चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
मायलेकी—सख्ख्या वैरी (भाग-१)
साक्षीने तावातावात स्वतःच्याच आईच्या तोंडावर प्याल्यातले पाणी फेकले. त्या संपूर्ण प्रकाराने तिथे फार खळबळ माजली होती. नोकर-चाकर, किंबहुना सर्वजण आता तिच्याकडे पाहत होते पण साक्षीच्या डोळ्यातील राग काही कमी झाला नव्हता. ती अजूनही आपल्या आईकडे रागाने पाहत होती.
"आई आहेस की कोण आहेस गं तू? वाटलं नव्हतं एवढ्या खालच्या थराला जाशील. तुझ्यापेक्षा शत्रू बरे. माझ्या बाबांना कधी प्रेमाने पाहिलं नाहीस की दोन शब्द नीट बोलली नाहीस पण माझा संसार मोडायला मात्र तू एक क्षण विचार केला नाहीस. अशी कशी दळभद्री आणि नीच असू शकतेस तू? आतापर्यंत तुझ्याबद्दल तक्रारी होत्या, नाराजी होती पण आज खऱ्या अर्थाने तिटकारा आणि तिरस्कार वाटतोय मला तुझा... तुला 'आई' अशी हाक मारणं खूप आधीच सोडून दिलं होतं मी आणि आज कळलं खरंच तू माझी आई असण्याच्या लायकीची नाहीस. थुंकते मी तुझ्या मातृत्वावर... कोणत्या जन्माची शिक्षा मिळाली आणि मी तुझ्या उदरातून जन्म घेतला, हेच कळत नाही. या जन्मात आई झालीस परत कधीच, कोणत्याही जन्मात, कोणाचीही आई होऊ नकोस, मिस अनिता कानेटकर." साक्षीने बोलायला सुरुवात केली आणि सरळ अंतःकरणातून अख्खा लाव्हा रस बाहेर काढून मोकळी झाली; तरीही अजून बरेच काही मनात साचलेले होतेच.
"साक्षी, तू शांत हो. माहिती आहे हा प्रकार तुझ्यासाठी धक्कादायक आहे पण जरा धीराने काम घे." तिचा प्रियकर आणि भावी नवरा— अजिंक्य तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला.
"कशी शांत होऊ अजिंक्य? ही बाई कायम माझ्या सुखाच्या आड येते. हिला जरा म्हणून लाज नाही... अशी कशी वागू शकते ही? मी काही मागितलं का आजपर्यंत हिला? यावेळीही काही अपेक्षा नव्हतीच पण म्हणून हिने असं वागावं? आपलं लग्न होतंय आठवड्याभरात आणि ही... माझ्याच... शी... मला बोलायलाही लाज वाटतेय. एवढ्याच सुप्त इच्छा आहेत तर एस्कॉर्ट हायर करायला हवा होता ना हिने... या धक्क्यापेक्षा तो धक्का सहन करून घेण्याचा निदान प्रयत्न केला असता." भावनेच्या भरात बरंच अद्वातद्वा बोलत होती ती.
काय करणार... स्वतःच्याच आईला आपल्या भावी सासऱ्यांच्या मिठीत पाहिले होते म्हणून तळपायाची आग जणू मस्तकात गेली होती.
"साक्षी, तू डोकं शांत ठेव. तुला कळत नाहिये तू काय बोलतेय ते... मुळात चिडचिड करून, नको ते बोलून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा आपण शांतपणे बोलू. कदाचित तू विचार करतेय तसं काही नसावं. जे आपल्याला दिसलं तेच खरंय, असा विचार करणं तरी कुठे योग्य आहे? कदाचित काही गैरसमज झाला असेल तर?" ती जेवढा आक्रोश करत होती, अजिंक्य तेवढाच शांतपणे मुद्दा जाणून घेण्यासाठी धडपडत होता.
"या परिस्थितीतही तू मलाच शांत राहायचा सल्ला देतोय? आणि कसला गैरसमज? तुला कळत कसं नाही... ह्या बाईने नादाला लावलं तुझ्या बाबांना..." डोळ्यात पाणी आणून, ओलावलेल्या कंठाने पण तेवढ्याच तीक्ष्ण कटाक्षाने पाहत साक्षी बोलली.
"साक्षी..." तिची अवस्था कळत असली तरी तिने केलेला शब्दप्रयोग त्याला आवडला नव्हताच.
त्याचे बाबा त्याचे विश्व, त्याचेे सर्वस्व होते आणि त्यांच्याविषयी असे काही शब्द त्याच्या प्रेयसीने वापरावे, हे सहन होण्यासारखे नव्हतेच; म्हणून नकळत त्याचा आवाज चढला. हातही हवेत भिरकावला होता पण वेळीच स्वतःच्या रागाला आवर घातला त्याने; मात्र त्याचा चढलेला आवाज ऐकून आणि उचललेला हात पाहून साक्षीला तिच्या आईचा आणखीच तिरस्कार वाटला.
"तुझ्यामुळे होतंय हे. स्वतःचा संसार कधी फुलवता आला नाही तुला पण माझ्या संसाराची सुरुवात होताना पाहून माझ्या स्वप्नाची, माझ्या भविष्याची राखरांगोळी केलीस तू... मी चूल मांडायला जाणार त्याआधीच तू सगळं उध्वस्त केलंस. तू दृष्ट लावलीस, विष कालवलंस माझ्या संसारात. जरा जरी लाज असेल तर जा मर ना जाऊन कुठेतरी, नाहीतर आणखी तुझे प्रताप पाहण्याआधी मला मरण येऊ दे." ती आईवर जळजळीत कटाक्ष टाकून बोलली.
"साक्षी..." तिची आई कातर आवाजात बोलली. कंठ दाटला होता आणि डोळे पाणावले होते.
लेकीने तिला 'मर' म्हटले याचे दुःख नव्हते पण तिच्या पोटच्या गोळ्याने स्वतःसाठी मरण मागितलेले तिला आवडले नाही. आई होती ती शेवटी, लेकीचा लळा होताच... साक्षी मान्य करत नसली तरीही!
आईचे शब्द ऐकून मात्र साक्षीच्या कपाळाची प्रत्येक नस रागाने ताणली गेली. "खबरदार माझं नाव उच्चारलंस तर... माझ्या बाबांशी वचनबद्ध आहे मी म्हणून स्वतःला अडवलंय नाही तर... नाही तर जीव घेतला असता मी या क्षणी तुझा..." घट्ट मुठी आवळून, दात-ओठ खात ती चिथावणी देऊनच आल्या पावली माघारी निघून गेली.
अजिंक्य एक क्षण तिच्या मागे जाण्यासाठी सरसावला तर खरा पण कुठल्याशा विचाराने त्याची पावले जागीच खोळंबली.
दरम्यान साक्षीचे शब्द अनिताच्या हृदयावर वार करून गेले होते. सतत तेच शब्द डोक्यात घोळत होते. शेवटी एक वाक्य तिच्या कानात निनादले, 'मर ना जाऊन कुठेतरी...' लेकीची इच्छा समजून की काय कदाचित तिने भलताच निश्चय केला त्या क्षणी; कारण एकाएकीच तिच्या छातीत कळ गेली आणि ती तिथेच कोसळली.
वेळीच अजिंक्यचे लक्ष गेले आणि तो तिच्या जवळ जात ओरडला, "आईऽऽऽ"
..........
..........
दुसरीकडे साक्षी एकटीच वाटेने जात होती. डोक्यात राग आणि विचारचक्र सातत्याने वेगळ्याच दृष्टीकोनातून धाव घेत होते आणि मन मात्र भूतकाळाची पाने चाळत होते.
तिला आठवू लागले की तिने अजिंक्यला कोर्ट मॅरेज करण्याची विनंती केली होती पण त्याला पारंपरिक पद्धतीने, विशेषतः तिच्या घरी जाऊन, तिच्या आईला रितसर मागणी घालून, देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने विधिवत लग्न करायचे होते. तिचा शेवटपर्यंत नकारच होता त्याच्या हट्टाला पण अजिंक्यच्या आनंदासाठी तिने माघार घेतली. अनितानेही लग्नाला परवानगी दिली. खरंतर परवानगी नाममात्र होती. साक्षीने आधीच बजावले होते की तिचे निर्णय ती स्वतः घ्यायला सक्षम आहे, ही फक्त औपचारिकता आहे म्हणून अनिताने कोणताही हस्तक्षेप केलेला ती खपवून घेणार नाही.
लग्नाला परवानगी मिळताच लगेच शुभ मुहूर्त बघून घरीच मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा आटोपला आणि एक महिन्याने लग्न ठरले होते. अनिताशी कधी साक्षीला जवळीक नव्हतीच म्हणून ती काय करते, ह्याच्याशी घेणे-देणे नव्हतेच पण जेव्हापासून अजिंक्यने अनिताची आणि त्याच्या बाबांची म्हणजेच कल्पेश केतकरची ओळख करून दिली होती तेव्हापासून अनिताच्या वागण्यात जरा बदल तिला जाणवत होता.
आधी तिचे बाबा जिवंत असताना असो वा तिचे बाबा हयात नसताना तिने कधीच अनिताला साधे स्मित करतानाही पाहिले नव्हते. केवळ निर्विकार चेहरा घेऊन ती वावरायची. दुःख असो की सुख, कधी कोणत्या भावना व्यक्त करायचीच नाही म्हणून हा सूक्ष्म बदल सहज लक्षात येण्यासारखाच होता. कळत-नकळत साक्षीच्या नजरेतून काही गोष्टी सुटल्या नव्हत्या तरी साक्षीने अति विचार करणे टाळलेच होते पण आज तिचा संशय खरा ठरला होता.
विचार करतच ती कधी घरी पोहोचली तिला कळले सुद्धा नाही. ती रागातच अनिताच्या खोलीत गेली आणि मिळेल ती वस्तू उचलून फेकू लागली. संपूर्ण खोली काही क्षणात अस्ताव्यस्त झाली होती. ठिकठिकाणी तुटलेल्या वस्तू पडल्या होत्या. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीला पाहून साक्षीचे अवसान गळून पडले आणि ती सरळ त्या व्यक्तीच्या मिठीत शिरून ढसाढसा रडू लागली.
त्या व्यक्तीने तिच्या पाठीवर थोपटत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. "साक्षी, अगं काय हे? काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची आणि या खोलीचीही? मला फाटक आणि दार उघडे दिसले, आत आले तर आदळआपटचा आवाज आला. इथे आले तर तू अशी... काय झालं? का रडतेस बाळा?" ती व्यक्ती तिला सावरतच विचारपूस करत होती.
"आत्तू... आत्तू का ती अशी आहे? ती का अशी वागते?" साक्षीने रडतच तिच्या आत्याला अर्थात मंजिरीला विचारले.
"कोण?" थोडा अंदाज आला होता पण तरी मंजिरीने प्रतिप्रश्न केला.
"माझी कधीच होऊ न शकलेली आई— मिस अनिता कानेटकर." तिचे बाबा वारल्यानंतर तिने कधीच अनिताला 'आई' म्हटले नव्हते म्हणून आताही तिने तिच्या आईचे तिच्या लग्नापूर्वीचे नाव घेतले आणि मंजिरी काहीशी स्तब्ध झाली.
क्रमशः
............
©®
सेजल पुंजे.
............
©®
सेजल पुंजे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा