प्रेम! एका अनामिक वळणावरचं... भाग-७८

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
भाग-७८


रात्री दादासाहेबांसोबत बोलल्यावर सार्थकला जरा मोकळं वाटत होतं. तेच अगदी दादासाहेबांबाबतही होतं. त्यामुळे आज खूप दिवसांनी त्यांना समाधानाची झोप लागणार होती. दादासाहेब खोलीत येऊन झोपले. आणि पडताच क्षणी त्यांना डोळा लागला. दुसरीकडे सार्थक त्याच्या खोलीत झोपायला जात होता. पण नकळत त्याची पावले गौरवीच्या रूमसमोर येऊन थांबली. दार नुसतंच पुढे केलेलं होतं. त्यामुळे त्या फटीतून त्याला गौरवी शांतपणे झोपली असेल की नाही हे बघायचं होतं. त्याने तिथूनच सहज बघितलं कारण आता यावेळी असं तिच्या रूममध्ये जाणं त्याला थोडं अतिशयोक्तीचं वाटलं. कारण जरी त्यांचं लग्न झालं असलं तरी  तो रिती आणि इतर गोष्टीत व्यत्यय आणणार नव्हता.

त्याने हळूच आत बघितलं. ती एका अंगावर झोपलेली. कपडे जरी चेंज केले असले तरी चेहर्यावर नववधूचा साज तसाच होता. कदाचित तिने कंटाळून हलकेच चेहरा धुतला असावा. त्यामुळे भांगेत सप्तपदी नंतर त्याने भरलेलं ते कुंकू अजूनही अस्पष्ट पण ठळक तसंच होतं. तिचे डोळे शांतपणे मिटलेले. एक हात दुमडून तिने समोर आडवा पसरलेला. तर दुसरा हात पोटावरून समोर सोडलेला... पाय दोन्ही एकावर एक असले तरी एक पाय जरासा दुमडलेला वाटत होता. केस मोकळे सोडले होते. आणि ते मोकळे केस मागच्या उशीवर पसरले होते. तर काही हवेने मानेवरून समोर येत गळ्यात रेंगाळत होते. आणि विशेष तिच्या चेहर्यावर एक उठावदार स्माईल होती. जी स्माईल खूप दुर्मिळ असायची आणि तो ते बघण्यासाठी तरसायचा. तीच स्माईल आज तिच्या चेहर्यावर विलासत होती. ते बघून त्याने हलकं स्मित केलं. त्याच्या मनात खूप भावना निर्माण होत होती की असंच जावं आणि तिला छळणारे ते केस मागे सरकवावेत. तिच्या थंड नि कोमल त्वचेवरून अलगद हात फिरवावा. आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत असंच तिला मिठीत घेऊन झोपावं... पण त्याने महत्प्रयासाने स्वताच्या मनाला आवर घातला. इतके दिवस वाट पाहिली आहेच तर मग आता अजून पुढचे चोवीस तास थांबायला काय जड जाणार होतं. हम्म हेही बरोबरच आहे. असं म्हणत त्याने ओशाळून त्याच्या केसांतून हात फिरवला. आणि तो त्याच्या खोलीत जायला निघाला.

सार्थक तिथून पुढे पास होत होता. तेवढ्यात त्याच्या रूमच्या डाव्या बाजूला असलेल्या रूमकडे सहज त्याचं लक्ष गेलं. ती दिग्विजयची रूम होती. त्याची पावलं नकळत तिकडे वळली. दिग्विजयच्या रूमचं दारही नुसतंच पुढे केलेलं. त्यामुळे ते थोडंसं उघडं दिसत होतं. त्या किंचित उघड्या असलेल्या फटीतून सार्थकने कुतूहलाने एक डोळा बंद करत आत पाहिलं. तर दिग्विजय शांतपणे झोपलेला. त्याला असं शांत झोपलेलं पाहून सार्थकला बरं वाटलं. आणि त्याने दरवाजा अजून जरा पुढे सरकवला. आता तो दारात हाताची घडी घालून उभा होता. तो दिग्विजयकडे स्मितवदनाने बघत होता. दिग्विजयच्या चेहर्यावर एक समाधानी हसू उमटलेलं. पण एक गोष्ट त्याने नोटिस केलेली आणि अचानक त्याला काहीतरी एक्सप्रेस झालं. आणि आता त्याच्या चेहर्यावर आश्चर्यकारक भाव तरळलेले... कारण दिग्विजय तसाच एकेरी अंगावर, एक हात पुढे पसरत तर दुसरा हात पोटावरून समोर घेत आडवा पसरलेला.. आणि दोन्ही पाय एकमेकांवर असले तरी एक पाय जरासा गुडघ्यातून दुमडलेल्या अवस्थेत तो झोपलेला... मघाशी गौरवीही अशीच झोपलेली हे तिचं निरीक्षण करतेवेळी त्याने बारकाईने पाहिलेलं...

यार इतकं कसं परफेक्ट... हे दोघे जुळे आहेत त्यामुळे आश्चर्य वाटायचं काही खास कारण नसलं तरी ते दोघेही त्यांच्या नैसर्गिक नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत आहेत हे क्षणोक्षणी त्याला जाणवत रहायचं. ते दोघे एका मातीचे, हाडा- मांसा-रक्ताचे बनलेले आहेत आणि त्यांचं आचरणही तितकंच या गोष्टीला पूरक आहे.. ही एक गोष्ट मला नेहमी तुम्हा दोघांच्या प्रेमात पून्हा पून्हा पडायला भाग पाडते. आज तुम्हा दोघांना इतकं समाधानाने हसत झोपताना, भावनाविवश होत एकमेकांचा आधार बनताना, स्वतःला अशक्य वाटत असलेल्या गोष्टीही स्वीकारताना, आपलंसं करताना बघून मला किती आनंद होतोय हे सांगायला कदाचित शब्द मावणार नाहीत मला... वर्षभरापूर्वी मला भेटलेले निर्विकार, भावना हीन गौरवी दिग्विजय ते आताचे प्रेमळ, मिश्कील आणि भावना जपणारे गौरवी दिग्विजय यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

सार्थक झोपलेल्या दिग्विजयकडे अतीव प्रेमाने पाहत होता. त्याच्या अंगावरचं ब्लॅन्केट कमरेपर्यंत होतं. ते सार्थकने अलगद वर खांद्यापर्यंत ओढलं. झोपेतही तो अगदी नीटनेटका दिसत होता. फक्त डोक्यावरचे केस जरासे कपाळावर आलेले. तेव्हा सार्थकने त्याचे कपाळावरचे केस अलगद मागे सरकावले. तेव्हा  त्याच्या कपाळावर दुपारी लग्नविधी नंतर कान पिळी वेळी सार्थकने त्याच्या कपाळावर ओल्या कुंकवाने नाम ओढून त्यावर तांदूळ चिटकवलेले ते अगदी तसंच होतं. त्याने चेहरा धुतला नसेल कदाचित असं त्याला वाटून गेलं. पण ते दोघेही सार्थकची प्रत्येक गोष्ट एखाद्या अमूल्य क्षणासारखी जपून ठेवतात. हे त्याला याही वेळी जाणवलं.

मला माहीत आहे दिग्विजय तू आणि गौरवी माझ्या तुमच्या आयुष्यात येण्याने खूप आनंदी आहात. खरं तर माझ्या गौरवीच्या अशक्यप्राय वाटणार्या नात्यातला तूच सर्वात मोठा पूल आहेस. तुमच्या दोघांतलं साम्य, हुशारी, चातुर्य यातला अंतर पडताळणं हे त्या देवालाही शक्य होणार नाही. कारण त्यानेच तुम्हाला जन्मतः इतक्या अतोनात यातना दिल्यात, ज्यातून सावरणं तर कठीण पण त्या गोष्टी धड विसरताही येणार नाहीत आणि स्मरताही येणार नाहीत. दादासाहेब म्हणाले ते खरंच आहे, तुमचं भावनिक होणं कदाचित तुमच्यातल्या  खर्या गौरवी दिग्विजयला कायमचं संपवून टाकेल. मी तुला मनोमन वचन देतो आज गौरवीशी लग्न करून मी फक्त तिच्या सुख दु खाचा भागीदार नसून तिच्या अंतरात्म्यात वसलेल्या प्रत्येक व्यक्ती च्या सुख दु खाचा भागीदार असेन. मी तुला, सौम्याला कधीच अंतर देणार नाही. मला मनापासून वाटतंय की तूही आता आयुष्यात प्रेम करावं त्या व्यक्तीवर जी फक्त तुझ्यासाठी या जगात आलीय. मला हेही माहीत आहे की तू नकळत प्रेमाच्या अवतीभवती घुटमळतोय पण तिथवर जायची रिस्क तुला नकोय. अगदी हेच आधी गौरवीच्याही बाबतीत घडलेलं. पण आज बघितलंस ना अखेर या सुवर्णक्षणाची ती साक्षीदार बनलीच. तसंच तूही बनशील. मला खात्री आहे, जी मुलगी तुझ्यावर मनापासून प्रेम करते तीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुझी जीवनसाथी बनूनच राहील. मला तुम्हाला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत प्रेमाची झुळूक फुंकताना पाहायचंय. आणि हे नक्कीच पूर्णत्वास जाईल. अशी माझी दृढ इच्छाशक्ती आहे. माझ्या इच्छाशक्तीवर माझ्यापेक्षा तुमचा जास्त विश्वास आहे ना... हेच खूप आहे माझ्यासाठी...

सार्थक दिग्विजयच्या डोक्यावरून हात फिरवत मनातच म्हणत होता. आणि थोडावेळ तिथेच बसून परत उल्हासाने तो त्याच्या खोलीत गेला. आता खूप छान झोप लागणार होती त्याला... त्याने डोळे मिटले तर गौरवी दिग्विजय चे आताचेच झोपेत हसणारे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर तरळले. आणि त्याच्या चेहर्यावर एक भलीमोठी स्माईल आली. तेव्हाच झोपेने त्याला जवळ केलं.


क्रमशः

ही कथा तुमच्या प्रमाणे माझीही फेवरेट आहे. आणि जेव्हा मी सार्थक गौरवी दिग्विजय आणि या कथेतल्या प्रत्येक पात्राबद्दल लिहित असते तेव्हा ते काल्पनिक नसून माझ्या जगण्याचा भाग आहे या विचारातून लिहिते. वेळेअभावी मला या कथेकडे फारसं लिहायला जमलं नसलं तरी मी वाचकांच्या गौरवी कथेबद्ल प्रतिक्रिया, त्यांचा उत्साह सगळं काही समजू शकते. पण समजून घ्या हं दरवेळी प्रमाणे. तुमच्या प्रत्येक प्रतिसादाचं स्वागतच असेल. तर मग भेटूयात. लवकरच
तोपर्यंत
Stay tuned

©️®️ अबोली डोंगरे.


🎭 Series Post

View all