Login

लव ट्रँगल भाग १९

विचार करून करून आता मन खरचं थकल होत....
.....अस म्हणून नील समीरला न विचारताच तिथून एकटाच निघुन जातो....
------------------------------------------------------
पुढे....

          ( चालू वर्तमान)........

        विचार करून करून आता मन खरच थकल होत. डोळ्यांवर आता झोपेची ग्लानी चढत होती. कारण जवळजवळ रात्रीचे पावणेतीन वाजले होते. विचारांच्या तंद्रीत वेळ कसा गेला नीललाच काय कदाचित वेळेला सुद्धा कळल नसेल. रात्री उशिरा झोपण्याचा परिणाम म्हणून सकाळी उठायलाही उशीर होतो. सूर्याची स्वछ प्रखर किरणे खिडकीच्या तावदाना तून आत येऊन त्याची झोपमोड करत होती. पण झोपेच्या तंद्रीत मात्र त्याला वेळेच भान राहील नव्हत. जेव्हा बेडरूमच्या डुअर बेलचा आवाज कानी पडतो, तसा तो अंथरुन झटकून खाडकन जागा होतो. घड्याळाकडे पाहतो तर काय...सकाळचे नऊ वाजले होते. तसाच तो डोक्यावर हात आपटून घेतो.

       "नील....आहे ना आत?... की बाथरूम मध्ये आहेस?...."आई बाहेरून ओरडते तसा नील पटकन जाऊन दरवाजा उघडतो.
       " अरे किती वेळ वाजवत आहे बेल...काय झालं बाळा, तब्येत तर ठीक आहे ना?" आई नीलच्या कपाळाला हात लावून विचारते.
   "हो हो आई... ठीक आहे मी. पण तू इतकी का घाबरली आहेस?... नीलच्या स्वरात काळजी स्पष्ट दिसत होती.
   "घाबरू नाहीतर काय करू...अरे नऊ वाजून गेलेत.. एवढा वेळ झोपला होतास म्हणून काळजी वाटली. आणि हे काय डोळे किती सुजलेत... शिवाय लाल ही दिसत आहेत. रात्री जागरण केल होतस काय?... आई नीलला विचारते तसा तो थोडा चपापतो.
     "अं....ह...ते ऑफिसच काम होत ना त्यामुळे थोडा लेट झालो झोपायला... बाकी काही नाही. "—नील.
    "बर असुदे...काळजी घेत जा. आणि जास्त जागरण नको करू. बघितलस ना किती वेळ झाला उठायला. चेहरा सुद्धा किती बिघडला आहे बघ. निघते मी आता आवरून ये खाली नाश्ता करायला. " अस बोलून आई खाली निघून जाते. रोज पहाटे उठून वर्कआउट करणारा नील आज खरोखरच लेट झाला होता. त्यामुळे पटापट आवरून तो ही नाश्त्यासाठी खाली हॉलमध्ये निघून जातो.

          घरात आता लग्नाची तयारी चालू झाली होती, पण सुभाषराव आणि सुशीलाबाईना हवी तशी मुलगी पसंत पडत नव्हती. ओळखीच्या नात्यातील आणि अनोळखी मुलीसुद्धा बघून झाल्या होत्या, पण एकही मुलगी नीलसाठी योग्य वाटत नव्हती.
      "अहो, मी काय म्हणते..उगाच बाहेरच्या मुली बघण्यापेक्षा आपल्या  प्रकाशची मुलगी आहे ना...तिलाच आपण लग्नासाठी मागणी घातली तर..."— सुशीलाबाई.
     " अग हो, हे तर माझ्याही लक्षात आल नाही. आणि अशी गुणी मुलगी शोधून सापडणार नाही बघ"— सुभाषराव.
        "हो मला पण तसच वाटत. खूपच गुणी आहे पोर. लहानपणापासून डोळ्यासमोर वाढलेली. शिवाय बाहेरच्या मुली कश्या निघतील आपल्याला काय  ठाऊक. मी बघतेच  प्रकाशाला विचारून."— सुशीलाबाई. सुभाषरावांच्या ही मनात होत 'प्राची' ला मागणी घालावी. पण तिच्या घरच्यांच ही मत लक्षात घ्यायला हवं होतं. 'मागणी घालायला काय हरकत, जे होईल ते बघु पुढच्या पुढे ' असा विचार करून सुभाषराव सुद्धा होकार देतात.

          प्रकाश म्हणजे सुशीलाबाईंचा मानलेला भाऊ. वयाने त्यांच्यापेक्षा लहान होता. प्रकाश शिर्के यांच एक मध्यमवर्गीय कुटुंब पुणे येथेच स्थित होते. प्रकाश आणि उषा हे दाम्पत्य, आई वडील आणि एकुलती एक मुलगी 'प्राची'. सुशीलाबाईंना भाऊ नव्हता पण त्यांनी प्रकाश लाच आपला भाऊ मानले होते. दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून जिव्हाळ्याचा संबंध होता. प्रत्येक रक्षाबंधनाच्या सणाला प्रकाश सुशीलाबाईंकडे राखी बांधुन घेण्यासाठी येत असे. त्याच्याबरोबर प्राची ही कधीकधी घरी यायची. त्यामुळे तिची सर्वांशी छान मैत्री जमली होती. नीलचीही तिच्याशी तशी जुजबीच ओळख होती.

                प्राची दिसायला जितकी सुंदर होती तितकीच प्रेमळ, मनमिळाऊ आणि हुशार ही होती. जरी आईवडिलांना ती एकुलती एक असली तरी लाडाने अजिबात बिघडलेली नव्हती. कोणत्याही परिस्थितीत ठामपणे सामोरे जाण्याची हिम्मत तिच्यात होती. खूप शिकून आय. ए. एस. व्हायचं हे तीच स्वप्नं. तेच स्वप्न उराशी बाळगून ती चिकाटीने मेहनत करायची.
------------------------------------------------------

   प्रकाशच्या घरी......

               "हे बघ प्रकाश...तू मला माझ्या सख्ख्या भावासारखाच आहेस. प्राची मला माझ्या मुलीसारखीच आहे. त्यामुळे तू कशाचीही काळजी करू नकोस. तिला मी माझ्या मुली इतकाच मान देईन. आम्हा दोघांनाही प्राची मनापासून सून म्हणून आवडली आहे. नील ला आवडेल प्रश्नच नाही. आता तुमचही मत आम्हाला कळवा. उगाच घाई नको. सारासार विचार करूनच काय ते कळवा. निघतो आता आम्ही."— सुशीलाबाई.
चहा पाणी करून दोघेही जायला निघतात.
------------------------------------------------------
                                               क्रमशः.........
  


🎭 Series Post

View all