोमांटिक गाणं सुरू केलं.

इश्क वाला लव...

हळूवारपणे गाणं त्यांच्या मनातली तार छेडत होतं. सगळ्यांचं अटेन्शन एकसाथ अचानकपणे त्यांच्याकडे वळलेलं बघून सार्थकला जरा ऑकवर्ड वाटत होतं. पण गौरवीने त्याची मान तिच्याकडे वळवत त्याला कम्फर्ट मध्ये आणलं. आता ते दोघेही त्या गाण्याच्या चाली आणि शब्दानुसार हळूवार स्टेप ते करत होते. सगळे जण बाजूला होत लांबून त्यांच्याकडे प्रेमभराने पाहत होते. आपापल्या नादात सगळे त्यांना विसरूनच गेलेले हे प्रत्येकाच्या लक्षात येत होतं.

त्यानंतर आलटून पालटून गाणे लागत होते.

मेरी जा तेरा यू मुस्कूराना..
गलत बात है...

सार्थकच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ते बघून गौरवीही खुश होती. त्याच्या डान्स मूव्हज पाहण्यासारख्या होत्या. तो उत्तम डान्सरही आहे ही गोष्ट बहुतेकांना आज पहायला मिळत होती. गौरवीला इतकं जमत नव्हतं पण ती त्याचं बघून त्याला योग्य प्रतिसाद देत होती. आजूबाजूला कोण आहे याचा पूर्णपणे विसर पडलेला आता त्यांना... ते दोघे त्यांच्या दुनियेत हरवून बेधूंद झालेले... सार्थकसारखा लाजाळू अन् हळवा मुलगा आणि गौरवीसारखी धीरगंभीर निर्विकार मुलगी हे ते दोघेच आहेत का असा प्रश्न पडलेला सगळ्यांना... म्यूझिक स्लो झाल्यावर सगळ्यांनी एकच टाळ्या शिट्ट्यांचा वर्षाव केला. या आवाजाने ते भानावर आले. आणि हसून त्या सगळ्यांकडे बघत आत निघून गेले. त्यात लाज किंवा ऑकवर्डनेस नव्हता. होता तो फक्त निखळ आनंद आणि समाधानाचं हसू!


चला सगळ्यांनी आता हळदीची तयारी करून या. असा नानींनी आदेश देताच सगळे आपापलं आवरायला निघून गेले.

सार्थक हळदीच्या कार्यक्रमासाठी त्याचं आवरत असताना अचानक त्याला काहीतरी आठवलं, जे त्याने आधीच नोट केलेलं आणि तो गौरवीच्या रूमकडे जायला निघाला. तिला तयार करण्यासाठी सौम्याने काही ब्यूटीशियन बोलवलेले. पण तरी तिच्या रूममध्ये जास्त गजबज चालणार नाही याची काळजी नानींनी घेतलेली. कारण त्यामुळे तिची तार नको सटकायला म्हणून फक्त एक तास आधी त्यांना तिच्या रूममध्ये जायची परवानगी दिलेली. म्हणून अर्थातच गौरवी तिच्या रूममध्ये एकटीच होती. तोच सार्थकने दरवाजा नॉक केला. ती नुकतीच बाथ घेऊन आलेली.

सार्थकने क्षणभर तिला न्याहाळलं आणि खिशातून एका फेस क्रीमची ट्यूब तिच्या हातात देत म्हणाला,

" गौरवी, ही हर्बल क्रीम आहे. जी आता हळदीच्या वेळी हे यूज करून त्यावर इतर ग्लो वापर. कारण तुला हळदीमुळे तुला infection होईल. त्यात तुला आधीच cosmetics ची सवय नाही म्हणून हे हर्बल क्रीम यूज कर. कळलं. " तो काळजीने बोलत होता. ती प्रेमळपणे त्याच्याकडे पाहत होती.

" ओहहह आणि तू नाही का यूज करणार... तुझी स्कीन पोलाद किंवा लोखंडाची आहे का " त्याची खेचण्याच्या हेतूने मुद्दाम आलेला तिचा मिश्कील प्रतिप्रश्न.

" पागल, मला सवय आहे याआधी मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या लग्नात अनेकदा हळद खेळलोय मी. तुला सवय नाही म्हणून सांगतोय हे " तो लटक्या रागात तिचे गाल जरा जोरात ओढत म्हणाला.

" कळलं ते. But don't do that...." त्याने तिचे गाल ओढलेले बघून ती म्हणाली. कुणी गाल ओढलेले लहानपणापासून तिला आवडायचं नाही. यावर तिची हीच प्रतिक्रिया असायची.

तेवढ्यात गौरवी फ्रेश झाली की नाही ते बघायला नानी आल्या कारण पुढची तयारी करून देण्यासाठी ब्यूटिशियनला पाठवायला बरं म्हणून त्या पहायला आलेल्या. आणि त्यांनी येता येता या दोघांचं चाललेलं हे conversation ऐकलं. आणि तिचं शेवटचं वाक्य ऐकून त्यांनाही हसू आवरलं नाही. अजूनही तिच्या सवयी, नियम, नीती तसंच आहे जसं लहानपणापासून होतं, हे त्यांना आठवलं.

