प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-६९

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-६९


हळदीची लगबग सुरू होती. नानी आणि माधवी सगळी तयारी, मांडणी वगैरे करण्यात गुंतलेल्या... आलिशा, सौम्या, मितल पण त्यांना हवं नको आणून देत होत्या. दिग्विजय, शशांक, कृणाल आणि इतर पुरुष मंडळींना नानींनी फक्त बघत बसा, इथे तुमची काही गरज नाही असं ठणकावून सांगितलेलं... मग काय करणार बिचारे, बसले मुकाट्याने समोरचं बघत..

भटजींनी हवी तशी मांडणी केल्यावर सार्थक गौरवीला आणायला सांगितलं. दोघांनाही एकत्रच हळद लागणार होती. खरं तर आधी मुलाची हळद उरकून तीच उष्टी हळद मुलीला लावण्याची पद्धत असायची. किंबहुना अजूनही आहे. पण इथे दोन्ही कुटुंब एकाच छताखाली असताना अशी वेगवेगळी हळद लावणं नानींना रूचणार नव्हतं. म्हणूनच त्यांनी हा बदल करायचा ठरवलेला...

सौम्या आणि आलिशा सार्थकला घेऊन आल्या. तर दुसरीकडून नानी आणि मितल गौरवीला घेऊन आल्या. दोघांनाही शेजारी शेजारी पाटावर बसवण्यात आलं. सार्थकने पिवळ्या रंगाचा शेरवानी सदरा घातलेला. त्यावर क्रीम कलरचा पायजमा त्याला शोभून दिसत होता. त्यात त्याच्या चेहऱ्यावरचा चार्म आणि ग्लो तर गौरवी दिसल्यावर अजूनच खुलला. गौरवीने पिवळ्याच रंगाची कांजीवरम साडी घातलेली. गळ्यात आणि कानात मोत्याचे दागिने, कपाळावर हलकीशी खड्याची टिकली, हातात हिरवा चुडा, बाजूबंद वगैरे हे सगळं कमी म्हणून की काय त्यात भर म्हणून दोन्ही डोळ्यांच्या बाजूने गालावरून खाली रेंगाळणाऱ्या त्या मुंडावळ्या... हे सगळं तिला अनोखं आणि विचित्र वाटत होतं. पण उद्या लग्न होईपर्यंत तिला काही आक्षेप नोंदवायलाही मज्जाव होता. त्यामुळे ती शांत होती. पण येताना सार्थक मुंडावळ्या कानामागे धरत आपल्याकडेच बघतोय हे बघून तिचाही चेहरा खुललेला. सगळे जण गौरवीकडे पाहत होते. कदाचित ही गौरवी त्यांच्यासाठी नवीनच होती. टिपिकल नवरीप्रमाणे ती लाजत साजत वावरत नव्हती. पण समजूतदारपणे आणि तितक्याच प्रांजळपणे तिचा वावर होता. सगळे मनातून खुश होते त्या दोघांसाठी...

दोघेही पाटावर शेजारी येऊन बसलेले. माधवीने दोघांनाही ओवाळलं. आणि मग हळद लागली. प्रत्येक जण तिथे येऊन आंब्याच्या पानावर ओली हळद घेऊन त्यांना लावत होता.  हळदीचा लेप सार्थक गौरवीच्या चेहऱ्यावर आणि हातावर जास्त होत असल्यावर सौम्या आणि मितल तो रूमालाने पुसत होत्या. आलिशाने त्यातली ओली हळद एका वाटीत घेऊन ती वाटी सगळ्यांच्या नकळत तिथेच कुठेतरी लपवली होती. कारण परत त्यांना हळदीची होळी जी खेळायची होती.

दिग्विजय, शशांक, कृणाल ही तिकडी अजून बघ्याच्याच भूमिकेत होती.

" काय राव या प्रोग्राममध्ये आपला काय रोल आहे की नाही..." शशांक अखेर वैतागत म्हणाला.

