Login

लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग चार

खोटं हे खोटं असतं ग. भले त्यांचं काम कितीही चांगलं का असेना, त्यांची वागणूक किती का चांगली असेना. जेव्हा कंपनीच्या महत्वाच्या पोझिशनचा प्रश्न असतो, तेव्हा कसलीही हयगय करून चालत नाही.

लव्ह ॲट सेकंड साईट (भूतकाळात डोकावताना) भाग चार


Love at Second Sight (Bhutkalaat Dokaavtana) Part Four

कथेचे नाव:- लव्ह ॲट सेकंड साईट
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (डिसेंबर २०२२)
विषय:- भूतकाळात डोकावताना


भाग चार

दुपारचं शांत वातावरण. रेस्टॉरंटमध्ये फक्त तिथे जेवणाऱ्या माणसांचे कुजबुजत बोलण्याचे, कटलरी प्लेट्सच्या आवाजाचे आणि वेटर्सचे सर्व्हिंगचे आवाज येत होते.

युवराज आणि अक्षयाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. इथे तिथे नजर फिरवल्यावर त्यांना एक ग्लास वॉल जवळचे टेबल रिकामी दिसले.

दोघेही जाऊन तिथे बसले. इथून बाहेरचे दृश्य खूप छान दिसत होते. मेन्यू बघून दोघांनीही ऑर्डर दिली.

ऑर्डर येईपर्यंत अक्षयाचे इथे तिथे बघणे चालू होते. त्यांच्या टेबलपासून काही टेबल सोडून अधिरा आणि धैर्य बसले होते.

अधिरा अगदी स्पष्टपणे दिसत होती अक्षयाला. त्या शांत रेस्टॉरंटमध्ये एकट्या अधिराचीच बडबड प्रकर्षाने ऐकू होत होती.

अक्षयाचे लक्ष अभावितपणे अधिराकडे वेधले गेले. एक बडबड करणारी, प्रचंड ऍक्टिव्ह अशी अधिरा तिच्या नजरेत नसती आली तरच नवल होतं. एक क्षण अक्षयाला वाटून गेलं की युवराज साठी अधिरासारखी प्रचंड ऍक्टिव्ह मुलगी परफेक्ट आहे.

युवराज ऑफिसच्या कॉलवर बोलण्यात व्यस्त होता. बोलतानाही हातवारे करत बोलण्याची त्याची सवय तिला आता चांगलीच सवयीची झाली होती. कधी कधी ती त्याचे हातवारे निरखत तो काय बोलतोय याचा तर्क करायची. त्याचं आणि समोरच्या व्यक्तीचं संभाषण काय असेल त्याचा तर्क लावण्यात तिला मजा यायची. कधीकधी ती विचार करायची की, ती आणि तो किती वेगळे आहेत एकमेकांपासून. सुरुवातीला युवराज इतका मोकळेपणाने बोलत नसे; पण जसजसे ते दोघे वरचेवर भेटू लागले, तसतसे त्याची बडबड आणि ऍक्टिव्हनेस तिच्या लक्षात आला.

जेव्हा लग्नाच्या निर्णयाप्रत ती येऊन पोहोचली, तेव्हा तिच्या मनात हाच एक विचार सतत येत होता. आपलं त्याच्याशी नीट जमेल ना? आता इतक्या महिन्यांनी पुन्हा हा विचार करताना तिला हसू येत होते. त्या दोघांचे सहजीवन उत्तमरीत्या सुरू झाले होते. अपवाद फक्त एक गोष्ट जी अक्षयाने युवराजपासून लपवली होती. आताही तिच्या मनात तोच विचार डोकावला. युवराजचं एव्हाना फोनवर बोलून झालं होतं.

"कसला एवढा विचार चालू आहे?" टेबलवर असलेला तिचा हात आपल्या हात घेत युवराजने विचारलं.

तिने मानेनेच काही नाही, असं सांगितलं.

त्यांचं जेवण आलं, तसं दोघांनीही जेवायला सुरुवात केली.

जेवताना अक्षया युवराजचं निरीक्षण करत होती. अचानक तिला काही आठवलं, तसं तिने बोलायला सुरुवात केली.

"राज, एक विचारू?"

"हा." त्याने फोर्कने कटलेटचा एक बाईट घेत म्हटले.

"तुझ्या ऑफिसमध्ये ते कारखानीस आहेत, त्यांच्यासाठी इन्क्वायरी कमिटी बसवली होती. हो ना?" तिने विचारले.

"हो, त्यांचं काय?" युवराजने जेवता जेवता विचारले.

"तू आहेस ना त्या कमिटीमध्ये?" तिने आता जेवणे थांबवले होते आणि तिचे पूर्ण लक्ष त्याच्या बोलण्याकडे होते.

"हो; पण आहे नाही, होतो." त्याने सांगितले. कटलेटचा पुढचा घास घेतला.

"होतास म्हणजे? आता नाहीयेस का?" तिने न राहवून पटकन विचारले.

"इन्क्वायरी पूर्ण झाली, म्हणून कमिटी बरखास्त केली." त्याने अत्यंत सहजपणे तिला सांगितले.

आता तिची धडधड वाढली. तिला उत्सुकता होती त्या कमिटीच्या निर्णयाबद्दल जाणून घ्यायची.

"काय निर्णय घेतला गेला?" तिने घाबरत विचारले.

"आमच्या ऑफिसमधील ही पोझिशन मिळावी म्हणून त्यांनी खोटी कागदपत्रं सादर केली होती. एक्सपिरिअन्स लेटर खोटं, सॅलरी स्लिप्स खोट्या, इन फॅक्ट, रेफरन्स लेटर्ससुद्धा खोटे होते." युवराजने स्पष्टीकरण दिलं.

"म्हणजे ते खोटं बोलले होते…." तिने टेबलवरचा ग्लास उचलून एक घोट घेतला.

"तू जेवत का नाहीयेस? काय झालं? आणि तुझा चेहरा का असा ओढल्यासारखा झालाय?" त्याने आपल्या हातातील फोर्क आणि नाईफ खाली ठेवत टेबलवरील टिश्यू बॉक्समधून एक टिश्यू काढला आणि तिचा चेहरा टिपून घेतला.

"काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुला अक्षया?" त्याने आपली खुर्ची तिच्याकडे सरकवत तिच्या शेजारी बसला.

"नाही रे. ते असंच वाईट वाटलं थोडं. त्यांचा जॉब?" तिने विषय बदलला. तो मात्र उत्तर द्यायचं सोडून तिच्याकडे एकटक बघत होता.

"तुला बरं वाटत नसेल तर आपण जेवण रूममध्ये मागवू." त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.

"मी ठीक आहे रे." तिने पाणी पिऊन स्वतःला थोडे नॉर्मल केले. त्याच्या समाधानासाठी तिने जेवायला सुरुवात केली. ती नॉर्मल जेवतेय, हे बघून त्यानेही मग आपली प्लेट स्वतःसमोर घेतली आणि जेवायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने त्यानेच बोलायला सुरुवात केली.

"त्यांना काढलं कंपनीमधून. खोटी कागदपत्रं सादर केल्याबद्दल."

"पण तू तर म्हणायचास की, त्यांचं काम खूप चांगलं आहे. इन फॅक्ट तुम्ही सर्व कमिटी मेंबर्स या गोष्टीसुद्धा गृहीत धरणार होतात निर्णय घेताना." तिने जेवता जेवता विचारले.

"खोटं हे खोटं असतं ग. भले त्यांचं काम कितीही चांगलं का असेना, त्यांची वागणूक किती का चांगली असेना. जेव्हा कंपनीच्या महत्वाच्या पोझिशनचा प्रश्न असतो, तेव्हा कसलीही हयगय करून चालत नाही." त्याने सांगितले.

"पण मग त्यांच्या चांगल्या कामाची, चांगल्या वर्तणुकीची काहीच किंमत नाही?" तिच्या मनाला कुठेतरी जाणीव झालेली की, युवराजला खोटं बोलणं किंवा काही लपवणे आवडत नाही. तिनेही एक गोष्ट लपवली होती युवराजपासून. आपण जर ती गोष्ट त्याला सांगितली तर त्यावर त्याची काय प्रतिक्रिया होईल हे ती या कारखानीसांच्या प्रसंगावरून पडताळून पाहत होती.

"चांगलं काम, चांगला स्वभाव, इत्यादी इत्यादी… सगळं आपण कितीही गृहीत धरलं, तरीही जी गोष्ट खोट्यामुळे सुरू झाली त्या गोष्टीचा शेवट चांगला होऊच शकत नाही. हा, त्यांच्या चांगल्या कामाचा मान ठेवून आम्ही त्यांना टर्मिनेट नाही केलं. त्यांना राजीनामा द्यायला लावला फक्त. त्यांना पुढे नोकरी शोधायला त्रास नाही होणार जास्त." एव्हाना त्यांचे जेवून झाले होते. दोघेही निघाले.


—-----------


इथे धैर्य आणि अधिराचेही जेवून झाले होते. दोघेही निघाले. अधिराची काहीबाही बडबड चालू होती. धैर्य ते सगळं लक्षपूर्वक ऐकत होता. समोर लॉबीमध्ये चालणारा युवराज त्याच्या नजरेस पडला. या हॉटेलमध्ये चेकना शेजारी उभी असलेल्या मुलीसोबत युवराजला त्याने तेव्हा पाहिलं होतं. युवराजचं तिला प्रेमाने जवळ घेणं, अगदी छोट्या छोट्या क्षणांमध्ये फोटो काढणं, हे सगळंच धैर्यने नोटीस केलं होतं.

\"अधिराला तिच्यासाठी असाच छानसा पार्टनर हवा होता का? अगदी प्रत्येक क्षण भरभरून जगणारा?\" त्याच्या मनात एक क्षण विचार चमकून गेला.

यावर त्याने इतक्या जोरात नकारार्थी मान हलवली की, ते अधिरानेही नोटीस केलं.

"काय झालं?" तिने विचारलं.

"काही नाही. चल, थोडं फिरून येऊ." म्हणत दोघेही हॉटेलबाहेर आले.

बाहेर छान लॉन होते. दोघेही एका बेंचवर बसले. पायात असलेले शूज दोघांनी काढून बाजूला ठेवले.

पायाला लॉनचे मऊ गवत स्पर्शून जात होते. गवताचा तो मऊ स्पर्श चित्त उल्हसित करून जात होता. लॉनवर शेड असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. नेहमी कॅमेरा घेऊन फोटो काढणारी अधिरासुद्धा शांतपणे धैर्यचा हात आपल्या हातात घेऊन बसली होती.

तिचं असं शांत बसणं त्याच्या सवयीचं नव्हतं.

"Are we good?" तिने त्यांचं नातं त्याच्या नजरेने बघायचं ठरवलं होतं.

"Yes, we are." त्यानेही म्हटले; पण तिच्या हातात आपली बोटं अधिक प्रकर्षाने गुंफून.

"अजूनही ती गोष्ट त्रास देतेय का?" तिने त्याच्या हातांचा आपल्या हातांवर असणारा दबाव जाणून घेत विचारले.

"ती नाही; पण…." त्याला पुढे शब्द सुचले नाहीत.

"माझ्याशी बोलणे खूप कठीण आहे का?" तिने विचारले.

"नाही. कठीण नाही; पण परिणामांशी अनभिज्ञ असलं की, सांगण्याचे धैर्य होत नाही." त्याने म्हंटले.

"धैर्यला धैर्य होत नाही?" तिने केलेली शाब्दिक कोटी त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवून गेली.

त्याने प्रेमाने तिला जवळ ओढले.

\"जे मनात आहे ते लवकरच मी तुला सांगेन अधिरा. कारण या लपवाछपवीने मला तुझ्यासोबत मोकळेपणाने जगता येत नाहीये.\" त्याने मनाशी निश्चय केला.

इथे अक्षयाने सुद्धा मनाशी युवराजला सगळं खरंखरं सांगायचा निश्चय केला. अक्षया आणि धैर्य दोघेही आता एकसमान भावना अनुभवत होते.

\"भूतकाळात डोकावताना पुन्हा कुठलाही \"परंतु\" बेडी बनून माझ्या पायात मला ठेवायचा नाही. तुला फसवायचा हेतू नव्हताच कधी; पण तुला गमवायची कल्पना मी सहन करू शकत नाही.\"

काहीसे असेच भाव दोघांच्याही मनात होते. पुढचा काळ निर्णायक ठरणार होता.


क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all