चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
मायलेकी—सख्ख्या वैरी (भाग-३)
"बाबा... ते तुमचं पहिलं प्रेम... जे अपूर्ण राहिलं काही कारणास्तव आणि ज्यांच्यासाठी तुम्ही लग्नच नाही केलं आयुष्यभर त्या... आई... म्हणजे साक्षीची आई आहे का?" चाचरतच त्याने प्रश्न केला. प्रश्न विचारताना मान खाली केली होती त्याने.
"नाही माझं पहिलं प्रेम साक्षीची आई नाही." कल्पेशने स्पष्ट केले आणि अजिंक्य जरा आश्चर्यचकित झाला.
"बरं पण मी तुम्हाला एकमेकांना एकेरी हाक देताना ऐकलं आहे, तुमच्यातला मोकळेपणाही जाणवला मला. मी बोललो नाही फक्त एवढंच पण आता स्पष्टच विचारतो, तुम्हाला साक्षीची आई आवडते का? म्हणजे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे का? तुम्हाला आयुष्याच्या या वळणावर त्यांची सोबत हवी आहे का? प्लीज खरं सांगा मी काय विचार करेल हा विचार न करता..." अजिंक्य प्रश्नांची सरबत्ती करून उत्तराच्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहू लागला.
"नाही, असं काही नाही. तुला आणि साक्षीला गैरसमज झाला आहे." कल्पेश म्हणाले आणि अजिंक्यच्या कपाळावर आठ्यांचे जाळे विणले गेले.
"पण तुम्ही एकमेकांना एकेरी बोलता... सहसा व्याही एकमेकांना आदरयुक्त संबोधन वापरतात ना? पण तुमच्यात वेगळंच बंध जाणवतं... शिवाय..." तो बोलता बोलता एकाएकी थांबला.
"शिवाय आज आम्ही मिठी मारली, हेच ना?" कल्पेशने त्याचे वाक्य पूर्ण केले, तशी त्याने नजर चोरून मान हलवली आणि त्यांनी हलकेच नकारार्थी मान हलवत सुस्कारा घेतला.
"तुझी सासू माझी जिवलग मैत्रीण आहे." कल्पेश म्हणाले आणि अजिंक्यचे आता डोळेच विस्फारले.
"फक्त जिवलग मैत्रीण. प्रेयसी ती कधीच नव्हती माझी, ना कधी असेल." असे म्हणून त्यांनी आतापर्यंत हृदयाच्या कप्प्यात बंद करून ठेवलेला भूतकाळ सांगायला सुरुवात केली.
.........
.........
एकीकडे कल्पेश आणि अजिंक्यचा शांततेत संवाद सुरू होता तर दुसरीकडे मंजिरी आणि साक्षी यांच्यात भावनिक चढाओढ सुरू होती.
"आत्तू..." साक्षी कशीबशी बोलली.
"आणखी एक शब्द बोललीस तर बघ... एका पुरुषाने स्त्रीला वा स्त्रीने पुरुषाला मिठी मारली तर त्याचा अर्थ अनैतिक असतोच असं नाही. काय कळलं तुला एवढं जे तू स्वतःच्याच आईला चारित्र्यहीन ठरवून मोकळी झालीस? तुझा सासरा कल्पेश आणि अनिता बालमित्र आहेत. तब्बल सत्तावीस वर्षानंतर तुझ्या लग्नाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली तर त्यांनी कसं व्यक्त व्हायला हवं? शिवाय त्यांनी मिठी मारली, हे दिसलं पण त्याला काय कारण आहे, नेमकी पार्श्वभूमी कोणती होती, ह्याची कल्पना तरी आहे का तुला?" मंजिरी आज संयमाचा बांध तोडून बोलत होती, साक्षी मात्र कित्येक प्रश्नचिन्हाच्या जंजाळात गुरफटली होती.
"आणि काय ओळखलंस गं तू तुझ्या आईला? काय माहित आहे तुला तिच्याबद्दल? तुला तिची निर्विकार बाजू दिसली पण मुळात ती तशी का आहे, याचा विचार केलास का कधी? आणि कोणते प्रयत्न केले तू तिला समजून घेण्याचे? मुळात मनात कोणतेही पूर्वग्रह न बाळगता तिला जाणून घेतलेस? नाही, कधीच नाही! कारण तुझ्यासाठी तुझा बाबा परीकथेतल्या राजकुमारासारखा आहे. तुझ्या मते, तुझा बाबाच एफर्ट्स घ्यायचा, तुझ्या आईला काळजीच नव्हती— ना तुझी, ना तिच्या संसाराची. चक्क तुझा बाबा आणि तिचा नवरा मेला तरी ती रडली नाही पण का रडावे त्या माणसासाठी तिने जो कधीच तिचा चांगला नवरा होऊ शकला नाही? चांगला नवरा तर दूर तो चांगला माणूसही नव्हता. जो व्यक्ती चांगला बाबा असतो तो व्यक्ती चांगला नवरा आणि चांगला माणूस असूच शकतो, हा गैरसमज आधी तुझ्या डोक्यातून पुसून टाक; कारण तुझा आदर्श बाबा कधीच चांगला नवरा आणि चांगला माणूस नव्हता." मंजिरीने कुत्सितपणे हसत साक्षीच्या डोळ्यात अंजन घालणारे वक्तव्य केले.
"म्हणजे... आत्तू तुला म्हणायचं काय आहे?" साक्षी जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वास होत नव्हता. नानाविध विचार येत होते म्हणून तिने स्पष्टच विचारले.
"तुझा आदर्श बाबा बलात्कारी होता. ही वॉज अ रेपिस्ट." मंजिरीने खुलासा केला आणि साक्षी काही क्षण सुन्न झाली.
"नाही... नाही... तू... तू खोटं बोलतेयस. माझे बाबा असे नाही. ते... ते किती चिडायचे बलात्काराच्या बातम्या वाचून, ऐकून... तू काहीही सांगतेस." साक्षी मंजिरीपासून दूर सरकत, अडखळतच म्हणाली.
"बलात्काराच्या बातम्या वाचून, ऐकून राग आणि आक्रोश व्यक्त करणारे अनेक असतात पण तरीही बलात्काराच्या घटनांमध्ये वाढच दिसते, घट कधीच नाही; कारण दिखाव्याचा राग, आक्रोश करणाऱ्यांना समाजात स्वतःची एक वेगळी प्रतिभा अबाधित ठेवायची असते आणि पडद्याआड स्वतःची कुकृत्ये झाकून ठेवायची असतात. अशाच विकृत मानसिकतेचा मानकरी तुझा बाबा होता. तुला फक्त तुझा बाबा माहिती आहे पण प्रीतम करंदीकर माहिती नाही. तुझ्या बाबाने तुझ्यापुढे त्याचा तो चेहरा कधी आणला नाही. किंबहुना कोणाला आणूही दिला नाही पण म्हणून तो संत आहे, असा त्याचा अर्थ नाही." स्वतःच्याच भावाविषयी बोलताना मंजिरीच्या डोळ्यात वेगळाच तिरस्कार झळकत होता.
"नाही. तू का खोटे आरोप करत आहेस बाबांवर? माझे बाबा... ते..." तिला पुढे काही बोलवले गेले नाही.
"तू मान्य कर किंवा नको करू. सत्य हेच आहे. मला काय हौस तुझ्या बाबावर खोटे आरोप करायची? मी तर आजपर्यंत जशी गप्प होते तशी राहिलेच असते पण आज तू अनिताला चारित्र्यहीन म्हटलंस आणि माझा ताबा सुटला. आपल्या नालायक मुलाची पाठराखण करणाऱ्या माय माऊलीने दिलेल्या त्या शपथीला तोडले मी आज... जसं तुझ्या बाबाने तुला अनिताची काळजी घेण्याचं वचन मागितलं होतं तसंच तुझ्या आजीने स्वतःची शपथ देऊन २६ वर्षांपूर्वी माझं तोंड बंद केलं होतं." तो भूतकाळ परत एकदा मंजिरीच्या डोळ्यासमोर तरळायला लागला होता.
"काय झालं होतं २६ वर्षांपूर्वी?" आता विश्वास बसत नसला तरी भूतकाळ जाणून घ्यावासा वाटला साक्षीला.
"मी, अनिता आणि कल्पेश बालमित्र. एकत्रच वाढलो, शाळा-कॉलेज एकत्रच... माझं नि अनिताचं एकमेकींच्या घरी कायम येणं-जाणं असायचं— कधी अभ्यासासाठी, कधी सणासुदीला तर कधी सहज गप्पा मारायला. सहसा तीच इकडे यायची कारण माझं तिच्याकडे जाणं तुझ्या आजीला आवडायचं नाही. करंदीकरांच्या घराण्याला, संस्कारांना हे शोभत नाही असं तिचं मत होतं. असो... १९९० सालची गोष्ट. आम्ही तिघे बारावी उत्तीर्ण झालो. कल्पेशने नोकरीच्या शोधात पुण्याकडे धाव घेतली. आता गावी फक्त आम्ही दोघीच... तर आमचं लग्न ठरलं. माझं लग्न आधी होतं आणि तिचं सहा महिन्यानंतर. तसा मुद्दामच हट्ट केलेला कारण लागोपाठ दोघींचेही लग्न झाले तर दोघींपैकी कोणालाही एकमेकींच्या लग्नात हौस करता येणार नव्हती; म्हणून मुहूर्त लांबचे शोधले होते. माझ्या लग्नाला साधारण पंधरा दिवस राहिले होते म्हणून मी अनिताला मुक्कामी बोलवलं. एकाच गावात राहत असलो तरी मैत्रिणीच्या लग्नात तिच्या घरी पंधरा दिवसांपासून मुक्काम करण्याची सुप्त इच्छा होतीच आम्हाला. शिवाय मला हवी होती ती जवळ म्हणून माझ्या आग्रहाखातर ती आली घरी..." मंजिरी हळूहळू भूतकाळ सांगत होती आणि साक्षी आता शांतपणे मंजिरी जे सांगेल ते ऐकत होती.
"अनिता हिरीरीने सगळी कामे करत होती. घरकामात मदत करत होती, मलाही मदत करत होती. सगळं सुरळीत सुरू होतं, नाही... कदाचित तसं भासवलं जात होतं. एक-दोनदा मला प्रीतम अनिताशी बोलताना दिसला पण त्याच्याशी बोलताना ती अस्वस्थ दिसायची. आधी तिने टाळलंच मला सांगायचं, मी माघार घेतली नाही म्हणून तिने खरं कारण सांगितलं की प्रीतमला ती आवडते आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली आहे." मंजिरी म्हणाली.
"काय? म्हणजे आईचं लग्न बाबांशी ठरलं नव्हतं?" साक्षीने चढ्या आवाजातच विचारले.
साक्षीचा अचंबित चेहरा पाहून मंजिरीला नवल काही वाटलेच नाही, उलट त्यावर खिन्न हसली ती.
"नाही आणि कधी ठरलं पण नसतं. त्याला ती आवडत असली तरी तिला तो नाही आवडायचा. तिच्यासाठी तो माझा भाऊ होता आणि तिच्यासाठीही भावासारखाच होता. शिवाय तिला तिच्या कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध वागायचे नव्हतेच. तिला पाहायला आलेला मुलगा करंदीकरांसारखा श्रीमंत नव्हताच पण अनिताला त्याच्या हृदयाची राणी बनवण्याची ऐपत त्याची नक्कीच होती. शिवाय कानेटकरांपेक्षा जरा जास्त संपत्ती होती त्यांच्याकडे आणि ती त्यातच संतुष्ट होती पण हेच प्रीतमला खटकलं. त्याच्या मते तो तिला त्या मुलापेक्षा नक्कीच जास्त सुख-सुविधा आणि ऐश्वर्य देऊ शकतो मग तरीही तिने का नकार द्यावा? त्याला तिचा नकार पसंत आला नव्हता. त्याला ती लहानपणापासून आवडते, प्रेम म्हणजे काय कळत नव्हतं तेव्हापासून तो तिच्यावर प्रेम करत आलाय तर तिने त्याला समजून घ्यावं, त्याच्या प्रेमाचा स्वीकार करून तिचं आधी जुळलेलं लग्न मोडावं, असं त्याचं मत होतं पण ज्या व्यक्तीला ती भावाचा दर्जा देते त्याच्याशी ती कशी काय संसार थाटण्याचा विचार करेल, एवढी साधी अक्कल नव्हती त्याला..." रागातच तो प्रसंग आठवून मूठ आवळली मंजिरीने.
क्रमशः
............
©®
सेजल पुंजे.
(संघ कामिनी)
............
©®
सेजल पुंजे.
(संघ कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा