प्रेम! एका अनामिक वळणावरचं.. भाग-७७

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-७७


नवीन घरात प्रवेश झाल्यानंतर रात्री सगळे झोपायला गेले होते. आणि सार्थक एकटाच हॉलमधल्या खिडकीजवळ उभारत विचार करत होता. रिसेप्शन नंतर इथे आल्यापासून गौरवी दिग्विजयचं अचानक शांत होणं त्याला जाणवत होतं. तेवढ्यात मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्यामुळे जरासं दचकून सार्थकने मागे बघितलं.

" तुम्ही? अजून झोपला नाहीत का?" सार्थक मागे वळताच आश्चर्याने म्हणाला. कारण त्याला वाटलं होतं की ते गौरवी किंवा दिग्विजय दोघांपैकी कुणीतरी असेल. पण त्याच्यासमोर दादासाहेब होते.

" इतक्या लवकर झोपायची सवय नाहीये मला... आणि तुला इथे माझ्याऐवजी दुसरं कुणी असावं असं वाटलं होतं का?" दादासाहेब शांत स्वरात म्हणाले. जणू त्यांनी सार्थकच्या हावभावावरून त्याचं अचूक फेस रिडिंग ( face reading ) केलेलं.

" अच्छा. पण नाही असं काही नाही. ते तुम्ही अचानक आलात ना मग म्हणून मला वाटलं आता यावेळी दमून झोपण्याऐवजी कोण इथे आलं. " सार्थक सावरत म्हणाला.

" सार्थक बाळा नाही जमत तुला खोटं बोलायला... आणि जगात कुठेही काहीही घडूदे पण ज्यांना उशिरा झोपायची सवय असते ना ते लवकर कधीच झोपू शकत नाहीत. पण ज्यांना लवकर झोपायची सवय असूनही ते जागतात तेव्हा ते कसल्यातरी विचारात असतात. " दादासाहेब गुढपणे हसत म्हणाले.

" हो खरंय. आपण जरावेळ बाहेर जाऊया मोकळ्या हवेत... छान गार वारा सुटलेला आहे. " सार्थक म्हणाला. तसं दादासाहेबांनी त्याला लगेच चल असं डोळ्यांनीच सांगितलं. आणि ते दोघेही बाहेर झोपाळ्यावर येऊन बसले. सार्थकला काय बोलावं सुचत नव्हतं कारण त्याच्या डोक्यात वेगळे विचार सुरू होते. कदाचित हे चाणाक्ष दादासाहेबांनी आधीच ओळखलेलं. म्हणून त्यांनीच बोलायला सुरुवात केली.

" सार्थक... तू जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि त्याहुन जास्त नितळ पारदर्शी स्वभावाचा आहेस. तू तुझ्यासाठी अगदी अनुरूप नाही पण जोखमीचा जोडीदार निवडला आहे. पण प्रत्येक गोष्ट सदैव आपल्या आवाक्यात राहू शकत नाही. कधीतरी नको असलेल्या गोष्टीही आपण मनापासून करतो ते प्रेम असतं आणि करायच्या असलेल्या गोष्टी डावलतो तेही प्रेमच असतं. पण प्रेम आणि कर्तव्य या दोहोंना एकाच तराजूत कधी तोलायचं नसतं. जसं की बघ ना... तू प्रेमालाच प्रथम कर्तव्य मानतो, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी प्रेमाव्यतिरिक्त जिंकता येते. बरोबर ना? आणि दुसरीकडे गौरवी आहे जी कर्तव्यालाच प्रेम मानते. अगदी मी आणि दिग्विजयही याच बाजूने मोडतो. मी आशा करतो तुला माझं बोलणं नक्कीच उमगलं असेल. " दादासाहेब शांतपणे त्याला समजावत होते. आणि तोही लक्षपूर्वक ते ऐकत होता. बोलता बोलता दादासाहेब थांबले. तेव्हा त्यांनी सार्थकच्या चेहर्यावर स्मित पाहिलं.

" हो दादासाहेब तुम्ही म्हणताय ते मला कळतंय. मी या गोष्टीचा आधीही अनेकदा विचार केलाय. आणि मला माझ्या नात्यावर, प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कधीच एकमेकांना वेगवेगळ्या तराजूत तोलणार नाही. कारण प्रेम आणि कर्तव्य दोन्ही सारखंच आहे माझ्यासाठी... " सार्थक स्मितवदनाने म्हणाला. तसं दादासाहेबांनी प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवला. कदाचित त्यांचं ते प्रेमळ रूप तो पहिल्यांदा पाहत होता.

" तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं मला... फक्त या दोन्ही गोष्टींना कधी भावनिकदृष्ट्या तोलू नकोस. कारण तू हळवा आहेस त्याहुन कितीतरी पटीने जास्त हळवं मन माझ्या गौरवी दिग्विजयचं आहे. पण त्यांचं ते हळवं मन आता त्यांना दिसत असलं तरी ते यामुळे कात्रीत सापडतात. आतापर्यंत निर्विकारपणे जगत आलेत ते त्यामुळे ते मन अजूनही पूर्णपणे स्वीकारणार नाहीयेत ते... आणि त्यांनी ते मन फक्त जाणावं आणि समजून घ्यावं. पण त्यात त्यांनी शिरता कामा नये. हे माझं मत आहे. " दादासाहेब जरा गुढपणे म्हणाले. पण त्यांच्या बोलण्याचा शेवटचा अर्थ सार्थकला कळाला नाही.

" हो पण तेही त्यांचंच मन आहे ना दादासाहेब. आणि आता गौरवी नंतर दिग्विजयनेही  पण त्यात शिरता कामा नये म्हणजे मी नाही समजलो..." सार्थक जरासा गोंधळून म्हणाला.

" हो कारण भावनिकता त्यांना झेपणार नाही. ते तूटून जातील. त्यामुळेच आम्ही त्यांना लहानपणापासून कणखर बनण्यास प्रवृत्त केलं. आणि आज तीच त्यांची ओळख आहे. त्यांच्यात झालेला सकारात्मक बदल आमच्यासाठी दिलासादायक आहे. पण जर यात अतिशयोक्ती झाली तर ते गौरवी दिग्विजय राहणार नाहीत. " दादासाहेब हळव्या स्वरात म्हणाले. यावर सार्थक काहीच क्षणभर काहीच बोलला नाही.

" ठीक आहे. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण दादासाहेब म्हणजे मला एक गोष्ट राहुन राहुन सतावतेय. तुमची हरकत नसेल तर___" सार्थक अडखळत बोलत होता. तोच दादासाहेबांनी त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याला बिनधास्त बोल असं डोळ्यांनीच सांगितलं.

" गौरवी दिग्विजयला त्यांच्या बाबांचं प्रेम कधीच मिळू शकणार नाही का? मी माझ्या वतीने एकदा पहिला आणि शेवटचा प्रयत्न करून पाहू का? कारण कोणताही परिपक्व माणूस सहज समजेल की त्या दोघांच्या जन्माआधी त्यांच्या आईला एड्स चं निदान झालं. त्यानंतर गर्भपात करायला सांगूनही त्या माऊलीने तिच्या लेकरांचा बळी जाऊ दिला नाही. आणि हा निर्णय त्यांचा होता. ज्यात गौरवी दिग्विजयचा काहीच दोष नव्हता. मग निदान त्यांची आठवण म्हणून तरी त्यांच्या वडिलांनी त्यांची पोटची मूलं स्वीकारावीत. " सार्थक जड स्वरात म्हणाला. यावेळी तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता. दादासाहेब त्याचं बोलणं ऐकून शांत झालेले, काहीच बोलले नाहीत म्हणून सार्थकने एकवार त्यांच्याकडे बघितलं. तर दादासाहेबांचे डोळे भरून आलेले नि त्यातून घळाघळा अश्रूधारा वाहत होत्या. सार्थक त्यांना या अवस्थेत पहिल्यांदा बघत होता. त्याचं अंतःकरण पिळवटून गेलं ते बघून... त्याने बसल्या बसल्याच दादासाहेबांना घट्ट मिठी मारली. आणि त्यांच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवत होता.

" यासाठी मी तुला अडवणार नाही आणि प्रोत्साहनही देणार नाही. पण ही गोष्ट गौरवी दिग्विजय ला कळायला नकोय. आणि त्यांच्या या आनंदावर विरजण पडलेलं नाही बघायचं मला. तुला योग्य वेळेची वाट पहावी लागेल त्यासाठी.. तुला समजलं मला काय म्हणायचंय ते..." दादासाहेब हळूवारपणे म्हणाले. तसं सार्थकने त्यांच्या हातावर आश्वासकपणे हात ठेवला.

" दादासाहेब आता खूप उशीर झालाय. तुम्ही आराम करा आता. मागच्या काही दिवसात खूप दगदग झालीय तुमची.. " जरा वेळाने सार्थक बाजूला होत म्हणाला.

" अच्छा पण जर मी म्हटलं की माझा आराम तू आहेस तर..." दादासाहेब मिश्कीलपणे म्हणाले. तसं सार्थकने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं.

" आता माझी खात्री पटतेय की गौरवी दिग्विजय एवढे हट्टी आणि जिद्दी का आहेत. " सार्थक पण हसत म्हणाला. तसं दादासाहेब गुढपणे हसले.

" अगदीच.. पण मघाशी तू ज्या चिंतेत होतास ती चिंता तर दूर झाली ना तुझी यानिमित्ताने..." दादासाहेब हलकेच हसत म्हणाले.

" कसं म्हणजे नाही.. दादासाहेब मी तेव्हा वेगळ्या गोष्टीचा विचार करत होतो. पण तुमच्याशी बोलून मोकळं वाटतंय आता.." सार्थक सारवासारव करत म्हणाला. कारण त्याला नेमकं कळलं नव्हतं त्यांना काय म्हणायचंय ते...

" नाही नाही. ती चिंता तात्पुरती शमेल. त्यापेक्षा बोलून मोकळा हो... खरं तर तू दिग्विजयचा विचार करतोयस ना. " दादासाहेब त्याच्या मनातलं हेरत म्हणाले.

" आता तुम्ही ओळखलंच आहे तर मी यावर खोटं बोलू शकणार नाही. हो मला मनापासून वाटतं त्याने लग्न करावं. आणि हे मला जाणवलंही आहे की तो नकळत कुठेतरी अडकलाय. पण तो हाच विचार करतोय जो गौरवी आधी माझ्याबाबत करायची. पण त्याला हे कळत नाहीये. आणि ती मुलगी कोण हेही मला समजत नाहीये. गौरवी आणि दिग्विजय दोघेही खूप कोड्यात बोलतात. पण दादासाहेब ? " सार्थक बोलता बोलता मध्येच थांबला.

" पण काय?" दादासाहेबांनी विचारलं.

" पण आज रिसेप्शनला ते कुणीतरी माजी मंत्री त्यांच्या मुलीसह आलेले.. कदाचित त्यामुळे तेव्हा दिग्विजय ला मी ते आल्यावर निघून जाताना पाहिलं. आणि गौरवीचा चेहरा मी खूप जवळून वाचला. तेव्हापासून ते दोघे अस्वस्थ वाटत आहेत. हे खरंय का?" सार्थकने तळमळीने विचारलं.

तसं दादासाहेबांनी एकदा त्याच्या खोल डोळ्यात डोकावून पाहिलं. कसा आहेस रे तू सार्थक... आजच तुझं लग्न झालंय, स्वताच्या भविष्याची प्रेमळ स्वप्नं बघत त्यात रमण्याऐवजी तू तुझ्या नुकत्याच झालेल्या सहचारिणीच्या इतक्या बारीक गोष्टीचंही निराकरण करण्याचा प्रयत्न करतोयस... फक्त तिचाच नाही तर तिच्यासारख्या असलेल्या दिग्विजयसाठीही प्रेमाचा पर्वत उभा करतोय. यालाच का प्रेम म्हणतात... हे असं निर्व्याज प्रेम फक्त तूच करू शकतोस... दादासाहेब मनातच म्हणाले.

" सार्थक मला तुझ्या बोलण्याचा संदर्भ कळतोय. पण ना काही गोष्टी आपण वेळेवर सोपवायच्या असतात. दिग्विजयचा निर्णय प्रलंबित आहे आणि का आहे हेही मला माहितीये. अगदी गौरवीबाबतही मला सगळं कळत होतं. पण त्यांना मी कधीच कशासाठी पुश नाही केलं. त्यामुळे ते आधीपासूनच एकमेकांचे निर्णय आपापसात घेतात. कारण यामुळे त्यांना त्यातलं गांभीर्य समजतं. जर ते इतर कुणाच्या काही सांगण्याने तितका प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. म्हणूनच... गौरवीसाठी तुझ्याबाबत सर्वात आधी दिग्विजयने पुढाकार घेतलेला.. मग आता तसंच गौरवीही दिग्विजय बाबत निर्णय घेईल. आणि एकमेकांचा निर्णय ते कधीच डावलत नाहीत. त्यामुळे आपण फक्त योग्य वेळेची वाट पहायची. " दादासाहेब त्याला समजेल अशा भाषेत प्रेमाने समजावत म्हणाले. यामुळे त्याला भलताच आनंद झाला. इतका वेळ मनावर असलेलं दडपण आपसूकच दूर झालं.

" मला पटतंय हे एकदम एकशे एकवीस टक्के पटतंय. आणि खरंच खूप मोकळं वाटतंय दादासाहेब मला आता. " सार्थकने आनंदाने त्यांना मिठी मारली. दादासाहेबही प्रेमाने त्याच्या पाठीवर थोपटत होते. आणि थोड्या वेळाने ते दोघेही आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले.


क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all