Login

Love U Zindagi! 2

Sucide is not a solution...

Love U Zindagi 

भाग 2

पूर्वार्ध: 

      विवेक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करायला जातो. तो नदीच्या पुलावरून उडी घेणार की तेवढयात तिथे एक मुलगी प्रभाती तिथे येते आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखते. विवेक तिला आपल्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम्स सांगतो. प्रभाती त्याला एका फॅशन हाऊसची माहिती आणि कार्ड देते. 

आता पुढे: 

"अरे काय शोधतोय? का एवढी उलथापालथ करून ठेवलीय?" विवेकची आई जर्जर आवाजात म्हणाली. 

"अग एक कार्ड होते, खूप महत्वाचे आहे, ते शोधतोय. काल या शर्टच्या खिश्यातच ठेवले होते, पण आता सापडत नाही आहे. कुठे खाली पडले आहे काय ते बघतोय. " तो.. 

"काय होते त्यात?" आई.

"एक पत्ता होता ग, आज तिथे लवकर पोहचायचे होते." तो म्हणाला. 

"त्यावरचा पत्ता वाचला नव्हता काय? आठवून बघ. म्हणजे जर आठवला तर कार्ड शोधण्यात वेळ नाही जाणार" ... आई म्हणाली.

"कोणीतरी इतक्या चांगल्या भावनेने मदत करायला आले आणि आपण एक साधं कार्ड सांभाळून ठेऊ शकलो नाही, खरंच युझलेस आहे मी " विवेक आपले दोन्ही हात आपल्या कंबरेवर ठेवत घरभर नजर दौडवत मनातच विचार करत होता.

               पुष्कळ वेळ शोधूनही त्याला ते कार्ड सापडले नव्हते. त्याने ते कार्ड वाचले तर होते, आईने सांगितल्या प्रमाणे त्याने पत्ता आठवून बघितला. त्याला थोडं थोडं आठवत होते. जे जे आठवले, ते ते त्याने भराभर एका कागदावर लिहून काढले. स्वतःची निटसर तयारी करून देवाचा आणि आईचा आशीर्वाद घेऊन तो फॉर्म भरायला बाहेर पडला आणि निर्धारित स्थळी पोहचला. तिथे त्याचा वयाच्या आसपासची बरीच मुलं जमली होती. दिसायला अगदी मॉडेल सारखी, फाडफाड इंग्रजी बोलणारी, अगदी बिनधास्त दिसत होती. त्या सर्वांना बघून विवेकला घाम फुटला. या सगळ्यात आपलं काय सिलेक्शन होणार, त्याचा डोक्यात प्रश्न डोकावून गेला. त्याला त्याचा आत्मविश्वास थोडा खचल्यासारखा वाटत होता. 

"विवेक, असे घाबरून चालणार नाही.. आयुष्यात काही करायचे असेल तर हीच शेवटची संधी आहे. ही गमावली तर आयुष्यात पुढे उठायला कोणी मदत करणार नाही. आता प्रभाती तरी आली मदतीला, प्रत्येक वेळी कोणी येईलच असे नाही. आणि आधीच हार मानणे भित्रेपणाचे लक्षण, प्रयत्न तर करायलाच हवा." तो त्या सगळ्यांकडे बघत स्वतःशीच विचार करत होता. त्याने मोकळ्या हवेत एक श्वास घेतला आणि तो सेलेक्शनसाठी होणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी सज्ज झाला. 

        एक पोझीटीव विचार आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने त्याचे काम झाले होते. वेळेतच त्याचा फॉर्म भरून झाला होता. पाच दिवसांनी सिलेक्शन होणार होते, आणि मग सिलेक्ट झालेले कँडिडेटना प्रोफेशनल लेव्हलवर ट्रेनिंग देऊन तीन महिन्यांनी होणाऱ्या फॅशन शोमध्ये सहभागी होता येणार होते. त्यातून जे विनर होणार होते त्यांचे भविष्य उज्वल ठरणारे होते. 

       फॉर्म भरून विवेक बाहेर पडला आणि ठरल्याप्रमाणे कालच्या पुलाजवळ येत उभा राहिला आणि प्रभातीची येण्याची वाट बघू लागला होता. सांगितल्याप्रमाणे पाच मिनिटातच प्रभाती तिथे पोहचली होती. 

"Congrats! एक काम झाले तर.." .... प्रभाती. 

"हो, थँक यू!" त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. आयुष्यात हरता हरता त्याला एक आशेचा किरण दिसला होता.   

"बरं मग चला, प्रॅक्टिस करण्याची सुरुवात करुया. पण इथे नाही, ते तिकडे जाऊया. ते तिकडे माझे आवडते बकुळीचे झाड आहे तिथे." ....प्रभाती म्हणाली. 

"बरं, चला मॅडम, तुम्ही आमच्या टीचर , तुमचं ऐकायलाच लागेल." .... विवेक. 

             पुलाच्या खाली उतरून नदीच्या बाजूने जात तिथे झाडाझुडपांची जांगलासारखी मोकळी जागा होती, तिथेच एक मोठे बकुळीचे झाड होते. त्या झाडाच्या भोवती गोल असा मोठा चबुतरा होता. तिथे ते दोघं येऊन बसले. शांत निवांत अशी ती जागा होती. फार कोणी डिस्टर्ब करणारे नव्हते. प्रभातीने त्याला मॉडेलिंग विषय आधी थोडी माहिती सांगितली. नंतर बोलण्याची, चालण्याची, फॅशन शो सिकेक्शनसाठी लागणारे अश्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करून घेतली. दोन तास प्रॅक्टिस करून दोघेही दमले आणि थोडा आराम म्हणून झाडाच्या चबुतऱ्यावर येऊन बसले. 

"प्रभाती , एक विचारू?" ... विवेक.

"हा ....बोल." ...प्रभाती.

" इथे कोणी नाही, साधं चिटपाखरू सुद्धा फिरकत नाही. तुझी माझी कालचीच ओळख, तू माझ्यावर विश्वास कसा ठेवला? म्हणजे तू आणि मी इथे एकटे आहोत, कितीही म्हटले तरी मी पुरुष, तू मुलगी त्यातही इतकी सुंदर..तुला भीती नाही वाटत?" विवेक.

"माझ्यासोबत एक वाईट प्रसंग घडला होता , त्या नंतर माणसं वाचायला शिकले. तू काय तसा लोफर मुलांसारखा वाटत नाहीये आणि तसेही माझे कोण काय बिघडवू शकत नाही . हे बघ हे तिथे माझे घर आहे. हा परिसर माझा नेहमीचा आहे , मी नेहमीच इथे येते. हे बकुळेचे झाड , माझं खूप आवडते. हवे तर तूच घाबरशिल मला, येह अपूनका इलाका है बाबू." ... प्रभाती हसतच आपली कॉलर टाईट करत बोलत होती. तिचं ऐकून विवेकला सुद्धा हसायला आले होते. 

"Okay उस्ताद , मान गये आपको....." विवेक तिच्या पुढे हात जोडत म्हणाला. आता ती सुद्धा खळखळून हसायला लागली. दिसायला तर ती खूप सुंदर होतीच अगदी कापसाची बाहुली वाटावी इतकी सुंदर आणि नाजूक, पण हसतांना ती जास्तच मोहक वाटत होती. विवेक तर भान हरपून तिला बघत होता. 

"बघत काय बसला आहेस? चल पुषप मार आणि थोडी एक्सरसाईज सुद्धा.." प्रभाती आपलं हसू आवरत म्हणाली. 

"चार दिवसात काय मी जॉन इब्राहिम होणारे काय?" विवेक हसत म्हणाला. 

"हा हा हा, ते तर तू बनेलच. इफेक्ट तू तर त्याच्यापेक्षा पण गुड लूकिंग आहेस. आणि त्यासाठी तर तुला नंतर खूप मेहनत घ्यावी लागेल. जिम जॉईन करावी लागेल. पण आता मी सांगते तेवढे कर. Exercise ने बॉडीला एक वळण येते, देहबोलीत खूप सुधारणा होते, आत्मविश्वास वाढतो आणि मुख्य म्हणजे खूप फ्रेश आणि एनर्जीटिक वाटते." प्रभाती. 

"बरं…ठीक आहे." विवेक.

"आधी आपण सूर्यनमस्कार पासून सुरुवात करुयात.. मग पुढे जाऊयात.." प्रभाती.

"ओके!" विवेक.

"मी जसे जसे करते, तसे मला फॉलो कर.." म्हणत प्रभातीने सूर्यनमस्कारची पोज घेतली. विवेक सुद्धा ती जसे जसे करत सांगत होती, तसे सगळे मन लावून करत होता. 

