प्रेम अनामिक वळणावरचे भाग१

प्रेम एका अंध आणि डोळस व्यक्तिमधले
भाग. १

आज सुनंदासाठी खूप आनंदाचा दिवस होता. गेली एकवीस वर्ष ती या गोष्टीची वाट बघत होती. तिच्या मुलाचा मंदारचा आज वकिलीच्या परीक्षेचा एल.एल.बी.चा आज रिझल्ट लागणार होता. त्याचा आधीपासूनचा अभ्यासाचा आणि हुशारीचा अवाका बघता तो चांगल्या पद्धतीने पास होणार याबद्दल तिला आणि सुधीरला दोघांनाही काळजीच नव्हती.


मंदार त्या दोघांचा एकुलता एक मुलगा. जन्मतःच देवाने त्याच्या नशिबी दृष्टीहीनतेचा शाप दिलेला पण तरीही जिद्दीने, सामान्य मुलांप्रमाणे करियर घडवण्याचे स्वप्न पाहणारा होता.

"मिळतील ना हो मंदारला पंच्याहत्तर पुढे मार्क?" सुनंदाने विचारले.


"तू अजिबात काळजी करु नकोस. मला तर वाटते पंच्यांशी टक्क्यांच्या पुढे तो जाईल." सुधीर म्हणाला.


सुधीर आणि सुनंदा दोघांचे तसे म्हटले तर रितसर कांदे पोहे, चौकशा करून झालेला विवाह. सुधीर एका बँकेमध्ये क्लर्क आणि सुनंदा शाळेत शिक्षिका ते सुद्धा मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षिका होती.


वयाच्या तेवीसाव्या वर्षी सुनंदाने आणि पंचवीसाव्या वर्षी सुधीरने एकमेकांशी लग्न केले होते. संयुक्त परिवारात राहता राहता त्यांचे प्रेम बहरले, एकमेकांना सांभाळत संसार सुरू झाला.


संधी मिळेल तसे एकमेकांवरील प्रेम ते दोघे व्यक्त करत असत. कामावरुन येतांना अधेमधे सुधीर सुनंदासाठी गजरा आणत असे.न बोलता प्रेम व्यक्त करण्याची ती खूण होती.सुनंदाचे सुधीरविषयीचे प्रेम हळुहळु सहवासाने फुलत होते.


नव्याची नवलाई संपली. सहवासाची सवय झाली. नवराबायकोचे नातेही फुलायला लागले. छोट्या छोट्या गोष्टीतून काळजी आणि प्रेम व्यक्त होत होते. आवडीनिवडी जपल्या जात होत्या. भेटवस्तूंची देवाणघेवाणही होत होती.


"पेढे बर्फी कधी?" याची लग्नाला दोन वर्ष झाले तशी आडून आडून सासर माहेरच्यांनी सुनंदाकडे विचारणा करायला सुरुवात केली.


"आत्ताच तर दोन वर्षे झाली आहेत लग्नाला. होईल ना वेळेवर" सुनंदा लाजून उत्तर देत असे.

अजून एक वर्ष गेलेआणि सुनंदाला काळजी वाटायला लागली. तेव्हा दोघे एका प्रख्यात डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी दोघांमध्येही काहीही दोष नाही याची ग्वाही दिली.


"निसर्गाला त्याचे काम करू द्या." असेही सांगितले.

सुधीर एकदा चार दिवस बॅकेच्या कामासाठी गेला होता. तेंव्हा त्याच्या विरहाने व्याकुळ सुनंदाने कविताही रचली.

‘सख्या रे येशिल कधी परतुन
वाट पाहुनी नयनही थकले,
ह्रदयी अनामिक हुरहुर दाटे
कळेना आपले प्रेम हे कसले.’


सुधीर येणार होता त्यादिवशी त्याला आवडणारा बेत सुनंदाने केला होता. पुलाव, पावभाजी आणि गुलाबजाम. सुधीरनेही येतांना तिला आवडणार्‍या रंगाची साडी आणली होती. चार दिवसाच्या विरहानंतर आलेली ती रात्र चांगलीच रंगली. त्या रंगलेल्या रात्रीतून सगळ्यांच्या शुभेच्छा कामाला आल्या आणि सुनंदाला दिवस राहिले.


"सुनंदा काय खावसं वाटतंय सांगत जा हो." सासूबाई मायेने म्हणाल्या.


सुनंदाच्या सासूबाईंना आणि आईला तर कुठे ठेवू सुनंदाला? असे झाले. तिच्या सगळ्या हौशी मौजी, खाण्याच्या आवडीनिवडी, डोहाळे दोघींनीही छान पैकी पुरवले. डोहाळे जेवण दणक्यात पार पडले. त्यानंतर रितीप्रमाणे सुनंदा माहेरी बाळंतपणासाठी गेली.


नववा महिना लागल्यावर सुरुवातीलाच पोटात दुखू लागल्यामुळे तिला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले
आणि ती नवव्या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रसूत झाली. एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला बाळाचं नाव मंदार ठेवण्यात आलं.


मंदार सहा महिन्याचा होताच पुन्हा सुनंदाने शाळेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. मंदार सहा महिन्याचा झाल्यावर त्याच्यातलं वैगुण्य घरातल्या सगळ्यांच्या लक्षात आले ते म्हणजे मंदारला दिसत नव्हते. तो जन्मतःच अंध होता.


मोठमोठ्या निष्णात डॉक्टरांना दाखवून झाले परंतु मंदारचे आंधळेपण हे उपचारा पलिकडचे आहे हे लक्षात आले आणि मग नंतर सुनंदा, सुधीर, मंदार आणि त्यांच्या घरचे सगळ्यांची खरी परीक्षा सुरू झाली.

आहे ती परिस्थिती स्वीकारून आता मंदारला वाढवावे लागणार हे घरच्यांच्या लक्षात आले. सुनंदा मतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षिका असल्यामुळे तिला अशा प्रकारच्या व्यंग असणाऱ्या मुलांना सांभाळण्याचा अनुभव होता.


मंदार हळूहळू तीन वर्षाचा झाला आणि त्याची बुद्धिमत्ता मात्र खूप चांगली आहे हे घरच्यांच्या लक्षात आलं होतं. मंदारला ब्लाइंड स्कूलमध्ये ऍडमिशन देण्यात आली आणि मंदारची अभ्यासाची वाटचाल चालू झाली. त्या शाळेतही कायम पहिला नंबर काढणारा मंदार हळूहळू यशाची पायरी चढत होता.

इकडे पुन्हा सुनंदा आणि सुधीरला दुसर्‍या मुलाविषयी सार्‍यांनी विचारणा सुरु केली. पण मंदार हा सुधीर सुनंदाच्या फुललेल्या प्रेमाचे प्रतिक होते. त्याच्याकडेच पूर्ण लक्ष देण्याचे त्यांनी ठरवले होते. दुसरे मूल होऊ द्यायचे नाही हा दोघांचा निर्णय जरी असला तरी यामुळे त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कमी झाले नव्हते.

संधी मिळेल तसे मंदाराला वाढवतांना ते एकमेकांनाही जपत होतेच. सासूसासरेही समंजस होते. मंदारची जवाबदारी घेऊन सुधीर-सुनंदाला स्वतःचा वेळ घेऊ देत होते.

क्रमशः
©®भाग्यश्री मुधोळकर
________

🎭 Series Post

View all