राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा
"प्रेम म्हणजे विश्व तुमचं
नजरेत तिच्या दाटणं!
प्रेम म्हणजे या मनाचं
त्या मनाशी भेटणं!"
नजरेत तिच्या दाटणं!
प्रेम म्हणजे या मनाचं
त्या मनाशी भेटणं!"
कित्येक कवी-कवयित्री आणि लेखकांनी विवाहाची व्याख्या केली आहे. पण काही गोष्टी शब्दात परिभाषित होत नसतात तर त्या उलगडत असतात फक्त स्वानुभूतीतूनच! मैत्री, प्रीती, विवाह हे प्रत्येकाच्या आयुष्यातंले असे अविभाज्य घटक असतात की कुठलाही शब्दकोश या घटकांची त्या त्या व्यक्तीला हवी तशी परिपूर्ण व्याख्या करूच शकत नाही.
कुणीतरी खरंच म्हटलंय "विवाह म्हणजे वादळाशी केलेली तडजोड!" मित्रांनो, ही तडजोड जर आवडत्या आणि ओळखीच्या व्यक्तीसोबत करता आली तर कोणत्याही वादळाचा माणूस आनंदाने सामना करू शकतो, नाही का? नाहीतर अनोळखी व्यक्तीच आपल्या आयुष्यातील वादळ ठरायला वेळ लागत नाही. आणि मग या वादळाशी झुंज देताना कधीकधी दोन व्यक्तींची तर कधी दोन कुटुंबाची फरफट होते ती निराळीच.
"प्रेम विवाहात होता येतं
परस्परांचा आजन्म दर्पण!
तडजोडीतला विवाह म्हणजे
मनावर आजीवन दडपण!"
परस्परांचा आजन्म दर्पण!
तडजोडीतला विवाह म्हणजे
मनावर आजीवन दडपण!"
आपण पुराणकथांना किती मानतो... किती जाणतो हे देखील व्यक्तीसापेक्ष असतं. गंधर्व विवाह असोत नाहीतर स्वयंवर... आवडीच्या व्यक्तीसोबत असलेला तो विवाहच असतो, नाही का? अमुक जोडप्याने चारच फेरे घेतले म्हणून त्यांचा विवाह समाजमान्य नव्हता हे ठरविणारे आपण कोण? पूर्वी सती प्रथा, हुंडा पद्धती, केशवपन या रुढी समाज मान्य होत्या. पुढे हुंडा पद्धतीला भेट वस्तू आणि कन्यादान असा समाजमान्य साजेसा वर्ख दिला गेला. परंतु कालांतराने हीच समाजमान्य बाब कायद्याने गुन्हा ठरविली ती हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ नुसार! याचाच अर्थ प्रत्येक समाजमान्य बाब समाजपूरक आणि मानव हिताची असतेच असं नाही. हो मात्र या प्रत्येक बाबीचा कालपरत्वे अभ्यास होणं गरजेचं असतं आणि मानव हिताच्या दृष्टीने त्यात बदल देखील क्रमप्राप्तच ठरतो. उदाहरण द्यायचंच झालं तर 'तीन तलाख' हे अगदी ताजं उदाहरण आहे!
पुराणातील बाबींमधून आपण आता जरा पुढे येऊत! डॉ. ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाह कायदा,१८५६ च्या निर्मितीत एक गाढे अभ्यासक म्हणून फक्त पुस्तकी योगदान दिलं नाही तर नारायण चंद्र या आपल्या एकुलता एका मुलाचा विवाह एका विधवेशी लावून दिला. त्यानंतर कित्येक सुशिक्षीत युवकांनी विधवांशी प्रेमविवाह केला. विधवा, अपंग, विकलांग, परित्यक्ता हे समाजातील दुर्लक्षित घटक! आणि यांना जर प्रेम विवाहाच्या माध्यमातून साथ देणारा जोडीदार लाभत असेल तर त्यात काय चूक! बदल हा प्रकृतीचा नियम आहे. संस्कृती जपताना प्रकृती, मानवी मूल्य, मानवी अधिकार जपले गेले तरच ती सांस्कृतिक मूल्य समाज प्रवाहात टिकतात, नाही का!
पूर्वी वर्णव्यवस्था होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चार वर्णांना पहीले फक्त व्यवसाय आणि सामाजिक जबाबदारी नुसार विभागले गेले होते मात्र कालांतराने ही वर्णव्यवस्था समाजात दुही निर्माण करू लागली. एका वर्णातील व्यक्तीने दुसऱ्या वर्णातील व्यक्तीशी केलेला विवाह समाजमान्य नव्हता. हीच वर्णव्यवस्था किती घातक होती हे पुढे सिद्ध झालं आणि सर्वांना समान हक्क तसेच कायद्यातील समानता देणाऱ्या भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. जर आपण पूर्वीच्या वर्णव्यवस्थेतील अमुक बाबींना समाजमान्य म्हणून आज स्वीकारलं तर आपण राज्यघटनेतील समानता मान्य करत नाही असे होईल! समानता ही फक्त शिक्षण किंवा नौकरी पुरती मर्यादित नसावी तर निर्णय घेण्याचा आणि आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत लग्न करून संसार थाटण्याचा अधिकार देखील या समाजाने समानतेत समाविष्ट करावा. नाहीतर हजारो वर्षांपूर्वीचा समाज विघातक वर्णभेद... जातीभेद फोफावायला वेळ लागणार नाही!
आकर्षण आणि प्रेम यात बरीच तफावत असते. कॉलेजात नुकतंच पदार्पण केलेली पौगंडावस्थेतील मुलं परस्परांना इतर मुलींवरून जे चिडवतात त्याचा या चर्चेशी दूरदूर पर्यंत संबंध नाही असं मानसशास्त्र सांगतं. त्या मुलांचं मनोविज्ञान समजून घेता आलं तर लक्षात येईल की त्या वयातल्या बहुतेक मुलांना असलेलं आकर्षण स्वाभाविक असतं. अशावेळी त्यांचं योग्य पद्धतीने समुपदेशन होणं गरजेचं असतं. तुम्हाला देखील तुमच्या पौगंडावस्थेतील असा एखादा किस्सा आठवत असेल, नाही का! तुम्हीच सांगा पुढे तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाचा त्या पोरकट वागण्याशी काही संबंध होता का?
आजच्या पुढारलेल्या काळात देखील माहेराहून अमुक एक रक्कम घेऊन ये... तमुक चारचाकी हवीच म्हणून कित्येक अरेंज मॅरेज मधील मुलींची... तिच्या माहेरच्या मंडळींची आणि कित्येकदा घरच्यांसोबत वहावत जाऊन आपल्या पत्नीची साथ न दिल्याने त्या वर मुलाची देखील फरफट होतेच. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. पण अरेंज मॅरेज नावाच्या तडजोडीतून होणारी ही नात्यांची फरफट पाहिली की असं वाटतं त्या विधात्यालाच जाब विचारावा...
"विधात्या हे तुझे फसलेत सारीपाट संसारी...
किती सुटताय या गाठी! किती फसवी तुझी नाणी!"
किती सुटताय या गाठी! किती फसवी तुझी नाणी!"
मुलीचं लग्न हा आई बाबांच्या आयुष्यातला असा क्षण जो एका नयनी आसवांचं पाणी पुसत दुसऱ्या नयनी आनंदाची गाणी गायला लावतो! आयुष्यभर तळहातावरच्या फोडागत जिला जपतो ती लेक जेव्हा सासरी जायला सुकुमाराची नवरी होते तेव्हा नेमकं काय करावं...आसू की हासू! किती साधी स्वप्नं असतात मुलीच्या आई-वडीलांची! तिला आई-वडीलांएवढी माया लावणारी नसली सासरची मंडळी... तरीही तिला सांभाळून घेणारं... आपल्या रीती-भाती पद्धतींशी मिळतं जुळतं सासरं तिला मिळावं! जन्मभर अगदी कोणत्याही परिस्थितीत साथ देणारा आयुष्याचा जोडीदार तिला नवऱ्याच्या रुपात मिळावा! पण कित्येक आईवडील लग्नानंतर काही दिवसातच मुलीच्या सासर कडून मुलीला होणार्या जाचामुळे हतबल होतात. कित्येकदा तर नातलगांच्या ओळखीने जमविलेल्या विवाहाला एखाद्या कारावासाप्रमाणे जपणे हाच एक पर्याय वर-वधूकडे उरतो. कारण काय तर त्या नातलगांशी असलेले नाते संबंध! अशा परीस्थितीत तर कायदा देखील मदत करू शकत नाही. अशा वेळी शिल्लक रहाते ती फक्त तडजोड!
"ओढून ताणून नाते असे विवाहाचे रेटावे लागते...
न पटणाऱ्या दोन वेदनांना रोज नव्याने भेटावे लागते!"
न पटणाऱ्या दोन वेदनांना रोज नव्याने भेटावे लागते!"
आते-भाऊ, मामे-बहिण असे नात्यातल्या नात्यात विवाह जमविले जातात ते या दृष्टीकोनातून की फार जवळचे नाते असल्याने दोन्ही कुटुंब आणि वधू-वर परस्परांना चांगले सांभाळून घेतील! परंतु विविध वैज्ञानिक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की जवळच्या नात्यातील वधूवरांमध्ये जवळपास २५% ते ५०% जनुकीय साहित्य सारखेच असते. अशा स्थितीत दोन सदोष जनुके एकत्र आल्याने होणाऱ्या अपत्याला जनुकीय आजार होण्याची शक्यता फार जास्त असते. उलटपक्षी जनुकीय संबंध नसलेल्या जोडप्यांच्या पुढल्या पिढीत असे जनुकीय आजार असण्याची शक्यता नगण्यच असते.
तुमच्यामुळे मी या मुलाशी लग्न केलं... तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न केल्याने असं झालं... ही कुरबूर कितीतरी घरांमधून ऐकायला मिळते. अशावेळी पश्चात्ताप करतात ते आई-वडील. जोडीदार दुसऱ्यांच्या पसंतीने निवडला गेल्यानंतर ते नातं जपण्याची नैतिक जबाबदारी वर-वधूची अशी कितीक शिल्लक रहाते? उलटपक्षी स्वतः घेतलेल्या निर्णयात ही जबाबदारी शंभर टक्के स्वतःचीच असते. शेवटी प्रत्येकच नात्यात कुरबूर ही असतेच. दोन व्यक्ती एकत्र आल्या की भांड्याला भांड हे लागतंच. मग ते नातं भावंडांचं असोत... नवरा-बायकोचं असोत नाहीतर आई-मुलाचं असोत! परंतु प्रेमविवाहात असं काही अघटीत घडलच तर निदान हा प्रेमविवाहाचा निर्णय घेणारे ते दोघे इतरांवर त्याचं खापर फोडू शकत नाहीत. शेवटी निर्णय घेणे... जबाबदारी घेणे आणि घेतलेला निर्णय... घेतलेली जबाबदारी पार पाडणे हीच तर सुजाण व्यक्तीची ओळख असते, नाही का?
कांदा पोह्याच्या कार्यक्रमातली एक नजरानजर आणि ओढून ताणून घरच्यांनी घडवून आणलेली एखादी भेट... ज्यात बहुतेकदा बऱ्याच बाबींची लपवाछपवी असते त्यासाठी अख्ख आयुष्य पणाला लावणं यात कसंल थ्रील! आणि अशा एखाद्या थ्रीलसाठी आपलं प्रेम क्षणभर आपण विसरू देखील पण मग याच तडजोडीच्या विवाहामुळे पुढे जाऊन कित्येक गुंतागुंतीच्या कधीही न सुटणार्या समस्या निर्माण होतात त्याच काय? पूर्वीचं प्रेम एखाद्याच्या मनात इतकं पक्क घर करून असतं की ती व्यक्ती कुटूंबियांच्या दबावात येऊन आणि आई-वडीलांसाठी प्रेमाचं बलिदान देऊन अरेंज मॅरेज तर करते पण या मॅरेज मधून ती एकाच वेळी तीन व्यक्तींच आयुष्य नकळत खराब करतं असते. न्यायालयात हल्ली या प्रकरणांचा पेव फार वाढला आहे. लग्नानंतर देखील पूर्वीच्या प्रेमप्रकरणात गुंतले राहिल्यामुळे अशा व्यक्ती कुठल्याच नात्याला न्याय देऊ शकत नाही. मग एकाच वेळी कैक नात्यांवर अन्याय करणारं हे प्रेमाचं बलिदान कोणत्या कामाचं!
शिक्षण आणि करियरसाठी मुलं हल्ली आपलं गाव/शहर सोडून दुसरीकडे रहातात. तिथेच कुणीतरी पसंत येतं. मात्र घरातल्या रूढी-परंपरांचा पगडा असलेल्या आई-वडीलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून त्यांना विश्वासात घेण्याच धाडस त्यांच्यात नसतं. अशावेळी कैक मुलं इकडे आई-वडीलांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न तर करतात पण तिकडे त्यांचं प्रेमप्रकरण सुरू असतं ते वेगळंच!
"मधूमिलन नावाचं वर्ख अशा
तडजोडीत नकली ठरतं...
अन् मग काळरात्रीचं एकटेपण
आजन्म तिच्या पदरी उरतं!"
तडजोडीत नकली ठरतं...
अन् मग काळरात्रीचं एकटेपण
आजन्म तिच्या पदरी उरतं!"
पूर्वीचं प्रेम... तडजोडीतला विवाह आणि प्रेमाचं बलिदान अशा त्रिकोणात अडकून सर्वांची फसगत करण्याऐवजी थोडंसं धाडस दाखवत आपल्या आई-वडीलांना विश्वासात घेऊन आणि मुलीच्या आई-वडीलांची रीतसर परवानगी घेऊन केलेला प्रेमविवाह कधीही न्याय्य ठरतो, नाही का! वाचायला हे उदाहरण कितीही फिल्मी वाटत असलं तरीही न्यायालयातील कार्यभार सांभाळत असतांना असे किस्से आमच्यासाठी तरी काही फार मोठ्या आश्चर्याचे कारण नाहीत.
समाजात आजही मुलीच्या बापाची मुलीचे लग्न म्हटलं की दमछाक होते. अशावेळी कुटुंबातील एखाद्या मुलीने प्रेमविवाह केला की तिच्या बहिणींच्या विवाहात अडचणी येतात. परिणामी मुलीचा जन्म म्हणजे आजही एक प्रकारचा शाप मानला जातो. त्यामुळे समाजाने दृष्टिकोन बदलला नाही तर स्त्रीभ्रूनहत्येचं प्रमाण वाढत राहील यात शंकाच नाही. कुणीतरी म्हटलं त्याप्रमाणे आता खरोखरच दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.
"सोच को बदलो सितारे बदल जायेंगे;
नज़र को बदलो नज़ारे बदल जायेंगे;
कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं;
दिशाओं को बदलो किनारे बदल जायेंगे।"
नज़र को बदलो नज़ारे बदल जायेंगे;
कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं;
दिशाओं को बदलो किनारे बदल जायेंगे।"
आई-वडीलांच्या पसंतीने केलेल्या विवाहानंतर किती मुलं आपल्या जन्मदात्यांचा सांभाळ करतात? अरेंज मॅरेज मधल्या किती मुली लग्नानंतर सासू-सासऱ्यांची जबाबदारी स्वखुशीने घेतात? अहो, जिथे आपलं मुलं लग्नानंतर आपलं रहात नाही तिथे इतरांकडून काय अपेक्षा! त्यामुळे आई-वडीलांनी मनाचा मोठेपणा दाखवत मुलांच्या निर्णयात त्यांना साथ दिली तर कित्येक मुलं आयुष्यभर आपल्या मायबापाचं मोठेपण जाणतील आणि गरजेला धावून देखील जातील.
झगमगाटनं डोळे दिपून टाकणारा... आई-वडीलांची जमापुंजी पणाला लावून वेळप्रसंगी वधूपित्याला कर्जबाजारी करणारा... संस्कृती परंपरेने धूमधडाक्यात पार पडलेला विवाह सोहळा महत्वाचा की लग्न समाधानाच्या... आनंदाच्या... विश्वासाच्या मजबूत पायावर टिकणं महत्वाचं? अर्थात, हे ज्याचं त्यानीच ठरवावं! लग्नाची ही गाठ अगदी साध्या सोप्या रजिस्टर्ड मॅरेज पद्धतीनं आणि सोबतच प्रेमाच्या ओलाव्यानं बांधली गेलेली असेल तर ती टिकविण्यासाठी ओढाताण आणि वेळप्रसंगी कृत्रिम प्रयत्न करायची गरजच पडत नाही.
शेवटी प्रेम हे प्रेम असतं! आज तुमच्यातल्या कित्येकांना आपलं प्रेम आठवलं असेल. कैकांना तर हे देखील वाटलं असेल की "त्यावेळी थोडी हिंमत केली असती तर आज आयुष्य काही औरच असतं!" हा माझा विश्वास नाही तर दावा आहे की खरं प्रेम आठवलं की पापण्या आपसुक पाणावतात. मात्र हेच प्रेम आपल्याला आपल्या प्रियकर-प्रेयसी एवढंच आई-वडीलांवर देखील करता यावं आणि हे प्रेमाचं नातं आजन्म टिकवता देखील यावं!
"कुठल्याही वादळात होईलच प्रेमाचा निभाव...
एवढा अस्सल असावा तुमच्या प्रेमाचा प्रभाव...!
प्रेमाखातर असू द्या हो पापण्यांवरती पाणी...
प्रेमाखातर ओठी तुमच्या राहो तरळत गाणी...!"
एवढा अस्सल असावा तुमच्या प्रेमाचा प्रभाव...!
प्रेमाखातर असू द्या हो पापण्यांवरती पाणी...
प्रेमाखातर ओठी तुमच्या राहो तरळत गाणी...!"