प्रेम अनामिक वळणावरचे भाग २

अंध आणि डोळस व्यक्तिमधले प्रेमँ

भाग २


मंदारने शाळेमध्ये शिकत असतांना वकृत्वकला, चेस खेळणे, अशा अनेक गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवले.
दहावी बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर, पुढे लॉ करून वकिलीची परीक्षा देऊन, पुढे न्यायाधीश होण्याचे त्याचं स्वप्न होते आणि तो त्या दिशेने वाटचाल करत होता.


आज त्याच्या वकिलीच्या परीक्षेचा निकाल होता. निकालाच्या दिवशी सुनंदाने आँनलाईन निकाल बघितला. आपल्या मुलाला डोळस मुलांच्या सोबत परीक्षा देऊनही कॉलेजमधून डिस्टिंक्शन मिळाल्याचे पाहुन तिचा उर अभिमानाने भरून आला होता.


सुनंदाने जेवणासाठी छान गोडाचा श्रीखंडपुरीचा बेत केला. आजूबाजूला वाटायला घरात पेढे आणले. मंदार आता वकील झालेला होता. न्यायरक्षणासाठी काम करणार होता.


पुढे काही दिवस एखाद्या वकिलाच्या हाताखाली प्रॅक्टिस करत करत, एलएलएमची परीक्षा द्यायची आणि पुढे न्यायाधीश परीक्षेसाठी पात्रता प्राप्त आल्यावर त्या दिशेने पुढे जायचे हे मंदारने मनात पक्के ठरवलले होते आणि सुनंदा सुधीरचा याला पाठिंबा होता.


मंदार पंचवीस वर्षाचा झाला. त्याची वकिलीची प्रॅक्टिस देशपांडे वकिलांच्या हाताखाली जोरात चालू होती. त्याने पुढचे शिक्षण घेऊन तो एलएलएमही झाला. त्याच्या हाताला यश तर होतेच त्यासोबत प्रचंड मेहनतीची त्याची तयारीही होती.


आता आपल्या मुलाला आहे तसा स्विकारणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, एखादी छानशी जोडीदार त्याला मिळावी अशी सुनंदाची इच्छा होती.


एका महत्त्वाच्या केसच डिस्कशन देशपांडे वकिलांसोबत मंदार करत होता. उद्या ती केस कोर्टामध्ये मांडायची होती. त्याचं हिअरिंग होते. मंदारच्या करिअरच्या दृष्टीने ही केस महत्त्वाची होती.


डिस्कशन करून मंदार देशपांडे वकिलांच्या केबिनच्या बाहेर पडला. तिकडून येणारी एक मुलगी मोबाईल मध्ये बघत बघत येत होती ती मंदारला धडकली. बेसावध मंदार धडपडला पण केबिनच्या दाराचा आधार घेऊन सावरलाही लगेच.


“ओ मिस्टर दिसत नाही का?" ती मुलगी विचारायला लागली आणि तिने मोबाईलमधुन डोके काढुन वर पाहिले.

"खरंच दिसत नाही हो; पण तुम्हाला तर दिसतं ना? तर बघायचं ना मी केबिन मधनं बाहेर येतोय ते." मंदारने मिस्किल हसत उत्तर दिले.


ती मुलगी क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्या डोळ्याला लावलेला गॉगल, त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व, आणि मिस्कील हसत उत्तर देण्याची लकब. ती मुलगी होती मधुरा. देशपांडे सरांच्या मित्राची मुलगी. औरंगाबाद वरून लॉ करून देशपांडे सरांकडे काम करायला आली होती. तिच्या बाबांनी 'देशपांडे काकांच्या हाताखालीच वकिलीची प्रॅक्टिस सुरू कर' असे म्हणून तिला तिथे पाठवलेले होते.


सध्या ती देशपांडे काकांच्या घरी राहत होती आणि आज पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आली होती. पहिल्या भेटीतच मंदारच्या व्यक्तिमत्त्वाने मधुरावर आपली छाप पडली होती.

त्यांचा संवाद ऐकून आणि मधुराचा आवाज ऐकून देशपांडे वकील केबिन बाहेर आले.

"अरे मधुरा? ये. ये. आतमध्ये ये, मंदार तुही ये."असे म्हणुन त्यांनी दोघांनाही आत बोलवले.


"मंदार, ही मधुरा, माझ्या मित्राची मुलगी. आजपासून आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे आणि तुझ्यासोबतच वकिलीची सुरुवात करणार आहे. तुला मी ज्या केसेस देतो त्या हिच्यासोबत बघ आणि हिला सोबत हिअरिंगलाही नेत जा म्हणजे तिचीही प्रॅक्टिस होईल आणि हिलाही शिकायला मिळेल."

खरेतर मधुरा देशपांडे काकांचे बोलणे ऐकून नाराज झाली. तिला स्वतः देशपांडे काकांकडून शिकायचं होते; पण आता सुरुवातच होती, त्यामुळे लगेचच कसे बोलायचे हा संकोच होताच.


'बघूया हा ब्लाइंड मुलगा आपल्याला काय शिकवतो आणि ह्याची हुशारी ती काय?' असा मनात विचार करून मधुराने मंदारच्या बाजूला डेस्कवर बसायला सुरुवात केली.


पहिल्या दिवशी मंदारने तिला काही जुन्या झालेल्या केसेस स्टडी करायला दिल्या. आठ दिवसातच त्याच्यासोबत काम करता करता मधुराच्या लक्षात आले की जरी याला डोळे नसले तरी त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे आणि प्रत्येक गोष्ट मन लावून, सारासार विचार करून करण्याची सवय आहे. ब्लाइंड असला तरी कुठेही त्याला त्याच्या वागण्या बोलण्यात सिंपथी, सहानुभूती मिळावी अशी अपेक्षा नाही.


इतर सामान्य माणसांप्रमाणे मंदार त्याची कामे करत असे आणि आपल्या वैगुण्याचे भांडवल करून कुठल्याही सवलतीची त्याला अपेक्षा नव्हती.

आठ दिवसातच ‘कोण हा? कसा?’ असे वाटणाऱ्या मंदारशी मधुराची चांगलीच गट्टी जमली. एक महिना देशपांडे काकांच्या घरी राहूनच ती आपल्याला काम जमतेय का हे बघत होती.

'आता आपल्याला काम जमते आहे आणि आपण बरेच दिवस नाशिकला राहणार आहोत' याचा अंदाज मधुराला आला होता.

"काका आता बरेच दिवस राहिले मी तुमच्याकडे. आता जरा स्वतःची सोय शोधते." ती एक दिवस देशपांडे काकांना म्हणाली.


काकांनीही फारसे आढेवेढे घेतले नाही कारण आपल्या घरात राहतांना मधुराला थोडे संकोचल्यासारखे होते हे त्यांच्या लक्षात आले होते.

देशपांडे काकांची फक्त तिने चांगल्या ठिकाणी राहावे एवढी अपेक्षा होती आणि त्यांना माहीत होते की, मंदारच्या घराच्या वरच्या मजल्यावर ते पेइंग गेस्ट म्हणून मुलींना राहायला देतात.


"अगं तुझा आता मित्र झालेला तो मंदार आहे ना, त्याच्या बंगल्यातल्या वरच्या खोल्यांमध्ये पेइंगगेस्ट म्हणून मुली राहतातं बरं का. त्याला विचारून बघ तुला राहायला तिथे जागा आहे का? म्हणजे तुझी सोय चांगल्या घरात होईल." देशपांडे काकांनी मधुराला सुचवले ते मधुरालाही हे पटले.


"मंदार, देशपांडे काका म्हणत होते की, तुमच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर तुम्ही मुलींना पेइंगगेस्ट म्हणुन राहायला देता. आहे का सध्या तिथे जागा?" दुपारी जेवणाच्या टेबलावर बोलता बोलता ती मंदारला म्हणाली.


"मला नक्की माहित नाही पण बहुतेक या महिन्यात एक मुलगी तिचे लग्न ठरलं म्हणून निघून जाणार होती. तिच्या जागी आई कोणाशी बोलली आहे का ते विचारावं लागेल." मंदार म्हणाला.


"ठीक आहे तू आईला विचार आणि उद्यापर्यंत मला सांग." मधुरा म्हणाली.

मंदार घरी गेला आणि आईला त्याने मधुराविषयी सांगितले. तसेही मंदारच्या बोलण्यात गेल्या महिनाभरात मधुराचा उल्लेख एकदोनदा आलाच होता.त्यामुळे आईला मधुरा माहीत होती.


"हो आहे जागा. अस्मिता येत्या आठ दिवसांमध्ये रूम रिकामी करून जाणार आहे आणि दुसरं कोणी तिच्या जागी अजूनतरी आलेले नाही. आपल्या सर्व अटी-शर्ती मधुराला सांग आणि त्या तिला मान्य असेल तर तिने इथे राहायला काहीच हरकत नाही." आई म्हणाली.


"होईल तुझे काम. संध्याकाळी घरी जाऊन आईला भेट." दुसऱ्याच दिवशी मंदारने मधुराला ऑफिसमध्ये सांगितले.
लगेच संध्याकाळी मधुरा ऑफिस मधून निघाली आणि मंदारच्या घरी गेली.


मंदारला ऑफिसनंतर पुढे क्लबमध्ये चेस खेळायला क्लबात जायचे असल्यामुळे तो नेहमी घरी उशिरा जात असे. मधुरा मंदारच्या घरी पोहचली. सुनंदा सुधीरशी तिने ओळख करून घेतली. तिला दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले हे काका काकू आवडले आणि त्यांनाही मधुरा लाघवी स्वभावाची वाटली म्हणून त्यांनी वरती जाऊन इतर राहणाऱ्या देविका आणि वैष्णवीशी मधुराशी ओळख करून दिली.

"आता तुझी जागा घेणार मधुरा घेणार आहे बरं का." अस्मितालाही सांगितले.


आठ दिवसातच मधुरा पेइंगगेस्ट म्हणून सुधीर सुनंदाच्या बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर राहायला आली. वरती राहणाऱ्या मुलींच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुनंदा किंवा मंदार कोणीच काही लक्ष घालत नसे. फक्त फार काही आगाऊपणा, वात्रटपणा मुलींचा चालत नाही ना, यावर त्यांचे लक्ष असे.


मुलींचे पालकही या कुटुंबाचे आपल्या मुलींवर नीट लक्ष आहे या विश्वासावर निर्धास्त असत. हळूहळू एक वर्ष पार पडलं आता मधुरा ही मंदारच्या जोडीने वकिलीच्या कामकाजामध्ये तरबेज झाली होती.

देशपांडे काका तिलाही स्वतंत्रपणे एखाद दुसरी केस देऊ लागले होते. या मध्यंतरीच्या काळात मंदार मधुराची चांगलीच मैत्री झाली होती.

रुबाबदार दिसणाऱ्या मंदारचे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे हे मधुराला कळले होते. आपल्या वैगुण्याचा वापर तो सहानभूतीसाठी करत नाही. इतर सामान्य माणसांप्रमाणे सर्व कामे व्यवस्थित करतो. तसेच त्याला अफाट बुद्धिमत्तेची देणगी आहे हे देखील मधुराच्या लक्षात आलं होते.

खरंतर देशपांडे काकांच्या फर्ममध्ये बरेच तरुण मुले होती पण तरीही मधुरा नकळतच मंदारच्या प्रेमात पडली होती.

मंदारच्या मनात मात्र त्याची एक असिस्टंट, देशपांडे काकांच्या मित्राची मुलगी या व्यतिरिक्त मधुराविषयी फारशा भावना नव्हत्या किंबहुना आपल्या जोडीदाराची जवाबदारी आईबांबावर सोपवून तो मजेत होता.

काय असेल मधुराच्या प्रेमाचे भवितव्य?
तिच्या घरचे, मंदारच्या घरचे देतील का तिच्या प्रेमाला होकार?

©®भाग्यश्री मुधोळकर

🎭 Series Post

View all