प्रेम! एका अनामिक वळणावरचं.. भाग-७६

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग -७६


रात्री रिसेप्शनला काही राजकीय नेते आणि मोजके नामांकित व्यक्ती उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे अगदी सगळं विनाव्यतय पार पडलं याचा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला. आणि आता ते सार्थक गौरवीच्या नवीन बंगल्यात रवाना झालेले... माधवीने त्या दोघांना ओवाळलं. आणि गौरवीला माप ओलांडून आत यायला सांगितलं. तिने पाय उचलला तेवढ्यात माधवी पून्हा म्हणाल्या,

" अगं असंच कसं बरं, माप ओलांडायच्या आधी उखाण्यात नाव घ्यायचं असतं एकमेकांचं... काय सार्थक तू पण विसरला?" माधवी त्या दोघांना म्हणाल्या. गौरवीला नीट कळलं नाही त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते...

" अगं आई आता किती उशीर झालाय. आणि बाकीच्यांचे चेहरे बघ किती थकल्यासारखे वाटतायत. " सार्थक शक्कल लढवत म्हणाला. कारण त्याला ते टाळायचं होतं. नाहीतर गौरवीला उखाण्यात नाव घ्यायला जमलं नसतं. आणि परत सगळे चिडवत बसले असते.

" काही नाही आम्ही थकले वगैरे नाहीयोत अजून. बघ जरा आमचे चेहरे किती एक्सायटेड आहेत ते.. जे काही व्हायचं ते रीतीप्रमाणेच होऊन जाऊदे. बरोबर ना आलिशा?" शशांक मुद्दाम म्हणाला. सार्थकने शशांककडे बारीक नजरेने बघितलं.

" हा वैसे भी ये सुनके थोडा एंटरटेनमेंट भी तो मिलेगा हमें.. " आलिशाला पण ते उखाणा वगैरे काय असतं हे माहित नसूनही तिने शशांकच्या हो ला हो म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. आणि सगळेच तोंडावर हात ठेवून हसले.

" उखाणे म्हणजे जोक नसतात. म्हणे एंटरटेनमेंट " सार्थक तिला म्हणाला. गौरवीने मात्र प्रश्नार्थकपणे बघितलं त्याच्याकडे यावर..

" इतकं बोलण्यापेक्षा आतापर्यंत उखाणा घेऊन झाला असता... तिला नाही जमत पण तुला तर माहितीय ना मग तू घे. आणि तिलाही मदत कर. " वसंतराव सबुरीने म्हणाले. तसं गौरवीनेही मी प्रयत्न करणारच असं सार्थकला डोळ्यांनीच सांगितलं.

" बरं ठीके मी आधी घेतो मग त्या पद्धतीने तूही जुळव. यमक कसं जुळवतात कविता करताना तसंच करायचं. फक्त त्यात एकमेकांचं नाव add करायचं असतं. " सार्थक हळूच गौरवीला समजावत म्हणाला.

" काय बोलला जरा मोठ्याने बोल ना. ऐकूच नाही आलं. " करण कान टवकारत म्हणाला.

" अरे आपल्याला कसं ऐकू येईल ते, त्यांचं private conversation असेल ना ते... " शशांक अगेन... सार्थकने एक लूक दिला त्याला. आणि बाकी सगळ्यांनी डोक्याला हात लावला, काय करायचं या वात्रट पोराचं अशा आविर्भावात...

" हो मी घेतोय ऐका..." सार्थक म्हणाला. तसं सगळे शांत होऊन तो काय बोलणार याकडे लक्ष देऊ लागले.

" नव्या दिशा, नवी आशा अन् नव्या घरी पदार्पण
  तुम्हा सर्वांच्या साक्षीने करतोय गौरवीला माझं सर्वस्व        अर्पण...! " सार्थक अगदी प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात म्हणाला. तसं ते ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गौरवी प्रेमाने बघत होती त्याच्याकडे, पण तिच्या डोळ्यात अजूनही काहीतरी होतं. जे फक्त सार्थकला कळलं होतं.

" हा हा चलो अब गौरवी तुम भी कहो ऐसा कुछ सार्थक के लिये..." आलिशा एक्सायटेडली म्हणाली. तसं गौरवीने हलकीशी स्माईल दिली. ती माधवीच्या हातात असलेल्या औक्षणाच्या ताटाकडे बघत होती.

" हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक,
  त्यासोबत अत्तरदाणी शोभे सुबक,
बसायला चंदनाचा पाट, भरवून मोत्याचा घास
सार्थक अभ्यंकरांचं नाव घेते तुमच्यासाठी खास..! " गौरवी न अडखळता बोलली. आणि सार्थकसह सगळे आ वासून तिच्याकडे बघायला लागले. तिने सार्थकचं बघून त्या तबकाचं निरीक्षण करत अगदी सुरेख शब्द गुंफले होते. सगळे जण आनंदाने टाळ्या वाजवत होते. दादासाहेब आणि दिग्विजय समाधानाने गालातल्या गालात हसत होते. सार्थक मात्र अजूनही गौरवीकडे बघत होता.

" वा खरंच मानलं. अगदी मिनिटभरात छान उखाणा रचलास. पून्हा दाखवून दिलंस तू सर्वगुणसंपन्न आहेस ते... आणि तुझ्यासारखी निष्णात सून म्हणून लाभली हे आमचं अहोभाग्यच म्हणावं लागेल. " वसंतराव अभिमानाने म्हणाले.

" चल आता गौरवी माप ओलांडून आत प्रवेश कर. " माधवींनी गौरवीला सांगितलं.

" अहं अहं, भाई डोळ्यात काहीतरी जाईल पापणी नाही हलवलीस तर... " शशांकने घसा खाकरत सार्थकला भानावर आणलं. तसं सार्थक हडबडून इकडे तिकडे बघायला लागला. आणि परत गौरवी माप ओलांडतेय हे बघून त्याने त्याचा हात तिच्या हातात दिला. आणि दोघांनी एकत्र गृहप्रवेश केला. तसं सौम्या आणि मितलने गुलांबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं.

त्यानंतर हॉलमध्ये सगळे जण जरावेळ बसले. कदाचित मागच्या आठवडाभरानंतर पहिल्यांदा ते इतके निवांत बसलेले...

" आता सगळे थकले आहात तर लवकर झोपा. उद्या दुपारी सत्यनारायणाची पूजा आहे. आणि...." नानी पुढे बोलतच होत्या पण तेवढ्यात आलिशा, शशांक, कृणाल उठून जायला निघालेले आणि ते ऐकून परत बसले.

" आता अजून पण काही राहिलंच आहे का ? नक्की कधी संपणार ते एकदाच काय ते सांगा. " शशांक बारीक तोंड करत म्हणाला.

" हो ना आणि नानी. ती पूजा आठवडाभराने घातली तरी चालते. त्यामुळे तोपर्यंत जरा relax होऊदे सगळ्यांना... " सार्थक म्हणाला. तसं माधवी आणि नानी एकत्रच सार्थककडे आश्चर्याने बघायला लागल्या. आणि दुसरीकडे दादासाहेब, वसंतराव आणि मनोहरराव गालातल्या गालात हसत होते. पण या आपल्या चिल्लर गॅन्ग ला कळत नव्हतं नक्की काय चुकतंय यात ते, म्हणून ते गोंधळून बघत होते.

" खरंच सार्थक तुला चालेल का आठवडाभरानंतर सत्यनारायणाची पूजा घातली तर... अरे बाकीचे नवरे लग्नानंतर घाई करतात या पूजेसाठी. कारण ही पूजा झाल्याशिवाय नवदांपत्याला खर्या अर्थाने एकत्र येता येत नाही. " माधवी तोंडावर हात ठेवून हसत हसत म्हणाल्या. तेव्हा कुठे सार्थकच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि त्याने गौरवीकडे बघितलं. ती त्याच्याचकडे बघत होती. त्याच्या टोटल हावभावावरून तिलाही ते कळल्यावाचून राहिलं नाही.

" हो पण तरी, अजून तीन चार दिवस थांबूया. सर्वांना आराम मिळणं गरजेचं आहे. " सार्थक जरासं लाजत म्हणाला.

" पण आई तू काय म्हणालीस आता, मला नीट समजलं नाही. काय असते ती पूजा ?" शशांकने विचारलं. तसं त्याला कृणाल, आलिशा, सौम्यानेही अनुमोदन दिलं. सार्थकने सुस्कारा सोडला. बरं झालं या टवाळखोरांना समजलं नाही ते... तो मनातच म्हणाला.

" सार्थक तू म्हणतो ते खरंय. पण सगळे एकत्र आहेत तोवर आपण उद्याच ही पूजा आपल्यात एवढ्या घरच्या लोकांत उरकून घेऊया. कारण परत सगळे आपापल्या कामाला निघून जातील. त्यानंतर कुणाला जमेल तर कुणाला नाही. म्हणून म्हणतेय मी. आणि त्यासाठी पूजेचा कालावधी दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी ठरवलाय. तोपर्यंत बर्यापैकी आराम होईल सर्वांचा... " नानी त्याला समजावत म्हणाल्या. त्यांना वसंतराव, दादासाहेब, मनोहरराव आणि माधवीने सहमती दर्शवली.

" बरं ठीक आहे. " अखेर सार्थकने तो प्रस्ताव स्वीकारला.

" चला आता जावा सगळे आपापल्या खोलीत. आणि गौरवी तुझ्या रूममध्ये तुझं सगळं सामान पाठवलंय. जा आवरून झोप. आणि बाकीचे सगळेही झोपा आता निवांत. उद्या लवकर उठायची काही गरज नाही. त्यामुळे आरामात झोपा. " नानी म्हणाल्या.

" लेकिन नानी गौरवी का सामान उसके रूम में क्यूं? सार्थक की रूम में शिफ्ट करना भूल गये या गलती से कह दिया..." आलिशाचा भाबडा प्रश्न. बाकी गॅन्गलाही तोच प्रश्न पडलेला.

" घ्या आता. रात्रभर रामायण झालं आणि तरी रामाची सीता कोण हेच माहित नाही आपल्याला अजून... " नानींनी कपाळावर हात मारून घेतला.

" आलिशा बरोबर बोलतेय नानी. लग्न झालंय ना त्यांचं, मग असं वेगवेगळ्या रूममध्ये का शिफ्ट करतेय त्यांना... " सौम्याचा निरागस प्रश्न.

" सौम्या तुझं लग्न झालं ना की मग कळेल हं तुला... अगं उद्याची पूजा झाल्याशिवाय त्यांना एका रूममध्ये शिफ्ट करता येणार नाही. कळलं का आता. जावा झोपा. " माधवी आधी सांगायला टाळत होत्या. पण यांचे प्रश्न काही संपणार नाहीत हे ओळखून अखेर त्यांनी सांगून टाकलं. तेव्हा कुठे त्यांना इतका वेळापासून हे त्या पूजेवर चर्चा का करतायत ते कळालं.

" ओहह भाई असंय काय... पण भाई तुझ्या मोठेपणाला मानलं बरं का " शशांक बरळला.

" शशी फालतू बडबड करू नकोस जा जाऊन झोप. खूप झाला पांचटपणा..." सार्थक त्याला तंबी देत म्हणाला.

" ऑ... आता लग्न झालं तुझं म्हणून तू मला असं बोलणार ? दिग्विजय गौरवी तुमने मेरा भाई छीन लिया..." शशांक

" झाली याची नाटकं सुरू..." कृणाल कपाळावर हात मारून घेत दिग्विजयला म्हणाला.

" सुरू होण्याआधी बंद तरी कधी झाली होती याची नौटंकी, आठवडा झाला बाबा. याला सहन करतोय आपण. " सौम्या पण खुसपुसत म्हणाली. पण सार्थकने सगळ्यांना झोपायला पाठवलं. तसं सगळे एकामागून एक झोपायला गेले.

इतके दिवस गजबजून गेलेल्या वातावरणात राहिल्यामुळे ती शांतता त्याला वेडावत होती. इथे आल्यापासून सगळ्यांची बडबड खेचाखेची चालू होती. पण यात त्याने एक गोष्ट नोटीस केलेली ती म्हणजे गौरवी दिग्विजयचं अचानक शांत होणं. काय झालं असेल त्यांना... ते कसल्या तरी विचारात बुडालेले आहेत हे त्याला कळत होतं. पण त्यामागचं कारण त्याला गवसत नव्हतं. कदाचित रिसेप्शन मध्ये काही राजकीय मंडळी आलेली,  त्यांच्यासोबत झालेल्या संवादात काहीसे डिस्टर्ब असावेत का ते?? सार्थक विचार करत होता. पण तेवढ्यात अचानक त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तसं त्याने दचकून मागे बघितलं.

" तुम्ही? अजून झोपला नाहीत का?" सार्थक आश्चर्याने म्हणाला.


क्रमशः


खूप खूप धन्यवाद सर्वांचे! भेटू लवकरच तोपर्यंत
Stay tuned
Good night

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all