" हा काय इथे बसून समोरचं चित्र शांतपणे बघणं हाच आपला रोल... " दिग्विजय त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये म्हणाला. तसं कृणाल मोठ्याने हसला.

" अबे हसू नकोस. कुणाचं तरी लक्ष जाईल आपल्याकडे आणि ते येतील हातात हळद घेऊन फासायला..." शशांक त्याचं तोंड धरत खुसपुसला.

" आता मला शंका येतेय शशांक तू नक्की पोलिस ऑफिसर आहेस ना रे ?" दिग्विजय उवाच. हे ऐकून कृणाल तोंड दाबून हसत होता.

" आणि तसंही आले तर येऊदे, हळदच घेऊन येतील.. शॉटगन घेऊन नव्हे..." आता कृणालनेही संधीचा फायदा घेतला.

" शॉटगन काय, एके-४७ आणि उझी आणली तरी चालेल. पण हळद आणि त्या वासाची अॅलर्जी आहे मला. कमबख्त गन से नहीं हलदी से डर लगता है अॅडव्होकेट बाबू... " शशांक बोलला. आणि ते तिघेही हसले.

तेव्हा त्यांना हसताना बघून नानींचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. आता बहुतांश नातेवाईक जेवायला गेलेले. त्यामुळे लॉनमध्ये सार्थक गौरवीच्या घरचीच मंडळी होती.

" अहो भावी सुनबाई जरा इकडे या..." नानी मितलला उद्देशून जरा मोठ्याने म्हणाल्या की ते समोर बसलेल्या त्या तिघांनाही ऐकू गेलं.

मितलला तर कळतच नव्हतं नानी नक्की कुणाला हाक मारतायत ते. तिने भांबावून बाजूला आणि मागे बघितलं.

" अगं इकडेतिकडे काय बघतेय, तुलाच बोलावतेय मी... इकडे ये जरा. " नानी म्हणाल्या. आणि मितलला तत्क्षणी जमिनीने दुभंगून तिला आत घ्यावं वाटत होतं. अचानक असं काहीतरी ऐकून ती घाबरलेली. अगदी ती चालताना तिचे पाय लटलटत होते. गौरवीने ती जवळून जाताना डोळ्यांनीच तिला घाबरू नकोस. Be strong. असा इशारा केला. तसं तिच्या जीवात जरा जीव आला.

" अरे यार आता नानींचं काय हे नवीनच ?" कृणाल हळू आवाजात पुटपुटला.

" नवीन नाही काही... जुनंच. कॉलेजपासूनचं.. सिनियर ज्युनिअर ते ऑफिशियल अॅडव्होकेट ते व्हाया डायरेक्ट भावी___" शशांक ने टोमणा मारला.

" तुला चेष्टा सुचतेय ? मला टेन्शन आलंय. ती बघ किती घाबरलीय... " कृणाल काळजीने म्हणाला.

" घाबरण्यासारखं काही नाही यात. चील. नानीला सवय आहे असं मुद्दाम चारचौघात खेचायची. You must ignore or enjoy it. " दिग्विजय कृणालला सबुरीने म्हणाला.

" अरे यार पण मला एक कळत नाही, मितल नक्की नानीला घाबरलीय की??" शशांक कृणालकडे भुवई उंचावून बघत होता. आणि यावर कृणालचा चेहरा मारक्या बैलासारखा झालेला...

" मला सोडून ती सगळ्यांनाच घाबरते." कृणाल बोलला. ते ऐकून शशांकला हसायचं कळत नव्हतं. दिग्विजय पण इकडेतिकडे पाहत हसत होता.

" गजब बेज्जती है यार . " शशांक हसत म्हणाला.

" शशांक कंट्रोल यूवरसेल्फ. स्टेजवरून सगळे आपल्याकडेच ताणून बघताहेत. " दिग्विजय म्हणाला. कारण शशांक मोठ्याने हसल्यामुळे नक्कीच यांचा हास्यविनोद चाललाय त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपसूकच त्यांच्याकडे वळलेल्या.

" मितल अगं घाबरू नकोस. कृणालही मला माझ्या मुलासारखाच आहे. आणि त्याच्यासाठी तू अगदी योग्य आहेस. हे तर तुम्हा दोघांसह सगळ्यांनाच माहिती. मग सांग मी तुला भावी सूनबाई म्हणलं तर बिघडलं कुठं... " नानी मितलच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या.

" तसं नाही नानी. पण अचानक असं ऐकलं तर जरा गोंधळले मी... बाकी काही नाही. " मितल सावरत बोलली.

" अरे फिर तो ये सोने पे सुहागा है... हमें नाज है कृणाल की चाॅईस पे. क्या बोलती सोमी?" आता आलिशाही सरसावली.

" हो मग. दि चा राईट हॅन्ड आहे तो शेवटी... आता त्याचा पण लवकरच वाजणार लग्नाचा धूमधडाका. आपली तर मजाच आहे मग. ये नाचो " सौम्या पण एक्सायटेडली बोलली.

हे ऐकून सार्थक गौरवीने यांचं काही होऊ शकत नाही अशा अर्थी मान हलवली. आणि त्यांच्या गालावर लोंबकळणार्या त्या मुंडावळ्याही हलल्या. ते बघून ते स्वतावरच गालातल्या गालात हसले.

आणि ते सगळं बघून इकडे खाली बसलेल्या या तिघांनी मनातल्या मनातच कपाळावर हात मारून घेतला. तोच नानींनी मितलच्या कानात तिला काहीतरी सांगितलं. ती खरं तर आधी नाही नाही म्हणत होती. पण परत तिने नमतं घेतलं.

" नानी काय बोलतायत तिच्या कानात काही ऐकू येतंय का तुम्हाला?" कृणाल कान टवकारत त्या दोघांना विचारत होता. त्या दोघांनीही नकारार्थी मान डोलावली. कारण ते त्यांनाही ऐकायचंच होतं. नानी नक्कीच काहीतरी आगाऊपणा करायला लावणार याचा दिग्विजयला संशय होता.

" यार ती आपल्याच दिशेने येतेय. नक्की काय सांगितलंय नानींनी तिला काय माहित. " शशांक हळूच पुटपुटला.

" मी निघतो आता. उगाच माझी फजिती होणार इथे..." कृणाल चाचपडत उठत होता. पण दिग्विजय आणि शशांकने त्याला धरलं.

" अरे तू का पळतोय. उलट तू तर खुश व्हायला पाहिजे. तेरी अमानत तेरे पास आ रही है..." शशांक चांगलाच फॉर्ममध्ये होता.

" पण ती स्वताहून कुठे येतेय. नानींनी काहीतरी सांगून पाठवलंय तिला." कृणाल कावराबावरा होत म्हणाला. ते बघून शशांक पण विचारात पडलेला. पण आपले कॅप्टन कूल शांत आणि थंडच होते. He is like " who cares"

" Seriously it's not over?" दिग्विजय त्या दोघांना म्हणाला. त्यांच्या ओव्हर अॅक्टिंग समोर बॉलिवूड स्टार पण फिके पडतील असा ड्रामा सुरू होता त्यांचा.

" ओव्हर नाहीये हे. खरोखरच विषय गंभीर आहे. तुम्ही काय कसेही सुटाल. पण मला महिनाभर पापड बेलत बसावे लागतील तिला मनवण्यासाठी." कृणाल सुस्कारा सोडत म्हणाला.

" विषय गंभीर तिथे आपण खंबीर... अरे हे तर काहीच नाही. पेशन्स काय असतात ते शशांक कडून शिक. वर्ष झालं तरी त्या केकवर केलेल्या कमेंट साठी तो अजूनही अधांतरी आहे. " दिग्विजय म्हणाला खरा. पण त्याने इनडायरेक्टली दोघांनाही सणसणीत टोला हाणलेला. ते ऐकून ते दोघेही आता त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होते.

" दिग्विजय तू नक्की मित्र आहेस की दुश्मन ?" कृणाल उवाच.

" ते आपण नंतर ठरवू. आता आधी मितल काय म्हणतेय ते बघू. " दिग्विजय रिटर्न्स.

" अच्छा. म्हणजे आम्हाला खड्ड्यात ढकलून तू नामोनिराळा राहणार तर ?" शशांक बाबू.

" असं कसं एकटं खड्ड्यात जाऊ देईल बरं मी तुम्हाला.. मी पण असेनच ना तिथे तुमच्यासोबत धीर द्यायला..." दिग्विजय अगेन.

" याला धीर देणं नाही, जखमेवर मीठ चोळणं म्हणतात. " कृणाल म्हणाला. पण तेवढ्यात तिथे मितल आली. आणि दिग्विजयने त्याला समोर बघ असा इशारा केला.

" तुम्हाला नानींनी तिकडे बोलावलंय हळद लावायला... तर चला लवकर. " मितल म्हणाली.

" तुम्हाला म्हणजे नक्की कुणाला? " शशांकने कृणालकडे बघत तिला विचारलं. तसं कृणालने लगेच गप बस म्हणून त्याला कोपरा ठोसला.

ते ऐकून मितलला तर कुठे तोंड लपवू असं झालेलं. आधी तिथे मुलींनी चिडवलं आणि आता इथे परत तेच...
आणि कृणालला तर असंच तिचा हात धरुन तिला तिथून दूसरीकडे घेऊन जावं वाटत होतं. इतके खेचत होते सगळे त्या दोघा बिचार्या स्वीट कपलला...

" नाही तुमच्या तिघांनाही बोलवलंय. चला. " मितल कशीबशी म्हणाली. ते ऐकून त्या तिघांनाही खात्री पटली की हे सगळं ती मनापासून बोलत नाहीये. त्यामुळे त्यांनी तिला चिडवणं थांबवलं.

" नाही आम्ही इथेच ठीक आहोत. "

" आणि तसंही आता हळद लावणं झालंय ना मग आमचं तिथे काय काम?"

दिग्विजय आणि शशांक लागोपाठ म्हणाले. त्यानंतर आता कृणाल बोलेल म्हणून सगळ्यांनी अपेक्षेप्रमाणे त्याच्याकडे बघितलं.

" ठीक आहे येतो आम्ही. चला. " कृणाल शरणागती पत्करत म्हणाला. तसं ते दोघंही अवाक् होऊन त्याच्याकडे बघत होते. पण तो मितलचे हावभाव टिपत होता. तो तयार झाला हे ऐकून तिच्या मनासारखं झालं म्हणून ती खुश होईल वाटलेलं, पण ती जराशी गोंधळलेली. कारण त्यांनी आता तिथे येऊ नये असंच तिला मनापासून वाटत होतं. कारण नानी, सौम्या, आलिशा मिळून नक्की फजिती करणार त्यांची हे तिला अंधूकसं माहित होतं. आणि हेच कृणालने बरोबर ओळखलेलं.

कदाचित हे कृणालच्या चेहऱ्यावरून दिग्विजय आणि शशांकनेही ओळखलेलं. आणि ते निघाले.

" मी नाही येत तुम्ही दोघेच जा. मला ते हळदीचा वासही झेपत नाही. " ते उठून जात असताना शशांक म्हणाला.

" हळद लावायची आहे सार्थक गौरवीला. आपण लावून नाही घ्यायची. Even माझ्यासाठीही पहिल्यांदाच आहे हे.  Let's see. " दिग्विजय त्याला समजावत म्हणाला.

क्रमशः
तुम्ही सार्थक गौरवीचं लग्न एन्जॉय करताय ना? तुम्हाला आवडतंय ना हे वाचायला? अजून काही असेल तर नक्की सांगा.

©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all