*****

          सिलेक्शनसाठी आता फक्त चार दिवस राहिले होते. विवेक जीव ओतून प्रॅक्टिस करत होता. प्रभातीने त्याला काही बुक्स आणायला सांगितली होती. थोडे पैसे उधार घेत त्याने पुस्तक विकत घेतली होती. त्यात मोठमोठ्या लोकांचे बरेच इंटरव्ह्यू होते. कशापद्धतीचे प्रश्न असतील, उत्तर कशी द्यायची, उच्चार कसे असावेत, बॉडी लँग्वेज कशी असावी अशी सगळी सखोल माहिती त्या बुक्समध्ये होती. 

           विवेक एका दुकानात काम करत होता. रात्री उशिरापर्यंत काम करून, 'सगळं काम भरून काढेल' त्याने मॅनेजरला सांगून खूप विनंती करून दुपारचे तीन ते सहा वेळची सुट्टीची परवानगी मिळवली होती. ते तीन तास तो प्रभातीसोबत प्रॅक्टिस करायचा. ती पण तिला जमेल तेवाढया उत्तम प्रकारे त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत होती. दोघांमध्ये आता चांगली मैत्री निर्माण व्हायला लागली होती. 

*****

"प्रभाती, तू पण फॅशन डिायनिंगमध्ये आहे काय? तुला सगळं खूप छान पद्धतीने येते." .... विवेक.

"नाही रे. इवा आणि मी मैत्रिणी. इवा श्रीमंत घरची, मी जेमतेम खाऊन पिऊन सुखी घरातली घरातली मुलगी. बारावी नंतर तिने डिझायनिंग जॉईन केले, तर मी आर्किटेक्चर. घरच्यांची इच्छा होती मी चांगलं काही शिकून लवकरात लवकर आपल्या पायावर उभे व्हावे. फीस तशी खूप होती, पण मला कॉलेज छान नावाजलेले मिळाले होते. म्हणून माझ्या वडिलांनी लोन घेऊन माझी एडमिशन घेतली होती. मी आणि इवा बेस्ट फ्रेंड्स होतो. ती डिझायनिंग शिकायची, प्रॅक्टिस करायची तर मी पण तिच्यासोबत तिचे ते सगळे ते बघत असायचे. कधी कधी तर ती मलाच तिची मॉडेल बनवत. तिने बनवलेले कपडे माझ्यावर ट्राय करत. मला असे चालून दाखव, तसे बोलून दाखव करत होती, आणि असेच शिकत गेले. म्हणून येते थोडे थोडे." ...प्रभाती. 

"ओह अच्छा..... छानच की , तू आर्किटेक्ट पण आहेस आणि फॅशन डिझाइनीगची ट्युटर सुद्धा. तुम्हा मुलींना सगळंच कसं जमते? ग्रेट यार!" ..... विवेक.

"हम्म!" प्रभाती.

"मग तुम्ही इतक्या छान फ्रेंड्स आहात, तरी असे वेगळे का झालात? त्या इवा मॅडम पण बोलून चांगल्या वाटल्या. म्हणजे मला थोडा attitude जाणवला, पण आता इतक्या लहान वयात आपल्या प्रोफेशनमध्ये इतकं सक्सेसफुल होणं म्हणजे पण खायची गोष्ट नाहीये. जाम मेहनत केली असणार..तेव्हाच सक्सेस पायाशी लोळण घातले आहे. तर मग इतना attitude तो बनता ही हैं. आणि तुला सांगू त्यांना तो शोभतो पण." विवेक. 

"हो, attitude तर आहेच. असायला पण हवाच, तशी गोडच आहे माझी मैत्रीण." प्रभाती. 

"हो ना? मग तुमच्यातला प्रोब्लेम सोडवून घ्या की लवकर. प्रभाती आणि इवा सोबत कसल्या भारी दिसतील!" विवेक. 

"बघू ते. चल खूप टाईम पास झाला, उद्या आहे ना सिलेक्शनची प्रोसेस? एकदा परत सगळी प्रॅक्टिस कर आणि ते बुक्स नीट वाचून घे. मी इथे बसते आहे. " ... प्रभाती. 

"ओके बॉस!" ....विवेक परत सगळं एकदा करून बघत होता. त्याला अशी मेहनत करतांना बघून प्रभातीच्या चेहऱ्यावर बरेच समाधान झळकत होते.