" येऊ का मी आत?..." नानींनी दारातूनच विचारलं. तसं त्या दोघांनी एकत्रच तिकडे बघितलं.

सार्थक जरासा ओशाळला. कारण लग्न होईपर्यंत असं वधूला एकांतात भेटायचं बोलायचं नाही या काही गोष्टी त्याला माहित होत्या.

" अं नानी या ना. actually मी ते गौरवीला हळदीच्या वेळी infection होऊ नये म्हणून हे द्यायला आलेलो. बाकी काही नाही. " सार्थक हातातली ती क्रीमची ट्यूब नानींना दाखवत म्हणाला.

" हो का? मग हे माधवीजवळ पण सांगून पाठवू शकला असता. " नानी मुद्दाम त्याला छेडत होत्या. गौरवीला हे कळत होतं. पण सार्थकला ते खरंच वाटत होतं. त्यामुळे त्याने मान खाली घातली. तसं गौरवीने नानीकडे हलका कटाक्ष टाकला. का त्याला छेडून त्याच्या चेहऱ्यावर डिस्टर्ब भाव पसरवते अशा अर्थाने गौरवीने नानीकडे बघितलं. नानींनी जीभ चावली.


" अरे मी तुला रागवत नाहीये राजा. मला माहितीये तू काळजीपोटी स्वता आला ते,. जराशी मस्करी केली फक्त. आणि हो आता आधीसारख्या पद्धती राहिल्या नाहीत. आणि ते बदलायलाही हवंय. पूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढायचंय मग अशी जाणीव आणि ते निभावण्याची जिज्ञासाही हवीच. " नानी कौतुकाने सार्थककडे बघत म्हणाल्या. तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला. आणि तो हसत त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाला.


थोड्या वेळाने सभा मंडपात हळदीची सगळी तयारी झालेली. वधू वराआधी करवले मंडळी नटून थटून तिथे उपस्थित झालेले. आणि सेल्फी, फोटो, candid फोटो काढण्यासाठीची त्यांची लगबग सुरू होती. त्यात सौम्या,आलिशा, मितलही होत्या. दिग्विजय आणि शशांक नुकतेच तिथे आलेले... आणि समोर काय चाललंय हे बघण्याशिवाय दुसरा इलाज तरी काय होता त्यांच्याकडे...

" दिग्विजय, बघितलंस का चायपेक्षा किटली गरम. पण मला एक कळत नाही फक्त नवरा नवरीने हळदीला पिवळे वस्त्र घातले तर चाललं असतं की, कारण लग्न त्यांचं आहे ना. मग आपण का उगाच बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना सारखं हे " शशांक दिग्विजयच्या कानात समोर बघत खुसपुसत होता.

" जर हे सगळं मी ठरवलं असतं तर कदाचित याचं उत्तर देऊन मी तुझं समाधान केलं असतं मित्रा... एकवेळ आपण सगळे रिती प्रथा मोडू शकतो पण महिला मंडळींची इच्छा नाही... " दिग्विजय मिश्कील अंदाजात म्हणाला. तसं दोघेही एकमेकांना टाळी देत हसले.

" वा. काय भारी विवेचन मांडलंय पॉलिटिकल बाबू... " शशांकही हसत म्हणाला.

" काय मग अजून किती दिवस असंच एकमेकांना भाबडे प्रश्न विचारून त्यावर विवेचन शेअर करत बसणार तुम्ही दोघे... तुमचेही हात पिवळे करून टाका लवकर मग असं काही सुचणार नाही. " कृणाल तिथे येत त्या दोघांची खेचत म्हणाला. तसं त्यांनी त्याच्याकडे बारीक नजरेने बघितलं.

" आलास का तू जखमेवर मीठ चोळायला ? अरे भावा तुझं बघ घोंगडं भिजत पडलंय ते आधी मार्गी लाव. आला मोठा आमचे हात पिवळे करायला." शशांकने टोमणा मारला. तसं दिग्विजय पण हसला. दरवेळी समोरच्याची दुखती नस पकडून त्यांना घेरणारा कृणाल मात्र आता चांगलाच त्यांच्या तावडीत सापडलेला... कृणालने दिग्विजयकडे बघितलं.

" Officer babu on the fire. जो त्याला आता डिच करेल तो अटकेल. " दिग्विजय शशांकला उद्देशून कृणालला म्हणाला.

" अच्छा तर असंय होय. मग आता आपली डाळ नाही शिजणार दिग्विजय. ही रिस्क घेऊन त्याला जमिनीवर फक्त एकच व्यक्ती आणू शकते. " कृणाल सौम्याकडे बघत म्हणाला. तसं दिग्विजय आणि कृणाल हसले. आणि शशांक त्या दोघांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता.

" दिग्विजय... तू याबाबतीत सेफ झोनमध्ये आहेस म्हणून असं बोलू नकोस. कॅप्टन कुलला पण तापवणारी लेडी फायर अशीच फायर बनून तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा तुला कळेल. तोपर्यंतच तू कुल रहा. " शशांकने आता दिग्विजयकडे मोर्चा वळवला. आणि थोडंसं आश्र्चर्यचकित होत यावर ते तिघेही गुढपणे हसले.

क्रमशः

©️®️अबोली डोंगरे


🎭 Series Post

View all