चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
मायलेकी—सख्ख्या वैरी (भाग-४)
थोड्या वेळात राग आटोक्यात आणून पण तिरकस हसत मंजिरी बोलू लागली.
"हं! काय करणार म्हणा करंदीकरांचा कुलदिपक, नवसाने झालेला. तो म्हणेल ते त्याला मिळायलाच हवे, असा जणू अलिखित नियम. त्यामुळे त्याला जी गोष्ट आवडते, ती त्याला मिळाली तरच तो संतुष्ट व्हायचा. त्यामुळे त्याचं अनितावरचं प्रेम कधी ऑब्सेशनमध्ये रुपांतरित झालं... त्याचं त्यालाही कळलं नाही. त्याला ती आवडते म्हणून ती कोणत्याही प्रकारे त्याचीच व्हायला हवी, हा त्याचा ध्यास होता. तो सातत्याने तिला आग्रह करत होता, जरा दबाव आणण्याचाही प्रयत्न करत होता. ती नम्रपणे त्याला नकार देत होती. त्याचा अतिरेक पाहून मी तिच्या वतीने त्याला समज देणार होती पण तिने थांबवलं कारण लग्नाचं घर होतं. घरी नातेवाईक मुक्कामी आले होते. त्यांच्या पुढे उगाच करंदीकरांची नाचक्की होऊ नये, असं तिला वाटलं तर दुसरीकडे तिचा नम्रपणा त्याला संधी वाटू लागली. त्याचा भ्रम वाढला की ती कदाचित लवकरच त्याच्या प्रस्तावाला होकार देईल म्हणून हळदीच्या दोन दिवसांपूर्वी त्याने परत तिला मागणी घातली, आपलं प्रेम कबूल केलं. यावेळी तिने स्पष्टच सांगितले की ती कधीच त्याला होकार देणार नाही कारण तिला तिचा होणारा नवरा आवडतो आणि ती त्याच्याशीच लग्न करेल व तिचा निर्णय चुकूनही बदलणार नाही पण नकार पचवता येणाऱ्या माणसाला कसं कळणार होतं ते..." मंजिरी चिडूनच म्हणाली आणि ते ऐकून तेव्हा काय घडले असेल, ह्याचा साक्षी विचार करू लागली.
"बास! तिथेच त्याचा संयम ढळला आणि त्याने अमानवी कृत्य केले. तिला ओढतच स्वतःच्या खोलीत घेऊन गेला आणि... आणि तिच्या शरीराचे लचके तोडले. कदाचित तिने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला असेल, त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी धडपड केली असेल, शेवटचा मार्ग म्हणून विनवण्याही केल्या असतील पण संगीताच्या आवाजात, पाहुण्यांच्या वर्दळीत तिचा आवाज गुडूप झाला होता. दुसरीकडे त्या निर्दयी माणसाने मात्र जराही कीव केली नाही. साधारण अर्ध्या तासानंतर माझ्या लक्षात आलं की अनिता आसपास कुठेच नाही. खालच्या माळ्यावर, अंगणात ती होतीच नाही. मी तिचा शोध घेत वरच्या माळ्यावर आले. आमच्या खोलीत ती नव्हती. मी शोधतच होते की प्रीतमच्या खोलीच्या थोडं अंतरावर अनिच्या बांगडीचं कांकण मला दिसलं. अचानक माझं हृदय धडधडायला लागलं. मनातली भीती खरी ठरू नये, असा विचार करतच त्याच्या खोलीजवळ गेली तर दारात तिच्या ओढणीची छोटीशी चिंधी अडकलेली दिसली. काळजात धस्स झालं. मी जोरजोरात प्रीतमला हाका मारत दार ठोठावत होते. दोन मिनिटांनी त्याने दार थोडंसंच उघडलं आणि त्याला झोप येत आहे, असं सांगून मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला ढकलतच आत शिरले आणि पुढे बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली." मंजिरीचे एकूण एक शब्द ऐकून साक्षीला थरकाप सुटला होता. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते, कदाचित तिनेही त्या घटनेचा एव्हाना अंदाज बांधला होता. मंजिरीला तर प्रत्यक्ष सर्व चित्र आठवत होते म्हणून ते सांगताना तिचे हृदय पिळवटून गेले होते.
"अनिताच्या अंगावर एक कपडा शिल्लक ठेवला नव्हता त्याने... तिच्या शरीरावर ठिकठिकाणी घाव होते, खोलवर जखमा होत्या, भरून न निघणाऱ्या... ओठ सुजले होते, मानेवर आणि बऱ्याच ठिकाणी दातांचे ठसे उमटले होते. पलंगावरची चादर आणि अनिताचे शरीर रक्ताने माखले होते, एवढा विध्वंस प्रीतमने केला होता. मी जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकून अनिताकडे गेले, तिला ताप आला होता. शुद्धीतही नव्हती ती... मी तिथलीच एक चादर घेऊन तिच्या उघड्या शरीरावर झाकली. प्रीतमला काही बोलणार त्याआधी तुझी आजी तिथे आली. अनिताला पाहून तिथे काय घडलं, हे कळून चुकलं होतं तिला तरीही ती एक अक्षर बोलली नाही, तेच मला खटकलं. मी चिडले खूप त्यांच्यावर पण मलाच गप्प करण्यात आलं. तोपर्यंत डॉक्टर आले आणि अनिताची परिस्थिती गंभीर असल्याचं कळवलं, घरी उपचार होणार नाही असंही सांगितलं पण करंदीकर म्हणजे पंचक्रोशीत नावलौकिक असणारं कुटुंब, ती बातमी बाहेर आली तर अब्रू धुळीस मिळेल म्हणून तथाकथित वडिलधाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा विचार केला." साक्षीला मंजिरी जे बोलतेय ते सत्य आहे, ही कल्पनाही केली जात नव्हती पण आता ती सगळं ऐकणारच होती.
"माझ्या बडबडीचा परिणाम झाला नाही. उलट मी परकं धन आहे, मला करंदीकरांच्या घरगुती भानगडीत बोलण्याचा अधिकार नाही राहिला, असं सांगितलं गेलं. आईने शपथ घातली. आबांनी म्हणजे तुझ्या आजोबांनी लेकाला दोन कानाखाली मारल्या, कदाचित ते सुद्धा माझी दिशाभूल करण्यासाठी... कारण त्यांनीही शेवटी घराण्याच्या तथाकथित अब्रूचा विचार केला. थोड्याफार उपचाराने कशीबशी शुद्ध आली होती अनिताला तेवढ्या वेळात त्यांनी इतर पाहुण्यांना त्या खोलीत काय घडतंय याची कल्पना न देता अनिताच्या कुटुंबाला बोलवून घेतलं. अनिताच्या कुटुंबियांना सत्य परिस्थिती न सांगता त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यातून हे असं काही घडलं, असं सांगून लग्नाला मागणी घातली. अनिताची अवस्था पाहून जे घडलं त्यात तिची स्वेच्छा होती की अनिच्छा हे न कळायला तिचं कुटुंब मूर्ख नव्हतंच पण त्यांनी तोंड गप्प ठेवलं; कारण तिच्या कुटुंबात होतंच कोण— काका-काकू. असाही त्यांना तिचा जिव्हाळा नव्हताच. त्यात करंदीकरांशी सोयरीक म्हणजे कानेटकरांचा मान वाढणारच होता. शिवाय त्यांच्या दोन्ही मुलांचं शिक्षण आणि नोकरी तुझे आजोबा बघतील, असं वचन त्यांंनी दिलं. करंदीकरांचा शब्द म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. लगेच त्यांनी होकार दिला." जसजशी मंजिरी पैलू मांडत होती तसतशी साक्षीला तिची आई हळूहळू कळत होती.
"सगळ्यांनी आपसांत निर्णय घेतले पण अनिताला कुणी एका शब्दाने विचारले नाही. अनिताच्या शरीरावरील घाव भरताच तिचं नि प्रीतमचं लग्न करण्यात आलं पण त्या दिवसानंतर ती हसरी, खट्याळ, खोडकर, चंचल, बोलकी अनिता निर्विकार झाली. तिच्या मनाविरुद्ध सगळं घडत होतं पण कुणी तिला आक्रोश व्यक्त करण्याची सूटही दिली नाही. लग्नानंतरही प्रीतमने बळजबरी व्यतिरिक्त काहीच केलं नाही. केलेल्या कृत्याची माफी तर मागितली नाहीच पण ती या लग्नाला स्वीकारत नाहीये, याची जाण असल्याने अमानुष कृत्याची साखळी अविरत सुरू ठेवली. दिवसभर तुझी आजी टोमणे मारायची तिला. ती गरीब कुटुंबातली असल्याने कधीच आवडली नव्हती तुझ्या आजीला पण प्रीतममुळे तिला सून करावं लागलं होतं पण यातही लेकाची चूक न मानता अनिताने त्याला फूस लावली, असा तिचा दावा होता. दिवस आरोप ऐकण्यात सरायचा तर रात्रभर प्रीतम तिचं शारीरिक शोषण करायचा. त्यामुळे तीन महिने सरत नाही तेच तिला दिवस गेले पण..." बोलता बोलता मंजिरीचा आवाज कातर झाला व ती थांबली.
"पण...?" साक्षी पुटपुटली.
"पण तरी प्रीतम बदलला नाही. तिने फक्त त्याचा विचार करावा, त्याला स्वीकारून नात्याची खरी सुरुवात करावी, पूर्वीसारखं व्यक्त व्हावं, खळखळून हसावं या इच्छेपोटी तो वारंवार ती गरोदर असतानाही तिच्याशी शारीरिक संबंध जोडायचा. ती आधीच अर्धमेली झाली होती, त्यात रोजचा छळ... सात महिने झाले तर डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला मी एक आठवडा आधीच आले. अनिताची या निमित्ताने भेट घेता येईल असा हेतू होता; कारण इतर वेळी माहेरी येऊन तू तिला उगाच फूस लावू नको, असं बोलून तोंडावर दार बंद केलं होतं. डोहाळ जेवणाला आले तर अनिताची हालत आणखी खस्ता झालेली दिसली. त्यात काही घाव असे असतात की कितीही लपवले तरी लपत नाहीत. अनिताने सांगितलं नाही तरी मला सगळं कळलं होतं. प्रीतमला बडबड केली पण उपयोग झाला नाही. त्या रात्रीही त्याने तेच केले जे प्रत्येक रात्री तो करायचा. बऱ्याच वेळाने तो शांत होऊन पलंगावर आडवा झाला आणि ती कशीबशी सावरत उठायला गेली. त्यादिवशी त्रास असह्य झाला असावा म्हणून न्हाणीघरात जाण्याआधीच चक्कर येऊन पोटावर पडली. कितीही दुःख, यातना साठवून ती जगत असली तरी त्या रात्री त्या वेदना तिला सहन झाल्या नाही आणि ती जोरात रडू लागली." मंजिरी त्या क्षणी भावूक झाली आणि २५-२६ वर्ष जुना क्षण आठवून तिला आजही रडू कोसळले.
आता साक्षी पुरती हादरून गेली होती. सर्वकाही अनपेक्षित होते. कसे व्यक्त व्हावे कळेनासे झाले होते. कधीही ऐकीवात नसलेली इतिहासाची पाने तिच्यापुढे वाचली जात होती.
स्वतःला सावरत मंजिरी पुढे म्हणाली, "गेल्या काही महिन्यात प्रीतमने तिचा जराही आवाज ऐकला नव्हता. आज तिचा आवाज ऐकून त्याला लगेच जाग आली. तो तिच्या जवळ गेला. तिला त्या अवस्थेत बघून त्याचं हृदय पिळवटून निघालं. तोपर्यंत आवाज ऐकून मी, तुझे आजी-आजोबा तिथे आले आणि घरातील काही नोकर खोलीबाहेरच थांबले. खोलीची अवस्था बघून मला कळलं नक्की काय झालं आहे... मी लगेच अनिताजवळ गेले. तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत प्रीतमने तिला उचलून घेतलं व गाडीत बसून इस्पितळाकडे धाव घेतली. घरीच ती बेशुद्ध पडली होती. इस्पितळात डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले पण गरोदर असतानाही तिच्याशी शारीरिक संबंध जोडल्याने तिचा गर्भपात करावा लागला, असं स्पष्ट कळवलं पण पुत्र प्रेमाने व्यापलेली तुझी आजी सरळ अनितावर खापर फोडून मोकळी झाली. रात्रीच्या वेळी अनिता पलंगावरून उठलीच नसती तर पोटाच्या भारावर पडलीच नसती, असा मुद्दा छेडून तिने अनितालाच दूषण लावलं."
साक्षीच्या नजरेतले आदर्श, सुसंस्कृत, सभ्य असणारे करंदीकर घराणे नेमके कसे आहे, हे तिला आज कळत होते. त्यांचा वाडा, त्यांची इभ्रत अन्यायाच्या खांबावर उभी होती, हे तिला कळायला जरा उशीरच झाला. मनातच आईप्रती सहानुभूती तिला आताशः जाणवायला लागली होती.
क्रमशः
............
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
............
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा