Love U Zindagi
भाग 7
पूर्वार्ध :
विवेक फॅशन शोमध्ये पहिला आला होता. त्याला what is life? असा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि त्याने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले होते. त्याच्या उत्तराने सगळ्यांना जिंकून घेतले होते. तो आपली ही आनंदाची बातमी प्रभातीला सांगायला आला होता.
आता पुढे:
" हो .... पहिला आलोय शो मध्ये, इवा मॅडम खूप खुश झाल्या. माझे खूप कौतुक करत होत्या. त्यांच्या तोंडून आपले कौतुक ऐकून खूप भारी वाटले , कारण त्या सहजासहजी कोणाचे कौतुक करत नाही असे ऐकले आहे. एक वर्षाचा बाँड साईन केला आहे , बारा लाख मिळतील . त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स, ऍड वैगरे असतील ते करायचे आहे." विवेक.
"अरे वाह.." प्रभाती.
"हम्म आणि एक इंटरनॅशनल मेन स्पर्धा आहे,मी त्यात भाग घ्यावा, अशी इवा मॅडमची इच्छा आहे. कठीण आहे, सगळ्या देशातून मॉडेल्स येतील. पण मॅडमचे म्हणणे आहे की जर यात हायलाईट झाले तर माझं करिअर खूप उंचीवर जाईल. पण एक प्रॉब्लेम झाला आहे." विवेक.
" काय प्रोब्लेम आहे?" प्रभाती.
" म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे , पण मलाच आपले वाटत आहे. सहा महिने तरी इवा टीम सोबत भारता बाहेर जावे लागणार आहे." विवेक.
" अरे हे तर मस्तच आहे की. कामासोबतच तुला जग बघायला मिळेल. वेगवेगळी लोकं भेटतील , खूप काही शिकायला मिळेल." प्रभाती.
" हो , पण मग तुला भेटता नाही येणार?" विवेक.
"धत् ! ' खोदा पहाड , निकाल चुहा ' अरे इथे कोणासाठी थांबायचं नसतं, संधी मिळाली आहे ना , त्याचा पुरेपूर वापर करायचा. परत परत अशी संधी चालून येत नसते." प्रभाती.
"तुझ्याकडे फोन पण नाही, मग तुझ्यासोबत बोलता सुद्धा नाही येणार. ए ऐक ना, खूप पैसे मिळाले आहे, एक फोन आणून देऊ काय ग तुला?"
"फोन नको रे , घरी आवडत नाही. तू ये परतून, मग आपण भेटूया." प्रभाती.
"ह्मम , आता तुझी खूप सवय झाली आहे. तुझ्यावर प्रेम करायला लागलोय . का मला तुला सोडून जायचा मोठा प्रोब्लेम वाटतो आहे?" विवेक तिच्याकडे बघत मनातच विचार करत होता.
"हो ग, जाणार तर आहेच , कारण मला पैशांची सुद्धा खूप गरज आहे. आता आपली छान मैत्री झाली ना , तर तुझ्या गोष्टी मला आठवत असतात." विवेक.
त्याच्या डोळ्यांतले भाव तिला काहीतरी सांगत होते, तो बोलत होता तेव्हा ती एकटक त्याच्याकडे बघत होती.
"मग ठेव की आठवणीत मला , कोण म्हणतंय विसरायला? आणि हम वैसे भी भुलनेवाली चीज नही है." प्रभाती हसत म्हणाली.
" तू तर आता नेहमीच हृदयात असते ग, तुला कसे विसरणार? कसे सांगू तुला तुझ्यापासून आता दूर रहावल्या जात नाही . प्रोजेक्ट संपवून परत आलो आणि थोडीफार घरादाराची सोय झाली, तुझ्या योग्यतेचा झालो की माझ्या मनातले तुला नक्कीच सांगेल." तो तिच्या अवखळ हसऱ्या चेहऱ्याकडे बघत मनातच विचार करत होता.
"काय रे , काय बघतोय? " प्रभाती.
" काही नाही. प्रभाती तू तुझ्याविषयी कधी बोलली नाही ग? कधी काही सांगितले नाही?" विवेक.
" काय रे? जे सांगण्यासारखे होते ते सांगितले की. बाकी काही नाही." प्रभाती.
"प्रभाती ssss.... का ग तू जेव्हा पण भेटते तेव्हा हाच एक ड्रेस घातलेला असते?" विवेक तिचे निरीक्षण करत म्हणाला.
"अरे सांगितले होते ना घरची परिस्थिती पाहिजे तशी नाही, आणि माझ्या जवळ हाच एक चांगला ड्रेस आहे, म्हणून मग हाच घालते." प्रभातीने वेळ मारून नेली.
"चल मग दुकानात जाऊया, तुझ्यासाठी ड्रेस घेऊया." विवेक.
"अरे नाही रे , नको. ठीक आहे हे." प्रभाती.
"अग, माझ्या यशामध्ये तुझा वाटा सगळ्यात जास्त आहे, मी तुला ऐवढे गिफ्ट तर देऊच शकतो." विवेक.
"अरे नकोरे बाबा, माझ्या घरी नाही आवडणार . मी जशी आहे तशी ठीक आहे. आणि कपड्यांवरून, वस्तूंवरून मोठेपणा मिरावण्यापेक्षा आपल्या स्वभावातून , आपल्या कामातून आपण श्रीमंत असलो पाहिजे, नाही काय?" प्रभाती.
" मॅडम, बस करा तुमचं प्रवचन, सगळं सगळं कळले आहे बरं काय. तुम्ही एकदा सुरू झाल्या की थांबायचे नावच घेत नाही." विवेक बिचारा चेहरा करत म्हणाला.
" हो रे. " प्रभाती त्याला बघून हसत होती.
" बरं चल जातो आता. दुकानातले राहिलेली काम पूर्ण करतो , आणि त्यांना दुसरा माणूस शोधायला सांगतो. घरी आईचे आणि बहिणीचे पण सगळं नीट सोय लावून देतो. मग वेळ मिळणार नाही. " विवेक.
" ठीक आहे .... चल बाय." म्हणत प्रभाती पुढे गेली , विवेक सुद्धा आपल्या घराकडे निघाला.
विवेक घराकडे निघाला होता की रस्त्यात त्याला एका गाई बकरी चरायला घेऊन जाणाऱ्या माणसाने थांबवले.
"काय रां पोरा, हिकडं कशापायी येतो? खूपदा दिसला हिकडं. ही चांगली जागा नाय पाय, खूप लोकायने आत्महत्या केली हितून. तू पण तसाच काय करायला तर येत नाय ना?" गुराखी विवेकला म्हणाला.
"नाही नाही, मी तसे काही नाही करत. मित्र राहतो इकडे, त्यालाच भेटायला येतो." प्रभातीच्या घरच्यांना आवडत नाही म्हणून त्याने मित्र सांगून वेळ मारून नेली.
" बरं बरं. पण आता लक्षात ठीव, दुसरं कुठेतरी भेटा, हितं नको. वाईट जागा हाय ही , भुतं फिर्त्यात हिकडं." गुराखी म्हणाला.
"काय हो मामा, असं भूत वगैरे काय नसतं बघा." विवेक.
"आर लय लोकास्नी अनुभव आलाय, हिकडं नदीजवळ गेलं का कोणतरी हात ओढतया म्हणे." गुराखी म्हणाला.
"मग चांगला भूत दिसतोय मामा. लोकांना वाचवतात ना ती भुतं? माणसापेक्षा चांगली दिसतंया ही भुतं. आहो मामा, इथे माणसाने माणसाचं जिण हराम करून ठेवले आहे, भुतं पण काय नाय करू शकत इथल्या राक्षसांना.." विवेक.
"ते तर हायेच की म्हणा. " गुराखी.
"बरं किती भुतं आहेत इकडे?" विवेक.
"ते काय माहित नाय. बरं काळजीनं रहा तेवढच सांगायचं व्हतं." गुराखी बोलून निघून गेला.
" आपण जवळपास काही महिन्यांपासून इकडे येतोय, आपल्याला तर असे कधी जाणवले नाही. प्रभाती पण येते, तिचे तर घर आहे तिथे, तिने पण असे कधी सांगितले नाही. इथे खूप लोकांनी आत्महत्या केलीय म्हणून असेल अशी अफवा पसरलेली." विवेक आपल्याच विचारात घरी पोहचला.
*****
दुकानात विवेकचे जंगी स्वागत झाले. सगळ्यांना विवेकचे कौतुक वाटत होते. त्याचा मालकांनी सुद्धा त्याचा यशासाठी त्याला छोटेसे गिफ्ट दिले. मालक नाही म्हणत होते तरी विवेकने त्याचे दुकानातले सगळे राहिलेले काम आटोपले होते. आईची आणि लहान बहिणीची नीट सगळी सोय करून दिली होती. आईला डॉक्टरकडे घेऊन जाऊन तिची ट्रीटमेंट सुरू केली. लहान बहिणीला सगळं नीट समजावून सांगितले. तो इथे नसतांना आईची नीट काळजी घे म्हणून बजावून सांगितले. त्याचा मित्राची ओळख करून दिली, काही मदत लागली तर मित्र हाजिर होता. बहिणीला कॉलेज सुरू करून दिले. सोबतीला कॉम्प्युटरचा एडवान्स कोर्स लावून दिला. पासपोर्ट , व्हिसा इवा फॅशन हाऊसच्या मदतीने लवकर मिळाला होता. एक दिवसाने सिंगापूरसाठी निघायचे होते. म्हणून तो एकदा प्रभातीला भेटायला म्हणून पुलाजवळ आला होता. येत होता तर त्याला प्रभाती पुलाच्या काठावर एका महिलेसोबत बोलतांना दिसली. तिचे बोलणे होईपर्यंत तो तिथेच दूर उभा राहिला. ती महिला तिथून गेली , तसा तो प्रभाती जवळ गेला.
" काय ग , कोण होती ती बाई? आणि ती रडत का होती? " विवेक तिथे येत प्रभातीला विचारू लागला.
****
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा