प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७५

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७५


सप्तपदी झाल्या आणि सार्थकने सर्वांच्या साक्षीने गौरवीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसुत्र घातलं. तसं सगळ्यांनी हर्षभराने टाळ्या वाजवत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्रार्थना केली. बहुधा आता सगळे लग्नाचे विधी झाले असतील असं समजून आपली कुरापती गॅन्ग जेवणासाठी उठली. तोच नानी उठल्या आणि त्यांना खाली बसायला सांगितलं.

" थांबा जरा, अजून एक महत्वाचा विधी राहिलाय. " असं म्हणत नानींनी माधवीला काहीतरी सांगून ते आणायला पाठवलं.

" लग्न झालंय ना मग आता अजून काय बाकी आहे ?" शशांक विचार करत म्हणाला.

" कानपिळीचा विधी अजून बाकी आहे शशी. सार्थकला सगळे रिती रिवाज माहित असतात सगळं पण तू याबाबतीत जरा उनाड पडतोस. बसा रे सगळे, फार वेळ नाही लागत यासाठी..." वसंतरावांनी आधी शशांकला टोमणा मारत परत सगळ्यांना बसायला सांगितलं.

शशांकला उनाड बोललेलं बघून सौम्याला भलत्याच गुदगुल्या होत होत्या. तर बाकी पोरांना हे कानपिळी म्हणजे काय असतं हा गहन प्रश्न पडलेला. पण शशांकला प्रचंड भूक लागलेली. त्यात मोठे बाबांनी त्याला शालजोडा मारल्यावर सौम्याला त्यावरून हसताना बघून त्याच्या पोटात भागम भाग खेळणारे चुहे आता जास्तच पिसाळलेले... पण तरी त्याने तोंडावर कसाबसा आवर घातला. कारण आता बोलून उरलीसुरली एनर्जी घालवायची नव्हती त्याला... कार्टून जैसी बच्ची तुला तर नंतर बघेन मी जेवण झाल्यानंतर... आता काढ किती काढायचे तेवढे ..अशा आविर्भावात त्याने सौम्याला खुन्नस दिली. तिनेही त्याला बघूच काय करतो ते, असं प्रतिआव्हान दिलं.

" मितल हे कानपिळी म्हणजे काय असतं ग. तुला माहित असेल ना..." कृणालने हळूच मितलला विचारलं.

" नाही ना. आमच्याकडे असं काही नसतं. बहुतेक ज्याची त्याची प्रथा वेगळी असेल. पण हा प्रथा एक असली तरी त्याची नावं वेगवेगळी पण असू शकतात. त्यामुळे आधी बघू यात काय करतात ते..." मितल समोर बघत एक्सायटेडली बोलली.

" बरं. आता बघून आपल्या वेळेस लक्षात ठेव हं.." कृणाल खट्याळपणे म्हणाला. तसं मितलने त्याला हळूच चिमटा काढून समोर लक्ष द्यायला सांगितलं.

गुरूजींनी बोलावताच सगळे तिकडे गेले. सार्थक गौरवी पाटावर बसलेले. तेव्हा नानींनी दिग्विजयला पुढे बोलावलं. दादासाहेबांनी दिग्विजयच्या खांद्यावर हलकेच हात थोपटत त्याला समोर जायला सांगितलं. आणि दिग्विजयही काही न विचारता सार्थक गौरवी बसलेले त्यांच्याजवळ येत गुडघ्यावर बसला. सगळे आता तो काय करणार या उत्सुकतेपोटी पाहत होते.

" हे बघा मुलांनो, ही कानपिळीची एक प्रथा आहे. ज्यात मुलीचा भाऊ तिच्या नुकत्याच झालेल्या नवर्याचा कान पिळून त्याच्या बहिणीला आयुष्यभर सुखात ठेव अशी तंबी देत त्याचा कान पिळतो. यालाच कानपिळीची प्रथा म्हणतात. कळलं का आता..." नानींनी सांगितलं तसं सगळ्यांना कळालं.

" वाह वाह, छान आहे प्रथा. पहिल्यांदाच अशी कोणती तरी प्रथा मला आवडली बाबा " शशांक हसत म्हणाला. तसं सगळे हसले.

" अरे पण तू का एवढा खूश होतोय शशांक. भविष्यात दिग्विजय तुझाही असाच कान पिळणारे... " कृणालने शशांकला कोपरखळी मारली.

" म्हणजे आम्ही फक्त कान पिळून घ्यायचे का ? आम्हाला कुणाचा तरी कान पिळायचा चान्स कसा मिळणार... बघितलंत आई बाबा तुमचा एक निर्णय आम्हाला किती मोठा आनंद देऊ शकला असता याची कल्पना करा. " शशांक नाटकीपणे म्हणाला.

" शशी पांचटपणा पुरे... वेळ काय नि तू बोलतोयस काय" शशांकच्या आईने त्याला दटावणीवजा आवाजात गप बसण्याचा इशारा केला. बाकी सगळे मात्र इकडे तिकडे बघत हसू आवरायचा प्रयत्न करत होते.

" काही नाही, हे याचं नेहमीचंच आहे. पण तो हा विचार करतच नाही की जर तो मुलगी झाला असता तर मलाही बहिण मिळाली असती.." सार्थक हसत म्हणाला. शशांकने बारीक नजरेने बघत एक लूक दिला त्याला...

" हाहाहा सच्ची में, अगर शशांक लडकी होता तो कितना क्यूट दिखता... और हमारी टीम का एक मेंबर भी बढ जाता. क्या बोलती सोमी ?" आलिशा हसत हसत म्हणाली. पण सौम्याने यावर नाक मूरडलं.

" अहं अहं... पण आलिशा यामुळे दोन प्रेमींचं दिल असं तूटलं असतं ना म्हणून देवाने हा डांबिस मुलगा म्हणून पाठवला असेल. " कृणाल हसत म्हणाला. आणि शशांकने त्याच्या खांद्यावरचा हात त्याच्या गळ्यापाशी नेत त्याला गप बसायचा इशारा केला.

" झालं तुमचं?? नाही अजून काही असेल तर बोला. मगच हा कार्यक्रम करू. आणि त्यानंतरच जेवण होईल. " नानी करंट मोडमध्ये म्हणाल्या. आणि जेवणाची आठवण होताच त्यांच्या भूकेने पून्हा पोटात घौडदौड सुरू केली.

" दिग्विजय अरे तू का थांबलाय. शुभ काम में देरी किस बात की... चल चल नानींनी जसं सांगितलं तसं कर. " शशांक म्हणाला.

आणि दिग्विजयने एकदा आळीपाळीने सार्थक गौरवीकडे बघितलं.

" मला 0% पण डाऊट नाहीये सार्थक कधी त्याच्या कर्तव्य आणि प्रेमात कमी पडेल यावर... हे रिती रिवाज किंवा परंपरा म्हणून ठीक आहे. आयुष्यात पहिल्या नजरेत मला भावलेली व्यक्ती म्हणजे सार्थक तू आहेस. अगदी गौरवीच्याही आधी, हे तर तुलाही माहित आहे. पण आज जो दिवस आहे तो येईल की नाही याबाबत मी साशंक होतो. But man you are easily cross our approximations. सगळ्या गोष्टी संयमीपणाने तू हाताळला आणि तू तुझ्या परीक्षेत फक्त पासच नाही तर टॉपर ठरला आहेस. हेच आजच्या दिवसाच्या या रिझल्ट वरून क्लिअर होतंय. या प्रथेनुसार मी तुझा तर कान पिळेनच. पण त्यासोबत गौरवीचाही कान धरेन. कारण संसार दोघांचा असणारे, त्यात सगळं एकमेकांसोबत वाटून घेताना स्वतासोबत समोरच्याचाही विचार करावा लागणारे. आणि आमच्या समानतेच्या तत्त्वानुसार मी तुम्हा दोघांचाही कान पिळतोय. कधीच एकमेकांना अंतर देऊ नका. " दिग्विजय त्या दोघांच्या मधोमध बसत भावोत्कटपणे बोलत होता. आणि त्याने दोन्ही हातात त्या दोघांचा एकेक कान पकडला.

सार्थक गौरवीही प्रेमाने हसत त्याच्याकडे बघत होते. आणि हे कॅमेरामैनने कॅमेरात अचूक टिपून घेतलं. सगळेच दिग्विजय कडे प्रेमाने आणि अतीव समाधानाने पाहत होते. नानींचे डोळे नकळत मालविकाच्या आठवणीने पाणावले. शेजारी उभ्या असलेल्या दादासाहेबांनी नानीला धीर दिला. पण का कुणास ठाऊक त्यांनाही अश्रू आवरणं कठीण झालेलं. मालविकाने त्यांच्यावर हेच संस्कार केलेले, ते अगदी आजघडीला पण ते दोघे विसरले नव्हते. आज ती असती तर तिला तिच्या लेकरांच्या कौतूकासाठी आभाळ ठेंगणं पडलं असतं. त्यांनी अलगद पाणावलेल्या कडा पुसल्या.

सार्थक आणि गौरवीने दोहो बाजूंनी बसल्या बसल्याच दिग्विजयला मिठी मारली. तो शांतपणे त्या दोघांच्या डोक्यावरून थोपटत होता. त्यानंतर वेगळं होत सार्थकने दिग्विजयला कानपिळीची नेक म्हणून एक गिफ्ट बॉक्स दिला.

" हे फक्त तात्पुरतं गिफ्ट आहे. परमनंट गिफ्ट तर नक्कीच वर्षभरात मिळणारे तुला माझ्याकडून. तोवर हे स्वीकार कर. " सार्थक गिफ्ट देत असताना हळूच दिग्विजयच्या कानात पुटपुटला. ते ऐकून दिग्विजय मिश्कीलपणे हसला.

" अरे वाह जीजा और साले का प्यार तो बढता ही जा रहा है... अब तेरा क्या होगा शशांक बाबू." असं बोलून आलिशाने शशांकच्या शेपटावर पायच ठेवला.

" आता यात माझं काय आहे मध्येच. शांत बसलं तरी फिरून फिरून सगळे माझ्यावरच का येतात मला कळतच नाही. " शशांक बारीक नजरेने बघत म्हणाला.

" हा हा चल आता जास्त भोळा बनू नकोस. " कृणालने पण हात मारला.

" अरे भोळाच आहे माझा भाऊ. बस आता लवकरच त्याचंही होऊदे कुशल मंगल हीच आस या येड्या जीवाला. " करण शशांकच्या मदतीला धावला. यावर शशांकने प्रेमाने त्याला मिठी मारली.

" अरे भाई इनका bromance देखकर तो मुझे अब सोमी तेरे बारें में भी डर लगरा है " आलिशा परत हसत म्हणाली. सौम्याने तिच्या पायावर पाय ठेवला आणि तिला एक लूक दिला. तसं सगळेच हसले.

" झालं यांचं परत टवाळक्या करणं आणि हसणं खिदळणं चालू... चला आता जेवायला चला. तेवढंच थोडावेळ तरी आराम मिळेल आमच्या कानांना... " नानी त्या सगळ्यांना म्हणाल्या. आणि सगळे जेवायच्या हॉलमध्ये निघाले.

त्यानंतर सगळ्यांनी हसत खेळत गप्पा मारत आणि एकमेकांना प्रेमाने घास भरवत जेवण उरकलं. आणि थोडावेळ विश्रांती साठी आपापल्या खोलीत गेले. त्यानंतर रात्री लगेच रिसेप्शन असणार होतं त्याआधी थोडा आराम केला सर्वांनी. आजनंतर उद्या सार्थक गौरवी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होत तिथेच गृहप्रवेश करणार होते. आणि त्यासोबतच छोटीशी सत्यनारायणाची पूजाही ठेवलेली. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं म्हणून सगळे जण खूश होते.


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all