प्रेम अनामिक वळणावरचे भाग ३

अंध आणि डोळस व्यक्तीमधले प्रेम
भाग ३

सुधीर सुनंदाला आता सामान्य आईवडालांप्रमाणे आपल्या मुलाचे जीवन मार्गी लागावे असे वाटत होते. अर्थातच त्याच्या लग्नाचे स्वप्न ते बघत होते. वधुवर सुचक मंडळात त्यांनी त्याचे नाव नोंदवले होते. त्या दृष्टीने मंदारही तयार होताच. एखादी थोडंबहुत वैगुण्य असणारी मुलगी आपल्याला जोडीदार म्हणून मिळणार याला त्याची तयारी होती आणि तारुण्यसुलभ भावना त्याच्याही मनात होत्याच.

रविवारी सकाळची वेळ. आज सुधीर सुनंदाच्या घरात खूप धावपळ सुरू होती. आज मंदारला बघण्यासाठी मुलीकडचे येणार होते. अनुपम विवाह मंडळातूनच त्यांना एका मुलीचा रेफरन्स मिळाला होता.


ती मुलगी चांगली होती. डोळस होती. फक्त तिचा पाय पोलिओमुळे जन्मात अधू होता. एका शाळेमध्ये ती शिक्षिका म्हणून कामही करत होती. मंदारविषयी तिला माहिती होतीच. ती मंदारला त्याच्यातील कमतरतेसहित स्विकारायला तयार होती म्हणूनच तर आज भेटायचे ठरले होते.


रविवारी सकाळी खालून येणाऱ्या आवाजावरून मधुराला काहीतरी विशेष आहे असे वाटले. तिने त्या दिवशी तिच्या मैत्रिणींसाठी आणि तिच्यासाठी गोड शिरा बनवला होता.

गोड शिरा देण्याच्या निमित्ताने ती खाली गेली. खरे तर खाली काय चालू आहे याचा अंदाज तिला घ्यायचा होता.

"काकू तुमच्यासाठी मी शिरा आणलाय. खाऊन बघा." मधुरा म्हणाली.


"हो का? अग छानच झाला असणार. बघते खाऊन. चहा घेतेस का ग?" सुनंदाने सहज विचारले.

"नको काकू. चहा झालाय माझा. आज शिरा बनवला बऱ्याच दिवसांनी. म्हणून तुम्हाला द्यायला आले. काय विशेष? खूप गडबडीत दिसताय." मधुरा म्हणाली.


"अगं आता मंदारच्या लग्नाचं बघतोय ना आम्ही. आज अनुपम विवाह मंडळातून एक स्थळ सुचवलं ते मुलीकडचे घरी येणार आहेत. मुलीचा फोटो वगैरे तर आम्हाला आवडलेलाच आहे. मंदारने आमच्यावरचं सोपवलंय. सगळं जमलं तर ठरवूया की लग्न." सुनंदाचा बोलणं ऐकून मधुरा चमकली.


आपल्याला आवडणारा मंदार दुसऱ्या कोणाचातरी होणार या कल्पनेने मधुरा खट्टू झाली. मंदारच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे याचा तिला अंदाज होताच. आपले प्रेम एकतर्फी आहे पण ते व्यक्त करावंच लागेल. नाहीतर मंदार दुसऱ्या कोणाचा तरी होईल या विचाराने मधुराच्या मनात चलबिचल सुरू झाली.


'अजुन तर आपण आपल्या आईबाबांनाही सांगितलं नाही. माहित नाही ते काय म्हणतील. मंदारच्या आईबांबानाही किती ही लग्नाची घाई' मधुराच्या मनात विचार सुरु होते.

मधुरा आधुनिक विचारांची मुलगी असली तरी आई-वडिलांच्या परवानगीशिवाय पुढे पाऊल टाकणार नव्हती. 'आता आपण घाई केली नाही तर मंदार दुसऱ्या कोणाचा तरी होणार' या विचाराने तिला अस्वस्थ वाटायला लागले.

‘प्रिया रे तुज सांगु कसे
गुज हे मनीचे…’

अशी मधुराची मनःस्थिती झाली होती. आता ताबडतोब पावले उचलावी लागणार होती. रुबाबदार दिसणाऱ्या, बुद्धिमान असणाऱ्या मंदारला नाकारणारी मुलगी क्वचितच सापडेल. या विचाराने मधुराने आजच आई-बाबांशी बोलायचं ठरवले.


एक दोनदा मध्ये औरंगाबादला गेल्यावर मंदारचा विषय तिच्या सारखा बोलण्यात यायचा. त्यामुळे आपली मुलगी हळूहळू त्याच्या प्रेमात पडत आहे याचा अंदाज मधुराच्या आई-बाबांना आलेला होता. फक्त मंदारचे अंधत्व खटकणारे होते. सुरुवातीचे प्रेमाचे दिवस संपले की मंदार मधुरामध्ये अंतर तर पडणार नाही ना अशी शंका त्यांना होती.


"मंदारसाठी त्याच्या घरचे स्थळ शोधत आहेत. माझ्या नकळत गेल्या वर्षभरामध्ये मी मंदारच्या प्रेमात पडलेली आहे. त्याच्या मनात माझ्याविषयी काही भावना आहेत की नाही हे मला माहीत नाही, मला मात्र तो आयुष्यभर जोडीदार म्हणून हवा आहे. तुम्ही एकदा येऊन भेटता का मंदारच्या आई-बाबांना ?" मधुराने दुपारी आपल्या घरी फोन लावला आणि आई-बाबांना सांगितले. मधुराचे बोलणे तिच्या आईबाबांनी ऐकून घेतले.


"मधुरा, एका अंध मुलाशी लग्न केल्यामुळे आयुष्यभर काही अडचणी येतील. त्याला तू कसा सामना करशील? याचा जरा विचार कर." फोनवर आई-बाबांनी तिला समजावले.


मधुरा मात्र आपल्या विचारावर ठाम होती. तिला डोळस मुले आणि मंदारमध्ये काही फरक जाणवतच नव्हता.

"माझ्या प्रेमावर विश्वास ठेवा. आईबाबा मी सर्व विचार करूनच निर्णय घेत आहे. माझ्या प्रेमावर विश्वास ठेवा. तुम्ही एकदा येऊन त्याला आणि त्याच्या आई-बाबांना भेटा." मधुराने गळ घातली.

शेवटी मुलीचा हट्टच तो. आई-बाबांनी त्याला मान द्यायचा ठरवले. एकदा भेटून घेऊया नंतर मधुराला समजावता येईल असा विचार करून आई-बाबांनी "आम्ही पुढच्या रविवारी येतो." असे तिला सांगितले.


आपले प्रेम कसे सांगावे? मंदारपुढे कसे व्यक्त व्हावे? याचा मधुरा विचार करायला लागली.

‘तुजविण जग हे सारे
भासे मज उदासवाणे
सांगु कसे तुजला
तुजविण असह्य जगणे.’

आता मधुराच्या मनाची घालमेल सुरु झाली. भेटायला आलेल्या मुलीने होकार दिला तर? मंदारला माझ्या मनात काय सुरु आहे हे माहितही नाही. मी बोलल्यावर त्याने नकार दिला तर? पुढाकार तर मलाच घ्यावा लागणार.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर
_________


🎭 Series Post

View all