Login

लव कल्लोळ - १०

Confused Boy For Choosing Girlfriend



लव कल्लोळ - १०

सकाळी तनया आणि तिची तेजु नावाची मैत्रीण असे दोघी मिळून तनयाची शॉपिंग करतात. शॉपिंग झाल्यावर तनया शर्विलला फोन करते आणि लंचसाठी बोलवून घेते. अर्ध्या तासात शर्विल रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. तनया तेजु आणि शर्विलची एकमेकांसोबत ओळख करून देते.

"हाय... तुम्हीच का मिस्टर शर्विल; कधी एकदाचं तुम्हाला पाहते असे झालं होतं माझं" तेजु

तिने असे बोलताच तनया तिला डोळे मोठे करून नजरेनेच काय बोलतेस असे खुणावते.

"मी समजलो नाही, काय म्हणत आहात ?" शर्विल प्रश्नार्थक नजरेने विचारतो

"सकाळपासून तुमचं नाव फार ऐकलंय तनयाकडून म्हणून थोडी उत्सुकता होती; न्यू पार्टनर म्हणून... आय मिन बिझिनेस पार्टनर" तेजु मुद्दाम चेष्टा करण्याच्या सुरात बोलते

"असंय होय... तरीच मला सकाळपासून उचक्या लागत होत्या, तरी आई म्हणालीच की, कोण आठवण काढत आहे." शर्विल तिच्या चेष्टेला चेष्टेनेच उत्तर देतो

या दोघांचे असे संभाषण ऐकून तनयाचा चेहरा लाजिरवाणा होतो. ती पुन्हा तेजुला नजरेने शांत बसण्याचे खुणावते आणि त्यांच्यामध्ये इंटरपट् करते.

"शर्विल तू हिचं काही ऐकू नकोस, उगाच काहीही बडबडत असते; मस्करी करण्याचा स्वभाव आहे तिचा" तनया प्रसंग सावरते

"असू दे ना मग, अनोळखी व्यक्तीला पहिल्याच वाक्यात इम्प्रेस करता येतं यांना. मला तर आवडला हा स्वभाव." शर्विल तेजुची स्तुती करतो

हे पाहून तनया जरा इनसिक्युअर होते. त्यामुळे विषय बदलते "शॉपिंग करून भूक लागली, चला जेवण करूयात."

"मी नाही जेवणार, मी निघतेय आता, मला काही काम करायची आहेत, तुम्ही दोघे जेवण करा... मी पळते आता" तेजु उभ्यानेच बोलते आणि जायला निघते

दोघेही तिला जेवण करून जाण्याचा आग्रह करतात तोपर्यंत ती बाय बाय करत रेस्टॉरंटमधून बाहेर पडते. मग दोघेजण आत जाऊन बसतात.

"काय तुझी फ्रेंड? न जेवताच गेली, थांबली असती तर काय काय बोलली असती देव जाणे... भारी आहे हा" शर्विल हसत हसत तनयाला बोलतो

"हो भारीच आहे ती, म्हणून तर आज तिलाच घेऊन आले होते, ती एका जागी नसते थांबत... पळत असते इकडून तिकडे. सकाळपासून बडबड करून माझं तर खूप डोकं खाल्लंय तिने. जरा शांत बसून जेवण तरी करू दे आता." तनया

"बरं... ती काय म्हणत होती, की तू सारखं माझं नाव घेत होतीस? माझ्यामुळे तुला महिनाभर जावं लागतंय म्हणून माझ्या नावाने ओरडत होतीस वाटतं" शर्विल

"आता तू पण तिच्यासारखं बोल... म्हणजे मी डोकं धरूनच फिरते बघ सगळ्या एशियात" तनया

असे बोलून दोघेही हसतात आणि जेवणाची ऑर्डर करतात. जेवण करता करता तनया बोलते, "माझी सर्व तयारी झाली आहे, मुंबईमधून फ्लाईट तर मी सकाळीच निघेल. माझ्यासोबत आई येणार आहे. मी ऑफिसमधून सर्व डॉक्युमेंट्स कालच घरी नेले आहेत त्यामुळे उद्या ऑफिसला येणार नाही."

"म्हणजे आजनंतर आपली भेट एका महिन्यांनीच होणार का ?"

"हो ना... उद्या तर मला पॅकिंग वगैरे करावे लागेल"

"ठीक आहे, तू सर्व व्यवस्थित मॅनेज करशील मला खात्री आहे, काही मदत लागली तर नक्की सांग."

दोघेजण बऱ्याच गप्पा मारत जेवण करतात, नंतर शर्विल तनयाला घरी ड्रॉप करायला निघतो. दोघेही शर्विलच्या कारमध्ये बसतात आणि थोड्या वेळात तनयाच्या घरी पोहोचतात.

तनया "घरात येतोस का? चल ना डॅडी पण असतील... त्यांना सुध्दा भेटशील"

"नको... आता तू जा आणि तुझी पॅकिंग वगैरे कर... मी बाहेरूनच निघतो"
असे बोलून तनयासोबत शर्विलसुद्धा गाडीतून खाली उतरतो आणि शॉपिंग बॅग्ज तिच्या हातात देतो. मग पुन्हा गाडीतून एक छोटी पेपरबॅग काढतो आणि तनयाच्या हातात देतो.

"अरे ही बॅग माझी नाही, माझ्या या तीन बॅग्ज आहेत, त्या मी घेतल्या" तनया

"हो माहिती आहे मला... तुला आणलंय मी हे गिफ्ट" शर्विल बॅग पुन्हा तिच्याकडे देतो

"गिफ्ट ! आणि का बरं ? माझा बर्थडे वगैरे नाहीये" तनया प्रश्नार्थक पाहते

"किती ते प्रश्न ! तू जाणार आहेस ना... गुडलक म्हणून आणलंय मी हे. उघडून बघ आवडतंय का?"

तनया बॅगमधून गिफ्ट बाहेर काढते, रॅपर खोलून त्यातून एक छोटी डबी बाहेर काढते तर त्यात एक नाजूक सिल्वर पेंडेंट असते.

"वॉव... कसलं ऑस्सम आहे हे! शर्विल नाईस चॉईस हा अँड थँक्स फॉर धिस क्युट गुडलक" तनया पेंडेंट गळ्याला लावून कारच्या काचेमध्ये पाहते

"आय होप धिस पेंडेंट विल ब्रिंग यु रिअली गुडलक" छान दिसतंय असे हातवारे करून शर्विल तिला बोलतो

"ओके देन... भेटुयात पुन्हा... एका महिन्यानी" तनया शर्विलच्या डोळ्यांकडे पाहत बोलते

तनयाच्या नजरेने आधीच कावराबावरा होणारा शर्विल तिने असे पाहताच ब्लॅंक होतो आणि तसाच स्तब्धपणे तिच्याकडे पाहत राहतो.

तनया चुटकी वाजवून त्याला पुन्हा आवाज देते "शर्विल... कुठे हरवलास?"

शर्विल भानावर येत बोलतो "आ.... काही नाही... हो भेटुयात, तू सेफली जाऊन ये आणि स्वतःची काळजी घे. मी सुयशला इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत. बाकी आपले कॉल्स होतीलच."

तनया "हो... डोन्ट वरी... मला सवय आहे ट्रॅव्हलची. मी घेईन काळजी, थँक्स शर्विल... चल मी निघते आणि तू सुद्धा स्वतःची काळजी घे"

"बाय... हॅपी जर्नी" शर्विल तिला हाताने टाटा करतो

"बाय बाय शर्विल" असे म्हणत तनया घरात जाते आणि शर्विल निघतो.

रात्री तनया पॅकिंग वगैरे करून थकलेली असल्याने झोपी जाते त्यामुळे शर्विल सोबत पुन्हा काही बोलणे होत नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी शर्विल नेहमीप्रमाणे ऑफिसला जातो आणि त्याचे काम करत बसलेला असतो. तेवढ्यात त्याच्या दारावर नॉक नॉक असा आवाज होतो.

"कम इन..." शर्विल

समोर तनया उभी पाहून शर्विल आश्चर्यकारक तिच्याकडे पाहतो.

"तनया... अगं आज कशी काय आलीस ? सर्व डॉक्युमेंट्स घेऊन गेली आहेस ना ? की काही राहिलंय ? काही इश्यू आहे का ?" शर्विल एकामागे एक प्रश्न विचारत सुटतो

"अरे अरे अरे जरा ब्रेक मार... किती प्रश्न विचारतोस ? मी याच रोडने पार्लरला जात आहे म्हणून जाता जाता एक राउंड मारायला आले." तनया गळ्यात घातलेल्या पेंडेंटसोबत खेळत खेळत शर्विलला बोलते

शर्विलच्या ध्यानात येते की आपण दिलेले पेंडेंट तनयाने घातलेले आहे. दोन सेकंद त्याची नजर त्यावर खिळते पण तो त्याबद्दल मुद्दाम काही बोलत नाही... म्हणजे त्यावर काय बोलू हे त्याला ऐनवेळी सुचतच नाही.

"अगं ये ना मग बस... बस... कॉफी घेऊया" शर्विल फॉर्मली होत बोलतो

शर्विलने पेंडेंट नोटीस केल्याचे तनयाच्या लक्षात येते, ती उभ्या उभ्याच बोलू लागते,
"ए नाही हा... मी अशीच आले होते. तुला एकदा बाय करू म्हणून आत आले. आता निघते मी चल... मला उशीर होईल" दरवाजा उघडत बोलते

"ओके... मी बाहेर सोडवायला येतो" असे म्हणत शर्विल तिला बाहेर गाडीपर्यंत सोडवायला जातो आणि सी ऑफ करतो.


****************************

तनया आज खास शर्विलला भेटायला ऑफिसमध्ये आली आणि तिने शर्विलने दिलेले पेंडेंट देखील घातले होते. यातून नक्की काय घडणार आहे ? पाहुयात पुढील भागात...

समीक्षा द्या आणि वाचत रहा...

© या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत
✍️ प्रशांत भावसार (एकांतप्रिय), पुणे

🎭 Series Post

View all