लव्ह यू जिंदगी !!
नवी पहाट , नवी सुरूवात !
आयुष्य हे अनमोल रे ! हसण्यासाठी रे ! प्रेमासाठी रे ! उंच झेप घेण्यासाठी रे ! लढण्यासाठी रे ! जिंकण्यासाठी रे ! आनंदाने जगण्यासाठी रे !
____________________________________
भाग १
"आत्महत्या करणे हा कुठल्याच संकटावरचा, प्रश्नांवरचा उपाय नाही, आत्महत्या हे पळपुटेपणाचे लक्षण आहे, शूरवीरांचे नाही."
पाठीमागून आवाज आला, तसे एका नदीवरच्या पुलावर उभ्या असलेल्या तरुण मुलाने मागे वळून बघितले, तर एक तरुण मुलगी त्याच्याकडे चालत येत होती.
"हरलास आयुष्याला?" .....ती.
"मग काय करू? जगून तरी काय उपयोग? " ....तो.
"आयुष्य खूप सुंदर आहे, एकदाच आयुष्यात घडलेल्या आनंदी गोष्टी आठवून बघ, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आठवून बघ." ...ती
"त्याने काय होणार आहे? माझे प्रश्न सुटतील?" .... तो.
"नाही, पण जगण्यासाठी बळ मिळेल." .....ती.
"माझ्या प्रेमाच्या लोकांसाठीच तर मी काही करू शकत नाही आहे. आपल्या आईला वाचवू शकत नाही आहे. खूप गिल्टी वाटत आहे. आता माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नाही आहे."
"असे काय झाले? प्रॉब्लेम सांगशील ?" ...ती.
"आईला कॅन्सर झाला आहे. तिला खूप त्रास होतो आहे. तिची ट्रीटमेंट सुद्धा करू शकत नाही. लहान बहीण आहे, तिचे शिक्षण करू शकत नाही. घरात दोन वेळ नीट पोटभर जेवण सुद्धा नाही देऊ शकत आहो. आईने आपल्या जिवाचं रान करून, खूप कष्ट घेऊन मला शिकवले. मी फर्स्ट क्लास मध्ये डिग्री मिळवली आहे, पण कुठेच नोकरी मिळत नाही आहे. ज्याने ज्याने जिथे जिथे जाऊन बघायला सांगितले आहे, तिथे तिथे जाऊन आलोय, पण काहीच फायदा झाला नाहीये. काही लोकं नोकरी लावून देतो म्हणतायत पण त्यासाठी त्यांना पाच, सात लाख रुपये हवे आहेत, कुठे कुठे तर खुलेआम लाच सुद्धा मागतात आहे. इथे दोन वेळचे जेवायाला नाही आहे, नोकरीसाठी पैसे कुठून देऊ? जेमतेम एका छोट्या दुकानात नोकरी मिळाली आहे, पण तीन हजारात काय होणार आहे? हरलोय मी, आता मला आई आणि बहिणीचे हाल बघवत नाही. " ....तो.
"तुझ्या मरणाने हे सगळे प्रश्न सुटणार आहेत काय?" ...ती.
"नाही, पण माझ्या डोळ्यांपुढे तर हे काही नसेल. या वेदना आता मला असह्य होत आहे, श्वास कोंडतोय माझा ." ... तो खूप हतबल झाल्यासारखा बोलत होता.
"आणि तू गेल्यावर काय होईल, याचा विचार कधी केला आहेस? तुझी आई, जी आता काही कदाचित चार पाच वर्ष जगणार असेल ती तुझ्या आत्महत्येची बातमी ऐकून, कदाचित सहन नाही करू शकणार आणि लवकरच मरेल. तुझी लहान बहीण एकटी पडेल. तुला माहिती आहे ना हे जग मुलींसाठी किती खराब आहे. एकटी मुलगी दिसली की समाजातली जनावरं तुटून पडतील तिच्यावर, कोण करेल तिचे रक्षण? दर वर्षी रक्षाबंधनाला तिच्याकडून राखी बांधून घेतो ना? आयुष्यभर तिचं रक्षण करायचे वचन दिले आहेस ना? मग ते कोण पूर्ण करेल? तुझ्या आई आणि बहिणी सोबत काही वाईट जर घडले तर तू स्वतःला माफ तरी करू शकणार काय? तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. देव सुद्धा तुला माफ नाही करणार. भटकत राहशील ,पण कधी मोक्ष मिळणार नाही. मरून सुद्धा मरण यातना भोगत राहशील. तू पैशाने जरी तुझ्या परिवाराला मदत नाही करू शकत आहेस, तरी तू त्यांच्यासोबत असण्यानेच त्यांची खूप मदत होते आहे. तुला समोर बघूनच तुझ्या आईला सगळ्या वेदना सहन करण्याचे बळ मिळते आहे. तुझी बहिण समाजातल्या राक्षसांपासून सुरक्षित आहे." ....ती.
तो निःशब्द , स्तब्ध उभा तिचे ऐकत होता.
"अन् काय रे, समजा तू इथून उडी मारली, पण तुझा आत्महत्येचा प्लॅन फसला तर? तू मेला नाही तर?" ...ती.
"इथून एवढया उंचीवरून पडल्यावर कोण वाचू शकते?" ...तो.
"इथून उडी घेतलेले सगळेच लोकं मरत नाहीत, काही काही वाचतात सुद्धा. तिकडे नदीच्या काठाला तरंगत मिळतात. कुणाचा मनका तुटलेला असतो, कुणाचा हात, तर कुणाचा पाय तुटलेला असतो , कुणाचे डोळे फुटले असतात तर कधी डोकं फुटलेले असते. कुणी अपंग होतात तर कुणी कोम्यात गेलेलं असते, पण जिवंत असतात. लोकं मेले तर नसतात आणि मग हे असे अपंगत्व घेऊन जीवनाचा प्रवास अजूनच जास्ती खडतर करून घेतात. मग ना नीट जगताही येत ना मरताही येत. परिवारावर ओझं बनून राहतात." ....ती.
तिचे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी जमा झाले होते. तो किती मोठी चूक, किती मोठा गुन्हा करायला निघाला होता हे त्याला कळले होते.
"धन्यवाद मॅडम! तुम्ही माझे डोळे उघडले. खूप मोठा गुन्हा करण्यापासून मला वाचवले. तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार." तो
"उपकार काय रे त्यात, आपण एकाच समाजात राहतो, एकमेकांना सांभाळून घ्यायला नको? जर कोणी चुकीचं वागतांना दिसत आहे, तर त्याला सांभाळून घ्यायला नको? ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण स्वतः, आपला परिवार, आपला समाज, आपलं गाव, आपला देश यांच्या सुरक्षतेची काळजी घ्यायला हवी." ती थोडी भावूक होत म्हणाली.
"बापरे! तुम्हाला जीवनाचे किती मर्म माहिती आहे. दिसता लहान पण खूप मोठी गोष्ट सांगून गेलात ." तो.
"असे काही नाही रे, ज्या चुकीमुळे माझ्या परिवाराला शिक्षा मिळाली, ती चूक तू करायला नको म्हणून सांगत होते. " ती.
"म्हणजे?" ....तो.
"असू दे, तुझ्या कामाचे नाही. " ....ती.
"ओके! बरे मी जातो घरी, तुम्ही पण जावा आपल्या घरी, संध्याकाळ झाली आहे, आता लवकरच अंधार पडेल." .... तो.
"हो ...." ....ती.
दोघेही एकमेकांसोबत बोलून, एकमेकांचा निरोप घेत पाठमोरे होत आपापल्या दिशेनी जायला लागले. तेवढयात तिला काहीतरी आठवले आणि ती परत फिरली.
"बरं, ओ मिस्टर ....." ....तिने आवाज दिला.
तिच्या आवाजाने परत तो थांबला आणि तिच्या जवळ आला.
"हा मॅडम ?" ...तो.
"अहो जाहो करू नको, मी लहान आहे. मला \"तू\" म्हणूनच हाक मार." ....ती.
"तुम्ही... सॉरी तू हे सांगायला आवाज दिला?" ...तो प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता.
"अरे नाही, मला तुझ्या जॉबसाठी काहीतरी आठवले म्हणून आवाज दिला." ... ती.
"अच्छा, काय ?" ....तो.
"तुला देवाने हातपाय दिले आहे की नीट. म्हणजे बघ दिसायला सुद्धा हँडसम आहेस. जेव्हा बुद्धीचा उपयोग होत नाहीये, तेव्हा या शरीराचा वापर करायचा की रे." ....ती.
"ओ मॅडम, मी तसला मुलगा नाही आहो, जो पैशासाठी स्वतःला विकेल. " ...तो.
"मी तर म्हणते आत्महत्या करण्यापेक्षा स्वतःला विकणे बरे. आपण स्वतःला विकतोय, दुसऱ्याला नाही. बिचाऱ्या कितीतरी बायकांनी स्वतःचे घर सावरण्याकरिता हा रस्ता अंगिकारला आहे. पण बुजदिलपणा, नालायकपणा नाही केला, आयुष्यात हार मानली नाही. आपल्या संसारासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्यात." ...ती.
तिचे ते एक एक शब्द त्याच्या हृदयावर घाव घालत होते. त्याला त्याची आई आठवत होती, कशी वडील गेल्यानंतर स्वतःला सावरत, न खचता आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहिली होती. दोन मुलं पदरात, सोबतीला कोणी नाही, एवढ्या मोठ्या जगाचा तिने एकटीने कसा सामना केला असेल, हाच विचार करून त्याचा अंगावर काटे उभे राहत होते.
"बरं, तो वेगळा विषय आहे. तुझ्या शरीराचा वापर कर म्हणजे तू असे मॉडेलिंग वगैरे करू शकतो असे म्हणायचे होते. चांगला हट्टा कट्टा, उंचपुर्ण, दिसायला रुबाबदार आहेस की, असा वेगळा प्रयत्न का करत नाही?" ...ती.
"ते तर अजूनच कठीण आहे, त्या लाईनमध्ये तर भयंकर मारामारी आहे. ".... तो.
"मी मदत करू शकते, जर इच्छा असेल करायची तर?" ...ती.
"कशी?" ....तो.
"माझी एक मैत्रीण आहे, तिचे फेमस फॅशन डिझानिंग हाऊस आहे \" इवा फॅशन \". तिच्या तिथे तीन महिन्याने एक मोठा फॅशन शो होणार आहे. उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. आवडत असेल तर प्रयत्न करून बघ." .... ती तिच्या जीन्सच्या खिशातून एक विझिटिंग कार्ड त्याच्या पुढे धरत बोलली.
" पण........?" .....तो.
"मला कळते आहे तुला काय विचारायचे आहे ते. डोन्ट वरी तिच्या तिथे वशिला चालत नाही. तुमचं टॅलेंट आणि तुम्ही कसे प्रदर्शन करत आहात, त्यावर सिलेक्शन अवलंबून असते."....ती.
"ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर एक प्रयत्न करून बघतो. पण .....एक प्रॉब्लेम आहे?" ....त्याने तिच्या हातातले कार्ड घेत त्यावरची सगळी माहिती वाचत, ते कार्ड आपल्या शर्टच्या खिशात ठेवून दिले.
"काय?" .....ती.
"मला ते फॅशनचे काहीच कळत नाही आणि ते तसे मॉडेल सारखे चालता, बोलता वगैरे पण येत नाही." ....तो.
"बस येवढेच? उद्या फॉर्म भरून झाला की ये इकडे, मला येते थोडेफार, मी शिकवेल. मी काही बुक्स आणि मॅगझिनचे नाव सांगेल तेवढे घेऊन ये. " .... ती.
"ओके, आतापर्यंतच्या आयुष्यात बरेच काही करून बघितले, आता हे सुद्धा करून बघुया. आयुष्याने कठीण परीक्षा घ्यायची ठरवलेच आहे तर ती सुद्धा देऊया." ...तो.
"दॅट्स द स्पिरीट, ऑल द बेस्ट! " .... ती.
"तुझ्यामुळेच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा अर्थ कळला, नवा दृष्टिकोन मिळाला, थँक यू! उद्या फॉर्म भरून झाला तर इथे येतो. पण तुला कॉन्टॅक्ट कसा करू? म्हणजे काही फोन नंबर वगैरे?" ...तो.
"माझ्याकडे फोन नाही आहे, मला नाही जमत ते. मी, ते बघ.... तिथे राहते, मला दिसते तिथून सगळं, तू आला की मी येईल इथे." ...ती बोट दाखवत तिथेच थोडे दूर असलेल्या घराकडे इशारा करत म्हणाली.
"ठीक आहे, भेटू उद्या." ....म्हणत तो त्याच्या घरी जायला वळला आणि काहीतरी आठवून परत फिरला.
"तुझं नाव काय?" .....तो.
"प्रभाती!" .....ती.
"नवीन सकाळ, नवीन सुरुवात ....."...तो.
" हां?" ....ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.
"तुझ्या नावाचा अर्थ ग!" ....तो.
"हम्म, तुझे नाव काय?" ...ती.
"विवेक!" ...तो.
"गूड नॉलेज, सतबुद्धी!" ... ती.
"हो ना, तरी आपल्या नावासारखा नाही वागलो ना, आपल्या सतबुद्धीचा वापर नाही केला. " ....तो.
"ठीक आहे ना, आता पुढल्या पासून उपयोग कर. बरं एक महत्वाचे उद्या जाशील तिथे माझं नाव नको सांगू हा? " ....ती.
"तुझी मैत्रीण आहे ना त्या मॅडम?" ....... तो.
"हो, पण आमचं जरा थोडंसं बिनसलंय. त्यामुळे तिला अजिबात कळू देऊ नको तू प्रभातीला ओळखतो ते. तिला जर तू माझी ओळख सांगितली तर मग मी कधीच तुला भेटायला येणार नाही." ....ती.
"मैत्रीण आहे म्हणतेस ना, मग इतके वैर? तू तर किती समजदार वाटते आहे, सोडवून टाक तुमच्यामधला काय तो गुंता. " ....तो.
"हो झाला होता थोडा मोठा इश्यू, माझं मी बघेल आहे. चल बाय." ....ती त्याला बाय करून निघून गेली. तो पण स्वस्थ, फ्रेश मनाने, नवीन संकल्पनेने घरी परत गेला.
तर हा चोवीस वर्षाचा विवेक, आयुष्याला कंटाळून नदीच्या पुलावर आत्महत्या करायला आला होता. बराच वेळ हिम्मत करून पुलावरून खाली नदीमध्ये उडी घेणार तेवढयात प्रभातीची नजर त्याच्यावर पडली आणि तिने तिच्या समजदारीने त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले होते.
******
विवेक फॅशन शो साठी फॉर्म भरू शकेल काय?
कोण आहे ही इवा? तिच्या येण्याने आयुष्यात नवीन काय घडणार आहे?
बघुया पुढल्या भागात.
क्रमशः
**********
नमस्कार मित्रांनो ,
आजकाल आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे, न्यूज मधून ऐकायला, वाचायला मिळत आहे. आत्महत्या करणे हे कुठल्याच प्रश्न वरील उत्तर नाही आहे. आत्महत्येचे काय साईड इफेक्ट होऊ शकता, त्याचे स्वतःवर, आपल्या परिवारावर किती गंभीर, जीवघेणे परिणाम होऊ शकतात ते या भागातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एकटेपणा फार वाईट आहे, मोकळे व्हा!
काळजी घ्या!
धन्यवाद !!
*********
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा