पुस्तकाचे नाव : माध्यम
लेखक : सुहास शिरवळकर
लेखक : सुहास शिरवळकर
मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध साहित्यिक म्हणजे सुहास शिरवळकर. सामाजिक, प्रेम, रहस्य, गुप्तहेर कथा, लघुकथा, इ. लेखनप्रकारात सुशिंचे बरेचसे लिखाण प्रकाशित झालेय. ऐतिहासिक, एकांकिका, बालसाहित्य, कविता, नभोनाट्य, इ. प्रकारातही त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. त्यांनी दिडशेहून अधिक रहस्यकथा लिहूनही प्रत्येक वेळी त्यांच्या रहस्यकथा वाचताना काहीतरी नवीन वाचायला मिळते. हेच इतर प्रकारच्या साहित्याबाबतही म्हणावे लागेल. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठही विशेष असायचे. तसे तर त्यांच्या कथेतील प्रत्येक पात्र मनात घर करून जाते; पण त्यांची बॅरिस्टर अमर, मंदार पटवर्धन, दारा बुलंद, इ. पात्रे तर अजरामर म्हणावी लागतील. 'दुनियादारी' तर आज चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच जणांपर्यंत पोहोचली आहे. मात्र सुशिंची कादंबरी स्वरूपातील दुनियादारी वाचण्याची मजा काही औरच! हेच 'समांतर'बाबतही. 'देवकी'ची लोकप्रियता सर्वांनी अनुभवली आहेच. एकूणच काय, तर सुहास शिरवळकर आणि त्यांच्या साहित्याविषयी जितके बोलू तितके कमीच.
'माध्यम' ही कादंबरी वाचताना सर्वात आधी जर काही लक्ष वेधून घेत असेल तर ते म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ. सुहास शिरवळकर यांच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकाचे मुखपृष्ठ काहीसे वेगळे वाटते. एका टोकाला कुठेतरी बघत चाललेला एक लहानसा मुलगा आणि दुसऱ्या टोकाला ते पिंपळाचे रोप. सोबतीला गडद अक्षरात दिमाखात मिरवणारे 'माध्यम' हे शीर्षक. मलपृष्ठावर असलेले सुहास शिरवळकर यांचे छायाचित्र अन् त्या काही 'स्पेशल' ओळी... हे सर्व वातावरण लेखकाला नक्की काय सांगायचे असेल असा प्रश्न निर्माण करते आणि अर्थातच मनामध्ये हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.
ती, तिची स्वप्न-सृष्टी आणि खूप साऱ्या प्रश्नांपासून या कादंबरीची सुरुवात होते. ही आहे अवी आणि सुलूची कहाणी. सुरुवातीच्या काही प्रसंगांमधून गेल्या बारा वर्षांमध्ये या दोघांच्या आयुष्यात काय झाले, त्यांचे आयुष्य साधारण कसे आहे हे थोडक्यात कळते. हे वाचत असताना अवी आणि सुलूचे हळुवारपणे उलगडणारे नाते मनाला भावते.
सुलूच्या मनात असलेली इतक्या वर्षांनंतरही आई न होण्याची सल नकळत वाचकांच्या मनातही भावनिक ओल निर्माण करते. बायकांची कुजबुज, हुस्ना बी आणि करीम चाचाचे ते घृणास्पद बोलणे ऐकून तर मनाला चटके बसतात. पुढे अवी आणि सुलूने तपासणी केल्यानंतर कळते की दोष तर दोघांमध्येही नव्हता. जसजसे कथानक पुढे जाते तसे सुलूने अवीच्या नकळत केलेले देवादिकांचे उपाय पाहायला मिळतात अन् सोबतच तिला मिळालेले अपयशही! अशातच उपायांच्या वाटेवर चालताना अचानक सुलू अविचारी मार्ग अवलंबते. अशा अविचारी मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक भरपूर भेटतात हे वाक्य मनापासून पटले. ते झोपडपट्टी आणि भगताचे वर्णन, संभाषण अन् सुचवलेला उपाय हे सगळे वाचताना ते किळसवाणे चित्र नजरेसमोर उभे राहते. मात्र असे उपाय करूनही सुलूच्या नशिबात निराशाच होती.
सुदैवाने म्हणावे की दुर्दैवाने; पण शेवटी सुलूला तो जालीम उपाय मिळतो. जोगतिणीचा उपाय! अमावस्येच्या रात्री बारा वाजता सुलूचा गावाबाहेर जाण्याचा प्रवास तर वाचकांना काळजीत पाडणारा आहे. स्मशानाचा उल्लेख येताच मनातील विचारचक्र वेगाने पुढे जाते. मग येते शंकराचे मंदिर आणि अखेर पूर्णत्वास गेलेला तो उपाय! हो, पूर्णत्वास गेलेलाच म्हणावा लागेल. कारण चांगले महिनाभराचे आजारपण पुरवून का होईना; पण अखेर या उपायानंतर इच्छित फळ मिळाल्याची वार्ता कळते.
कथानक पुढे जाते तसतसे बरेच काही समोर येते. आतापर्यंत सुखद वाटणारी बातमी आता मात्र विचार करायला भाग पाडते. सुलूचे अघोरी डोहाळे अन् ते वर्णन तर शिसारी आणणारे अन् मनात किंचित भय निर्माण करणारे ठरतात. मानवी मनाशी, माणुसकीशी सांधणारा दुवा गळून पडण्यासारखे नक्की काय घडले हे वाचणे उत्कंठा वाढवणारे आहे. हिज डे नाईट बघताना तर सुलूला त्यात स्वतःचीच प्रतिमा दिसते; पण अवीच्या डॉक्टर मित्राच्या सल्ल्यामुळे इन्टरव्हलनंतरचा चित्रपट मात्र त्यांना पाहता येत नाही. भविष्याचे अंदाजे चित्र कळलेले योग्य ठरले असते की ते न कळलेलेच बरे होते याबद्दल तर कादंबरीचे कथानक शेवटापर्यंत जाते तेव्हाच मत व्यक्त करता येते.
अखेर तो क्षण येतो. अमावस्येच्या रात्री बरोबर बारा वाजता जन्मलेला 'तो' ज्याच्या तोंडात जन्मतः चार सुळे होते. त्यामुळे जन्मापासूनच त्याच्याविषयी एकच चर्चा रंगायची, ती म्हणजे त्याच्या अभद्र लक्षणाची! आणि काही गोष्टी लपत नाही म्हणतात तेच खरे. पुढे बारशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बायकांच्या नानाविध चर्चांना उधाण येते. शेवटी मात्र तिथे शांतता पसरली ती एका नावाने... भूतनाथ!
गेल्या काही महिन्यांपासून अचानक सुलूला तो पिंपळ जवळचा वाटू लागलेला. कथानकात गुंतल्यावर त्या पिंपळाआड नक्की कोणता चेहरा दडलाय हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. मनात विचार रुंजी घालतो की भूतनाथचा जन्म होण्यामागची कहाणी, हाही व्यभिचार होता का?
इकडे नाथा मात्र याही वयात भलतेच गुण दाखवत होता. लहान मुलासारखा निरागसपणा? छे! त्याच्याबाबतीत तर सारेच अमानवी होते. पुढे एका अघटित प्रकाराने तर सुलू कितीतरी वेळ बेशुद्धच असते. त्यानंतर मात्र तिचे विचारचक्र आणखीनच गतिमान झाले. ते इतके की आता ती मनातल्या मनात भगवान शंकराला विनवणी करत होती, हट्ट करत होती, त्याचे दान परत घेण्यासाठी!
चार महिन्यांच्या नाथाने स्वयंपाकघरात केलेला पराक्रम आणि त्यावर सुलूचा रागराग, साधेपणाने पण अतिशय परिणामकारक पद्धतीने मांडले आहेत. या सगळ्या घडामोडी अवीला सांगायच्या की नाही हा सुलूच्या भावनांचा कल्लोळ वाचकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचतो. मात्र या प्रसंगानंतर नाथाच्या डोळ्यांतली खुन्नस, ते रात्रीच्या वातावरणाचे वर्णन आणि नाथाच्या अंगावर हात टाकण्याचा जाब विचारण्यासाठी अखेर तिच्यासमोर आलेला 'तो'... हे सर्व वाचून अंगावर शहारे येतात.
त्याच्या येण्याने सुलूसमोर झालेला एक उलगडा, जो तिला स्वतःलाच ऐकवेनासा होतो. त्याने स्पष्ट शब्दांत दिलेली धमकी आणि असहाय ती, त्याची दुर्गंधी अन् भेसूर हसणे हे सर्व एक वेगळेच वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तिला आणखी बारा वर्षे नाथाला सांभाळायचे होते; पण एकूणच परिस्थिती पाहता तिला खरेच हे जमणार होते? उपायाखातर अखेर सुलू आणि त्याच्यात एक सलोखा झाला. त्यानुसार तो तर त्याच्या वचनाला जागत होता. सुलूचे मन मात्र शापित मातृत्वाच्या विळख्यात भटकंती करत होते. तरीही कुठेतरी तिच्यातली आई, आईची माया वरचढ ठरली आणि न राहवून तिने नाथाला जवळ घेतले; पण तिच्या आयुष्यात हेही एकप्रकारचे क्षणिक सुख होते. कारण 'तो' त्याच्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करत होता. त्याने आपली जबाबदारी पार पाडलेली खरी; पण ते किळसवाणे दृश्य पाहून सुलूच्या मनात जागलेल्या मायेला वास्तवाची जाणीव झाली, हेही तितकेच खरे.
याच किळसवाण्या प्रकारामुळे अवीच्या मनात मात्र नकळत काही विचार घर करतात. कथानक शेवटच्या टप्प्यात येते आणि अशातच वसंतराव नावाचे सामाजिक कार्यकर्ते घरी येऊन त्याच्यासमोर भलताच खुलासा करतात. त्यांच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन अखेर अवीला बरेच काही कळते. असे काही, जे सुलूने आतापर्यंत लपवून ठेवलेले. या प्रसंगानंतर मात्र सुलू सगळे काही कबूल करते. तिच्या चेहऱ्यावर त्याचे समाधानही उमटते. अवीची त्यानंतरची प्रतिक्रिया पाहून नकळतच त्याच्याविषयीचा आदर बळावतो. अवीने सुचवलेला उपाय आणि तो उपाय पूर्णत्वास नेणे, पुन्हा एकदा थरारक वाचन अनुभव देतात.
दुसऱ्या दिवशीची सकाळ मात्र सुलूला जुन्या पुसट झालेल्या घटनेची आठवण करून देणारी होती. शेवटी एक जुनी अमानवी घटना नव्याने घडते. कोणाचीतरी रक्ताची तहान शमत असताना जणू काही जुने बोल खरे ठरत होते.
रहस्यकथा म्हटले की रहस्याची योग्य गुंफण महत्त्वाची ठरते. सुहास शिरवळकर यांच्या इतर रहस्यकथांसारखीच ही कथासुद्धा उत्तम आहे. रहस्याची मांडणी आणि एकूणच कथानक पाहता कुठेही किचकटपणा जाणवला नाही. कथेतील रहस्य, आवश्यक गूढ कायम ठेवणे लेखकाला उत्तमरीत्या जमले आहे. त्यांचे लहानसहान गोष्टी लक्षात घेऊन केलेले लिखाण मला नेहमीच आवडते. एका प्रसंगातील आवश्यक असलेला अर्वाच्य भाषेचा वापरही मर्यादा सांभाळून केलाय हे जाणवले. मूल नसलेल्या स्त्रीला समाज कसे वागवतो याचे वर्णनही उत्तम केले आहे. या रहस्यकथेत नवराबायकोतील प्रेमाच्या नात्याचे पैलूही दिसतात अन् सामाजिक दृष्टिकोनही दिसतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच असलेले 'जे नशिबात नाही, त्याच्याकरता दुःखी होऊन जीवनातला असलेला आनंद गमावण्यात काय मजा आहे?' हे सकारात्मक वाक्य मनापासून आवडले. कथानकाच्या शेवटापर्यंत येताना 'माध्यम' या नावाचा आणि मुखपृष्ठाचा अर्थ लक्षात येतो. भाषाशैली, कल्पनाशक्ती, मांडणी, आशय सर्व काही नेहमीप्रमाणेच वाखाणण्याजोगे आहे. अशा प्रकारच्या लेखनप्रकारात न रमणाऱ्या व्यक्तींना यातील काही गोष्टी कदाचित फारशा पटणार नाहीत; पण रहस्यकथेचा विचार करता हे नक्कीच एक उत्तम कथानक आहे.
जोगतिणीचा उपाय नक्की काय होता? अघोरी आणि किळसवाणे असे नक्की काय घडले? 'तो' कोण होता? अशा अनेक गोष्टींचा उलगडा होण्यासाठी ही अवी आणि सुलूच्या जोडीची मूल, समाज, मनाची स्थिती, रहस्यमय वातावरण, इ. बाबींनी परिपूर्ण कादंबरी वाचून पहा.
© कामिनी खाने
८ फेब्रुवारी २०२५
८ फेब्रुवारी २०२५
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.