प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७३

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७३


सार्थकचे डोळे गौरवीला पाहण्यासाठी आतूर झालेले असताना ती मात्र त्याच्या दृष्टिक्षेपास पडतच नव्हती. त्याला असंच वाटत होतं की ती मांडवातील स्टेजवर आधीच पोहोचली असेल. म्हणून तो तिकडे सतत पाहत होता. पण तिथे तर भटजींव्यतिरिक्त कुणीच नव्हतं. सगळे वरातीतच होते.

" चला आता निघूया भटजी बोलवतीलच इतक्यात... माधवी आरतीचं ताट घेऊन येतेस का." नानी म्हणाल्या.

" थांब नानी. आधी हे तर सांग की आता वरातीत डान्समध्ये कुणी आघाडी घेतली ते... मुलींनी की मुलांनी? " सौम्याने विचारलं. तसं सार्थकने तिच्याकडे बारीक नजरेने बघितलं. अगदी काही क्षणच उरलेत पण हे पोरटे काही महायुद्ध करण्याचा एकही चान्स सोडत नाहीयेत देवा... सार्थक मनातच चरफडला.

" सगळ्यांनीच छान डान्स केला. पिछाडीवर कुणीच नव्हते. अगदी तुमचे दादासाहेबही स्वताचं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच नाचलेत. " नानींनी हे सांगतानाही दादासाहेबांची फिरकी घेतलीच. दादासाहेब मात्र हसावं की रडावं अशा अर्थी बघत होते.

" नाही कुणाची तरी एकाचीच बाजू सांग कारण विजेती टीम एकच असते. मुलं की मुली? " सौम्याने हट्ट धरला. तसं शशांक आणि कृणालही सरसावले. एकदाच काय ते दूध का दूध और पानी का पानी करून टाका म्हणून. आणि सार्थकने मनातच कपाळावर हात मारून घेतला.

" नाचले तर सगळेच छान. पण याबाबतीत आघाडीवर मात्र मुलंच होते. कारण करणने शेवटपर्यंत खिंड लढवली. आणि त्याला बाकीचेही साथ देत होते. पण मुलींनीही गाणी गाजवली. " वसंतराव हस्तक्षेप करत म्हणाले. यावर दादासाहेब, मनोहरराव डॉ नेनेंनीही दुजोरा दिला.

" नो... सार्थक आणि दादू तुम्ही तर न्यूट्रल आहात ना..." सौम्या त्यांच्याकडे वळली.

" ते न्यूट्रल काय असतं आणि... जे आहे ते आहे. त्यात आता ते दोघे काही वेगळं बोलणारेत का " कृणाल उवाच.

" झालं मिळालं ना उत्तर तर मग चला आता बाजूला व्हा. ये करण ये भावा. तू तो अपनाही भाई है यार... तुझ्यामुळेच आज आमचं नाक कापण्यापासून वाचलं नाहीतर काही लोक अरसिक समजत होते आम्हाला." शशांक म्हणाला. तसं सगळे मुलं हसले.

" हाहाहा . मै तो तेरे भाई का भी भाई हू. बस यही वादा निभाने आया हू. बघितलंस सार्थक मी म्हणालो होतो ना की तुझ्या लग्नात जीव तोडून नाचणार ते... बघ बघ." करण सार्थकला उद्देशून म्हणाला. तसं एकच हशा पिकला तिथे...

" आणि सार्थक ते पुढचा शब्द पण लवकरच पाळता येईल मला त्यासाठी प्रयत्न कर आता." करण सार्थकच्या कानात जाऊन कुजबुजला.

" अबे लग्न तर होऊदे आधी..." सार्थकची reaction.

चला आता लवकर मुहूर्त समीप येतोय. वसंतराव असं म्हणताच सगळे निघाले. पण सार्थक एकटाच पुढे होता.


" अरे अरे दुल्हेराजा दुल्हन के बिना अकेले कहा निकले हो...?" आलिशाने त्याला हाक मारत म्हणलं तसं तो थांबला.

" अरे सार्थक थांब तरी. " माधवीनेही त्याला हाक मारली तसं तो आता काय म्हणून जरा वैतागतच मागे वळला. तर दुसरीकडून सौम्या आणि मितलसह गौरवी तिकडेच येत होती. आणि ते दोघे मिळून आतमध्ये प्रवेश करणार होते हे सार्थकच्या लक्षातच आलं नाही. त्याने लाजत इकडेतिकडे बघितलं.

" क्यू दुल्हेराजा, दुल्हन के बिना उसे ढूंढने सबसे पहले ही आप अंदर निकले थे..." आलिशा तिच्या खुमासदार शैलीत म्हणाली. तसं सगळेच खळखळून हसले.

आणि नुकत्याच तिथे येत असलेल्या गौरवीनेही ते ऐकलं आणि तिने सार्थककडे बघितलं. तर तो तिच्याचकडे बघत होता. तिने आंबा कलरची नऊवारी काष्ठा नेसलेली. त्या साडीला लाल रंगाचा भरजरी काठ होता. गळ्यात एक राणीहार आणि छोटी मध्यम जाड आकाराची ठुशी घातलेली. कानात त्यानुरूप तसेच झुमके होते. नाकात नाजूक नथ आणि कपाळावर मध्यभागी छोटीशी चंद्रकोर तिच्या चंद्रासारख्या मुखड्यावर शोभत होती. दोन्ही हातात चुडा, कमरपट्टा आणि बाजूबंद असलेल्या हातांवर लाल रंगाची शाल दंडाच्या खालच्या कमानीत स्थिरावलेली... त्याने परत तिच्या डोळ्यात बघितलं तिचे डोळे दुपारच्या भर उन्हातही काळोखातल्या चांदणीप्रमाणे चमकत होते. त्याच्याकडून तिच्या डोळ्यात हरवल्याची ग्वाही मिळताच तिचे डोळे हसले.

आणि गौरवीने सार्थककडे बघितलं. तर त्याने आंबा कलरचाच सदरा आणि लाल रंगाचं धोतर घातलेलं. त्यावर लाल रंगाचा फेटा आणि त्याच रंगाची शाल त्याच्या एका खांद्यावरून दुसऱ्या हातात स्थिरावलेली. गळ्यात मोत्यांचा हार होता. आणि या सगळ्याहुन तेजस्वी तर त्याचा शीतल आणि दिलखुलास हसणारा चेहरा होता. त्यात त्याच्या घाऱ्या डोळ्यात तर प्रत्यक्ष सूर्योदयासमयीचं प्रखर तेज झळकत होतं. त्याच्या या मनमोहक गहिर्या डोळ्यात ती क्षणभर हरवली. त्याने डोळ्यांची उघडझाप करत इशार्यानेच तिला भानावर आणलं. तेव्हा ती हसताना तिच्या गालावर उमटलेली खळी मात्र त्यालाही सतावून गेली.

" झालं का तुमचं. चला या आता असे समोर " नानींनी त्यांना भानावर आणलं. तसे ते समोर आले. तेव्हा सौम्या त्यांच्या पायावर पाणी ओतत होती. आणि दिग्विजय त्यांचे पाय धुवत होता. त्यामुळे ते दोघेही जरा चकित झाले.

" D' what's that? " गौरवीने आक्षेप घेतला.

" हो ना. आणि नानी मला वाटतं या सगळ्याची गरज नाही. " सार्थकही म्हणाला.

" अरे प्रथा आहे आमच्याकडे, जी खूप पूर्वीपासून चालत आलीय. " नानी म्हणाल्या.

" मग आम्हाला हात आहेत ना हे?" गौरवी तिचे हात दाखवत म्हणाली. पण सगळ्यांना त्याचं हसू येत होतं.

" हो आहेत. ते तू दिग्विजय आणि सौम्याच्या लग्नात वापर या पद्धतीने हं " नानी म्हणाल्या.

तेवढ्यात दिग्विजय उठला. त्याने डोळ्यांनीच गौरवीला शांत हो असा इशारा केला. आणि दुसर्याच क्षणाला तिने त्याला जवळ घेत मिठी मारली. ती त्याला मूकपणे सांगत होती त्याची जागा पायाशी नाही तर हद्यासमीप आहे. तिचं उजव्या बाजूचं धीम्या गतीने धडधडणारं हद्य त्याच्या काळजाचा ठाव घेत होतं. दुसऱ्या क्षणी त्यांनी सौम्याला पण त्यांच्या मिठीत सामावून घेतलं. त्या दोघांना असं भावूक झालेलं बघून तीही गहिवरली. आणि तिच्या हाताचा विळखा त्यांच्या कमरेभोवती अजूनच घट्ट केला. ते तिघेही भावनेच्या सागरात खोळंबलेले... त्यांच्या भावना जणू त्या समुद्रातील लाटांप्रमाणेच खळखळत होत्या. सगळेच भरल्या नजरेने अतिव प्रेमाने त्यांच्याकडे बघत होते. अखेर महत्प्रयासाने भावनेला सावरत ते तिघे एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा सौम्याच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं... पण दिग्विजय आणि गौरवी तसेच कोरडे होते. त्यांच्या अश्रूंचा दुष्काळ अजूनही सरलेला नव्हता हे प्रत्येकाला दिसत होतं. पण ते निर्विकारही नव्हते. त्यांचं मन आज पहिल्यांदाच आतून आनंदाश्रूंनी खोळंबत होतं जे कुणीच पाहू शकणार नव्हतं. दिग्विजयने सौम्याला त्याच्या बाजूला उभी करत हलकेच तिच्या डोळ्यात आलेले ते थेंब पुसले. आणि ती खुदकन हसली. तसं गौरवी दिग्विजयही हसले.

त्यानंतर नानींनी सार्थक गौरवीला ओवाळलं. आणि त्यांना मांडवात प्रवेश करायला सांगितला. तो पदमार्ग गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला होता. ते दोघे जसजसे पुढे जात होते तसं आजूबाजूला आतिषबाजी होत होती. आणि ते सगळे स्टेजवर पोहोचले. भटजी त्यांचीच वाट पाहत होते. सार्थक गौरवीला समोरासमोर वेगवेगळ्या पाटावर आणून उभा केलं. आणि मध्ये अंतरपाट धरला गेला. भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. अखेर पाच मंगलाष्टके पार पडल्यानंतर मध्ये धरलेला अंतरपाट बाजूला झाला. आणि भटजींनी गौरवीला सार्थकच्या गळ्यात वरमाला घालायला सांगितली. ती त्याच्या गळ्यात वरमाला घालणार तोच सार्थक एक पाय दुमडून गुडघ्यावर तिच्यासमोर बसला.

" गौरवी आयुष्याची नवीन सुरूवात करताना तू ही वरमाला माझ्या गळ्यात घालणारेस त्याचसोबत तुझे प्रत्येक रूदन, चांगला वाईट सहवास, समस्या असो वा निर्णायक भूमिका ज्या तुला द्विधा मनस्थितीत आणतील त्या सगळ्या गोष्टी तू सर्वांसमक्ष मला समर्पित कर... " सार्थक असं म्हणताच गौरवीच्या चेहऱ्यावर हसू, प्रेम आणि सगळ्याच भावना एकत्रितपणे तरळल्या. आणि तिथे उपस्थित सगळेच हर्षभराने भारावून त्यांच्याकडे बघत होते. आता गौरवी काय करणार याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालेलं...

" माझ्या पूनरूज्जीवित झालेल्या या भावनांचा शिल्पकार तर तूच आहेस. तू आयुष्यात आला नसता तर या सगळ्याची परिणीती कधी मला झालीच नसती. त्यामुळे या प्रत्येक स्पंदनाचा भागीदार तूच असशील अगदी या श्वासांतरानंतरही.... म्हणूनच तुझ्यासाठी माझ्याकडे असणारा नाही हा शब्दच गौण आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयातच नाही तर श्वासांच्या गतीतही गौरवी तुझी साक्षीदार आणि भागीदार असेल याची मी ग्वाही देते. " असं म्हणत गौरवीने त्याच्या हातात हात देत त्याला उभा केलं. आणि त्याच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर सार्थकनेही तिच्या गळ्यात वरमाला घातली.

सगळे जण भरल्या डोळ्यांनी पाहत टाळ्या वाजवत होते. प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू जमा झालेले... पण यातले काही आनंदाश्रू होते तर काही संमिश्र भावनेतले आसू होते.


क्रमशः

सार्थक गौरवीचा विवाह सोहळा संपन्न... वाचून नक्की सांगा कसा वाटला आजचा भाग. काही चुका असतील तर सांगा, कारण हे लग्नाचे विधी मलाही इतके माहित नाही. त्यामुळे जरा गफलत झाली असेल तर चुकभूल माफ... सर्वांना विनंती आहे की जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये. आणि तुमच्या शुभाशिर्वादरूपी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. भेटू लवकरच तोपर्यंत
Stay tuned

©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all