प्रेम अनामिक वळणावरचे भाग ४

अंध आणि डोळस व्यक्तीमधले प्रेम
भाग ४

मंदारचे ठरत आलेले लग्न थांबवले पाहिजे अशा मनःस्थितीत मधुरा होती. दुपारी काय घडले आहे? याचा अंदाज घ्यायला संध्याकाळी तिने पुन्हा काका काकूंच्या घरी फेरी मारली.

"काय मंदार? कशी होती मुलगी? तिच्या बोलण्यावरून वाटली का ती तुला स्मार्ट? पडली का पसंत?" मंदारला थोडं चिडवण्याच्या हेतूनेच तिने विचारले

“अगं मी काय बघणार त्या मुलीला? मी फक्त तिचं बोलणं ऐकलं. बोलण्यावरून तर ती चांगली वाटली. बघू आता त्यांच्याकडून काय उत्तर येते ते. आठवडाभरानंतर सांगणार आहेत ते. आई-बाबा ठरवतील ते मान्य असणार आहे." मंदार म्हणाला.


आता आपल्याकडे आठवडाभर वेळ आहे, हे मधुराच्या लक्षात आले होते. या आठवडाभरात मंदार समोर आपलं प्रेम व्यक्त करणे आणि काका काकूंनाही आपल्या मंदार वरच्या प्रेमाची कल्पना देणे ही दोन्ही कामे मधुराला करायची होती.

सोमवारी मंदार मधुराने नेहमीप्रमाणे देशपांडे काकांच्या ऑफिसमधली काम संपवली. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मंदार क्लबमध्ये खेळायला जात असे.

"मंदार माझ्यासोबत कॉफी प्यायला चालतोस का?" मधुराने आजच ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याच्या आधी मंदारला विचारले.


"काय मधुरा आज काय विशेष?" मंदारने विचारले.


"अरे विशेष काही नाही. असंच वाटलं काॅफी प्यावी तुझ्यासोबत. आजच्या दिवस नको जाऊस क्लबमध्ये." मधुरा म्हणाली.

"ठीक आहे चालेल. तसंही आज क्लबमध्ये विशेष काही नाही. फक्त फोन करून सांगतो त्यांना की मी येत नाही म्हणून." मंदार म्हणाला आणि त्याने क्लबमध्ये फोन करून तो येत नसल्याची कल्पना दिली.

छोट्याशा कृतीतूनही मंदारची जबाबदारी निभावण्याचा स्वभाव कळत होता. मधुरा त्याला घेऊन कॉफी शॉप मध्ये गेली.

"मंदार मला जे सांगायचं आहे ते मी स्पष्टच सांगते. उगाचच आढेवेढे घेऊन, इकडून तिकडून विषय काढणं मला ही अवघडल्यासारखं होईल." मधुरा म्हणाली.


"बरोबर आहे. सांग सरळ सरळ मला. जी काही तुला मदत करता येईल ती नक्की करेन. कोणाच्या प्रेमात वगैरे पडली आहेस की काय? आणि तुझ्या आई-बाबांना ते सांगायचे का?" मंदारने मिश्किलपणे विचारले.


"हो तसंच आहे असे समज." हे बोलतांना मंदारला दिसत नसले तरी मधुरा लाजेने चूर झाली आहे हे कळत होते.


"ठीक आहे. सांग मला कोण तो मुलगा? काय करतो? मी करेन माझ्या परीने प्रयत्न तुझे प्रेम यशस्वी करण्याचा." मंदार म्हणाला.


"तो मुलगा म्हणजे तू आहेस मंदार. गेले वर्षभर आपण दोघं सोबत आहोत. माझ्याही नकळत मी तुझं वागणं, दिसणं, बोलणं, तुझी बुद्धिमत्ता याच्या प्रेमात पडलेली आहे." मधुरा तल्लीनपणे बोलत होती.


"तुझ्यासोबत असले की मी आनंदात असते. एखाद्या दिवशी तू दिसला नाहीस, भेटला नाहीस तर मला करमत नाही." मधुरा बोलतच होती.


“काय? काय म्हणतेस तू?” मंदारसाठी तर हा एकदम बाॅम्बच होता. क्षणभर त्याला काही सुचतच नव्हते.


"हो मंदार हे खरं आहे. काल जेव्हा तुझ्या लग्नाची गोष्ट घरी चालू होती आणि एक मुलगी तुझं घर बघायला घरी आली तेव्हा मला जाणवलं की, आता मला माझे प्रेम व्यक्त करण्याची घाई करावीच लागणार. तुला कधी समजलेच नाही माझे प्रेम. तू फक्त मैत्रीच्याच नात्याने पाहतो आहेस म्हणून मी आज लगेच तुझ्यापुढे हा विषय काढला आहे." मधुरा म्हणाली.


"अगं काय बोलतेस हे मधुरा? आपण मित्र आहोत ते ठीक आहे पण आयुष्यभर माझ्यासोबत कशी राहणार तू?" मंदार तिला सत्यपरिस्थितीची जाणीव करुन देत होता.


"अरे राहणार म्हणजे कशी म्हणजे? तुझे डोळे होऊन राहणार आणि तू माझं हृदय होऊन राहायचं. आपला संसार नक्की सुखाचा होणार याची ग्वाही देते तुला." मधुरा आत्मविश्वासाने बोलत होती.

"अग मधुरा, भावनेच्या भरात आणि तारुण्यसुलभ भावनेने, सहवासाने तू माझ्याकडे आकर्षित झाली आहेस. माझ्या प्रेमात पडली आहेस. सोपं नाहीये माझ्यासोबत आयुष्य काढणं." मंदार समजावत होता.


"मंदार, अरे आज तेवीस वर्षाची आहे मी. माझं भलंबुरं मला नीट कळतं. गेल्या वर्षभर मी तुला नीट ओळखते. इतर सामान्य मुलांइतकंच तू कमावतोस. तेवढाच हुशार आहेस. दिसायला रुबाबदार आहेस. एक डोळे नसले म्हणून काय झालं? बाकी सगळं तर तुझ्यात आहेच. माझ्या दृष्टीने तू 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' आहेस." मधुरा म्हणाली.


"काही कळतंय का तुला मधुरा? अगं बाई या सगळ्या गोष्टी कथा, कविता, कादंबऱ्यात ठीक वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात असं प्रेम निभवणे कठीण असतं माहिती आहे का? मी तर तुला आतापर्यंत फक्त मैत्रीण म्हणूनच बघत होतो." मंदार म्हणाला.


"असू दे तुझ्या मनात माझं मैत्रिणीचं स्थान परंतु मी मात्र तुझ्या प्रेमात पडली आहे. तुला नाही का आवडत मी? माझ्या समोर मी तुला दुसऱ्या कोणाचं होताना मी नाही बघू शकणार. माझ्यात काही नाकारण्यासारखं आहे का रे?" मधुराला आज कसंही करुन मंदारला मनातले सारे सांगायचेच होते.


"अगं असं काहीच नाही. कोणताही तरुण जो तुझ्याशी लग्न करेल तो सुखातच राहील." मंदार म्हणाला.


"मग तो तरुण तूच आहेस. राहशील ना सुखात ." मधुरा म्हणाली.

"थांब मला विचार करू दे." मंदार शांतपणे म्हणाला.


"घरी आई-बाबांशीही बोलतो मी. तू बोललीस का तुझ्या आई-बाबांशी." मंदारने विचारले.


"हो मी बोलले आहे. मी आणि माझे आई-बाबा मुळीच बुरसटलेल्या विचारांचे नाहीत. ते नक्की माझं प्रेम समजून घेतील आणि आपल्या लग्नाला होकार देतील. पुढच्या रविवारी येणार आहेत ते तुला आणि तुझ्या आईबाबांना भेटायला." मधुरा म्हणाली.

मंदारला अचानक आलेल्या या प्रेमाच्या प्रस्तावावर काय बोलावे हे सुचतच नव्हते. मधुरा तर पूर्ण विचाराअंतीच त्याच्यासमोर प्रेम व्यक्त करते आहे हे त्याला जाणवत होते.

काय असेल मंदारचे उत्तर?

क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर

🎭 Series Post

View all