चॅम्पियन्स ट्रॉफी 2015
मायलेकी—सख्ख्या वैरी (भाग-२)
"काय झालं?" साक्षीचे अश्रू पुसत, आता तिच्या डोळ्यात पाहत जरा गांभीर्यानेच मंजिरीने विचारले.
"आत्तू, ती... ती..." तिला परत हुंदका दाटून आला.
जवळच पाण्याचा प्याला होता, तो तिला देत मंजिरी म्हणाली, "हे घे पाणी पी आधी नि शांत हो. मग सांग सगळं..."
आज्ञाधारक लेकराप्रमाणे ती दोन घोट पाणी प्यायली, डोळेही पुसले. मंजिरी तिला घेऊन पलंगावर बसली. काही कळायच्या आत लहान बाळाप्रमाणे साक्षी मंजिरीच्या मांडीवर डोके ठेवून आडवी झाली आणि बोलायला लागली.
"आत्तू, तुला माहीत आहे माझं बालपण कसं होतं? मी माझ्या आईला कधी बोलताना तर दूर साधं हसताना वा रडतानाही पाहिलं नाही. चेहरा कायम निर्विकार पाहिला. 'जिंदा लाश' असं काहीतरी बोलतात ना तशी असायची ती. नवरा-बायको संसाराची दोन चाके असतात. संसार हा दोघांमुळे उभा राहतो, रुसवे-फुगवे त्यातच आले पण मी माझ्या आई-बाबांना असं कधी पाहिलंच नाही. एकटे बाबाच एफर्ट्स घेताना दिसायचे, तिने कधी साधा प्रतिसाद दिलेलाही आठवत नाही. माझे मित्र-मैत्रिणी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना त्यांच्या घरातील वातावरणाविषयी बोलायचे, कधी त्यांच्या आई-बाबांच्या भांडणांबद्दल तर कधी त्यांच्यातल्या नॉस्टॅल्जिक प्रेमाबद्दल पण माझ्याकडे कधीच काहीच नसायचं सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आणि आहे ती परिस्थिती सांगून चार चौघात बाजार नव्हता मांडायचा. त्यांचं नातं एवढं क्लिष्ट होतं की भांडण आणि प्रेम तर दूर उभ्या आयुष्यात मी कधी आईला बाबांशी एक अक्षर बोलताना पाहिलं नाही. राग, लोभ, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, मोह, सुख, दुःख, वेदना, यातना यातल्या कोणत्याही भावना तिला जाणवतात, असंही मला वाटायचं नाही. इतकी ती निर्विकार होती..." एकेक शब्द, एकेक आठवण सांगताना तिचे डोळे आणखीच पाणावत होते.
"दुसरीकडे बाबा तिला हवं-नको ते सगळं पाहायचे, अगदी मन लावून सगळं करायचे, तिची मर्जी राखायचे. वेळोवेळी तिला भेटवस्तू द्यायचे, वेळोवेळी आम्हाला फिरायला घेऊन जायचे, एकत्र वेळ घालवायचे आणि सहसा माझा गृहपाठही तेच घ्यायचे. ओढाताण व्हायची त्यांची आणि आजी आईला बोलायची पण बाबाच मध्यस्थी करून आजीला गप्प करायचे तरीही आईच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा हलत नसायची. कृतज्ञता, भावना, संवेदना वगैरे तिच्या शब्दकोशात नव्हतेच कदाचित. जसजशी मला समज यायला लागली तसतसं आईचं वागणं खटकायला लागलं, तिला समजून घेण्याचाही प्रयत्न केला पण ती कितीही माझी जन्मदाती आई असली तरी आमच्यात अंतराची पोकळी मला सातत्याने जाणवायची. असं वाटायचं, मी तिला ओळखतच नाही आणि ती मला..." ते सर्व बोलत असताना तिच्या हृदयात साचलेल्या आठवणी आणखीच सलत होत्या पण तरीही आज तिने व्यक्त व्हायचे ठरवलेच होते.
"माझे मित्र-मैत्रिणी आपल्या घरी येण्यासाठी आग्रह करायचे, आताही करतात पण मीच नकार देते कारण घरातलं निर्विकार वातावरण त्यांना मला कधीच दाखवायचं नव्हतं. कधी आम्हा मित्र-मैत्रिणींमध्ये कौटुंबिक गप्पा रंगल्यावर ते म्हणतात की मी नेहमी केवळ बाबांबद्दल भरभरून बोलते, आईबद्दल नाही. अशा वेळी 'माझ्या आईला आणि आमच्या नात्याला तुमची दृष्ट लागू नये, म्हणून काही सांगत नाही' असं खोटं मी बोलते कारण खरं काय आणि कसं बोलणार? आईला बाबा जिवंत होते तरी कधी फरक पडला नाही आणि त्यांच्या निधनाचंही काहीच वाटलं नाही. ती विधवा झाली पण दोन अश्रू गाळायची तसदी तिने घेतलीच नाही. त्या क्षणी माझ्या नजरेतून ती 'आई' म्हणून पुसली गेली पण मी एक शब्द बोलले नाही; कारण ज्या स्त्रीने माझ्या बाबांना कधीच नीट वागणूक दिली नाही त्या स्त्रीलाच आयुष्यभर जपण्याचं वचन बाबांनी माझ्याकडून मरत्या क्षणी घेतलं. नाईलाज असला तरी त्यांची अखेरची इच्छा होती ती... ती अपूर्ण ठेवून मला माझ्या बाबांना आणखी यातना द्यायच्या नव्हत्याच; कारण जिवंतपणी त्यांनी आधीच हाल सहन केले होते मिस अनिता कानेटकरशी लग्न करून..." मंजिरीला बरेच काही बोलायचे होते त्यावर पण सध्या ती फक्त शांतपणे ऐकत होती.
"बाबा गेल्यानंतर या घरापासून माझा जिव्हाळा तुटला. फक्त बाबांचं वर्षश्राध्द करायला यायचे मी इथे; कारण माझ्या बाबांची बायको, त्यांचं वर्षश्राध्द करेल याची शाश्वती नव्हतीच मला पण मी वर्षश्राध्द उरकून लगेच निघून जायचे. मनात कित्येक तक्रारी असल्या तरी मिस कानेटकरला काहीच बोलायचे नाही मी, वचनामुळेही आणि मला स्वतःलाही तिला तेवढं महत्त्व द्यावंसं वाटलं नाही. तिला वागू दिलं तिच्या इच्छेप्रमाणे... एवढंच काय मला कोर्ट मॅरेज करायचं होतं, नकोच होता हा एवढा प्रपंच; पण अजिंक्यची खूप इच्छा होती विधिवत लग्न करायची. त्याला नकार देता आला नाही म्हणून लग्नाचा घाट घातला पण कधी हे लग्न पार पडतंय असं झालेलं... कारण मला नकोशीच आहे ती आणि तिची सावली... मला नव्हतंच काळं सावट पडू द्यायचं माझ्या उमलणाऱ्या संसारावर पण शेवटी तेच झालं." या क्षणी तिने मंजिरीला आणखीच कवटाळून घेतले. स्वतःला खंबीर ठेवायचा प्रयत्न करत होती पण आत्याच्या कुशीला हक्काची कुशी समजून व्यक्त होत होती.
"म्हणजे?" साक्षीचे शेवटचे वाक्य ऐकून, थोडे गोंधळून मंजिरीने विचारले.
"आत्तू... तिच्यात आणि अजिंक्यच्या बाबांमध्ये एक वेगळं नातं रुजू पाहत आहे. जी तिच्या नवऱ्यापुढे निर्विकार असायची, तिला मी अजिंक्यच्या बाबांच्या मिठीत पाहिलं. याआधीही बऱ्याच गोष्टी जाणवल्या पण मी दुर्लक्ष केलं, विचार केला की मीच अति विचार करतेय पण आज प्रत्यक्ष पाहिलं. ती तिच्या व्याहीशीच नातं जोडू पाहतेय..." साक्षी बोलली पण मंजिरीला धक्काच बसला आणि तिने साक्षीला स्वतःपासून दूर केले व तिच्या दंडाला पकडून बसवले.
"तुला कळतंय तू काय बोलतेय? तुझी आई आहे ती... कितीही तेढ असले नात्यात तरी तू अशी कशी बोलू शकतेस?" मंजिरी जरा रागातच म्हणाली.
"मला समजतंय आत्तू पण मी तेच बोलतेय जे खरं आहे. विश्वास उडवण्यासारखंच आहे पण मी प्रत्यक्ष पाहिलंय तिला अजिंक्यच्या बाबांच्या मिठीत... जेव्हापासून तिची आणि त्यांची ओळख झाली तेव्हापासून ती मी अनुभवलेली, या घरात वावरणारी अनिता कानेटकर नव्हतीच... ही काहीतरी वेगळीच आहे. अगदीच व्यक्त होत नसली तरी बारीक-सारीक हावभाव द्यायला लागली आहे. मला आधी वाटलं तात्पुरता दिखावा करत असेल आमचं लग्न पार पडेपर्यंत पण काल चक्क मी तिला अजिंक्यच्या बाबांना कल्पेश अशी एकेरी हाक देताना ऐकलं; तर आज मी आणि अजिंक्य इव्हेंट मॅनेजरला भेटून, काही खरेदी करून अजिंक्यच्या घरी गेलो तेव्हा ती अजिंक्यच्या बाबांच्या मिठीत होती. मला बोलायलाही लाज वाटतेय पण हेच सत्य आहे. तिला जेवढी सूट मिळत गेली तेवढी ती नीच झाली. आत्तू ती खरंच एक चारित्र्यहीन बाई आहे." साक्षी त्वेषानेच पाहिलेला अख्खा प्रसंग रेखाटत बोलली.
तिच्या आवाजातून आईप्रती द्वेष, तिटकारा, राग सर्वकाही व्यक्त होत होते पण तिचे शब्द ऐकून दुसऱ्याच क्षणी तिच्या गालावर पाच बोेटे उमटली. तिने गालावर हात ठेवून, अविश्वासाने नजर वर केली तर मंजिरी तिच्याकडेच रागात पाहत होती.
.......
.......
अजिंक्य आणि त्याचे बाबा आय.सी.यु.च्या खोलीबाहेर बाकावर बसून होते. थोड्या वेळापूर्वी अनिताला हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ तिला इस्पितळात भरती केले होते. अजिंक्यने साक्षीला कळवण्यासाठी बरेच कॉल केले पण तिने एकदाही प्रत्युत्तर दिले नव्हते. शेवटी त्याने फोन खिशात ठेवला व बाकावर बसला. आत अनितावर उपचार सुरू होता, बाहेर मात्र गूढ शांतता पसरली होती.
ती शांतता भेदत अजिंक्यचा अस्फुट आवाज बाहेर पडला. ती वेळ त्या चर्चेसाठी योग्य नव्हतीच पण नाईलाजानेच त्याने धाडस केले.
"बाबा..." त्याचा आवाज कल्पेशला ऐकू गेला आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिले.
"बाबा, मला माहीत आहे ही वेळ योग्य नाही पण मला काहीतरी विचारायचे आहे." दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून तो गंभीर आवाजात म्हणाला.
"विचार..." त्याने विचारले नसते तरी त्याचे प्रश्न त्यांना आधीच कळले होते. घरी गेल्यावर ते सविस्तर सांगणार होतेच पण आता त्याने पुढाकार घेतला होता म्हणून त्यांनी आताच त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा निर्णय घेतला.
क्रमशः
..........
सेजल पुंजे.
(संघ कामिनी)
..........
सेजल पुंजे.
(संघ कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा