प्रेम! एका अनामिक वळणावरचं.. पर्व-२.भाग-१

एक राजकारणी आणि एका ध्येयवेड्या मुलीची ही अनोखी प्रेमकहाणी.


पर्व दुसरे...
भाग-१


रात्रीचे  एक वाजत आलेले, ती घड्याळात बघत झपाझप पावले टाकत निघालेली... गोवा ट्रीप जरा जास्तच महागात पडलीय याचे पडसाद आता तिला घरी गेल्यावरच कळणार होते. बाकीच्या सगळ्या मैत्रिणी एअरपोर्टवरून मिळेल त्या लिफ्टने घरी निघून गेलेल्या.. पण ती मात्र तिच्या ताईची वाट बघत इकडून तिकडे येरझारे घालत होती. आधीच मुंबईत ती नवीन, काही माहिती नाही त्यात हे अनोळखी शहर... म्हणूनच ताईच्या भरवशावर होती ती. पण आता अर्धा पाऊण तास झाला तरी तिचा पत्ता नव्हता. ती वेड्यासारखी तिची वाट बघत, तिला फोन करत तिथे उभारली होती. येता जाता लोक तिला भिंत म्हणून धडकत होते.

बाप्पा काय माणसं आहेत ही, त्यापेक्षा आमचं वाशिम लाख पटीने परवडलं. कशाला आले इथे तडमडायला उगाच, पण काय करणार ताई मुंबईत सेटल झालीय आणि तू बसलीय इथे लहान पोरांना शाळा शिकवत. मुंबईत जा आणि ताई सारखं स्वावलंबी बनून नाव कमव आणि अमूक तमूक ढमूक.. असं म्हणत बाबांची रिटायरमेंट होते की नाही तोवर इथे यायचा धोशा लावलेला आई आणि आजीने मिळून... तिथली ओढ, आपलेपणा तसं इथे काहीच नाही. नुसतं घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतात लोक. आणि काय तर म्हणे मुंबई म्हणजे मायानगरी, काय करायचंय अशा नावाच्याच मायेचं.. कप्पाळ.

स्वताच्याच विचारात चालत चालत ती एअरपोर्ट बाहेरील पार्किंगच्या दिशेने आलेली... तिला समजत नव्हतं नेमकं काय करावं आणि कुठं जावं म्हणून ती इकडेतिकडे बघत पुढे चालत होती. त्यामुळे पायात दगड आलेला पण दिसला नाही आणि त्याला ठेचकाळली ती.. एवढं काही लागलं नव्हतं, पण तिची सॅन्डल मात्र तुटली. घ्या आता दुष्काळात तेरावा महिना.. असं म्हणत आता ती तशीच पायात सरकावून तो पाय न उचलता घसरत चालत होती. आणि अशातच एका कारसमोर येऊन थोडक्यात वाचली. तो माणूस तिला लागलं का ते विचारण्याऐवजी सरळ तिला शिव्या घालून निघून गेला.

काय निर्लज्ज माणूस आहे तो.. जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटावी की नाही. चोराच्या उलट्या बोंबा त्याला शिव्या घालत ती रोड क्रॉस करून टॅक्सीच्या दिशेने जात होती. पण मध्येच तिच्या हातातला मोबाइल  खाली पडला आणि ती ते घेईपर्यंत वार्याच्या वेगाने भरधाव कार बाजूने गेली. प्रसंगावधान राखून तिने पटकन पुढे जायचा प्रयत्न केला पण त्या कारचा स्पीड इतका होता की त्या हवेने तिच्या गळ्यातला स्कार्फ त्या गाडीच्या चाकात अडकला आणि त्या झरोक्यात ती खाली पडली.
त्या कारचा स्पीड जेवढा फास्ट होता तेवढ्याच गतीने ब्रेक मारला.

ती मागून ओरडत होती त्याला हे कळताच त्याने एकवार फ्रॉन्ट मिररमधून तिच्याकडे बघत एक नंबर डायल करून काहीतरी बोलला आणि कारमधून उतरून चाकात अडकलेला तिचा स्कार्फ घेऊन तिच्यासमोर धरला. तिला हातापायाला खरचटलेलं, त्यावर फुंकर मारत ती तिचा शॉर्ट टॉपचं खालचं टोक त्या जखमेपर्यंत नेऊन रक्त पुसण्याचा प्रयत्न करत होती. ते बघूनच तो स्कार्फ देत होता तिला...

" माझाच स्कार्फ मला देताय? " ती त्या स्कार्फकडे आणि तो घेऊन उभारलेल्या तरूणाकडे बघत घुश्यात म्हणाली. तो मात्र काही झालंच नाही अशा आविर्भावात उभा होता.

उंच, धिप्पाड, रात्रीच्या अंधारात त्याच्या फ्रेश कलरवर तो काळा गॉगल, प्लेन शर्ट आणि त्यावर जॅकेट, एक हात खिशात तर एका हातात तो स्कार्फ तिच्यासमोर धरून तो उभा होता. बसल्या बसल्याच तिने त्याला न्याहाळलं. पण त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसत नव्हता उजेडाच्या विरूद्ध दिशेला तो उभा होता. पण त्याने मात्र क्षणभरात तिचं अचूक निरीक्षण केलेलं...

त्याचा चेहरा स्पष्टपणे ओळखू येण्यासाठी ती एकटक त्याच्याकडे बघतेय हे लक्षात आल्यावर तिने लगबगीने नजर फिरवली. तिचं लक्ष तिच्या फाटलेल्या स्कार्फकडे गेलं.

" माझा फेवरेट स्कार्फ..काय अवस्था झालीय त्याची. याला तुम्ही जबाबदार आहात "

" आणि या जखमांना कोण जबाबदार आहे?"

" चोर तो चोर वरून शिरजोर, तुमच्यामुळे झालंय हे सगळं आणि वरून मला विचारताय"

" कारण टाळी एका हाताने वाजत नाही. "

" काय म्हणायचंय तुम्हाला? समोरचा जखमी आहे, त्याला मदत करायची सोडून त्यालाच चुकीचं ठरवताय. काय माणूसकी नावाची गोष्ट आहे की नाही तुमच्याकडे "

" वाळवंटात नदी कशी असू शकेल..." तो निर्विकारपणे म्हणाला.

" शेवटी मान्य केलंतच की तुम्हाला माणूसकी नावाचा प्रकार माहिती नाही ते..‌" ती म्हणाली तसं तो फक्त उपहासात्मक हसला. त्याचं टोटल वागणं आणि त्याचे शब्द बाऊन्सर जात होते तिला...  तेवढ्यात एक मध्यमवयीन महिला तिच्याजवळ आली.

" काय झालं तुला, किती लागलंय. चल ये जरा बाजूला मी मलमपट्टी करून देते. " असं म्हणत ती महिला तिला उठवत होती.

" चला तर म्हणजे कुणीतरी माणूसकीच्या नात्याने बोललं तरी निदान. नाहीतर लोक इथे नुसते खिशात हात घालून उभे होते. " तिने त्याच्याकडे बघत म्हटलं तसं त्या महिलेने स्मितहास्य करत त्या तरूणाकडे बघितलं. तो किंचित हसला आणि त्यांना अंगठा दाखवत तिथून निघाला.

" देव करो आणि तुमच्यासारख्या माणसाशी परत माझी चुकून पण भेट न होवो..." तो जाताना ती पाठीमागून ओरडत म्हणाली. त्याने ते ऐकलेलं पण काहीच न ऐकल्यासारखं करत तो त्याच वेगात तिथून गेला. Who cares

त्या महिलेने ती नको म्हणत असतानाही जखम स्वच्छ करून व्यवस्थित मलमपट्टी करून दिली.

" तुम्ही देवासारख्या धावून आलात खरंच खूप बरं वाटलं. या मलमपट्टी पेक्षा तुम्ही ही मदतीची आणि आपलेपणाची भावना दाखवलीत ना त्याबद्दल खरंच थॅन्क्यु "  ती प्रांजळपणे म्हणाली.

" It's my pleasure. तुझी मदत करण्यासाठीच तर मला इथे बोलावलेलं... आणि थॅन्क्यु म्हणायचं असेल तर त्या व्यक्तीलाच म्हण, ज्याच्यामुळे नकळत हा अपघात घडून आला. चल आता निघते मी, काळजी घे. " असं बोलत त्या जायला निघाल्या. पण तिने त्यांना थांबवलं.

" काय ? माझी मदत करण्यासाठी बोलवून घेतलेलं आणि कुणी, म्हणजे तो माणूस मघाशी होता तो कोण होता??" तिला काय बोलावं सुचत नव्हतं. यावर ती महिला फक्त हसली.

" तू आता ज्याला माणूसकीचे धडे सांगत होती तो माणूसकीच्याही पलीकडचा माणूस आहे. तो श्रेय घ्यायला कधीच थांबत नाही. बहुतेक तू त्याला नीट बघितलं नाहीयेस. ओळखायचं असेल तर डेली न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल पाहत जा. येते मी. " तिच्या गालावर थोपटत ती महिला एवढं बोलून तिथून निघून गेली.

ती मात्र विचारात पडली. नक्की कोण होता तो मला व्यवस्थित दिसलंच नाही. कुणीतरी मोठा माणूस असावा. देवा रे आता मी जे बोलले त्याबद्दल त्या माणसाला माझा सॉरी आणि थॅन्क्यु चा मेसेज तूच पोचव. मनातल्या मनात देवाला विनवत ती म्हणाली.

" पूर्णा, अगं कधीची शोधतेय तुला तर तू इथे आहेस होय... मूर्ख मुली तुला सांगितलं होतं ना तिथेच थांब तर इथे कशाला आली. " एक मुलगी धापा टाकत तिच्याजवळ येताच तिला म्हणाली. ती तिची मोठी बहिण होती.

" तायडे किती वाट बघितली तुझी, मला फार भीती वाटत होती. मला काही सुचतच नव्हतं मग काय करणार मी.." ती काकुळतीने म्हणाली.

" मी आलीये ना आता, चल घरी उशीर झालाय खूप. " असं म्हणत त्या दोघी घरी गेल्या.


क्रमशः

Hey guys, I'm back with Digvijay's love story. कसा वाटला भाग नक्की सांगा.


🎭 Series Post

View all