प्रेम अनामिक वळणावरचे भाग ५ अंतिम

अंध आणि डोळस व्यक्तीमधले प्रेम
भाग ५ अंतिम भाग.

गेले वर्षभर मंदार मधुरा सोबत काम करत होता. त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर मधुरा राहतही होती पण त्याने कधीही प्रेयसी किंवा आपली भावी सहचारिणी या रूपामध्ये मधुराचा विचार केलाच नव्हता आणि अचानकच मधुरा आपल्या प्रेमात पडलेली आहे हे कळताचं तो गोंधळून गेला होता.

आपल्या आई-बाबांचा याविषयी सल्ला घेणं त्याला महत्त्वाचं वाटले. रात्री जेवण झाल्यावर त्याने मधुराशी झालेलं बोलणे सुधीर आणि सुनंदाला सांगितले. त्या दोघांसाठीही हा धक्काच होता. आपल्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहणारी आणि मंदार सोबत काम करणारी इतकीच त्यांची मधुरा विषयी कल्पना होती.

ही मुलगी आपल्या मुलाच्या प्रेमात पडली आहे हे कळताच त्यांच्यासाठी सुखद धक्का होता परंतु तो पचवणे अवघडच होते.

"मधुराला उद्या संध्याकाळी मला भेटायला सांग." असे सुनंदाने मंदारला सांगितले.


"मी तिच्याशी नीट चर्चा करते आणि कोणत्या भावनेच्या भरात ती निर्णय घेते का? याची चाचणी करते." सुनंदा समजूतदारपणे म्हणाली.


"चालेल आई." मंदार.


“आईशी बोल नंतर आपण पुन्हा एकदा भेटून आपलं काय ठरवता येईल ते बघूया.” दुसऱ्या दिवशी मंदारने मधुराला आईचा निरोप सांगितला.


दुसर्‍या दिवशी मधुरा ऑफिसमधून आल्यावर फ्रेश झाली आणि निटनेटका ड्रेस घालून ती सुनंदाला भेटायला घरी आली.

मंदार अर्थातच क्लबमध्ये गेला होता. सुधीरही कामानिमित्त बाहेर होता. त्यामुळे सुनंदा आणि मधुराला मोकळेपणाने बोलायला चांगलाच एकांत मिळाला होता.


"ये मधुरा बैस इथे. दोघींसाठी चहा करते." चहाचे कप आणि बिस्किटांचा ट्रे हातात घेऊन सुनंदा हॉलमध्ये आली. मधुराच्या हातात चहाचा कप दिला आणि तिने सरळ विषयाला सुरुवात केली.

"मधुरा, काल मंदार मला सांगत होता की तू त्याच्या प्रेमात पडली आहे खरं आहे का हे?"


"हो काकू." चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी थोडीशी लाज उमटलीच मधुराच्या.


"अगं गेली वर्षभर तू इथे राहतेस. आम्हाला कधी असं जाणवले नाही." सुनंदा म्हणाली.

"हो काकू, मला माझं प्रेम व्यक्त नव्हतं करता येत. गेल्या सहा-सात महिन्यापासूनच मंदार मला आवडायला लागला होता. आमच्यात मैत्री तर चांगलीच झाली होती पण जेव्हा तुम्ही त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहात असं कळलं तेव्हा माझा मंदार दुसऱ्या कोणाचा होणार हे जाणवलं आणि आता मी माझं प्रेम व्यक्त केलं पाहिजे याची जाणीव झाली. म्हणूनच मी काल मंदार समोर माझ्या भावना व्यक्त केल्या." मधुरा बोलत होती.

"अग मधुरा, मंदार दिसायला चांगला आहे, हुशार आहे, कर्तबगार आहे, सगळं मला मान्य आहे परंतु एका दृष्टिहीन व्यक्तीसोबत आयुष्य काढणं सोपं नसतं. माहिती आहे का? सुनंदा समजावण्याच्या सुरात म्हणाली.


"म्हणूनच तर काकू मी मंदारला म्हणाले की, मी तुझे आयुष्यभर डोळे होऊन राहीन. तू माझं हृदय होऊन राहा." मधुरा म्हणाली.


"हे तू भावनेच्या भरात तर बोलत नाहीयेस ना बाळ." सुनंदा म्हणाली.


"नाही काकू मी खूप सारासार विचार केलाय. मी माझ्या आई बाबांशी ही बोलले आहे. माझे आई-बाबा तुम्हाला भेटायला येणारच आहेत या रविवारी. आता तुम्हालाच मी आवडत नसेल तर तो भाग वेगळा." मधुरा विचारुन मोकळी झाली होती.


"अगं बाई इतकी गुणी आहेस तू. तुझ्यामध्ये न आवडण्यासारखं काय आहे? कोणीही तुला सून म्हणून हसत हसत स्वीकारेल." सुनंदा म्हणाली.


"तसंच हसत हसत मंदारला सांगा ना मला पत्नी म्हणून स्वीकारायला." मधुरा म्हणाली.


"बरं तुझा निर्णय ठाम आहे ना?" सुनंदा म्हणाली.


"हो काकू गेले वर्षभर मी ऑफिसमध्ये आणि घरी ही मंदारला बघत आहे. त्याच्या सगळ्या गुणांवर मी भाळली आहे." मधुरा म्हणाली.

"ठीक आहे मग बोलते मी मंदारशी आणि त्याच्या बाबांशी." असं म्हणून सुनंदाने तिला जवळ घेतले आणि हळूच प्रेमाने मिठीतही घेतले. सासूसुनेचे नाते गोड ठरणार यात काही शंकाच नव्हती.

रात्री सुनंदा सुधीर आणि मंदारशी बोलली. मधुराला ते गेले वर्षभर ओळखतच होते. तिचा लाघवी स्वभाव त्यांना माहितच होता. मंदारला देखील मैत्रीण म्हणून तर ती आवडतच होती.


"मधुराचा निर्णय ठाम आहे आणि मंदार तुझ्यासाठी ती योग्य जोडीदार आहे हे मला पटलं आहे आता तिच्या आई-बाबांनी होकार दिला तर आपण पुढे जाऊ शकतो." सुनंदा म्हणाली.


मंदारनेही 'मला आयुष्यभर तुझी सोबत आवडेल' अशी कबुली दुसऱ्याच दिवशी मधुराला दिली आणि एका प्रेमकहाणीला सुरुवात झाली.

मधुराला तर आकाश ठेंगणे झाले होते. तिचे आई-बाबा पुढच्या रविवारी मंदारच्या घरीआले. मंदारच्या आईबाबांशी, मंदारशी बोलल्यावर इतर मुलांप्रमाणेच मंदार सर्वगुणसंपन्न असल्याचे त्यांनी मान्य केले. मंदार सर्वार्थाने मधुरासाठी योग्य आहे हे त्यांना पटले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला.

मंदार मधुराची खरी प्रेमकथा तर लग्नानंतरच फुलणार होती.

मधुराच्या मनात सूर गुंजत होते..

‘तुला पाहते रे तुला पाहते
गुज मनीचे तुला सांगते
लोचने होईन प्रिया तुझी मी
तुला सांगते रे तुला सांगते.’

समाप्त
भाग्यश्री मुधोळकर
______

🎭 Series Post

View all