प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७१

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७१


अखेर लग्नाचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच सगळ्यांची लगबग चालू होती. रात्री फक्त काही वेळासाठीच झोपले असतील ते सगळे तेवढ्यात सकाळही झाली. सगळे आपापल्या कामाला लागले. साडे अकराचा मुहुर्त होता. त्यामुळे सगळे विधी अगदी वेळेवर पार पडावेत यासाठी नानी आणि वसंतरावांची लगबग चालू होती. सौम्या सकाळी बळेच झोपेतून उठून मागच्या दाराजवळ जाऊन उभारलेली.

" सौम्या अगं मध्ये का उभारली बाजूला हो जरा. आणि हे काय तू अजून अंघोळही केली नाहीये. जा आवर पटकन. त्यात आज नऊवारी नेसायचीय सर्वांना. तयारी नको का सगळी आधीच चल आवर पटकन. " नानी घाईघाईत सौम्याला बोलल्या आणि तिच्या उत्तराची वाट न बघताच घाईत निघूनही गेल्या. तिला मात्र बिचारीला त्या काय बोलल्या तेही नीटसं कळालेलं नव्हतं. ती झोपेतच होती अजून.

" अरे सोमी तू यहा नींद में चलती आयी क्या. मैं तो बाथ भी लेके आयी. मितल भी आयेगी दो मिनट में तू चल जल्दी..." आलिशा तिचा हात धरुन तिला चलण्यासाठी बोलत होती. दिग्विजय आणि शशांक तिथे मागे काहीतरी करत होते तसंच हा एकपात्री प्रयोग पण पाहत होते.

" ऑ आलिशा... अगं माझी झोपच नाही झाली अजून. मघाशीच तर झोपले होते आणि लगेच तू उठवलं पण मला " सौम्या डोळे चोळत म्हणाली. मोकळे सोडलेले खांद्यापर्यतचे केस बेल्टने थोपवून धरलेले. आणि ती अर्धी जागी आणि अर्धी झोपेत त्यात अशी काहीतरी बोलताना एकदम लहान मुलीप्रमाणे क्यूट वाटायची. तिचं बोलणं ऐकून का कुणास ठाऊक पण शशांकला हसू आवरणं कठीण झालेलं... तो इकडेतिकडे बघत हसत होता. दिग्विजयने ते बघितलं.

" शशांक असं हसण्यापेक्षा तिला बोल काहीतरी म्हणजे ती पूर्ण शुद्धीत येईल. " कृणाल तिथे येत म्हणाला.

" नाही नको. कशाला सकाळी सकाळी तिचा मूड खराब करायचं पाप मला करायला लावतोय? परत दिवसभर कडकड करेल ती पोरगी. निदान आज तरी तिला नको डिस्टर्ब करायला... चला आज लेडिज काही कामं करणार नाहीत भाव खाण्याशिवाय, सगळं आपल्यालाच करावं लागेल. चला" शशांक अगदी शांतपणे बोलला. आणि निघूनही गेला. ते बघून कृणाल आ वासून त्याच्याकडे बघायला लागला. दिग्विजय मात्र गालातल्या गालात हसत होता.

" दिग्विजय अरे हा नक्की शशांकच आहे ना ? सौम्याला चिडवायचा एक चान्स सोडत नाही तो आणि लेडीजची काम आपण करण्याबाबत तर बहस केल्याशिवाय याची गाडी पुढे सरकत नाही. आणि आज हा चक्क ? " कृणाल उवाच.

" तुला अनुभव असतानाही तू मला विचारतोय, या गोष्टीचं जास्त आश्र्चर्य वाटतंय मला. तूच म्हणतोस ना नेहमी की प्रेमात भलेभले फक्त पडतच नाही तर आपटतातही... घे आता..." दिग्विजय शांतपणे पण तेवढ्याच मिश्कीलित म्हणाला. ते ऐकून कृणालच्या पण चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं.

दिग्विजयला आजचं शशांकचं असं mature वागणं जास्त भावलेलं. आजपर्यंत त्याच्या वागण्यातून हे बरेचदा जाणवलेलं पण आज प्रत्यक्ष तो किंचित का होईना व्यक्त झाला याचं समाधान वाटत होतं त्याला... तसं तर तो नेहमीच असं maturely च वागायचा. पण जेव्हा पासून सौम्या सोबत त्याची भेट झालेली तेव्हा पासून तो खूप चाईल्डीश आणि बालिशपणे बोलायचा तिच्याबाबत... पण गौरवी दिग्विजय सोबतच तिच्याबद्दलचे निर्णय घेताना तोही तितकाच केअरफूल असायचा. आणि त्यात कधी त्याने इतर गोष्टींची गय केली नव्हती. गौरवी दिग्विजय च्या या काळजाच्या तुकड्याला त्यानेही तितकंच आपलं मानलेलं. पण तो तिला दाखवत मात्र नव्हता. गौरवी दिग्विजयसोबत त्याचा बंध इतका गहिरा होता की त्यांनी कधीच एकमेकांना अंतर दिलेला नव्हता. अगदी एकमेकांसोबत त्यांच्या जबाबदारी, कर्तव्य आणि नात्यांनाही त्यांनी सलोख्याची किनार जोडलेली की त्याचा भेद केवळ अशक्य होता. दिग्विजय चं मन अजूनच प्रफुल्लित झालं.

तो निघणार तोच त्याचं लक्ष वर बाल्कनीत उभारलेल्या गौरवीकडे गेलं. मघाशीपासून ती तिथेच उभी होती आणि तिने सगळा सिक्वेन्स पाहिलेला. ते दोघे हलकेच हसले एकमेकांकडे बघून... याहून जास्त आणखी कोणत्या शब्दांची गरजच नव्हती त्यांना.. पण आजचा दिवस येण्याआधी सरलेलं वर्ष, त्यात बदललेले त्यांचे माईंडस् ते लहानपणापासूनचा जगण्यासाठी केलेला संघर्ष या सगळ्याचे ते दोघेच तर साक्षीदार होते. त्यांचा हा जीवनपट सध्या सार्थकच्या येण्याने, शशांक कृणालच्या साथीने पूर्णपणे कलाटणी मिळालेला होता. जन्माआधीपासूनच नाळीने एकमेकांसोबत बांधले गेलेले ते दोघे... वेगवेगळ्या उपनावाने आणि त्यावरूनच तयार झालेल्या त्यांच्या ओळखीने जगत होते. पण अंतर कधीच दिलेलं नव्हतं त्यांनी. एक तलवार तर दुसरा ढाल बनून एकमेकांसाठी लढायला तयारच असायचा. त्यांच्यातील भेद केवळ अशक्य होता, इतके अभेद्य अजिंक्य होते ते दोघेही... त्यांच्या या आगळ्यावेगळ्या नात्याला तरीही प्रत्यक्ष नाव देणं मात्र आजपर्यंत झुगारत आलेले ते दोघे... पण आज कळत म्हणा अथवा नकळत ते दूर जाणार होते. रोज रात्रीची अंधारातली त्यांची हितगुज आता कधीतरीच होणार होती. हे सगळं आठवून त्या दोघांना गलबलून आलेलं. तरी स्वताला सावरत त्यांनी एकमेकांना नजरेनेच आश्वस्त केलं. आणि आपापल्या कामाला लागले.


मुलींना नऊवारी साडी नेसण्यासाठी माधवी आणि मितल मदत करत होत्या. माधवी पेक्षा मितल बर्याच सराईतपणे साडी नेसवत होती. ते बघून न राहवून शेवटी माधवी म्हणाल्याच,

" मितल तुला बराच सराव दिसतोय याआधी कधी काष्ठा नेसली होतीस का?"

" हो खूपदा. माझी आजी रोज अशी नऊवारी साडी घालायची. मग एखादा सणावाराला ती आवडीने मलाही तशीच साडी नेसवायची. मग लहानपणापासूनच माहित आहे जणू अंगवळणीच पडल्यासारखं..." मितल आठवणी जागवत म्हणाली. यावर माधवीसह सौम्या आणि आलिशानेही तिला दाद दिली.

" बरं चला मुलींनो आवरा आणि तुमचं झालं की वरातीत पण जायचंय तुम्हाला..." माधवी सुचना करत म्हणाल्या.

" बारात कब निकलनेवाली है I mean exact time ? ऊस हिसाब के पहले रेडी होना है. फिर बारात में नाचना भी तो है हमें " आलिशा म्हणाली.

" पण या साडीत आपल्याला नाचता येईल ना? " सौम्याचा भाबडा प्रश्न.

" हो अगदीच. अगं नॉर्मल साडीपेक्षा या साडीत तू हवं तसं नाचू शकशील. लोळून नागीण डान्स पण करता येईल. इतकी comfortable आहे. " मितलने तिला सांगितलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.

" चालूदे तुमचं. मी गौरवीला मदत करते. " असं म्हणत माधवी निघतच होत्या की दारासमोर गौरवी प्रकटली.

" खरं तर मी तुमच्याकडेच आलेले. बट हे आताचं तुमचं सर्वांचं conversation ऐकून माझा डिसीजन झाला. मितल मला हेल्प करेल for sure. तोपर्यंत तुम्ही तुमचंही आवरून रेडी व्हा. " गौरवी माधवीला म्हणाली. त्यांनीही एखाद दुसरी सुचना देत तिला दुजोरा दिलेला.

" येस मॅम, मी नक्कीच हेल्प करेन तुम्हाला... " मितल आनंदून म्हणाली.

" Moody girl... मग हे आधीच सांगायचं ना मला. त्या कोणत्या मेक अप आर्टिस्ट अन् ब्ला ब्ला माझ्या मागे लावल्यात नानीने... " गौरवी मितलचे गाल ओढत म्हणाली.

" भला ये भी कोई तरीका है गौरवी. तेरे लिये वो मोहतरमाओं को यहापे लाया और तुम उनसे रेडी होना ही नहीं चाहती..." आलिशा तिला चिडवत म्हणाली. यावर गौरवी काही बोलणार तितक्यात मितलच बोलली.

" आलिशा आपण यावर नंतर निवांत डिस्कस आणि खेचाखेची करू. आता वेळ खूप कमीय... तुम्ही दोघी ज्वेलरी आणि मेक अप करून घ्या. मी मॅमना तयार करून आणि लगेच मीही होते. " मितल सुवर्णमध्य काढत म्हणाली.

" That's my girl. Let's go..." असं म्हणत गौरवी मितलसोबत तिच्या रूममध्ये गेली.

दुसरीकडे मुलांचीही तयारी चालू होती. त्यांना पंचा आणि धोतर दिलेलं. शशांकचे बाबा त्यांना ते कसं घालायचं ते सांगत होते. त्याप्रमाणे कृणाल ते फॉलो करत होता. तर दिग्विजय आणि शशांक ते धोतर हातात घेऊन त्याकडे आणि ते घालणार्या कृणालकडे आळीपाळीने बघत होते. त्यांचे चेहरे हसण्यासारखे झाले होते.

" बाबा मी काय म्हणतोय हे एवढं आढेवेढे घेऊन घालण्यापेक्षा ते साऊथच्या हिरोप्रमाणे लूंगीच गुंडाळतो ना आम्ही याची " शशांक काहीतरी हसण्यासारखं बोलला. ते बघून बाबा हसलेही.

" शशी आपल्याला महाराष्ट्रीयन लूक करायचाय. साऊथचा नाही. त्यामुळे इथल्या रीतीनुसार धोतरच नेसावं लागेल. " बाबांनी त्याला सांगितलं.


" आणि हे नक्कीच लेडिज मंडळाने डिसाईड केलं असणार. नो डाऊट. " दिग्विजय त्याला साथ देत म्हणाला. तसं बाबांनी हसतच हो म्हणून सांगितलं.

" काही स्वातंत्र्यच नाही राहिलं आपल्याला... हे यांचे अजीब रूल्स फॉलो करता करता नाकीनऊ आलेत आता. " शशांक उवाच.

" बघ बाबा मग शशांक तूच आता काय ते ठरव. तुझ्या लग्नात रूल बुक लेडिज मंडळाकडे देऊ नकोस. हाच धडा घे यातून..." कृणालने निशाणा साधलाच.

" बेटा माझ्याआधी तुला शहीद व्हायचंय. तेव्हा आधी तुझं बघ आणि मग परत आमच्यावर उड. " शशांक ने रिव्हर्स स्विंग दिली.

" अरे तुमची अजून लग्न झाली नाहीत तर तेवढं तरी स्वातंत्र्य अनुभवा. परत तर आहेच बाकी सगळं. " बाबा त्यांची मस्करी ऐकून हसत म्हणाले.

" अरे झालं नाही का अजून तुमचं... तिकडे मुली तयार होऊन वरातीत नाचायला कधीही उतरतील. आणि तुम्ही बसलाय इथे एकमेकांना टोमणे मारत. सार्थक पण तयार झालाय. आणि तुम्ही त्याचे सरदार अजून पडद्याआडच का " तेवढ्यात तिथे वसंतराव येऊन म्हणाले.

" नाही एकवेळ मी भाईचं समजू शकतो त्याचं लग्न आहे आणि तो त्या excitement मधून आवरून बसला असेल. पण मुली एवढ्या लवकर कशा काय तयार झाल्या सुनों सरदारों दाल में कुछ काला जरूर है, बचके रहना. " शशांक आश्र्चर्यचकित होत म्हणाला. तसं ते दोघंही सावध झाले.

" आम्हाला फक्त पाच मिनिटे द्या आम्ही आलोच. तोवर तुम्ही व्हा पुढे..." दिग्विजय वसंतरावांना म्हणाला. आणि ते तिघेही भराभर चेंज करायला गेले.

थोड्याच वेळात ते तिघेही तयार होऊन सार्थकसह खाली आले. पण तिथे इतर मुली दिसतच नव्हत्या. हे त्यांनी नोट केलेलं. तेवढ्यात मागून मितल आली.

" सर तुम्हाला व्यवस्थित जमलं ना. आणि सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही तुम्हाला मदत करायचं ते...शीट" मितल कृणालजवळ येत म्हणाली. पण त्याचं लक्ष कुठे होतं तिच्या बोलण्याकडे... तो तर तिला पाहताच क्लीन बोल्ड झालेला.

लिंबू कलरची नऊवारी काष्ठा, साडीला हिरव्या रंगाचा काठ, त्यावर कानात आणि गळ्यात मोत्यांचे दागिने तिच्या मोत्यासारख्या कांतीवर उठून दिसत होते. 


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all