Login

माऊली-एक मायेची सावली. भाग-सहावा. (मराठी कथा)

मातृत्वाची कसोटी.

माऊली-एक मायेची सावली. भाग-सहावा.

नंदिनीच्या जाण्याने फक्त मुलांवरच मातृछत्रचं हरवलं नव्हत, तर सयाजीची अर्धांगिनी त्याला सोडून गेली होती, आई आपल्या मुलीसारख्या सुनेला मुकली होती. तसेच पाटलाचा वाडा भकास झाला होता.एरव्ही छतावर बसणाऱ्या पाखरांनी तिकडे पाठ फिरवली होती. एकूणच सगळीकडे मरगळ पसरली होती.

 दोन मुली आणि एक नुकतंच जन्मलेलं मुल आईच्या सावलीसाठी आसुसली होती. रणरणत्या तप्त वाळूवर जसा मासा तळमळतो तशी अवस्था त्यांची झाली होती. त्यांना आईच्या मायेची, ममतेच्या ओलाव्याची गरज होती. त्यासाठी सयाजीचं दुसरं लग्न जुळवायची लगबग सुरु होती. मुली खूप येत होत्या, पण सयाजीच्या अटीत बसणारी अजूनही भेटत नव्हती. अशातच काही दिवसांनी सयाजीचा मामा सर्जेराव एका मुलीची माहिती घेऊन आला होता.

आणि आपल्या बहिणीला म्हणजेच आईला म्हणाला,

"ताई, आपल्या सयाजीसाठी जशी मुलगी शोधत होतो ना अगदी तशी मुलगी माझ्या नजरेत आहे."

आई म्हणाली,

"कोण आहे अशी मुलगी? नाव गाव काय आहे तिचं?"

सर्जेराव म्हणाला,

"ताई, मी पोरगी नाही पाहिली पण तिच्याबद्दल थोडी माहिती समजली म्हणून सांगायला आलो होतो."

आई म्हणाली,

"कसली माहिती मिळाली?"

सर्जेराव म्हणाला,

"ताई,आमच्या शेजारच्या गावी म्हणजेचं कडेगावमध्ये नाना मोहिते यांची एक मुलगी आहे. ती आपल्या सयाजीसाठी योग्य आहे.आपण बघायची काय?"

आई प्रश्नार्थक चेहरा करून विचारलं,

"अरे पण ती आपल्या सयाजीशी लग्नाला तयार होईल काय?"

सर्जेराव म्हणाला,

"ताई तिचीसुद्धा काहीतरी अडचण आहे, असं मला समजलंय.मी ज्यादाची माहिती काढतो. त्यानंतर आपण एकदा जाऊन यायला काय हरकत आहे?"


 

आई म्हणाली,

"ठीक आहे. तू लवकरात लवकर माहिती काढ.जमत असलं तर लवकर उरकून टाकू. या लेकरांची आबाळ मला बघवत नाही रे."

"ठीक आहे."

म्हणून सर्जेरावने निरोप घेतला आणि तो आपल्या गावी परतला.

आईने सयाजी घरी आल्यावर त्याच्या कानावर ही गोष्ट घातली.

सयाजीच्या पोटात गोळा आला, मनात कालवाकालव झाली.नंदिनीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला. डोळे निर्झर बनून वाहू लागले. अशातच लहानग मुलं रडू लागलं आणि सयाजी भानावर आला.आईला काहीच न बोलता जणू सगळ्याला मूकसंमती देऊन तो बाळाला घ्यायला गेला.

दुसऱ्याच दिवशी सर्जेरावाचा कॉल आला तो आईला सांगत होता.

सर्जेराव-"हॅलो ताई, मी त्या मुलीची माहिती काढली आहे. तिचं नाव भैरवी आहे,बारावी सायन्स शिकली आहे."

आई-"अरे हो, पण तू काहीतरी अडचणीबद्दल बोलत होतास ना? ती समजली काय? "

सर्जेराव-"हो माहिती मिळाली.तिला कधी मुल होणार नाही असं डॉकटरनी सांगितलं आहे. त्यामुळे तिचं कुठे लग्न ठरत नाही,म्हणून तिच्या घरचे आता घटस्फोटित किंवा विदुर जोडीदार शोधत आहेत."

आई-"तस असेल तर आपण बघायला हरकत नाही. तू त्यांच्याशी बोलून घे आणि कधी बघायला जायचं ते ठरवून मला सांग."

"ठीक आहे." म्हणत सर्जेरावने फोन ठेवला.

सर्जेरावने सगळी बोलणी करून बघण्याचा दिवस ठरवला आणि त्यादिवशी सर्जेराव,त्याची बायको पार्वती, सयाजी आणि आई लहानग्या मुलासहित कडेगावला निघाले. श्वेता आणि शुभ्रा यांना आवरून शाळेला पाठवलं होतं. त्यामुळे त्यांच काही टेन्शन नव्हतं.पण सयाजीच्या मनात अनामिक भीती दाटून आली होती. आणि ही भीती साहजिकच होती. एका अनोळखी गावात अनोळखी मुलीला दुसऱ्या लग्नासाठी मागणी घालायला जाणे म्हणजे थोड अवघड काम होतं. पण त्याला इलाज नव्हता. मुलांसाठी सयाजीला या परिस्थितीला तोंड द्यावंच लागणार होतं.

सयाजीकडे पाहून आई म्हणाली,

"सयाजी बाळा, तू अजिबात काळजी करू नको. आपण तिचंपण चांगलंच करण्यासाठी लग्नाची मागणी घालत आहोत.तू संकोच नको बाळगू."

सयाजीने फक्त मान हलवून सहमती दर्शवली.

यावर सर्जेराव म्हणाला,

"अरे त्यात संकोच कसला बाळगायचा? प्रत्येकाला काहीनाकाही अडचण असतेचं. आपण ती धरून न बसता एकमेकांच्या साथीने त्यातून मार्ग काढायचा असतो.तू बिनदास्त रहा, मी आहे."

आताही सयाजीने होकारार्थी मान हलवून सहमती दाखवली.

नकळत सयाजीच्या डोळयांतून एक थेंब त्याच्या हातावर पडला आणि हातावर पसरला. काहीवेळात तो धूसर होतं होतं नाहीसा झाला. कदाचित नंदिनीच दुःखही असच हळूहळू धूसर होईल असा संदेश तर तो देत नसावा. असा प्रश्न सयाजीच्या मनाला पडला होता.

या विचारात सयाजी असताना गाडी कडेगावच्या प्रवेशद्वारातुन आत आली आणि गाडीपाठोपाठ धुळीचा लोट हवेत पसरू लागला. जणू भूतकाळाच्या धुरळयाला मागे टाकून वर्तमानाची गाडी भविष्याच्या दिशेने धावत होती.

बघता बघता गाडी नाना मोहितेंच्या दारात येऊन थांबली.

गाडी थांबताच सयाजी भानावर आला. एकएक करतं सगळेजण गाडीतून खाली उतरले. नाना मोहिते आणि परिवार त्यांच्या स्वागतासाठी दारात आले. परंपरेप्रमाणे त्यांनी सर्वांना पाण्याचा तांब्या भरून दिला. पायावर पाणी घेऊन झाल्यावर सगळे आतमध्ये गेले.

नाना मोहित्यांनी बोलायला सुरवात केली,

"रामराम मंडळी, प्रवास कसा झाला म्हणायचा? रस्ता जरा खराब झालाय म्हणून जरा काळजी वाटली. काही गैरसोय झाली नाही नव्ह?"

सर्जेराव म्हणाले,

"प्रवास अगदी छान झाला, काहीच अडचण नाही आली आणि रस्त्याचं म्हणत असाल तर आपल्याला खड्डे चुकवत यायची सवयच आहे."

सर्वत्र हशा पिकला. सयाजीसुद्धा चेहऱ्यावर उसनं हसू आणत हसला.

दरम्यान सरबताचा कार्यक्रम पार पडला आणि सर्जेरावान मुळ विषयाला हात घातला.

सर्जेराव म्हणाला,

"पाहुण मी सर्जेराव शिंदे-पाटील,ही माझी बायको पार्वती, ही माझी बहीण आणि हा माझा भाचा सयाजी.तर आता मी मुळ विषयाला हात घालतो.

हा माझा भाचा सयाजी, एक उमदा, देखणा आणि कर्तुत्ववान मुलगा पण नियतीने त्याच्याशी अगदी वाईट खेळ खेळला आणि याची बायको लहानगा मुलगा पदरात टाकून देवाघरी निघून गेली.या मुलांना आता आईच्या मायेची गरज आहे तशीच सयाजीलाही आयुष्यभराच्या जोडीदाराणीची गरज आहे. तरी आम्ही त्याबद्दल तुमची मुलगी 'भैरवी' हिला मागणी घालायला आलो आहोत. तिला आमच्या घरी काहीच कमी पडणार नाही. जे आहे ते सगळं तिचंच असेल. अगदी सुखात राहिल ती आमच्या घरी."

हे ऐकून घेत नाना मोहिते म्हणाले,

"होय पाव्हणं,आम्हाला मध्यस्थीकढून सगळी माहिती मिळाली आहे आणि तुमालाबी त्यांनी माहिती दिली आहे. नशिबानं दोघाना या परिस्थितीत आणून ठेवलंय मग यातून आपल्याला मार्ग काढून द्यायलाच हवा. शेवटी सगळी देवाची इच्छा.जर त्या दोघांची तयारी असलं तर मगं आता आमाला काय अडचण असणार?"

यावर सर्जेराव म्हणाले,

"पाहुण मग बोलवा मुलीला बाहेर, एखादा समोरासमोर चर्चा होउदे."

नाना मोहित्यांनी आतमध्ये आवाज दिला,

"अयं ऐकलं का? भैरवीला बाहेर घेऊन या."

दोनच मिनिटात भैरवी बाहेर आली आणि समोर येऊन नमस्कार करून पाटावर बसली.

सावळा रंग पण नितळ कांती, सरळ टोकदार नाक, बदामी डोळे, नाजूक ओठ असणारी जास्त मेकअप न केलेली भैरवी हिरव्या साडीत मनमोहक आणि नैसर्गिक सुंदर दिसत होती. सयाजी अजून मान खाली घालूनच बसला होता.

नाना मोहिते म्हणाले,

"पाव्हणं काय विचारायचं असेल ते विचारून घ्या आणि पाहूनपण घ्या. नंतर पुन्हा शंका नको."

यावर सर्जेराव म्हणाले,

"मुली तुझं नाव काय?"

"भैरवी नानासो मोहिते."

भैरवीने नाजूक आवाजात उत्तरं दिल.

सर्जेराव म्हणाला,

"शिक्षण आणि वय किती?"

"शिक्षण बारावी आणि वय अठ्ठावीस वर्ष."

तिने सांगितलं.

त्यावर सर्जेराव म्हणाले,

"सयाजी तुला काही विचारायचं आहे काय?"

सयाजी लक्खदिशी हलला आणि म्हणाला,

"न न न नाही काही नाही."

यावर सर्जेराव हळूच सयाजीला म्हणाला,

"बाळ सयाजी मुलगी पाहून घे आणि तुला काय विचारायचं असेल तर विचार.नंतर पुन्हा काही अडचण नको."

सयाजी म्हणाला,

"मला यांच्याशी दोन मिनिटे एकांतात बोलायचं आहे."

यावर नाना मोहिते म्हणाले,

"होय,होय,जावा की बोलून घ्या.बाळ यांना पाठीमागच्या अंगणात घेऊन जा."

भैरवीने उठून जागेवरूनच सर्वांना नमस्कार केला आणि ती पुढे चालू लागली तसा सयाजी तिच्या मागोमाग गेला.

पाठीमागे जाताना घरात उपस्थित सर्व बायका सयाजीला न्याहाळत होत्या. ते पाहुन सयाजीला अवघडल्यासारखं झालं. तो इकडेतिकडे न बघता सुसाट भैरवीच्या मागे गेला.

भैरवी एका झाडाजवळ जाऊन उभी राहिली, सयाजीही तिथे जाऊन थांबला.

थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.मग सयाजीनेच विषय काढला.

सयाजी:"तुम्ही बारावी नंतर शिक्षण बंद का केलंत?"

भैरवी:"गावातून शहरांत येण्याजाण्याला खूप गैरसोय होतं होती,म्हणून केलं बंद."

सयाजी:"ठीक आहे. मी आता काही गोष्टी सांगणार आहे त्या नीट ऐकून मग मला उत्तर द्या."

भैरवी:"ठीक आहे."

सयाजी:"माझी बायको नंदिनी मुलाला जन्म देताना देवाघरी गेली. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर, म्हणजे आजही आहे. पण दोन लहान मुली आणि एक तान्हुलं बाळ ज्याचं अजून नामकरण सुद्धा केलेलं नाही,अशीं माझी मुलं आईच्या प्रेमाच्या सावलीसाठी आसुसली आहेत. माझ्याशी लग्न करून तुम्ही त्यांना स्वतःच्या मुलांसारखी माया लावू शकाल का?त्यांना मातृत्वाचं दान द्याल काय? माझ्याकडून तुम्हाला पत्नी म्हणून सगळे अधिकार, सगळ सुख मिळेल. आमच्याकडून प्रेम,माया,जिव्हाळाही मिळेल. फक्त माझ्या मुलांसाठी तुमच्या ममतेची भीक माझ्या फाटक्या झोळीत घाला.एक हतबल बाप तुमच्यापुढे हात पसरतोय."

एका असहाय्य बापाची अगतिकता पाहून भैरवीला गहिवरून आलं.

भैरवी:"अहो असे हात नका जोडू.प्रत्येकाच्या आयुष्यात काहीनाकाही अडचणी येतच असतात. म्हणून आपण अगतिक न होता धैर्याने सामोरं जायला हवं. एकमेकांना साथ देऊन, मदतीचा हात देऊन सावरून घ्यायला हवं. मलाही काही अडचणी आहेत. डॉकटर म्हणालेत की माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी कधी आई होऊ शकत नाही. दुनियाभरची औषधं झाली, देवधर्म झाले पण तो प्रॉब्लेम सुटला नाही. मग मी आणि माझ्या घरच्यांनीही ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे.मी तुमच्या प्रस्तावाचा नक्की विचार करेन आणि लवकरात लवकर तुम्हाला सांगेन."

सयाजी:"ठीक आहे. मी वाट पाहीन."

सयाजीला भैरवी समजूतदार वाटली.

दोघेही परत आतमध्ये गेले. पुन्हा एकदा चहापाणी घेऊन सयाजी आणि सगळे घरी परतले.सयाजी आता भैरवीच्या उत्तराची वाट पाहत होता.


 

क्रमशः

भैरवी लग्नासाठी होकार देईल का? लहानग्या मुलांना आईच छत्र मिळणार का? तिला सयाजीच्या सगळ्या अटी मान्य असतील का?

हे जाणून घेऊ पुढील भागात. तोपर्यंत रामराम.

©®सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर 9975288835.

0

🎭 Series Post

View all